महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण नाट्यकृती : दशावतारी
आपल्या भारतवासियाना परंपरा, इतिहास नक्कीच आहे. सगळ्यामध्ये समूहाने राहण्याची सहज प्रवूत्ती देखील आहे. तसा राहत असताना एकमेकांच्या सुखदुःखात समरस होऊन सहकारी वृत्तीने जगतो. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी पारंपारिक खेळ, सण, उत्सव, जत्रा ई.साजरे होत असतात. भारतात अनेक राज्यांची तशी खासियतच आहे. मग आपला कोकणी बांधव त्याला अपवाद कसा ठरेल.? अर्थातच नाही.
आपल्या कोकणातील दरवर्षी गावा-गावातून संपन्न होणा-या विविध प्रकारचे, उत्सव, खेळ, शिमगा, होळी जत्रा, यात्रा, नाटके ई.मधून मनोरंजन, समाजप्रबोधन, परंपरा जतन, व्यक्तिमत्व विकास होत असतो. कोकणी माणूस नोकरी व कामानिमित्ताने कोकण बाहेर असला तरी शक्यतेनुसार प्रसंगी गावाकडे येणारच हीप्रथाच आहे; जणू त्याशिवाय तो आनंदाने राहूच शकत नाही. गावची त्याची जोडलेली नाळ कधीच तुटत नाही हेच खरे. त्या निमित्ताने एकोप्याने, मौजेत, आनंदाने, उन्मादात सण उत्सव साजरे करून केवळ नाईलाजानेच परत तो आपल्या नोकरी/धंद्याच्या गावी परततो. हे वास्तव आहे. ‘दशावतारी' - दक्षिण कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोव्याकडील भागातील कोकणी मंडळी हे नेहमीचे आपले उत्सव साजरे करीत असताना त्यांच्यात एक आणखीन वेगळेच वैशिष्ट्य दिसून येते ते म्हणजे ‘दशावतारी'. ही एक नाट्यकृती असून त्यात दशावतारातील प्रसंग दाखवले जातात. हे पारंपारिक अनेक वर्षापासून चालत आलेले तळ कोकणातील वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
विशेषतः ग्रामीण भागात हे अती लोकप्रिय असते. दशावतारापैकी कथांचं काहीमुख्य विषय घेऊन गुंफलेले नृत्य/नाट्याचे वैशिष्ट्य . .दिवाळीनंतरची हिवाळ्याची चाहूल लागते.त्यानंतर मंदिरातील जत्रा/उत्सव ई. ना सुरवात झालेला असते. कोकणातील लोकांनी एकत्र यावे हाच त्यामागील खरा उद्देश असतो.त्या निमित्ताने खाद्यपदार्थांचे वेगवेगळे स्टॉल्स भरवलेल्या असतात. त्यात त्यांची खाद्य कलाकृती देखील लक्षात येते ते वेगळेच़. कोकण व दशावतार हे मोठे समीकरणच म्हणावे लागेल. शेकडो वर्षांची परंपरा असलेले ही लोककला लोकांपुढे आणली जाते. विष्णूने दुर्जनाचे निर्दालन करण्यासाठी व सज्जनांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक युगात अवतार घेतले. त्यापैकी फक्त वामन, परशुराम, राम, कृष्ण ह्यांचीच कथानके दशावतार नाटयकृतीत घेतली जातात. ह्या परंपरेची पाळेमुळे दक्षिणेत अगदी गोवा, कर्नाटकपर्यंत पोहोचली आहेत. सिंधुदुर्गात दशावतार तर रत्नागिरी-रायगड जिल्ह्यामध्ये नमन ही कला प्रसिद्ध आहे, राजापूर ते वेंगुर्ला व पुढे गोवा, कर्नाटकपर्यंत दशावतारी नाटके साजरी केली जातात. मुंबई-पुणे-दिल्लीपर्यंत दशावतार सादर होत आहे व त्यात भाग घेण्यासाठी सहभागी होण्यासाठी कोकणी माणूस अत्यंत उत्सुक असतो; मुद्दाम नोकरीत रजा काढतो. गावातील जत्राप्रमाणे कलाकाराला नाट्यकृती आपली कला दाखवण्याचे एक हक्काचे स्थान समजले जाते. हौशी कलाकारच दशावतारी नाट्यकृती सदर करताना दिसतात. आता मात्र थोड्या फार कंपन्या कलाकृती सादर करीत आहेत. परंतु आता त्यात चांगलीच भर पडलेली दिसते आहे. त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेला दशावतारी खरोखरच एक वेगळेच आकर्षण नक्कीच आहे.
नाटय कलाकार व नाटकाविषयी : रंगमंचावर दशावतारी नाटक सुरु होण्यापूर्वी काही पथ्ये आवश्य पाळली जातात. पडदा उघडण्यापूर्वी प्रथम गणपती, कलाकारांच्या साहित्याची आरती व पूजा केली जाते. नाटकाचे सादरीकरण वर्षानुवर्षे चाललेल्या पद्धतीनुसारच चालते. १ गणपतीस्तवन, २ पूर्वरंगात रिद्धी-सिधी, भटजी, संकासरस्वती यांचे प्रवेश होऊन उत्तरार्धात, रामायण, महाभारत,पौराणिक कथा सादर केली जाते. दशावतारी नाटकांचे प्रत्यक्ष संहिता असे नसते. स्वत;ची रंगभूषास्वत;च करायची असते. पण त्या अगोदर कोणते कथानक करायचे कलाकारांना सांगितले जाते. दुहेरीपण टाळण्यासाठी़ .त्यानुसार प्रत्येकजण स्वत;चे संवाद स्वतःच तयार करतात. कथानकातील रंगभूषा, अभिनय, संवादफेक, संगीत कथानक, युद्ध नृत्य, सादरीकरण, कलाकारांचे कौशल्य, अनुभवण्यासाठी रसिक प्रेक्षक रात्रभर चोखंदळपणे नाटक पाहत राहतात. ही नाटके सर्वसाधारणपणे रात्री सुमारे १०-११ला सुरु होऊन अगदी पहाटे पर्यंत चालतात. रंगभूमीसाठी व कलाकारांसाठी खडूचे रंग वापरले जातात. देवदेवतांच्या व्यक्तिरेखांसाठी निळा, पांढरा तर राक्षस व नकारार्थी भूमिकांसाठी लाल आणि काळा असे रंग वापरले जातात. नाटके सदर करताना स्त्रीची भूमिका देखील पुरुषच उत्तम प्रकारे वठवितात. जरा देखील कोणतीही शंका उपस्थित होत नाही हे विशेष. देव-दानवांच्या युद्धप्रसंगी राक्षसाचा अचानक प्रवेश बाजूने व समोरून प्रेक्षकामधून भयंकर आरोळ्या, हातातील लखलखणाऱ्या तलवार वा किंचाळण्याने होतो.कित्येकदा देव-दानवातील लढाई नृत्य स्वरुपात होते.
रंगमंचावर कला सादर करणारा कलाकार व खऱ्या आयुष्यातील दिसणा-या व्यक्तीत मात्र बराच फरक जाणवतो. दशावतारी नाटकाचा काळ सर्वसाधारणपणे ४-५ महिन्यांचा असतो. कलाकार एरव्ही आपापली शेती -नोकरी-व्यवसाय मध्ये व्यग्र असतो. कलेच्या केवळ आवडीपोटी आपले योगदान देत असतो. कामाबद्दल त्याला मिळणारे अर्थार्जन देखील फारच अत्यल्प असते. कलेच्या प्रेम व श्रद्धेपोटी निष्ठेने काम करीत असतात.त्यामुळेच ही कला टिकून आहे. दशावतारी नाट्यकृती हे कोकणचे वैभवच व त्यांचा एक अविभाज्य भाग नक्कीच आहे. म्हणूनचही कला वृदधींगत होते आहे. -रामकृष्ण विनायक अभ्यंकर