महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
पावसाळा....आणि स्मृतिगंध
पावसाळ्याबद्दल अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया असतात. कित्येक शहरी, धुवट मानसिकतेच्या लोकांना पाऊस, धबधबे, चिखल, पूर, नदी-समुद्राचे रौद्र रुप, हिरवाई, पागोळ्या, रानवाटा यातले काहीच आवडत नाही. पण जीवन म्हणजे पाणी व पाणी म्हणजे पावसाचे पृथ्वीवर अवतरलेले स्थिर-अस्थिर रुप! त्या पावसाच्या, त्या पावसाळ्याच्या तिटकाऱ्याची कल्पना चुकूनही मनाला शिवू नये. तो अनेक उत्पात हा पाऊस घडवत असला तरी...!
१ जुलैच्या भल्या सकाळची गोष्ट. अंथरुणातून बाहेर येण्याआधीचा तो वखत. उठावंसं वाटतंय.. पण तरीही अंथरुणातून निघावंसं वाटत नाही अशा द्विधा मनस्थितीचा तो संधीकाल. तेवढ्यात मोबाईलने आवाज दिला. कॉल करणाऱ्याचे नाव स्क्रीनवर झळकले आणि मी ताडकन उठून बसलो आणि विचारता झालो...‘बोला सर...कसे आहात?' समोरच्या व्यक्तीने सांगितले की.. ‘मी बरा आहे. तुम्ही कसे आहात? मी आजच्या महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीमध्ये रिक्षावाल्याच्या प्रामाणिकपणाबद्दल आपुलकीने लिहीलेला तुमचा लेख वाचला व लगेच कळवावंसं वाटलं म्हणून खास फोन केला.' मी आवाजात जमेल तेवढी नम्रता आणत म्हणालो की ‘सर, खूप बरं वाटलं की इतक्या दिवसांनी तुम्ही आठवणीने फोन केलात म्हणून. मधल्या काळात माझा मोबाईल फॉर्मॅट झाल्याने त्यातून अनेक नावे, त्यांचे संपर्क डिलिट झाले होते. ज्यांचे ज्यांचे जसजसे कॉल्स येताहेत तसे मी त्यांचे नंबर सेव्ह करतोय. सर, तुम्हाला एकदा नवी मुंबईत यायचे आहे व आमच्या स्टुडिओत मुलाखत द्यायची आहे.' त्यावर ते म्हणाले...''नो फॉर्म्यालिटीज. मी नवी मुंबईतील विविध शिक्षण संस्थांमध्ये व्हिजिटच्या निमित्ताने येत असतो. सहज एकदा तुमच्याकडेही येऊन जाईन."
हल्ली आपण सरावाने, आदराने अनेकांना ‘सर' म्हणून संबोधत असतो. पण हा जो मला कॉल आला होता ते करणारे खरोखरच माझ्या महाविद्यालयीन जीवनातले ‘सर', माझे गुरुवर्य होते डॉ.प्रा.श्री मुरलीधर कुऱ्हाडे. बारावी, प्रथम-द्वितीय वर्ष बी.ए.करताना उल्हासनगरच्या आर. के. तलरेजा महाविद्यालयात ते आम्हाला मानसशास्त्र हा विषय शिकवायचे. सर त्याच महाविद्यालयातील स्टाफ ववार्टर्समध्ये राहात असत. पदवी अभ्यासक्रमाच्या वर्षात मात्र मानसशास्त्र हा विषय त्या महाविद्यालयात नव्हता. तो करण्यासाठी मी डोंबिवलीच्या के. वि. पेंढारकर महाविद्यालयातून मानसशास्त्रात बी ए करुन पुढे एम ए साठी ठाणे जिल्ह्यात कुठेच मानसशास्त्र शिकवणारे महाविद्यालय त्या काळी नसल्याने विषय बदलला व मराठी साहित्य घेत पुन्हा आर के तलरेजा महाविद्यालयात परतलो. त्यामुळे प्रा. कुऱ्हाडे यांच्याशी भेटी-गाठी चर्चा होतच राहिल्या. सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा तो सारा पट माझ्या डोळ्यांसमोर या निमित्ताने पुन्हा झळकला. मधल्या काळात प्रा.कुऱ्हाडे सर एकदा वाशी येथे माझ्या घरी येऊन गेले होते.
पावसाळ्याचा हा सारा काळ माझ्यासाठी संमिश्र भावभावनांचे तरंग, वादळ उठवणारा काळ आहे. सरांनी जो ‘महाराष्ट्र टाइम्स' वाचून मला फोन केला होता, त्याच दैनिकात मी ‘दुःखाच्या सूरांचा पाऊस' या ३१ जुलै २००५ रोजी प्रसिध्द झालेल्या लेखात माझे मोठे मेहुणे १९८६ साली उल्हास नदीला आलेल्या पूरात त्यांनी स्वकष्टाने उभारलेल्या गॅरेजमधील महागडी यंत्रसामग्री पाण्यात वाहुन जाऊ नये म्हणून प्रयत्न करण्याच्या भरात तेच स्वतः जखमी होऊन त्या नदीत वाहुन गेले होते व त्यांचा मृतदेह तीन दिवसांनी तेथून दूर अंतरावर बिर्ला कॉलेजच्या मागील नदीपात्रात कसा सापडला होता याची आजपासून सुमारे एकोणचाळीस वर्षांपूर्वीची ती करुण कहाणी वर्णन केली होती. तेथे सुमारे तीन तास बसून त्या मृतदेहाची राखण फायर ब्रिगेड, शववाहिका येइपर्यंत मी एकट्याने कशी केली ते लिहिले होते. त्याच ‘महाराष्ट्र टाइम्स'साठी पुढे जाऊन मी अनेक सदरे, बातम्या, लेख, मुलाखती लिहिन आणि मग अनेक ज्ञात-अज्ञात वाचकांप्रमाणेच माझे एकेकाळचे शाळा-महाविद्यालयीन सोबती, तत्कालिन प्राध्यापक ते वाचतील असे त्या पाण्यात थांबून तो मृतदेह राखताना कधीच माझ्या मनात आले नव्हते. पण ते प्रत्यक्षात घडले खरे! ‘महाराष्ट्र टाइम्स'ने ‘लाईक ॲण्ड शेअर' हे प्रचंड वाचक-लेखकप्रिय सदर सुरु केल्यापासून माझे आजवर त्यात पन्नासच्या आसपास विविध लघुलेख प्रसिध्द झाले असतील. २००८ च्या सुमारास अशाच पावसाळ्याच्या दिवसांत खोपोली येथील विलास धबधबा येथे गेलो असता चिखलातून पाय निसटल्याने पडून माझा उजवा हात मनगटाजवळ फ्रॅक्चर झाला होता तेही आठवले.
याच पावसाळ्यात यंदा २२ जून रोजी ‘शिवतुतारी प्रतिष्ठान संचालित कविता डॉट कॉम' यांचा ‘जीवन गौरव' पुरस्कार मला विख्यात साहित्यिक प्रा. प्रविण दवणे व ज्येष्ठ कवी-निवेदक श्री. अरुण म्हात्रे यांच्या हस्ते देण्यात आला. या साऱ्यात माझा पराक्रम असा काहीच नाही. मी माझे काम नित्यनेमाने मनापासून करत आलो आहे. असा जीवन गौरव पुरस्कार वगैरे कधी आपल्याला दिला जाईल, आपल्यासाठी तुताऱ्या वाजतील व सपत्निक व्यासपीठावर नेण्यात येईल; शिवमुद्रा, शाल, प्रदीर्घकाळ सहज घरात ठेवता येईल असा श्री. गोरखनाथ पोळ यांनी साकारलेला भलामोठा व सुंदरसा नॅपकीन बुके, एखाद्या पद्मश्री सन्मानपत्रासारखे देखणे सन्मानपत्र ज्यात आपल्यासोबत आपल्या आई-वडीलांचेही नाव रेखाटले आहे (तेही विख्यात सुलेखनकार श्री. विलासराव समेळ यांच्या सिध्दहस्ते आकारास आलेले!) ते देताना पत्नीलाही छानशा साडीने गौरवले जाईल असा विचारही कधी माझ्या मनाला शिवला नव्हता; पण ते घडले व अनेकाच्या साक्षीने घडले आणि माध्यमकर्मी असल्यामुळे व शिवतुतारी संस्थेचे कार्य सर्वदूर पोहचले असल्यामुळे त्या कार्यक्रमाचा वृत्तांत अनेक प्रसारमाध्यमांतून प्रसिध्द झाला. आता छापील माध्यमांच्या जोडीला दृकश्राव्य माध्यमेही असल्याने तो सोहळा ‘जीवंत' स्वरुपात पाहता आला व बऱ्यापैकी व्हायरलही झाला. तशात आमचे कुटुंबस्नेही आणि महाराष्ट्राचे माजी माहिती व जनसंपर्क संचालक श्री. देवेंद्रजी भुजबळ यांनी ते सारे वृत्त ‘माध्यम भूषण' या शीर्षकाखाली त्यांच्या ‘न्युज स्टोरी टुडे' या वेबपोर्टलवर प्रसिध्द केले. मराठी वाचले जाणाऱ्या विविध भारतीय प्रांतांसह ते वेबपोर्टल विदेशातही वाचले जाते. त्यामुळे अनेकांच्या वाचनात ते सारे आले. मग मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा ठिकाणाच्या काही वर्तमानपत्रांनी त्यावर लेखही माझ्या विविध छायाचित्रांसह प्रसिध्द केले. ज्यांना पाऊस, सकाळची वेळ, प्रवास या व अशा कारणांमुळे कार्यक्रमास येता आले नव्हते, त्यांच्यापर्यंतही तो सोहळा पोहचला....आणि मग माझ्या आईच्या, वडिलांच्या गावाकडून, माझ्या जन्मस्थळ असलेल्या तसेच मी शिक्षण घेतलेल्या वेगवेगळ्या शहरांतून फोन यायला सुरुवात झाली. या संस्थेचे काम किती लोकांपर्यंत पोहचले आहे याचा मग पडताळा येऊ लागला. कोणताही अर्ज, शिफारस, घटनाबाह्य दबाव, याच्या-त्याच्याकडून नावाची सुचवासुचवी या सगळ्यांना डावलून राबवलेल्या ‘शिवतुतारी'च्या निवडपध्दतीचे वेगळेपण मग लक्षात आले. आणि आता ‘आम्हीही तुम्हाला असाच पुरस्कार देणार आहोत..आपल्या सोयीची तारीख सांगावी' अशा सूचना वेगवेगळ्या संस्थांकडून येऊ लागल्याने मी तर अचंबितच झालो. ज्या समाजात मी जन्म घेतला, ज्या नातेवाईकांच्या कुशीत-सोबतीने मी वाढलो, ज्यांच्यासाठी लेखणी झिजवली त्यांच्या आधी नवी मुंबईत साहित्यिक उपक्रमांसोबत विविध सामाजिक उपक्रम राबवत या महानगरात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या शिलेदारांच्या एकत्रीकरणातून काम करणाऱ्या ‘शिवतुतारी' संस्थेच्या म्होरक्याना मला ‘जीवन गौरव'सारख्या बहुमानाने सन्मानित करावेसे वाटले ही माझ्यासाठी हृदयाला फारच जवळ असणारी गोष्ट आहे.
माझ्या आजोळचे गाव..म्हणजे गणपतींचे गाव असलेल्या पेण येथून या कार्यक्रमाला वेळेत येऊ न शकलेला माझा मावसभाऊ बजरंग पाटील त्याच्या फार्म हाऊसवरील सुमारे वीस किलो वजनाचा एक भला मोठा फणस घेऊन त्याच दुपारी माझ्या घरी पोहचला..त्यावेळी मी, प्रा. प्रविण दवणे, श्री. अरुण म्हात्रे, श्री. सुभाष कुलकर्णी, श्री महेंद्र काेंडे व सौ. काेंडे आम्ही सारे वाशीमधील नवरत्न हॉटेलमध्ये आयोजकांनी केलेल्या व्यवस्थेनुसार भोजन करीत होतो. मग त्याच आठवड्यात आमच्याच दै. नवे शहर कार्यालयात सत्कार केला गेला. महाराष्ट्र सेवा संघ, संत सावता माळी सभागृह ऐरोला यांच्याही सभागृहांत जीवन गौरव सन्मानामुळे असेच सत्कार केले जात आहेत हे सगळे सुरु आहे. तशात ‘न्युजबॅण्ड' या दैनिकाच्या संपादकांनी माझी मुलाखत घेऊन ती प्रसिध्द केल्यामुळे एका मराठी दैनिकाच्या उपसंपादकाची मुलाखत इंग्रजी दैनिकाच्या संपादकाने घ्यावी असाही अनोखा योग जुळुन आला.
पावसाळ्यात खोल समुद्रात मासेमारीला बंदी असते. मग नदी, तलाव, खाड्या, खाजणे अशा जवळच्या भागात मिळणारे मासेच विक्रीसाठी मासळी बाजारात येतात. अशाच एका बुधवारी मी बाजारात दशहरी आंबे, केळी, फणस घेतले. त्यानंतर कोळंबी, अंडी व अन्य मासे घे mऊन झाल्यावर आणखी काही दिसतेय काय म्हणून वाशीच्या मासळी बाजारात फिरत होतो. तेवढ्यात एका महिलेने आवाज दिला...व हसत म्हणाली...‘ओ जीवन गौरववाले, इथे मासळी बाजारात काय करताय? हातातली पिशवी तर भरलेली दिसतेय.' मीही हसतच म्हटले..‘मासे घेतलेत. नेहमी घेतो, पिशव्यांची ओझीही वाहतो. आणि घरी बायको, सूनेने मासे शिजवून वाढल्यावर खातोपण. जीवन गौरववाल्यांनी बाजारहाट करु नये, मासे खाऊ नये असा नियम थोडाच आहे? ‘गौरव' एक दिवसाचा...आपलं ‘जीवन', आपलं कुटुंब, आपल्यावर जीव लावणारी माणसं, आपलं खानपान सदासर्वदाचं'
यावर त्या महिलेने छानसे स्माईल दिले आणि ‘कसा दिला वाटा?' म्हणून समोरच्या कोळणीला विचारती झाली.
- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई