महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
जाता पंढरीसी
आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी असे म्हणतात. या पंढरीचा आणि विठुरायाचा अनादी काळापासून अतूट संबंध आहे. संत मंडळींनी या पंढरपुर नगरीचे आणि विठुरायाचे स्थानमाहात्म्य आणि नाममाहात्म्य तोंड भरून गायले आहे.
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा।
आनंदें केशवा भेटतांचि।।१।।
या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं।
पाहिली शोधोनी अवघीं तीर्थे।।२।।
ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार।
ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठें।।३।।
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक।
ऐसा वेणुनादी काला दावा।।४।।
ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर।
ऐसा पाहतां निर्धार नाहीं कोठें।।५।।
सेना म्हणे खूण सांगितली संतीं।
यापरती विश्रांती न मिळे जीवा।।६।।
आज आषाढी एकादशी. देहूहून संत तुकारामांची, आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, पैठणहून संत एकनाथांची पालखी अशा सकल संतांच्या पालख्या आपापल्या दिंड्या घेऊन विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होणार. टाळांचा किनकिनाट होणार. मृदंगाचा नाद घुमणार. विठुरायाचा नामघोष होणार. आपापसातील भेदभाव विसरून भक्तजन मोरासारखे थुईथुई नाचणार. पताका फडफडणार. भक्तजन विठ्ठलाला भेटणार. सगळीकडे आनंदीआनंद होणार!
महाराष्ट्रात १३ व्या शतकात संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या प्रभावळीतील एक संत सेना महाराज होऊन गेले. थोर विठ्ठल भक्त. नाभिक समाजात जन्मलेले. त्यांनी मराठी भाषेत सुंदर अभंग रचना केलेल्या आहेत. त्यांचे मराठी भाषेत रचलेले एकूण १४३ अभंग सापडतात. त्यांच्या एका काव्यरचनेचा शिखांच्या ग्रंथसाहेब या धर्मग्रंथात समावेशही करण्यात आलेला आहे.
आम्ही वारीक वारीक। करूं हजामत बारीक।। असा संत सेना महाराजांचा समाधीपर अभंग प्रसिद्धच आहे. तसाच त्यांचा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा हाही विठ्ठलमाहात्म्यपर अभंग प्रसिद्धच आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्या गोड आवाजात हा अभंग आपण सर्वांनी ऐकलाच असेल.
संत सेना महाराज म्हणतात, पंढरपूरात गेल्यावर आनंदाने विठ्ठलाला भेटताच जिवाला सुख लाभते. स्वर्ग, मृत्यू, पाताळ अशा त्रिभुवनातली तीर्थक्षेत्रे शोधली तरी या (पंढरीच्या) सुखाला उपमा नाही. ते अनुपम्य आहे. येथे होणारा नामघोष, पताकांचे भार आणि असे विठ्ठलाचे पाईक (सेवक) अन्य कोठे सापडतील का? (या विठ्ठलाच्या पाईकांनाच संत तुकारामांनी वीर विठ्ठलाचे गाढे, कळिकाळ पायां पडे , कळिकाळसुध्दा या विठ्ठलाच्या पाईकांपुढे नतमस्तक होतो असे म्हटले आहे). असली चंद्रभागा नदी, असा पुंडलिक, बासरीचे मधुर स्वर ऐकत काला खाणारे गोपाळ अन्य कोठे सापडले तर दाखवा. (हा दहिकाला खाण्यासाठी स्वर्गीचे देवही लालायित होतात!). विटेवर उभा राहून हात आपल्या कटीवर ठेवून विठ्ठलाची आपला निर्धार व्यक्त करणारी मूर्ती अन्यत्र सापडणार नाही. संत सेना महाराज म्हणतात, येथल्यासारखी विश्रांती किंवा शांती आपल्या जिवाला दुसरीकडे कोठेही आढळणार नाही अशी संत मंडळींनी खूण सांगितली आहे. - नाना ढवळे