महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
अभाविक विश्वातला दर्प
स्वतःकडे अमरत्व असल्याच्या आविर्भावात पाहणे व आपलाच ग्रह नष्ट करण्याचा नकळत प्रयत्न करणे, काय कामाचे? जैव तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता याला सीमा असावी. दोन राष्ट्रांमध्ये शत्रुत्व येणे स्वाभाविक आहे. कारण काही असुदे म्हणून आपण द्वेषाने उत्तेजित होऊन स्त्री, मुले, ज्येष्ठ नागरिक, हॉस्पिटल यांना टार्गेट करुन पुरुषार्थ असल्याचे सांगणे दुर्दैवी आहे.
आजचा विषय माणूस आणि युध्द असा असावा म्हणून विचार करु लागलो. माणसाच्या मूलभूत गरजा काय? तर अन्न वस्त्र आणि निवारा! यापलिकडे जे काही असते, दिसते किंवा घडते...त्या समस्या नसून तो जगण्यापलीकडला एक दर्प असेल किंवा नसेलही...पण माणूस म्हणून जगतांना अमर्याद असे विचार कायम ये-जा करत असतील तर त्याची व्याप्ती काय असावी? ती कुठवर जात असावी? हा दर्प कशासाठी? असे विविध प्रश्न उपस्थित होणे सहाजिकच आहे.
ये दुनियां गोल है
उपर से खोल है
अंदर से देखो प्यारे
बिल्कुल पोलम पोल है
संपूर्ण जग जरी हिंडता आले नसले तरी जगांतील सर्वात मोठया ऑईल कंपनीत सुमारे ीेचाळीस देशातील कामगारांसोबत नोकरी करण्याचा योग लाभला. अशी कंपनी ज्याची स्वतःची अशी विमान कंपनी आहे, समुद्री जहाज आहेत, रेल्वे आहे, बस ट्रान्स्पोर्ट आहे, पोलीस आहे. पांच जिल्हयातील कंपनीचा फैलाव आहे. स्वबळावर विस्तारित अशी ही जगातली सर्वांत मोठी कंपनी ज्याचे कामगार बळ काही लाखात आहे. रेल्वे, बस ही कामगारांना ये-जा करण्यासाठी म्हणून कंपनीने उपलब्ध करुन दिलेली दळवळणाची मोफत सुविधा होय! ज्याचे साप्ताहिक सेपटी ॲवार्डस तीनशे पासष्ट डिपार्टमेंट मध्ये वर्ग केले जातात. ”सेपटी फर्स्ट” हे ब्रीद वाक्य सर्वत्र लिहीले जायचे! प्रत्येकाने सेपटी हा विषय समजून घ्यायचा व तसे वागायचे! अशा त्या कंपनीतील प्रत्येक कामगारांना भूक होती, कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या. म्हणूनच तर आपला देश सोडून गल्फमध्ये नोकरी पत्करली. त्यातलेच काही निवडक माझे मित्र झाले. थेट पाश्चात्य गोरे, अरब भाषिक तसेच त्या देशातील स्थानिक. जिवाभावाचे यार! त्या व्यतिरिक्त भारतीय उपखंडातले कामगार, सर्व एशियन नागरिक असे माणूस नावाचे एक भलेमोठे कुटूंब तेथे जगत होते. आजही लोक काम करत आहेत. आपुलकी, प्रेम, जिव्हाळा... आदर, कुतूहल अश्या अनेक भावनांचा जमावडा त्या भूमीत कार्यरत होता, आजही असेल. कामगारांशिवाय जग नाही, अन् जगात आलोय तर काम केल्या शिवाय पोट भरणे नाही. मग कुणाची चाकरी असो वा स्व-व्यवसाय.
सध्या जगात सर्वत्र अनेक देशातील नागरिकांना विदेश किंवा आंतरदेशीय विमान प्रवास अनिवार्य झाला आहे. त्यामुळे वेळेची बचत होते. जलप्रवास हा एकतर पर्यटनाचा भाग झाला असावा किंवा अवजड मालवाहू माध्यम झाले असावे. अनेकांचे धागेदोरे अनेकांच्या गरजेनुसार जोडले जातात तसेच तोडलेही जातात. तो आंतरराष्ट्रीय समस्यांचा विषय असू शकतो. आता सर्वत्र जर अशी सुबत्ता व चकचकीत उत्कर्ष उजळून दिसत असेल तर मग एकमेकांचा हेवा वाटावा अशी मानसिकता निर्माण झाली तशी आजही आहे, काहीशी मोठ्या प्रमाणात आहे, तर काही आतल्या गाठीचे आहेत. हेही नाकारता येणे शक्य नाही.
आपली भरभराट, उत्कर्ष, प्रगतीचा आलेख सतत वरवर जात रहावा असे वाटणे स्वाभाविक आहे. जपून ठेवणे आणि जपणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ज्या ठिकाणी जाऊन आपला प्रगत बिंदू ज्याने गाठला त्या उंचीला साधा कुणी स्पर्शही करू नये अशी मानसिकता काहींची होत असेल तर त्याने मानसिक तज्ञाचा त्वरित सल्ला घ्ोतलेला बरा. दुर्दैवाने हा रोग कोरोना पेक्षा ज्यास्त भयावह आहे, हे कळतंय पण वळत नाही. ही आजची परिस्थिती आहे.
ज्याला पक्षी आवडतो म्हणून त्यांस पिंजऱ्यात ठेवणे साहजिकच आहे. त्यावर प्रेम करतो, खाऊ घालतो. पण त्यांस उडण्यासाठी म्हणून आकाश मोकळे करून नाही देत. पक्षाची आकाश भरारी, त्याचे स्वातंत्र्य याकडे तो पक्षीप्रेमी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. कारण त्यास स्वतःचा आनंद महत्वाचा वाटतो. हिच प्रवृत्ती अलीकडे ज्यास्त फोफावत आहे. कुणालाही आपल्यापेक्षा पुढे जाऊ द्यायचे नाही. असल्या वैचारिकतेस ‘काँपिटेटिव्ह स्टेज' असेही बोलले जात असावे. स्त्री, लहान बाळ, वृद्ध नागरिकांस जीवे मारुन त्यांस उत्कर्ष मानणाऱ्यांनी आरसा पाहून जग जिंकावे. लहान बालकांचे हॉस्पिटल ध्वस्त करण्यांत कसली ही मर्दांगी? संपूर्ण जगात दोनच जाती आहेत...एक पुरुष, एक स्त्री! जिओ पॉलिटिक्स असे गोंडस नाव देऊन सजीव पिढ्या जमिनीत गाडल्याने जे तथाकथित उत्कर्षाचे काटेरी झाड जेव्हा उगवेल त्यांत फक्त आणि केवळ द्वेषाची फळे लागतील. जगा अन जगू द्या...हा विचार जगांतील सर्व महान विचारवंतानी आम्हांस दिला आहे. तो केवळ कागदी बाण ठरू नये. विचार म्हत्वाचा.
घरात, वाडीत, गावांत कितीही मोठं काम करा, श्रमदान करा, माणसाच्या कर्तृत्वापेक्षा मानसन्मान मिळतो तो फक्त पैशाला! पैसा खिशातला, खात्यातला तो कुठेही असो, मान सन्मान पैशास मिळतो. एपलचा सेलफोन आणि इतर दुसऱ्या दुय्यम दर्जाच्या कंपनीचा सेल फोन... त्यांत किंमतीचा फरक आहेच ना? किंमत हा शब्द त्यातूनच पुढे आला. कालच म्हणजे फक्त पन्नास वर्षांपूर्वी डिजिटल क्रांती जगात सर्वत्र घडून आली. तेव्हां जग आकुंचन पावले. आता रात्र असो दिवस असो लोक फक्त बोलतात... अमर्याद बोलत राहतात...वाहन चालवताना बोलतात, वैश्विक असे काही राहिले नाही...इधर का माल उधर...अशी जगण्याची तर्हा सुरु आहे...कुठवर हा खेळ चालेल? शून्यातून अनंतात सायबर स्पेसमध्ये प्रतिध्वनित होणारे मानवीय बोलणे खरंच एवढं आवश्यक आहे? स्वतःकडे अमरत्व असल्याच्या आविर्भावात पाहणे व आपलाच ग्रह नष्ट करण्याचा नकळत प्रयत्न करणे, काय कामाचे? जैव तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता याला सीमा असावी. दोन राष्ट्रांमध्ये शत्रुत्व येणे स्वाभाविक आहे. कारण काही असुदे म्हणून आपण द्वेषाने उत्तेजित होऊन स्त्री, मुले, ज्येष्ठ नागरिक, हॉस्पिटल यांना टार्गेट करुन पुरुषार्थ असल्याचे सांगणे दुर्दैवी आहे.
अहंकाराचे फुगे हवेतच फुटून जातात आणि उरतो तो केवळ पश्चाताप. येणाऱ्या पिढीसाठी दुष्काळ, दुर्दशा, भग्नावस्थेत विदीर्ण झालेला समाज, हेच आपण येणाऱ्या पिढीसाठी मागे सोडून जाणार आहोत का? स्पर्धा सशक्त असावी, त्यांत दर्प नको. असेल तर आत्ताच त्यावर उपाय किंवा अंकुश असणे आवश्यक आहे. - इक्बाल शर्फ मुकादम