महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
कवयित्रिच्या नवकल्पनांची ओटी : सखी कवितासंग्रह
भरारी प्रकाशनचा कवयित्री निशा वर्तक यांचा सखी हा काव्यसंग्रह कोरोनात गेलेल्या आपल्या प्रिय बहिणीला म्हणजे आशाताईस अर्पण केलेला आहे. जात्याच कवितेबद्दलची आवड असलेली ही कवयित्री भावस्पर्शी व लयबद्ध कविता लिहिते. सखी या संग्रहातील सर्वच कवितांमधून कवयित्रीचे रसिक व संवेदनशील मन लक्षात येते; म्हणूनच तिच्या कविता सहजशैलीत वाचकांसमोर येतात.
कवयित्रीला सरस्वतीचे वरदान लाभलेले आहे म्हणूनच तिच्या काव्यसंग्रहात हे शब्दांचे दान पडत आहे! तिला शब्दांचे दान आहे तसेच शब्दांचे भानही आहे म्हणूनच ती मुक्तछंद, छंदबद्ध, वृत्तबद्ध, अभंग, ओवी, इत्यादी प्रकारात काव्यरचना करू शकते काही रचना या गझलतंत्रातील कविता आहेत. कवयित्रीची नाळ निसर्गाशी जुळलेली आहे म्हणूनच निसर्गातील ‘बकुळी' तिला बालपणीची सखीच वाटते. वाटेने जाता-येता वळणावर तिला बकुळी भेटते. कवयित्री म्हणते, ‘मला पाहताच बकुळी आनंदाने सळसळते आणि बकुळीला भेटताच माझीही कळी उमलून येते!' निसर्गवर्णनपर, ऋतुवर्णनपर इतरही अनेक कविता प्रस्तुत संग्रहात आहेत उदाहरणार्थः ऋतुराज (पृष्ठ २०) मध्ये,
पानगळीचा शिशिर संपला
मनीमानसी वसंत फुलला
ऋतुराज दशदिशी प्रगटला
मनपसंत हा वसंत आला
वसंत ऋतूचे असे वर्णन करताना पुढे ती म्हणते,
आम्रतरू बहरुनी डवरला
मधुर गंधी पवन झिंगला
कोकीळ कवीने तान घेतली
साद सख्याला गोड घातली!
आम्रवृक्षाचे बहरणे, कोकीळपक्ष्याचे साद घालणे, त्यापुढे मधुमालतीचं रंगीत तोरण, शरदाचं चांदणं, पलाशाचं फुलणं, ही वसंताची वैशिष्ट्ये कवयित्री चपखलतेने शब्दबद्ध करते. पिवळ्या बहाव्याची झुलणारी फुले तिला अंबरी टांगलेली झुंबरंच वाटतात! हा वसंत कवयित्रीला ‘सौंदर्याचा जादूगार' वाटतो. पृ ६० तसेच वसंतबहार पृ.६१ वरही ही वर्णने थोड्या फरकाने आढळून येतात. चैतन्य पहाट (पृ. २८), पहाट वारा (पृ. ३८), गर्जत आल्या जलधारा (पृ. ४१), प्राजक्त (पृ. ४५), ओढ मातीची (पृ. ५०), पाऊस किती हा छळतो (पृ. ५३), नवीन वाटा (पृ. ५४), गंध मोगऱ्याचा (पृ. ५५), या आणखी काही निसर्गवर्णनपर कविता. ‘आला श्रावण' (पृ. ५७), आणि ‘श्रावणघन' (पृ.६४), तसेच ‘सांजसोहळा' (पृ.६२),‘सांजरंग' (पृष्ठ ७०) या कवितांतही विषयसाधर्म्यामुळे कल्पना, शब्द यांची पुनरुक्ती येणं स्वाभाविक आहे परंतु निशाजी कल्पकतेने शब्दरचना करून वाचकाला भावणारी नवीनच कविता वाचकासमोर आणतात. आला श्रावण ही कविता श्रावणातील निसर्ग सौंदर्याचे, सुखद बदलाचं वर्णन अगदी लयबद्ध वृत्तरचनेत आले आहे. ती वाचताना वाचक नकळत ती गुणगुणू लागतो. बालकवींची ‘श्रावणमासी' प्रमाणे ही कविता सुप्रसिद्ध होईल इतकी सुंदर झालीय.
‘आई' म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातला महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा विषय. आपला पहिला गुरू म्हणजे आई. ती आपल्याला वळण लावते. कवयित्री ही तिच्या आईला समईच्या ज्योतीत, देवाच्या प्रेमळ डोळ्यात, फुलांच्या सुगंधात, तुळशीच्या मंजिरीत, झाड, पान, वारा अशा विविध ठिकाणी पाहते. गोधडीत तिला आईच्या ऊबदार स्पर्शाचा भास होतो. इतकेच नव्हे तर ती म्हणते, ‘आई शिकवणुकीत अन संस्कारातून सतत माझ्याजवळच आहे!'( पृ.१८)
विठूमाऊलीवरील अभंग श्री संतश्रेष्ठांच्या अभंगपंक्तीत बसणारा आहे. (पृ.६६)
आषाढ दारात । विठ्ठल मनात
पूजिते घरात माऊलीला ।।
विठू रखुमाई माझे मायबाप ।
शमविती ताप संसाराचा ।।
वाचनाचे महत्त्व पटवून देताना कवयित्री लिहिते, नको घालू वाया । क्षण अनमोल ।
वाचनाचे मोल । जाणुनी घे ।।
येथे ‘प्रसंगी अखंडित वाचीत जावे' हा श्री संत रामदास स्वामींच्या बोधपर ओळी आठवल्याशिवाय राहत नाहीत. कवयित्रीच्या संवेदनशील मनाची कल्पना, युद्ध नको (पृ. ५८), युद्धाचा फोलपणा (पृ.५९) या कवितांमधून आपल्याला येते. ती माणसालाच प्रश्न विचारते, होतो युद्धाचा शेवट
रक्त आप्तांचे सांडते
युगे युगे हेच घडे
काय शेवटी उरते?
...फोलपणा हा युद्धाचा
सांग कळणार कधी?
खरंच ‘माणसाला युद्ध नको' हे कळेल तो सुदिन असेल.
माणूस समाजप्रिय प्राणी आहे. हा समाज आपल्याला भरभरून देत असतो; आपण त्याचे ऋण फेडले पाहिजेत याबाबत कवयित्री म्हणते,
मीही लागतो की काही समाजाचे देणे
पण मला माहीत आहे फक्त घेणे!
आता मी ठरवलंय, ‘स्वतःला बदलायचेच..
अन् स्वतःबरोबर इतरांनाही घडवायचे!
‘देण्यात असतं एक वेगळंच सुख'
‘लागावी मला देण्याचीच भूक'
‘खूप काही घेतलंय मी समाजाकडून'
‘ऋण फेडू दे थोडं तरी थोडं काही देऊन!'
समाजाप्रति कृतज्ञतेचा भाव हा महत्त्वाचा आहे! सुखाची आणि भूकेची परिभाषा देण्याच्या वृत्तीतून कवयित्री अशी सीमित पण सोप्या शब्दांतून सकारात्मकतेने मांडते.
शब्द जपून वापरावेत, दुसऱ्याला आपण कठोर, वाईट बोलून दुखवू नये. कवयित्री सांगते,
नको नको रे अशी जिभेला धार नको जागोजागी शब्दांचा हा वार नको (पृ.८६)
‘सांगायचे बोलायचे होते किती सारे जरी'
‘वेड्या मनाचे आजही वेडे किती पण राहिले' (पृ.९६)
आ. सुरेश भटसाहेबांचा प्रभाव असलेले असे काही शेर निशाजी सहज लिहून जातात.
जीवनाचा गाडा चालवण्यासाठीमाणूस दिवसभर धडपड करतो नव्या नव्या कसरती करतोतसेच स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी या धडपडीतो पुन्हा पुन्हा करीत असतो.
निशाजी हेच खालील शब्दांत मांडतात,
‘किती धडपडे पुन्हा तरी उठे'
‘किती करत असे नव्या कसरती'
कोवळ्या वयांच्या मुलींवर होत असलेल्या अन्यायाने कवयित्री व्यथित होते आणि संवेदनशीलतेने लिहिते,
मुक्या कोवळ्या कळ्यांचा किती वेलीस भार आहे
फुलण्याआधीच त्या कळ्यांचा काळा व्यापार आहे (पृ.९२)
मुलींनाही अभिव्यक्तिसाठी, विकासासाठी मुक्त अवकाश हवे असते पण ते सर्वत्र मिळते का..?
वेड्या खुळ्या कळीलाही नाद उमलण्याचा
नाजूक अशा फुलाला तोडायचे कशाला?(पृ. ८८)
असे शेर समाजातील विदारक वास्तव उघड करून आपल्याला अंतर्मुख करतात.
प्रस्तुत संग्रहात गझल तंत्रातील अनेक कविता या उत्तम गझल होऊ शकतात. निशाजी, ‘वो दिन भी दूर नहीं ।' आगामी काळात गझलसंग्रह नक्की येईल ही आशा अन अपेक्षाही!
ती कधीही येते
मला कवटाळून घेते
नवकल्पनांनी ओटी माझी भरते
अमृताचे थेंब ओठी लावून येते!
असे कवितेच्या निर्मितीबद्दल लिहिणाऱ्या या कवयित्रीची नवनवीन कल्पनांनी ओटी नित्य भरलेली राहो. कवितारूपी अमृत नित्य ओठावरती राहो; शिवाय
‘ध्याना मनात हृदयात वास कवितेचा
दिवसा रात्री सदाच तास कवितेचा' (पृ.९८)
असेच होवो आणि आपल्याला तिच्या अधिकाधिक कवितांचा आनंद मिळो ह्याच मनःपूर्वक शुभेच्छा!
खिडकीजवळ शांत कोपऱ्यात बसून वाचनव्यग्र पुरंध्रीचं समर्पक चित्र मुखपृष्ठाला सजीव, आकर्षक आणि वाचनास उद्युक्त करते. निशाजींची कन्या नेहा वर्तक-शर्मा यांनी ते कल्पकतेने साकारले आहे. तसेच सुप्रसिद्ध गझलकार सदानंद डबीरसाहेबांची समर्पक, उत्साहवर्धक व प्रेरक अशी प्रस्तावना आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिका माधवीताई कुंटे यांचं आशीर्वादपर, प्रेरणादायी पाठराखण (ब्लर्ब) लाभलेली आहे. सखी हा काव्यसंग्रह रसिकाला नक्की आनंद देईल असाच आहे...हार्दिक अभिनंदन निशाजी!
सखी (कवितासंग्रह) कवयित्री - निशा वर्तक
भरारी प्रकाशन - प्रकाशिका लता गुठे पृष्ठे - १००मूल्य - १५०
-पुष्पा कोल्हे