ती दोघं

"आजपर्यंत कधी बोललो नाही; पण तू खरंच संसार खूप छान केलास. मुलांना नीट वळण लाऊन मोठं केलंस, नातीपण सांभाळलीस. याआधी मी कधी गंभीरपणे याकडे बघीतलच नाही. परंपरेनी चालत आलेले सणवारं रिती रिवाज तु आनंदानी करत आलीस.”

तो आज काहीतरी वेगळचं बोलत  होता भाऊक झाला होता....आवाजही नरम आणि कातर झाला होता.....त्याचे  एक निराळे रूप ती बघत होती.....तो  आतून..अंतःकरणातून जे वाटले ते बोलत होता....अगदी मनापासून..खूप पूर्वीच आपण हे  तीला सांगायला हवं होतं असं त्याला वाटलं....

सकाळची वेळ..ती बेडरूममधून उठून बाहेर आली. आणि म्हणाली
"अहो दुधाची पिशवी आत आणता का?” मगाशीच बेल वाजली..

"अरे बेल कधी वाजली? मला नाही ऐकू आली. थांब.... तू नको जाऊस मी घेतो. ..तुला बरं नाही.  तु दोन दिवस अगदी आराम करायचा.. हे  आपलं ठरलं आहे ना...म्हणून तर सकाळ संध्याकाळ डबा सांगितला आहे. दोन वेळेसचा चहा.... तो  काय......मी करीन.” तो एका दमात हे बोलला. ती आत गेली. त्याच्या लक्षात आलं आज आपण प्रथमच दूधाची पिशवी आत  घेत आहोत....नाहीतरी प्रत्येक वेळेस बेल वाजली की तीच दार उघडते.... दुधाची पिशवी कापून दूध पातेल्यात घालताना कधी सवय नसल्याने  दूध सांडलंच ..पटकन त्यांनी तिथल्या नॅपकिननी ते  पुसून घेतलं.  ती समोर नव्हती ...ते एक बरं..दूध तापायला ठेऊन तो  सोपयावर येऊन बसला.काही वेळाने बायकोने  बाहेर येऊन आठवण करून दिली.....

"अहो दूध तापलं असेल बघा..नाहीतर तिथे थोडं थांबून तापवून घ्या...”

"बरं बरं....” तो गॅस समोर....जरा वेळातच तो वैतागला मनात म्हणाला.. च्यायला... दुध तापायला किती वेळ लागतो....  इथे  नुसतं बघत  उभं राहायचं.....शेवटी तापलं एकदाच दुध. गॅस बंद करून तो पेपर वाचत बसला.

सकाळी अकराची वेळ..ती परत  बाहेर आली. "अहो तुमचा दुसरा चहा..”.

"आता अजून एकदा दुध तापवायचं?”

"साय चांगली येण्यासाठी मी चारदा दूध तापवते....” ती सहज म्हणाली.

दुध गॅसवर....गॅसची पलेम कमी झाली का काय ...  काय कटकट आहे... ऊगीच दूधाकडे  बघत ऊभ रहायचं....कुकरला शिट्टी असते तस काहीतरी हव होतं...मग त्याच्या लक्षात आलं आपल्याच चहासाठी दूध तापवणं चाललं आहे.... त्यांनी चहा केला चहा पिताना मनात तो म्हणाला..तसा बरा झालाय चहा...जमतंय आपल्याला पण ...  तिच्या सारखा नाही.... त्यांनी मनाशी कबूल केलं... अजून प्रॅक्टीस करायला हवी.. ती कसा करते हे शिकून घ्यायला हवे.

दुपारी पावणेचारची वेळ
"माझ्या लक्षात आहे हं.. चारला आपल्या दोघांचा चहा करणार तेव्हा दूध तापवतो...” तीनी काही बोलायच्या आताच त्यांनी सांगितलं. ती खुद्‌कन हसली...

आज त्याला साक्षात्कार झाला की साधा चहा करायचा म्हटलं तरी बराच व्याप असतो ..चहाच भांडं, गाळणं, कप ,बशी, चमचा,ते आलं खिसायच....एका चहाचा ईतका पसारा?....चहा कपात ओतताना ...तो मनाशी म्हणाला..झालं संपल बाबा  एकदाच आजच्या दिवसातल  चहा प्रकरण....

वेळ रात्रीची..
"अहो उद्या दुपारी जेवताना दही लागणार त्यासाठी दूध विरजण लावायच आहे.....” तो आत आला.

 "दही नुसतं नाही घालायच. ती दह्याची कवडी चांगली हलवा ..मग दुध घाला म्हणजे दही घट्ट लागतं..बास .. ईतकच पुरे... सकाळच्या चहाला दुध लागेल...” तिच्या सुचना सुरू होत्या..

आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी दुध विरजण लावलं...हे असं असतं तर...हे त्यांना नविनच कळलं...

"आता  फ्रिज मधला तो साईचा  सट घ्या. त्यात साय घाला. पाच दिवसांची साठली आहे .आता उद्या बरं वाटलं तर ... त्याचे ताक करते आणि लोणी काढते...तुमचे आवडते  बेरी घालून कणकेचे लाडू करीन...आणि ताकाची कढी...गोळे घालून...गरम भाताबरोबर...” तो बघत राहिला ती बोलतच होती.... आपल्याच तंद्रीत.....थोडं स्वतःशी थोडं त्याच्याशी...तो नुसता ऊभा..

दूसरा दिवस... वेळ सकाळी साडे सहाची..."अग आपला चहा झाला तरी दूध शिल्लकच आहे.... आता याचे काय करायचे...”

"आता हे रात्रीसाठी विरजण लावायचे....पण इतक्यात नाही...ताजं दूध आलं की मग...तुम्ही  कसं... कोणी आलं  की  बाहेरूनच ऑर्डर करता.... ...दोन कप कॉफी कर......  म्हणून हे ठेवायचे ..घरात दूध नाही असे नको व्हायला..... ” ती सांगत होती..

अरे खरंच की....आपण कधी याचा विचारच केला नाही...कालपासून आपण  सकाळ...दुपार... संध्याकाळ ....दुधाच्या पातेल्याशीच खेळतं आहोत  असे त्याला वाटले....अरे देवा...एका दुधाच इतकं रामायण असतं ? तो विचारात पडला....

स्वयंपाकघरात त्याने नजर फिरवली.  निरनिराळी भांडी , धान्यांचे डबे, फ्रिज, लोणच्याच्या, मसाल्याच्या बरण्या, सॉसच्या बाटल्या, ताट, वाट्या ....मग या सगळ्या संसारातल्या वस्तूंचं किती असेल...

त्यांचं देव घराकडे लक्ष गेलं . ती आजारी असल्याने आज पूजा झाली नव्हती. त्यामुळे नेहमीसारखं प्रसन्न न वाटता आज तिथं उदास उदास वाटत होतं...ती हे सगळं मॅनेज करते हे आपल्या कधी लक्षातच आलं नाही...आज आजारी असतानादेखील तिचं लक्ष स्वयंपाक घरात आहे. सारखं काय स्वयंपाक घरात काम असतं ग....सारखी आत आत..काय करत  असतेस...आपण तिला सहज म्हणत होतो...आज त्यांच्यावर वेळ आली तेव्हा त्यांना त्याची  जाणीव झाली. अनेक विचारांनी त्यांच्या मनात गर्दी केली...तीनी केलेले अनेक रूचकर   पदार्थ त्यांना आठवायला लागले.. आज काय झाले कोण जाणे...त्यांचे मन ,डोळे आपसुक  भरूनच आले...एका दुधाच्या पातेल्यावरून त्यांना तिच्या अनेक गोष्टी आठवायला लागल्या...... तिचे कष्ट तिने केलेला त्याग, तिची शिस्त.....कितीतरी आठवणी आज ऊफाळून वर आल्या

ती आत आली..."अहो स्वयंपाक घरात ईतका वेळ  काय करताय...”

तिच्या जवळ जाऊन ते म्हणाले,” दिवसभर तू किती आणि काय काय करत असतेस माझ्या कधी लक्षातच आलं नाही....बायको सॅल्युट आहे तुला.” तो अगदी  मनापासून बोलला...."इश्य इतकं काही नाही हं...आम्हा बायकांना सवय असते..तुम्ही बाहेरचं सांभाळता आणि मी घरातलं...” ती सहज म्हणाली

अचानक त्यांनी तिचे हात हातात घेतले...
"आजपर्यंत कधी बोललो नाही; पण तू खरंच संसार खूप छान केलास. मुलांना नीट वळण लाऊन मोठं केलंस, नातीपण सांभाळलीस. याआधी मी कधी गंभीरपणे याकडे   बघीतलच नाही. परंपरेनी चालत आलेले सणवारं रिती रिवाज तु आनंदानी करत आलीस.”

तो आज काहीतरी वेगळचं बोलत  होता भाऊक झाला होता....आवाजही नरम आणि कातर झाला होता.....त्याचे  एक निराळे रूप ती बघत होती.....तो  आतून..अंतःकरणातून जे वाटले ते बोलत होता....अगदी मनापासून..खूप पूर्वीच आपण हे  तीला सांगायला हवं होतं असं त्याला वाटलं.....

ती तर गडबडूनच गेली होती...तो अस कधीही आजपर्यंत बोलला नव्हता...अनपेक्षित  अशा सुखाने ती  भारावली होती...आनंदीत झाली होती..त्यांच्या हाताचा मायेचा, प्रेमाचा स्पर्श तिला सुखावत होता... त्यांच्या नजरेत आज तिला प्रथमच वेगळे भाव दिसत होते.

जीवनाचं सार्थक झालं भरून पावलो.. धन्य  झालो... असं मनोमन  तिला वाटलं....
ते दोन जीव हातात हात घेऊन तृप्त मनाने एकमेकांकडे बघत होते...
त्याचे डोळे भरून आले होते तिचेही........
आता शब्दही मुके झाले होते...
-नीता चंद्रकांत कुलकर्णी 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

अभाविक विश्वातला दर्प