अवतीभवतीच्या मनोवेधक गोष्टी

सुहास मळेकर यांचे नाव त्यांच्या ‘चल बस, एक राऊंड मारून येऊ'  या मार्च २०१९ साली प्रसिद्ध झालेल्या ललित लेखांच्या संग्रहापासून मराठी वाचकांना परिचित आहे. या संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाचे औचित्य साधून त्यांचा ‘अवतीभवती सदरच्या गोष्टी' हा दुसरा ललित लेखसंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. पेशाने फोटोग्राफर असलेल्या मळेकरांना साहित्यातसुद्धा रुची असल्याने ते बऱ्याच नियतकालिकातून नियमितपणे लिहीत असतात. मागील वर्षी दैनिक सामनामध्ये लिहिलेल्या सदरातील लेखांचे संकलन म्हणजे हे पुस्तक.

या संग्रहात एकूण पंचेचाळीस लेख/कथा आहेत. लेखकाने अनेक छोटेछोटे आणि साधेसाधे प्रसंग निवडलेले आहेत. एकदा एक प्रसंग निवडला की त्यातील बारकावे आणि सूक्ष्म तपशील लेखक अत्यन्त सफाईदारपणे वर्णन करतो. वाचकाला लेख पुढे वाचायला उद्युक्त करतो. भोवताली घडलेला प्रसंग हुबेहूब वर्णन करत आपल्यासमोर ते उभा करतात. त्यांच्या बहुतेक लेखांमधून काही ना काही संदेश ते आपल्याला देत असतात, ही फार मोठी गोष्ट आहे. बोधप्रद आणिसंस्कारक्षम असं हे लिखाण आहे. कल्पना राणे यांनी प्रस्तावनेत म्हंटल्याप्रमाणे, ‘यातील प्रत्येक लेख म्हणजे एक स्वतंत्र तत्वज्ञान आहे. विचारसंबोधन आहे' या वाक्याचा प्रत्यय वाचताना येतो. आपलं लक्षही जाणार नाही अशा छोट्याछोट्या आणि साध्या प्रसंगातून कथाबीज निवडून ते कथा/लेख सजवतात. या दुर्लाक्षित प्रसंगातूनच काही संस्कार, कुठलाही आव न आणता ते सहजपणे देतात. ना कुठली पोज ना कुठला आव. रोजच्या जीवनातील प्रसंग, अलंकाररहित साधी सोपी भाषाशैली हे या संग्रहाचे लोभस वैशिष्ठय. आणखी एक वैशिष्ठय म्हणजे बहुतांशी ललितबंधातून जाणवणारे धक्कातंत्र. लेखाच्या शेवटी ते एक धक्का किंवा कलाटणी देतात. ढ मुलगा (पान २०), डेंजर भाई (पान १२५), चाफा (पान ३१) इत्यादी लेखांमधून याचा सुखद आणि शीतल प्रत्यय येतो. ‘चाफा' मधून लेखकाची समाजाप्रती असलेली कणव देखील प्रत्ययास येते.

धाकावर जगणारी जुनी पिढी आणि अकालीच सर्वज्ञान मिळवलेली आजची पिढी पहिली की लेखक अस्वस्थ होतो. (पान ४९ कालथा) वसा (पान ५१) मध्ये दोन पिढ्यांच्या बापाची गोष्ट ते सांगतात. परिस्थितीला न घाबरता खंबीरपणे सामोरं जाण्याचा धडा या लेखातून मिळतो. श्रीमंती (पान ८२ ) या लेखात माणसं जमवणं हीच खरी श्रीमंती आहे, हा फार मोठा विचार ते सांगतात. बुटाच्या तळव्यापासून ते बटाटेवडेवाल्याच्या टपरीपर्यंत त्यांची सर्जक नजर आणि तीक्ष्ण निरीक्षणशक्ती पोहोचते. मग निर्माण होतात बुटाचा तळवा (१२७) आणि बालाचा वडा (पान १२३) हे लेख. नियती आपल्याशी कसे अनपेक्षित खेळ खेळत असते याची ते जाणीव करून देतात. म्हातारपण तुम्हाला उघडं पाडतं या लेखात(पान ११०) या लेखात म्हातारपणी माणसाने कसे वागू नये याची शिकवण लेखक आपल्याला देतो. व्यवसायाने यशस्वी फोटोग्राफर असलेल्या लेखकालाच तो म्हातारा मी तुझ्यापेक्षा चांगले फोटो काढतो असं म्हणतो. लेखकाचं सुसंस्कारित मन त्याच्यावर नाराज होण्याऐवजी त्याची कीव करतं. अशा एक ना अनेक कथा. इथे दैनिक सामनाच्या फिचर एडिटर कल्पना राणे यांचा उल्लेख करणं जरुरी आहे. एका गुणी लेखकाला सामनासारखे लोकप्रिय व्यासपीठ वर्षभर उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या गुणग्राहकतेला सलाम. मळेकर यानी अनेकमोठ्या नियतकालिकात यापूर्वी लिखाण केले आहे. संग्रहाच्या जातकुळीशी संलग्न असे मुखपृष्ठ शैलेश सावंत भोसले या प्रसिद्ध चित्रकाराने रेखाटले आहे. एकंदरीत भोवताल आणि निळ्या रंगाची पार्श्वभूमी नेत्रसुखद. संवेदना प्रकाशनचे श्री. नितीन हिरवे यांनी हे पुस्तक त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसे असे देखणे काढले आहे. या लिखाणाला कथा म्हणायचं ललित म्हणायचं की ललितबंध म्हणायचं? हा प्रश्नच आहे. पण हा झाला विद्यापीठीय प्रश्न. या तिन्ही लेखनप्रकारातील वैशिष्ठे मात्र या पुस्तकातील लिखाणात ठासून भरलेली आहेत, याचा अनुभव मी वाचताना घेतलेला आहे. या संग्रहातील लेखकाच्या प्रतिभेचा आवाका भविष्यात त्याला लोकप्रिय कथाकाराकडे नेऊ शकतो. त्याच्याकडून अधिक चिंतनशील,भावगर्भ आणि वाङ्‌मयीन मूल्य असलेली निर्मिती होईल अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

अवतीभोवती सदरच्या गोष्टी -  कथासंग्रह
संवेदना प्रकाशन  पाने १२८  मूल्य रुपये २५०/-
अशोक गुप्ते 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

हरी पालख्या भिजवून गेल्या