महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
पंथ
पंथ म्हणजे रस्ता किंवा मार्ग असा त्याचा सहज सोपा अर्थ. धार्मिक भाषेत पंथ म्हणजे चांगल्या तत्वांचा मार्ग दाखवणारा धार्मिक रस्ता. साध्या माणसाला आपल्या जीवनात आनंद कसा निर्माण होईल म्हणजेच सुख कुठे मिळेल याच्या शोधात तो सतत प्रयत्नशील असतो; परंतु ते मिळते की नाही हा नंतरचा प्रश्न.
पृथ्वीतलावावरचा माणूस पहिल्यापासूनच एक सामाजिक प्राणी म्हणून उदयास आला. तो समूहाने राहतो, सांस्कृतिक ठेवा जपतो, नातीगोती आणि मैत्रीव्यवहार एकमेकांशी करतो, विनिमयाचे साधन प्रांतान्वये स्वतःच्या सोयीने आजपर्यंत तो महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. यापलीकडे जाऊन त्याने स्वतःच स्वतःची तत्त्ववार विभागणी करून घेतलीय ती म्हणजे धर्मानुसार त्यानुसार जगात वेगवेगळे धर्म पूर्वापार अस्तित्वास आलेत. त्यांची पोटविभागणी पुन्हा खाली खाली जात आणि पोटजातीनुसार होत गेली. एखाद्या ठराविक जातीच्या मूळ पुरुषाची त्या जातीत विभागणी झाली तो क्षण म्हणजे त्यावेळी त्याला असलेल्या कामाप्रती आवडीने म्हणून तो त्या ‘क्ष' या जातीत गणला गेला. मात्र त्यापुढे त्याच्या वंशजांना जातीच्या आवडीनिवडीचे स्वातंत्र्य राहिले नाही मग जो त्या कुळात जन्माला त्याला जन्मापासूनच ती जात चिकटली गेली असं म्हणावं लागेल.
कालानुरूप पुढे परिस्थितीनुसार माणूस प्रगती करू लागला परंतु जाती-धर्माच्या बाहेर न येता. कालांतराने धर्मांतर्गत जीवनाचे तत्त्वज्ञान विशद करणारे प्रमाणबद्ध मार्ग सांगणारे विभूती अवतरले आणि त्यांची विचारधारा अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने धर्माच्या चाकोरित राहून पटू लागली आणि त्यांनी त्या तत्वविचारधारांचा मार्ग पकडला. त्यालाच आपण पुढे एका अर्थाने ‘पंथ' म्हणू लागलो. प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या विचारधारांचे पंथ आपल्याला बघायला मिळतात. जसे हिंदूंमध्ये वारकरी पंथ, महानुभाव पंथ, नाथपंथ; मुस्लिमांमध्ये शिया, सुन्नी व बोहरी ख्रिस्तांमध्ये रोमन, कॅथोलिक, प्रोटेस्टंट, ऑर्थोडॉक्स; जैनांमध्ये दिगंबर आणि श्वेतांबर; पारशींमध्ये शहंशाही, कदमी आणि फसली; शिखांमध्ये खालसा, नामधारी आणि निरंकारी; बौद्धांमध्ये थेरवाद आणि महावाद. याचा अर्थ कुठेतरी धर्मतत्त्वांमध्ये विचारांची एकजूट झालेली आपणास कुठेही दिसून येत नाही. प्रत्येक धर्माने ज्याअर्थी आणखी पोटधर्म म्हणजेच वेगळ्या विचारधारेचा ‘पंथ' जन्माला घातला; पण त्यापुढे पुन्हा पंथाला आजतागायत उपफाटा फुटलेला कुठेही दिसून आला नाही म्हणजेच निर्माण झालेल्या कोणत्याही पंथाचे तत्त्वज्ञान त्या समाजातील किंवा पंथातील लोकांनी निरपेक्ष मानलेले आहे.
बदल हा माणसाचा अगदी मूळ गुण. त्याला प्रगती किंवा विकास साधायला कालानुरूप आवडते, हाही त्याचा स्थायी स्वभाव. म्हणून कोणताही माणूस जसे दिवस पुढे जातील..तसे नवीन नवीन शोधाच्या मागे लागतो परंतु धार्मिक शोधाच्या मागे पंथ निर्मितीनंतर कोणताही माणूस त्यापासून वेगळा मार्ग निवडण्यात पुढे आला नाही. म्हणजेच प्रत्येक धर्मातील पंथ हा प्रत्येकानेच अर्थपूर्ण व परिपूर्ण मानलेला आढळतो.
पंथ म्हणजे रस्ता किंवा मार्ग असा त्याचा सहज सोपा अर्थ. धार्मिक भाषेत पंथ म्हणजे चांगल्या तत्वांचा मार्ग दाखवणारा धार्मिक रस्ता. साध्या माणसाला आपल्या जीवनात आनंद कसा निर्माण होईल म्हणजेच सुख कुठे मिळेल याच्या शोधात तो सतत प्रयत्नशील असतो; परंतु ते मिळते की नाही हा नंतरचा प्रश्न. पहिल्यांदा आनंदाचे दोन प्रकार जगात आपल्याला बघायला मिळतात. त्यातील पहिला म्हणजे क्षणिक आनंद आणि दुसरा परमानंद किंवा नित्यानंद! क्षणिक आनंद हा संसारिक जीवनात प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात मिळत राहतो आणि मिळाल्यावर सुखी आणि नसल्यावर दुःखी असं प्रत्येक माणसाचं जीवनचक्र सुरू असतं. मात्र या संसारात नित्यानंद हा कुठेही कुणाला सापडलेला नाही म्हणून धर्माच्या अंतर्गत स्थापन केलेल्या पंथांच्या आद्य प्रवर्तकांनी जगाला नित्यानंदाचा मार्ग कसा मिळेल यावर प्रकाश टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तो मिळतोही आणि चिरंतर टिकतोही हे पंथाचे तत्त्वज्ञान जगाला समजते म्हणून आपल्या आवडीनिवडीनुसार माणसाने ‘पंथ' ही तात्विक जीवनरेषा पकडून निरंतर सुखाच्या आयुष्याचा मार्ग निवडला असे म्हणता येईल. ‘वारकरी पंथ' हे जगातलं एकमेव उदाहरण की जे अनेक तत्व परीक्षांच्या चाळण्यांमधून गाळलेलं शुद्ध आणि सुंदर पंथाचं उदाहरण जे दरवर्षी ठरलेल्या दिवसांत नित्यानंद, परमानंद हे देहभान विसरून पुढं पुढं ज्याने मार्ग दावला त्याच्याकडे मार्गस्थ होत जातं.
- निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी,मंडळ कृषी अधिकारी, संभाजीनगर