महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
शौर्याचा मार्ग प्रदीप्त करणारा सैन्याधिकारी!
मेजर प्रदीप रामचंद्रराव ताथवडे साहेबांसारख्या शूर, वीर सैन्याधिकाऱ्यांची माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी हा सदर दीर्घ लेख लिहिण्यामागचा उद्देश आहे. ऑक्टोबर १९९९ मध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनच्या पाच अतिरेक्यांना वरचा मार्ग दाखवला होता. त्याआधी १९८७ मध्ये मेजर वरिंदर सिंग साहेबांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या ‘ऑपरेशन राजीव' मध्येही ताथवडे साहेबांचा सहभाग होता.. सियाचीन मधील वास्तव्याच्या काळात ताथवडे साहेबांनी घरच्यांना लिहिलेल्या पत्रांचा समावेश ‘अमर योद्धा' या पुस्तकात केला गेला आहे.
त्या दोघांना ठोकताना अर्थात रायफलमधून अचूक गोळीबार करून ठार मारताना त्यांच्यातला तिसरा पाठीमागून कधी आला आणि त्याने कधी मरणमिठी मारली हे समजायला मेजरसाहेबांना काही क्षण लागलेच..साक्षात यमदूत पाठीवर वर होता....पाठीमागून कमरेला मिठी मारलेल्याला पाठीमागून पुढे आपटायला वेळ नाही लागला...पण त्याने मिठी सैल केली नाही...मग दोघ्ोही जमिनीवर लोळण घेत पुढे गडगडले...दोघांमध्ये अंतर असे नव्हतेच...तो झटक्यात उठला आणि त्याने त्याच्या हातातील एके-४७चा ट्रिगर दाबण्यात बाजी मारली...जो आधी वार करेल तो जिंकतो हातघाईच्या लधाईत...साहेबांच्या पोटात, मांडीत कित्येक गोळ्या तातडीने घुसल्या आणि त्यांनी आपले काम बजवायला प्रारंभही केला...रक्ताची धार शरीराबाहेर धावू लागली...शरीरात लालबुंद तापवलेल्या शिगा खुपसल्या जाताहेत असे वाटले...पण दुस-याच क्षणी साहेबांच्याही रायफलीतून गोळ्यांचा फवारा उडाला...अचूक. तिसरा त्या दोघांच्या पावलांवर पावले टाकीत निघून गेला..त्याच्या ‘आखरी अंजाम कडे...पाकिस्तानातून भारतात ते पाच लांडगे घुसले होते ते इथे रक्तपात घडवून आणायाला...पण मेजर साहेब त्यांच्यापुढे एखाद्या पहाडासारखे उभे ठाकले...आणि त्यांनी आणि त्यांच्या शूर सैनिकांनी या पाचही जणांना ठोकले! !
या आधी त्या सर्वांना मेजर साहेबांनी शरण येण्याचे आवाहन केले होते. ते एका झोपडीत लपून बसल्याची पक्की खबर साहेबांना मिळाली होती. त्यावेळी साहेब त्यांच्या युनिटचे ऑफिसीएटींग कमांडींग ऑफिसर होते, म्हणजे वरिष्ठ अधिका-यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या युनिटचे नेतृत्व मेजर साहेबांच्या हाती होते. सेनेत कुणासाठी कोणतेही काम थांबून रहात नाही.
त्या अतिरेक्यांच्या मेंदूत शरण जाण्याची भाषा पोहोचली नसावी...त्यांपैकी दोघे झोपडीच्या दुस-या बाजूने तिथून निसटून जाण्याच्या तयारीत असतानाच साहेबांनी त्यांना पाहिले...आणि मग क्षमा करण्यात काही अर्थ नव्हता...साहेबांनी दोघे अचूक टिपले! तिस-या अतिरेक्याच्या गोळ्यांच्या वर्षावात पुरते जायबंदी झालेले मेजर साहेब खरे तर तिथून मागे फिरून औषधोपचारासाठी जाऊ शकले असते...पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. ऑपरेशन अर्थात मोहीम अर्धवट सोडून जर नेताच मागे फिरला असता, तर सोबतच्या सैनिकांना मार्गदर्शन कुणी केले असते..आणि भारतीय सेनेची अशी परंपराही नाहीच! आणखी दोन अतिरेकी शिल्लक होते..आणि ते अंदाधुंद गोळीबार करीत होते. आपले सहकारी सैनिकांच्या जीवाला धोका उत्पन्न होणार नाही अशा पद्धतीने मेजर साहेबांनी पुन्हा व्यूहरचना केली...आणि काही मिनिटांनी दोन्ही बाजूंचा गोळीबार एकदाचा थांबला...उर्वरीत दोन्ही अतिरेकी ठार मारले गेले होते...मोहीम फत्ते झाली...गड आला...पण सिंह कायमचा निघून गेला....हाती ढाल नसताना केवळ शेला गुंडाळून लढता लढता उदयभानला कापताना तानाजीराव हे जग सोडून गेले होते! कोंडाण्यावरची सरदार तानाजीराव मालुसरे यांची आठवण यावी अशी ही घटना... हा दिवस होता १७ जून, २००० आणि ठिकाण होते जम्मूमधील पूंच क्षेत्रातील शाहपूर हे गाव!
हे परमेश्वरा! तुझ्या आणि मातृभूमीच्या सेवेत रत असताना सैन्यदलांचा सन्मान आमच्याद्वारे अबाधित राखला जाऊ शकेल इतपत आम्ही आम्हांला शारीरिकदृष्ट्या सशक्त,मानसिकदृष्ट्या सजग आणि चारित्र्याने निष्कलंक ठेवावे यासाठी साहाय्यभूत हो! बाह्य आक्रमण आणि देशांतर्गत अराजक यांपासून देशाचे रक्षण करण्यासाठी आम्हांस बळ प्रदान कर. प्रामाणिक व्यवहार आणि निर्मळ विचाराप्रती आमच्या मनांत आदरभाव निर्माण होऊ दे आणि आमच्याकडून सुलभ परंतु अयोग्य आणि दुष्कर परंतु योग्य यांमधील योग्य गोष्ट निवडली जावी, यासाठी आम्हांस मार्गदर्शन कर. आमच्या सैनिकी-साथीदारांबद्दल आमच्या हृदयांत बंधुत्व भावना आणि ज्यांचे आम्ही नेतृत्व करणार आहोत त्यांच्याविषयी एकनिष्ठतेची भावना जागव. सत्य आणि न्याय्य गोष्टी संकटात असताना, उदात्ततेविषयीच्या प्रेमातून उत्पन्न होणा-या, तडजोड न जाणणा-या, माघार न घेणा-या धैर्याची आम्हांस देणगी दे!
तुझी, या देशाची,ज्यांचे आम्ही नेतृत्व करणार आहोत त्यांची सेवा घडवतील अशा नवनवीन संधी आम्हांस उपलब्ध करून दे...आणि अशी सेवा आम्हांसाठी सर्वोपरी असावी यासाठी साहाय्य कर!
वर्ष होते १९८०. पुण्याजवळच्या खडकवासला येथे स्थित आणि सेवा परमो धर्मः हे ब्रीदवाक्य असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील प्रशिक्षणार्थी छात्र नेहमीप्रमाणे ही प्रार्थना म्हणत होते. या प्रशिक्षणार्थी तरुणांमध्ये प्रथम वर्षात असलेला एक मराठी तरुणही होता.
१६ जानेवारी १९५५ रोजी एन.डी.ए.चे औपचारिक उद्घाटन झाले. या अतिशय महत्वपूर्ण अशा संरक्षण प्रशिक्षण संस्थेत आरंभी महाराष्ट्रीय तरुणांचे प्रमाण विविध कारणांनी इतर राज्यांच्या तुलनेने अल्प होते. महाराष्ट्रात एन.डी.ए. आहे, पण एन.डी.ए.मध्ये महाराष्ट्र अभावानेच दिसतो, अशा आशयाचे एक वक्तव्य देशाचे अर्थमंत्री, संरक्षण मंत्री आणि उपपंतप्रधानपद भूषवलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी केले होते आणि ते खूप गाजलेही होते.
हे प्रमाण वाढावे यासाठी मुलांना विद्यार्थी-दशेपासूनच सैनिकी प्रशिक्षण गरजेचे होते. त्यासाठीच २३ जून, १९६१ रोजी देशातील पहिली सैनिकी शाळा साता-यात सुरु झाली. या शाळेने कित्येक शूर, तडफदार अधिकारी भारतीय सैन्यास दिले. यशवंतराव चव्हाण यांना देवाज्ञा झाली ते वर्ष होते १९८३. आणि याच वर्षी वर उल्लेखिलेल्या मराठी तरुणाने एन.डी.ए. प्रशिक्षण पूर्ण केले, हा एक योगायोगच म्हणावा! एन.डी.ए.च्या तोपर्यंतच्या इतिहासात एन.डी.ए.मध्ये प्रवेश मिळवणा-या काही मोजक्या मराठी तरुणांच्या यादीत असलेल्या या बहाद्दराचे नाव होते...प्रदीप रामचंद्रराव ताथवडे!
प्रदीप या नावाचा अर्थच ‘प्रकाशाचा स्त्रोत' असा आहेे. सेन्ट्रल एवसाईज खात्यात सेवारत असलेल्या रामचंद्रराव ताथवडे आणि सुगृहिणी असलेल्या कुसुमताई ताथवडे यांना दोन मुलगे आणि एक मुलगी. या तीन अपत्यांपैकी प्रदीपजी हे मधले...जन्म २१ सप्टेंबर, १९६३. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर-पाबळ या ग्रामीण भागात जन्मलेले प्रदीपजी इयत्ता पाचवीपासून सातारा सैनिकी शाळेचे विद्यार्थी बनले. या शाळेने २०२३ पर्यंतच्या नोंदीनुसार एक जनरल, लेपट.जनरल आणि समकक्ष पद प्राप्त केलेले अकरा, मेजर जनरल आणि समकक्ष पद प्राप्त केलेले पंधरा, ब्रिगेडीअर आणि समकक्ष पद प्राप्त केलेले चाळीस इतके सैन्याधिकारी भारतीय सेनेस दिलेले आहेत! आणि उत्कृष्ट सेवेसाठी विविध सन्मान मिळवलेले अधिकारीसुद्धा अगणित आहेत. मेडल्सच्या यादीत प्रथम क्रमांकावर दिसतात ते मेजर प्रदीप ताथवडे साहेब...कीर्ती चक्र (मरणोत्तर)..देश वीर सैनिकांना प्रदान करीत असलेले चौथ्या क्रमांकाचा सन्मान! तत्कालीन राष्ट्रपती महोदय श्री.कोचेरील रमण अर्थात के.आर.नारायणन यांच्या हस्ते मेजर साहेबांच्या वीरपत्नी लीनता ताई यांनी कीर्ती चक्र स्वीकारले!
प्रदीपजी अभ्यासात, खेळांत अत्यंत वाकबगार होते. त्यांच्या मातोश्रींचे वडील कोंडाजीराव घनवट यांनी पहिल्या महायुद्धात कामगिरी बजावली होती, तर मामा लेपटनंट मार्तंडराव घनवट हे दुस-या महायुद्धात लढाईवर जाऊन आले होते...आणि दुसरे मामा कॅप्टन शिवाजीराव घनवट (निवृत्त) यांनी १९७१च्या भारत-पाक युद्धात मर्दुमकी गाजवली होती! बाल प्रदीप यांनी त्यांच्या या फौजी नातलगांकडून आजोळी अशा अनेक शौर्य कथा ऐकल्या असतील...त्यांच्या मनात आपणही असेच शौर्य गाजवावे, हा विचार न येता तरच नवल!
सातारा सैनिकी शाळेत सैनिकी संस्कार प्राप्त केलेले प्रदीपजी १९८० मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी एन.डी.ए.मध्ये प्रवेश मिळवते झाले. मुष्टियुध्द वॉटर पोलो, जलतरण इत्यादी खेळांत प्राविण्य दाखवत, तीन वर्षांचा अत्यंत खडतर अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून कडेट प्रदीप रामचंद्रराव ताथवडे लष्करी अधिकारी बनले.
१९८४ मध्ये इंडियन मिलिटरी अकादमी, देहरादून येथे त्यांचे एक वर्षाचे प्रगत प्रशिक्षण झाले आणि जून १९८४ मध्ये प्रदीपजी ८,जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्रीमध्ये सेकंड लेपटनंट पदी रुजू झाले. पुढील वर्षी बेळगावच्या सैनिकी प्रशिक्षण केंद्रातून त्यांनी कमांडो कोर्स पूर्ण केला आणि १८ जून १९८६ मध्ये साहेब कॅप्टन झाले! प्रदीप साहेबांना हवाई दलाचे विशेष आकर्षण होते. त्यांची ही इच्छा सुदैवाने लवकरच पूर्ण झाली...सियाचीन मधील अत्यंत खडतर युद्धभूमीवर त्यांची नेमणूक झाली आणि आर्मी एविएशन विंग मध्ये ते निवडले गेले...लष्करी हेलिकॉप्टर्स ते लीलया उडवू लागले...त्यांच्या गणवेशावर पंख लागले!
१७ जून २००० पर्यंत साहेबांनी तब्बल सोळा वर्षांची सैनिकी सेवा प्रभावीरीत्या बजावलेली होती. अगदी एकच वर्षापूर्वी म्हणजे ऑक्टोबर १९९९ मध्ये त्यांनी हिज्बुल मुजाहिद्दीनच्या पाच अतिरेक्यांना वरचा मार्ग दाखवला होता. त्याआधी १९८७ मध्ये मेजर वरिंदर सिंग साहेबांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या ऑपरेशन राजीव मध्येही ताथवडे साहेबांचा सहभाग होता..सेकंड लेपटनंट राजीव पांडे साहेबांच्या सन्मानार्थ या मोहिमेला ‘राजीव' हे नाव दिले गेले होते. या प्रसिद्ध मोहिमेत पाकिस्तानच्या निर्मात्याच्या नावाने असलेले कायद ठाणे भारतीय सैनिकांनी जिंकून घेतले होते आणि त्या कामगिरीत अतुलनीय कामगिरी बजावलेल्या बाणा सिंग यांचे नाव त्या ठाण्याला दिले गेले! सियाचीन मधील वास्तव्याच्या काळात ताथवडे साहेबांनी घरच्यांना लिहिलेल्या पत्रांचा समावेश ‘अमर योद्धा या पुस्तकात केला गेला आहे. सातारा सैनिक शाळेच्या माजी विद्यार्थी मित्रांनी मेजर साहेबांच्या जीवनावर बनवलेला एक लघुपट लवकरच प्रकाशित होईल, असे समजते.
त्या दिवशी मेजर साहेबांचे सहकारी मेजर सीयान ओब्रायन साहेबांनी ताथवडे साहेबांचा देह पुण्यापर्यंत पोहोचवला होता. त्यांनी साहेबांची कामगिरी त्यावेळी विशद करून सांगितली होती. पुणे महानगरपालिकेने मेजर साहेबांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मेजर प्रदीप ताथवडे उद्यानाची २००२ मध्ये निर्मिती केली. या उद्यानात मेजर साहेबांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून दरवर्षी १७ जून रोजी साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक या उद्यानात येत असतात.
मेजर प्रदीप रामचंद्रराव ताथवडे साहेबांसारख्या शूर, वीर सैन्याधिकाऱ्यांची माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी हा सदर दीर्घ लेख लिहिण्यामागचा उद्देश आहे. माहिती इंटरनेटवरील अनेक स्त्रोतांतून मिळवली आहे. विविध वर्तमानपत्रे, विकिपीडिया, एक्स, श्री.विकास मनहास साहेब आणि इतरांच्या लेखनातून खूप माहिती मिळाली. सादरीकरणात अर्थातच माझ्यासारख्या सिव्हिलियन माणसांकडून चुका होतातच. जाणकार या चुका दाखवून देतील तर सुधारणा करता येईल. मी गेली कित्येक वर्षे ताथवडे उद्यानासमोरून जाताना त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करत असतो. मात्र दुर्दैवाने मलाही मेजर साहेबांची इतकी सखोल माहिती नव्हती. या लेखाच्या निमित्ताने मला या महान हुतात्मा सैनिकाचे जीवन थोडेसे माहित झाले. अनेक उल्लेख राहून गेले आहेत, क्षमस्व! - संभाजी बबन गायके