महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
युद्धाय कृतनिश्चय
एके काळी आसामी तरुणांना काही विघटनवादी शक्ती भारतापासून तोडू पहात होत्या. अशा परिस्थितीमध्ये आसामचा एक तरुण भारतमातेच्या रक्षणार्थ प्राणांची आहुती देतो...कारगिल युद्धातला पहिला आसामी सैन्याधिकारी ठरतो...ही बाब आसामी तरुणांमध्ये देशाभिमान जागृत करण्यात कारणीभूत ठरली! या हुतात्मा तरुण अधिका-याचं गाव जणू तीर्थक्षेत्र बनले...आणि तो सर्वांचा आदर्श. लवलीना बोर्गेहेन तिच्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय लढतीआधी या हुतात्म्याचे स्मरण करते आणि मगच लढायला उतरते! कोण होता हा वीर?
लवलीना बोर्गेहेन, भारताची महिला मुष्टीयोद्धा टोक्यो,जपान येथे २०२० मध्ये सुरु असलेल्या कांस्य पदकाच्या लढतीसाठी रिंगमध्ये सज्ज होण्याआधी हात जोडते, डोळे मिटते आणि एका वीराचे स्मरण करते...आणि मग मोठ्या त्वेषाने प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण करते...आणि आपल्या देशासाठी...भारतासाठी जिंकते!
एका संपूर्ण तरुण पिढीला आपल्या पराक्रमाने भारावून टाकणारा, जिंकण्याची उमेद, जिद्द जागवणारा हा वीर कोण होता हे देशाने समजावून घेतले पाहिजे!
२१ नोव्हेंबर,१९७० रोजी भारतीय वायूदलात पलाइंग ऑफिसर या पदावर देशसेवा केलेले श्री.थोगीराम गोगोई आणि श्रीमती दुलुप्रभा गोगोई यांच्या पोटी जिंतू यांचा जन्म झाला..यानंतर अवघे २८ वर्षांचे आयुष्य लाभले या मुलाला. पण मरण अमर करून गेला हा पोरगा!
जिंतू बालपणापासूनच सैन्यात जाण्याची स्वप्ने रंगवत असे...आणि त्याने तशी तयारीही केली. पदवीधर झाल्यानंतर ९ मे, १९९४ रोजी जिंतू ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी,चेन्नई येथे निवडले गेले आणि प्रचंड कठीण प्रशिक्षणाच्या यशस्वी सांगतेनंतर ११ मार्च, १९९५ मध्ये गढवाल रायफल्सच्या १७ व्या बटालियनमध्ये रुजू झाले.
वर्ष १९९९. मे महिना. जिंतूसाहेबांसाठी आई-बाबांनी एक मुलगी पसंत केली आणि मोठ्या आनंदाने विवाहनिश्चय झाला...आणि त्याचदरम्यान कारगिल युद्ध पेटले. जिंतू साहेब दीर्घ सुट्टीवर आले होते...पण त्वरीत माघारी फिरले..सीमेवर. जुबार टेकड्यांवर पश्चिमी बाजूला पाकिस्तानी घुसखोर सैनिक मोर्चे लावून बसले होते...बटालिक सेक्टर मधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ त्यांच्या टप्प्यात होता..त्यामुळे भारतीय फौजांची मोठीच कोंडी झालेली होती.
२९ जून १९९९ रोजी कॅप्टन जिंतू गोगोई साहेबांनी त्यांच्या तुकडीचे नेतृत्व हाती घेतले. शत्रूवर हल्ला करून त्यांना तेथून पळवून लावण्यासाठी अनेक तुकड्या पुढे सरसावत होत्या....उंचच्या उंच डोंगर,काही ठिकाणी बर्फ, खोल दऱ्या. तर काही ठिकाणी एकदम सपाट जागा. शत्रूला आपल्या सैनिकांचा अचूक ठावठिकाणा दिसत होता...त्यामुळे ते अगदी आरामात आपल्यावर गोळीबार करू शकत होते. यांतील जिंतू साहेबांची तुकडी मात्र शत्रूच्या नजरेआड होती...याचाच फायदा घेत जिंतू साहेबांनी रात्रीच्या अंधारात पहाड चढून जाऊन शत्रूला घेराण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला...थोडेथोडके नाही...सुमारे एक किलोमीटर एवढे अंतर चढून पार करायचे होते..भयाण अंधारात! पाय घसरला की मृत्यू अटळ. शत्रूने हालचाल पाहिली तर मग खेळच संपला...त्यांच्या गोळ्यांना सामोरे जावे लागणार!
या जागेचे नाव...काला पत्थर...नावासारखाच काला आणि जिंकायला अवघड. शत्रूच्या ठाण्याच्या अगदी समीप पोहोचायचा अवकाश...शत्रूने त्यांना पाहिले आणि सर्व बाजूंनी घेरले! कित्येक लांडगे...चावे घ्यायला सज्ज होतेच. आणि मग सुरु झाले मृत्यूचे तांडव. जिंतू साहेब सर्वांच्या अग्रस्थानी होते. आता माघारी फिरता कामा नये...मारता मारता मरू! त्यांनी निश्चय केला.
गढवाली भाषेत लहान भावांना ‘भुल्ला' असे संबोधतात...नीडर, शूर आणि देशसेवेप्रती एकनिष्ठ. हे लहानगे भाऊ मोठ्या शत्रूच्या समाचारास पुढे सरसावले!
त्यांचा आसामी सैन्याधिकारी सर्वांपेक्षा मोठ्याने गढवाली देवाला साकडे घालीत पुढे निघाला...बोल बद्री विशाल लाल की जय! समोरासमोरच्या लढाईमध्ये एकास चार गुणोत्तर किती कठीण. जिंतू साहेबांनी समोर आलेल्या दोघा घुसखोरांना हातघाईच्या लढाईत यमसदनी धाडले खरे...पण एकाच्या मशीनगन मधील फवा-यातून निघालेल्या कित्येक गोळ्या साहेबांच्या पोटात घुसल्या...पोटातल्या या भागाला सोलर प्लेक्सस म्हणतात वैद्यकीय भाषेत. आणि याच ठिकाणी शरीरातील तिसरे चक्र असते असे म्हणतात...याला मणिपूर चक्र म्हणतात...शक्ती, आत्मविश्वास आणि दृढ संकल्पाचे स्थान. जिंतू यांचे हे चक्र अत्यंत शक्तीशाली. त्यांनी प्रचंड जखमी अवस्थेतही आक्रमण जारी ठेवले...११ सोबती धारातीर्थी पडले तरीही हार मानली नाही...शेवटच्या क्षणापर्यंत. शत्रूच्या ठाण्यापासून केवळ १५० हातांवर त्यांचा देह पडला...त्यांना शेवटपर्यंत जिंकत जायचे होते..पण नियतीला ते बहुदा मंजूर नसावे. नाईक शिव सिंग, लान्स नाईक मदन सिंग, लान्स नाईक देवेंद्र प्रसाद, लान्स निक दिनेश दत्त, रायफलमन बिरेंद्र लाल, अमित नेगी, विजय सिंग, जे.एस.भंडारी, रणजीत सिंग, एस.सी.सती आणि भगवान सिंग....यांनी देह ठेवले! परंतु या सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याच्या मना आणखी भय मात्र कोरून ठेवले...त्यामुळे पुढील काही दिवसांतच भारतीय फौजेने नव्याने हल्ले चढवत शत्रूला मागे हटवले.
कारगिल संघर्षात धारातीर्थी पडलेले बहुतेक सर्वच सैनिक, अधिकारी हे नव्या पिढीतील होते...एक मोठे नुकसान झाले यात भारताचे. कॅप्टन विक्रम बात्रा यांची कामगिरी सर्वांना माहिती झाली. परंतु जिंतू गोगोई यांचे नाव त्या गदारोळात काहीसे मागे पडले असावे. देशाला खरे तर हे सर्वच वीर माहीत करून द्यायला पाहिजेत.
कॅप्टन जिंतू गोगोई साहेबांना मरणोत्तर वीर चक्राने सन्मानित करण्यात आले!
३० जून रोजीच्या स्मरणदिनी संपूर्ण देश जिंतू साहेबांच्या पराक्रमाची गाथा स्मरतो आहे! जय हिंद..जिंतू साहेब! आप अमर हो! -संभाजी बबन गायके