सोशल मिडिया आणि शालेय विद्यार्थी : आधुनिक वास्तव (३० जून - जागतिक सोशल मिडिया दिन )

आजच्या डिजिटल युगात सोशल मिडिया ही केवळ माहितीची देवाण-घेवाण करणारी जागा उरलेली नाही, तर ती एक नवी संस्कृती, नव्या विचारांची दिशा, आणि अनेकांसाठी आयुष्याला चालना देणारी प्रेरणा बनली आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा प्रभाव सर्वात अधिक जाणवतो तो शालेय विद्यार्थ्यांमध्ये. त्यांच्यासाठी हे माध्यम शिक्षणाचे साधनही आहे आणि विरंगुळ्याचा मार्गही. पण या स्वातंत्र्याच्या पंखांना शहाणा उपयोग हवा, अन्यथा हे आभासी जग वास्तवाला गिळून टाकते.

सोशल मिडियाचे सकारात्मक पैलू : सोशल मिडियाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे क्षणार्धात जगाशी संपर्क साधणे. विद्यार्थ्यांना आज केवळ पुस्तकांपुरते मय्राादित रहावे लागत नाही. अभ्यासाचे व्हिडिओ, विज्ञान प्रकल्प, गणिती सूत्रांचे सोपे स्पष्टीकरण, ऐतिहासिक घटनांचे थ्री-डी मॉडेल्स, भाषेचे ऑनलाईन वर्ग  हे सर्व काही अगदी एका क्लिकवर उपलब्ध आहे. शालेय अभ्यासक्रमाबाहेरही अनेक गोष्टी शिकता येतात. वाचन, कोडिंग, वक्तृत्व, शुद्धलेखन, किंवा नवनवीन भाषा. विद्यार्थ्यांमध्ये नव्या कौशल्यांची जाणीव होते. सोशल मिडिया हे केवळ तंत्रज्ञान नव्हे, तर सर्जनशीलतेचं व्यासपीठ आहे.

समाजाशी संवादाचा नवा मार्ग : आजचा विद्यार्थी केवळ आपल्या गावापुरता सीमित नाही. जगभरातल्या विद्यार्थ्यांशी चर्चा, आंतरराष्ट्रीय वेबिनार्स आणि विचारमंच यामधून तो जागतिक दृष्टिकोन विकसित करतो. यातून व्यक्तिमत्त्व घडते, नेतृत्वगुण वाढतात, आणि नव्या संधींच्या दारात प्रवेश मिळतो.

दुष्परिणामांची सावली :  परंतु या चकाकत्या जगामागे एक सावली आहे - व्यसनाची. सोशल मिडियाचा अतिरेकी वापर हा शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक आरोग्यास अपायकारक ठरतो. अनेक विद्यार्थी सतत मोबाइल हातात घेऊन बसतात. अभ्यासापेक्षा रील्स, गेम्स, मेसेजेस अधिक महत्त्वाचे वाटू लागतात. त्याचा परिणाम म्हणजे एकाग्रतेचा अभाव, झोपेचे त्रास, डोळ्यांचे विकार, नैराश्य, आणि आत्ममूल्य कमी होणे. तसेच, सोशल मिडियावर दाखवले जाणारे आदर्श आयुष्य, सौंदर्याच्या कल्पना, प्रसिद्धीची चढाओढ  या साऱ्यांमुळे विद्यार्थी आत्मभान विसरतात. त्यात सायबर बुलिंग, चुकीची माहिती, आणि अनैतिक मजकूर यांचा धोका अधिकच गंभीर ठरतो.

सुसंवाद आणि सजगतेची गरज : या माध्यमाचा योग्य उपयोग व्हावा यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात खुला संवाद आणि जागरूकतेची गरज आहे. पालकांनी मुलांशी संवाद साधावा, त्यांना मार्गदर्शन करावे. शिक्षकांनी डिजिटल साक्षरतेबाबत शाळेतूनच योग्य दृष्टिकोन विकसित करावा. विद्यार्थ्यांनी स्वअनुशासन पाळून, सोशल मिडियाचा अभ्यास व व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोग करावा. महत्त्वाचे - सोशल मिडिया हे एक प्रभावी साधन आहे. त्याचा योग्य वापर विद्यार्थ्यांचे भवितव्य उजळवू शकतो, तर अतिरेकी व गैरवापर त्यांना अंधारात लोटू शकतो.

जागतिक सोशल मिडिया दिनानिमित्त आपण सर्वांनी हा विचार करावा की  "सोशल मिडिया हे साधन आहे की स्वामी?” याचे उत्तर आपल्याच वागणुकीत दडलेले आहे.
 -अजय लक्ष्मीबाई लिंबाजी पाटील, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद केंद्र शाळा, राहनाळ 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

विदर्भ निद्रिस्त नि तेलंगणा अतिदक्ष