महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
म्हातारपण म्हणजे केवळ पैशांची सोय करुन ठेवणे नव्हे!
मुलांची साथ मिळत असली तरी स्वतःलाच स्वतःची तयारी करायची असते. कितीही संस्था ज्येष्ठांसाठी स्थापन होऊ दे, कितीही, सोई, सुविधा, योजना असू देत, पण जोपर्यंत स्वतःज्येष्ठ याबाबतीत आपली काळजी घेण्यास समर्थ होणार नाही, तोपर्यंत ते एकाकी, अगतिक बनत गेल्याची उदाहरणे दिसत राहतीलच. अगदी या प्रवासातही काय काय होऊ शकतं त्या सर्व गोष्टींचा विचार करून आपले प्लान काही कागदांवर नाही, मनात असायलाच हवे.
म्हातारपण म्हणजे फक्त पैशाची सोय करून भागत नाही. तर ते स्विकारण्याची फार मोठी मानसिक तयारी करावी लागते. काल अजय अनिता बगीच्यात फिरायला गेले. फिरून झाल्यावर एका बाकावर बसले. त्याच बाकावर एका बाजूला एक आजोबा बसले होते. थोडे अस्वस्थ होते. कागदाची पूडी उघडून वडापाव खात होते. निर्विकार, सुस्त, निराश चेहरा. अस्ताव्यस्त केस, कपडे.
अजय लहान असतानाच त्यांचे वडील गेले, आईने कष्ट करून सांभाळले .वडिलांचे प्रेम कसे असते, हे त्याने कधी अनुभवलेच नाही. आई काय करते? किंवा करू शकते हे त्याने बघीतले आहे. पण बाबा असते तर त्यांनी काय केले असते? किंवा मी बाबांसाठी काय केल असतं? हा विचार त्याच्या मनात नेहमी येतो.
वडापाव खाता खाता आजोबांना ठसका लागला, बहुतेक त्यांच्याजवळ पाणी नव्हते.
अजयने त्यांना पाणी दिले. पाठीवरून हात फिरवला. ठसका जबरदस्त होता. आजोबांचा जीव घाबराघुबरा झाला. घाम आला अजयने त्यांना विचारले, आजोबा कुठे राहता? मी पोहचवू का तुम्हाला घरी?
अजयने जवळच असलेल्या रिक्षाला बोलविले व आजोबांना घरी सोडले. घर नव्हे, चांगला बंगलाच होता. श्रीधर देशपांडे नावाची मोठ्ठी पाटी होती .दरवाजा त्यांनीच उघडला. अर्थातच घरात दुसरं कोणी नव्हतंच. घरात सर्व अस्तव्यस्त होतं. काहीच जागेवर नव्हतं. कितीतरी दिवसांत घराची स्वच्छता झालेली नाही, हे कळत होतं. म्हणजे ती समोरची खोली हॉल आहे, बेडरूम आहे की डायनिंग रूम आहे की स्टोअर रूम हे सांगता येणार नाही अशी अवस्था होती. समोर टेबलावर दोन तीन फोटो ठेवले होते. त्यांच्या बायकोचा आणि मुला सुनेचा असावा बहुतेक. एक आजोबांचा टाय सूटबूट मधला फोटो. एक प्रशस्तीपत्र पण ठेवले होते. एकंदरीत बरंच काही लक्षात आलं.
तेवढ्यात आजोबांनी छान अस्खलित इंग्रजीमध्ये आपल्या बद्दल सांगायला सुरुवात केली. क्लास वन अधिकारी, मुलगा अमेरिकेत स्थायिक. बायको दोन वर्षांपूर्वी गेली. बहुतेक खूप दिवसांनी कोणाबरोबर तरी बोलायला मिळाले असावे म्हणून किती बोलू आणि काय काय सांगू असं झालं होतं त्यांना. खरंतर त्या खोलीत बसणं कठीण होतं पण अजय अनिता बसले. आजोबा म्हणाले, श्रेया होती तेंव्हा घर खूप व्यवस्थित ठेवायची. मला तेवढं जमतं नाही. सांपत्तिक स्थिती उत्तम असावी. हे तर दिसत होतंच.
अजयने आपला फोन नंबर आजोबांना दिला. त्यांचा नंबरही त्यांच्या परवानगीनंतर घेतला. आम्ही जवळच राहतो. तुम्हाला कधी काही गरज लागली तर निःसंकोचपणे सांगा असं अजय म्हणाला. आम्ही फक्त शनिवार रविवारच सकाळी बगीच्यात फिरायला येतो असंही अजयने सांगितले. घरी आल्यावर अजय-अनिताच्या मनातून आजोबा हा विषय काही जात नव्हता. त्यांच्या घरातील अनेक संभावित प्रश्न त्या दोघांच्या मनात धुमाकूळ घालत होतें. बरं ! आता अंदाज तरी कसे आणि काय बांधायचे ? त्यांच्या आयुष्यात काय गुंतागुंत आहे, हे आपल्याला माहीत नाही. तेंव्हा कोणतेही अंदाज बांधणे चूकच. नाही का ?
खरंतर अजयला आजोबांना मदत करायची होती. पण खरं कळेपर्यंत ते तसं करणं बरोबर नाही, हेही समजत होतं. आज शनिवार अजय अनिता बागेत फिरायला निघणार, तेंव्हा अजय म्हणाला आज आपल्याला आजोबा भेटतील बहुतेक. अनिताने आजोबांसाठी दोन पराठे, भाजीचा डबा घेतला होता. भेटले तर, घेतला तर, देऊ.
आजोबा भेटले. खरंतर तेही अजय अनिताला शोधत होते. आज फिरणं थोडं कमीच झालं. अजय अनिता आणि आजोबा एका बेंचवर गप्पा मारत बसले. तेथेच अजय चहा घेऊन आला. आज अजयने स्वतःबद्दल थोडी माहिती आजोबांना सांगितली. आजकाल धोकेबाजी फसवणूकीचे प्रमाण खूप वाढले आहे. गैरसमज तर सहज लवकर होतात.
अनिता म्हणाली, आजोबा मी तुमच्यासाठी डबा आणला आहे .घ्याल का? आजोबांनी सहज घेतला.
हळूहळू शनिवार रविवारी भेटी होऊ लागल्या. दोस्ती झाली. हळूहळू बऱ्याच गोष्टी आजोबांच्या बोलण्यातून कळल्या. त्यांच्या मुलांबद्दल कळलं. एकच मुलगा नाव श्री अमेरिकेत स्थायिक आहे. दोन वर्षांपूर्वी आई गेल्यानंतर आला होता. त्यानंतर नाही. कधी कधी फोन करतो.
आजोबा म्हणाले अरे, माझी काही तक्रार नाही. श्रेयाशिवाय मलाच माझं आयुष्य मॅनेज करता येत नाहीये. एवढं मोठं घर सांभाळता येत नाहिये. ऑफिसमध्ये एका वेळेस दोन तीन मोठे मोठे प्रोजेक्ट्स मी सहज सांभाळत होतो. पण आयुष्य नावाच्या प्रोजेक्ट मध्ये मी पूर्णपणे श्रेयावर अवलंबून होतो. मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, ती माझ्या आधी मला सोडून जाईल. मी नापासच झालो.
मला चहासुद्धा करता येत नाही. नेहमी सर्व वेळेवर व्यवस्थित माझ्या आवडीनिवडीनुसार मला पन्नास वर्ष सर्व मिळत गेलं. त्याआधी आईच्या राज्यातही असंच होतं होतं. श्रेयाची वेळ आली आणि ती एका क्षणात निघून गेली आणि या एका क्षणात मी माझं पूर्ण आयुष्य गमावलं.
आजोबा म्हणाले, म्हातारपण म्हणजे फक्त पैशाची सोय करून भागत नाही. तर ते स्विकारण्याची फार मोठी मानसिक तयारी करावी लागते. हे सत्य मला समजेपर्यंत खूप उशीर झाला. मला ते जमत नाहिये.
अनिता म्हणाली, आजोबा एखाद्या मावशी ठेवा, डबा लावून घ्या. असं किती दिवस तुम्ही काढणार?
हळूहळू भेटी होत गेल्या. आजोबा मनाने खचले आहेत, हे अजयच्या लक्षात आलं. त्याला आजोबांना मदत करावी असं सारखं वाटत होतं. त्यांचे हे असं जगणं म्हणजे भयंकर परिस्थितीला आमंत्रण देण आहे .हे कळत होतं. उद्या काही झालं तर शेजारच्यांना पण कळणार नाही. निस्वार्थ मदतीचा अर्थ कसा घेतला जाईल ? हा प्रश्न तर होताच. आजकाल तर खरं बोललं तरी काही तरी स्वार्थ नक्की असेलच. असंच वाटतं. आजकाल म्हणतात ना.. सच मत बोलो, वरना लोक तुम्हे झूठा समझेंगे ।
अजय म्हणाला.. आजोबा मी काही मदत करू का? तुम्ही हो म्हणत असाल, तरच मी आधी तुमच्या मुलाची परमिशन घेऊन हे काम करेन.
एव्हाना आजोबांना अजय अनिताची सवय झाली होती. त्यांनी श्रीचा नंबर ईमेल ॲड्ड्रेस दिला.मेल, फोन झाल्यावर एकदा व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सर्व गोष्टी अजयने श्रीला आजोबांसमोरच सांगितल्या. घर दाखविले. त्यांची एकंदर परिस्थिती बघता अनेक गोष्टी करणं आवश्यक आहे हे श्रीच्या लक्षात आलं. अजय अनिताने हे मनावर घेतलं आणि एजंेंसीकडून घराची सर्वंागीण स्वच्छता करून घेतली. आजोबांना सलूनमध्ये नेऊन त्यांची कटींग, इतर स्वच्छता झाली. स्वयंपाकाला अनिताच्याच मावशी येऊ लागल्या. एकंदर परिस्थिती बदलली.
एका चांगल्या घरात पन्नास वर्ष आनंदी संसार केल्यानंतर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात हे सर्व का घडलं ?
खरंतर आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर जबाबदारी, निर्णय वेगळे असतात. त्याची तयार आपण करतो. मग आयुष्यात या शेवटच्या टप्प्यावर काही गोष्टी /सत्य मान्य करायच्याच असतात. धरून ठेवल्या तर आयुष्याचा पसारा व्हायला वेळ लागत नाही, याचा विचार करणंही आवश्यक आहे ना. आज प्रत्येक चौथ्या घरी दोघं जेष्ठ किंवा काही घरी तर एकटेच जेष्ठ आहेत. मग ते पुरुष असो, नाहीतर स्त्री. समोर येणाऱ्या प्रत्येक घटनेला सामोरे जावेच लागेल. प्रकृतीचा निर्णय मानावाच लागेल. नाहीतर समोर येणाऱ्या प्रत्येक दुःखावर आपण स्वतःच सही करत राहतो.
आज अजय अनितासारखे किती प्रामाणिक लोक असतील जे प्रसंगी लोकापवाद सहन करुन तुमच्या मदतीला येतील? मुलांची साथ मिळत असला तरी स्वतःलाच स्वतःची तयारी करायची असते.
कितीही संस्था ज्येष्ठांसाठी स्थापन होऊ दे, कितीही, सोई, सुविधा, योजना असू देत, पण जोपर्यंत स्वतः ज्येष्ठ याबाबतीत आपली काळजी घेण्यास समर्थ होणार नाही, तोपर्यंत अशी उदाहरणे दिसत राहतीलच. अगदी या प्रवासातही काय काय होऊ शकतं त्या सर्व गोष्टींचा विचार करून आपले प्लान काही कागदांवर नाही, मनात असायलाच हवे. काही मित्र, दोस्त, छंद हवेतच.नाही का? जसे आपण दहा दिवसांच्या टूरवर जाताना तयारी करतो ना, अगदी तसंच किंबहुना त्यापेक्षा जास्त. प्रकृतीचा एक नियम हेपण शिकवतो की सुर्यास्त इस बात का प्रमाण है की अंत भी सुंदर हो सकता है। -संध्या बेडेकर