महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
पुस्तक परिक्षण
भारतातील पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्रीला दुबळे केलेले होते अज्ञानामुळे स्त्री अंधारात चाचपडत होती.त्यावेळी स्त्रीविषयक कळवळा व्यक्त करणाऱ्या काही व्यक्ती होत्या. भगवान बुद्धानं स्त्रीला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली. प्राचीन भारतात स्त्रियांबाबत उदासीनता होती. त्यामुळे विशिष्ठ परिघाबाहेर स्त्रियांना झेप घेता येत नव्हती. त्यामुळे महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रांना ज्ञानी होण्याचा अधिकार मिळवून देण्याच्या कामी प्रारंभ केला. भारतामध्ये स्त्रीमुक्तीच्या संदर्भात महाराष्ट्र अग्रेसर होता. पुढे आगरकर, रानडे, महर्षी कर्वे यांनी या कामाचा सेतू निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.त्याचा परिणाम आंबेडकरांच्या माध्यमातून अंधारात खितपत पडलेली स्त्री उंच शिखरावर मजल मारू शकली.त्याचा लाभ अनेक वर्गातील दुबळ्यांना प्राप्त झाला.
मनूच्या आधी स्त्रिया ह्या शिक्षणात ज्ञानाच्या क्षेत्रात उच्च शिखरावर पोहचल्या होत्या. पुढे तिचे अवमूल्यन करण्यात आले. अतिप्राचीन काळात मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. आधी चरितार्थासाठी स्त्री पुरुष एकत्रितपणे काम करायचे. पुढे स्त्रीने फक्त घर आणि मूल सांभाळणार पुरुषाने उदरनिर्वाह करून घर चालवणे अशी विभागणी पुरुषाने स्वतःच्या सोयीनुसार केली. स्त्रीला मुक्त वापरण्यावर निर्बंध लादून घराच्या चौकटीत बंदिस्त केले. पुरुषी वर्चस्वाखाली झालेली स्त्रियांची फरफट पुढे आपल्या मुलींना येऊ नये म्हणून स्त्रीने पुरुषी वर्चस्व पेलायला पुढे सरसावू लागली. त्यामुळे स्त्रीवर लादलेली मानसिकता बोथट झाल्यावर ती परावलंबनातून मुक्त होऊन स्वावलंबी झाली. म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "ज्या देशात महिला सुखी तो देश सुखी” हे विधान आजही प्रगतिशील राष्ट्राला तंतोतंत लागू पडते. जगातील अनेक महापुरुषांनी स्त्रीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
महात्मा जोतीराव नि सावित्री फुले यांनी शिक्षणामुळे स्त्री सत्तेची पहाट होईल हे जाणले होते. त्यांची स्त्रियांच्या प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी दिशादर्शक होती.सन १८४८ साली म.फुले यांनी महार, मांगाच्या मुलींसाठी शाळा काढली आणि अस्पृश्य मुलींना शिक्षणाची वाट मोकळी करून दिली. पारंपारिक रूढी आणि धर्म शास्त्राच्या विरोधात उभारलेले हे प्रभावी अस्त्र होते. खरं पहाता अस्पृश्य स्त्रीच्या भवितव्याची ती नांदी होती. समाजव्यवस्थेच्या मूळ गाभ्यालाच हात घालून म.फुल्यांनी या स्त्रियांना सन्मान मिळवून दिला. हाच विचार घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी भारताच्या विविध कानाकोपऱ्यात गेले. या माध्यमातून त्यांनी आपल्या भाषण, संमेलन, परिषदांतील भाषणांतून दलित,उपेक्षित व अस्पृश्यांना स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला. कामगार,शेतकरी,शेतमजूर, वेठबिगारी,अंधश्रद्धा इत्यादी विषयांवर वेळोवेळी जनकल्याणांच्या हितार्थ संदेश दिला.या संदेशातील शब्द न शब्द प्रेरणादायी, स्फूर्तीवर्धक ठरत होता. अंधकारमय आयुष्याला प्रकाशमान करणारा होता.विकास प्रगतीच्या दिशेने झेपावणारा शब्द होता, तोच विचार महिलांच्या मनात रुतून बसत होता. म्हणूनच या कार्यात अनेक महिला सहभागी होत होत्या. यामुळे विविध शैक्षणिक व महाविद्यालयीन संस्था स्थापन करण्यात प्रेरणा व ऊर्जा मिळत गेली. स्त्रियांना सामाजिक सुधारणेच्या प्रक्रियेत सामील करून घेण्यासाठी आणि त्यांच्यावर जबाबदारी देण्याच्या हेतूने अनेक सभा, संमेलनातून परिषदांच्या भाषणांतून, लेखनातून त्यांना आंबेडकरांनी प्रवृत्त केले.
देवतांचा आढावा घेता दोन गोष्टी स्पष्ट होतात. हिंदू देव हे सामान्य माणसांप्रमाणे विवाह करू शकतात. देवांना अथवा त्यांच्या भक्तांना यात काहीच वाटत नाही. देवांची पत्नी ही स्वाभाविकपणेच देवता बनते आणि देवाप्रमाणेच देवताही भक्तांकडून होणाऱ्या उपासनेस पात्र होते. परंतु पुराणाकडे पहाता आणि विविध देवीकडे पहाता कोण कुणाची पत्नी ठरविणे अवघड गोष्ट ठरते. म्हणजे प्रत्येक नाव हे वेगवेगळ्या देवतेचे कोणते नाव लावते किंवा एकाच देवतेचे ते नाव आहे याबद्दल निश्चित सांगता येत नाही. त्यांचे माता, पिता,पती कोण याबद्दलही निश्चित सांगता येत नाही. या बद्दलची सविस्तर गहन माहिती या पुस्तकात उपलब्ध आहे.
अहिंसेचे कोडे यात डॉ. आंबेडकर म्हणतात,जे ब्राह्मण एकेकाळी गोवध करीत ते गोपूजक कसे झाले? याची कोणतीच कागदपत्रे सापडत नाहीत. प्राचीन आर्याच्या सवयी, सामाजिक चालीरीती यांची आणि नंतरच्या हिंदूंच्या सामाजिक चालीरीती यांची तुलना केली असता त्यामध्ये प्रचंड बदल झाला आहे हे ध्यानात येते.ही तर सामाजिक क्रांती आहे. हिंदू धर्मात नैतिकतेला काही स्थान आहे का प्रश्न पडतो. यात तांत्रिक धर्म म्हणजे नेमके काय? तांत्रिक धर्म म्हणजे शक्तीपूजा. शक्ती या शब्दाचा अर्थ सामर्थ्य अथवा ऊर्जा. तंत्रमार्गी तत्वज्ञानाच्या दृष्टीने पुरुष देवांची स्त्री सहचरी म्हणजे शक्ती. तांत्रिक धर्माची साहित्यिक माहितीचा पसारा भरपूर मोठा आहे. हिंदूचा शाक्य पंथ हा पुराणातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी भरलेला आहे. त्यात खूपच स्त्रियाच आहेत. हिंदूंच्या देवगणांपैकी बराच मोठा भाग यात आहे.
"तांत्रिक धर्म” हा पौराणिक धर्माचाच एक भाग आहे.अविवाहित स्त्री देवतांचे पूजन हा भाग पुराणांनी प्रथम रूढ केला. त्यानंतर मग देवांच्या स्त्रिया या पूज्य बनल्या. देवांची पत्नी म्हणून पूज्य होण्याचा त्यांचा जणू हक्कच होता. पुराणांनी शक्तिपंथाची जोपासना केली. तो पंथ सुरू केला. पुराणांच्या मते एखादी देवता एकटीच (अविवाहित) असली तरी तिला द्विविध रूप असते. तिचे एक रूप निष्क्रिय व शांत असते तर दुसरे रूप सक्रिय, उत्साही असते. देवतेच्या सक्रिय रूपाला शक्ती म्हणतात. पुराणांमध्ये या शक्तीचे प्रत्यक्ष व्यक्तीमध्ये रूप बघावयास मिळते.त्या त्या देवतेची पत्नी म्हणून हे रूप असते. शक्ती पंथाची ही बैठक आहे. देवपत्नीची पूजा हा शक्तिपंथाचा आधार आहे. हिंदुधर्मात नैतिकतेला काय स्थान आहे का? याबद्दलचे "हिंदुत्वाचे कोडे” या आंबेडकरांच्या पुस्तकातील विचार या पुस्तकात देखील वाचावयास मिळतात.तांत्रिक उपासना पद्धती ही पौराणिक उपासना पद्धतीहून वेगळी आहे. या पद्धतीचे मध्यवर्ती तत्वज्ञान कोणते? देवतांची पूजा करून माणसांच्या वैषयिक इच्छांची पूर्ती करून घेणे. तांत्रिक उपासना ही पाच प्रकारची असते. त्याचे प्रकार १) मद्यपान २) मांसाहार ३) मस्य (मासे सेवन) ४) मुद्रा सेवन (तळलेले धान्य) ५) मैथुन.
तांत्रिक पूजेमध्ये हे पाचही भाग येतात. अशाप्रकारे हिंदू धर्माची वाढ झालेली दिसते. हा इतिहास वाचला की, धर्माच्या अभ्यासकाला प्रश्न पडतो. म्हणूनच डॉ.आंबेडकर म्हणतात, हिंदुधर्मात नैतिकतेला काही स्थान आहे काय? या बद्दलचे ते अनेक दाखले ते देतात. डॉ.आंबेडकरांचे स्त्री विषयक लेखन पाहता हिंदू स्त्रियांची उन्नती आणि पडझड तसेच अन्य धर्माबद्दल देखील अशीच याबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध होते. तसेच मनुस्मृतीत स्त्रियांच्या एकंदर जीवनासंबंधी धार्मिक कायदे केलेले आहेत त्याची माहिती वाचकांना उपलब्ध होते. परंतु मनुने केलेल्या कायद्यात स्वतःच्या बुद्धिमत्तेची मौलिकतेचे प्रदर्शन केलेले दिसून येत नाही. ब्राम्हणी जात धर्माचा उदय भारतात झाल्यानंतर ब्राह्मणांची स्त्रियांसंबंधी जी विचारसरणी होती तीच मनुने आपल्या कायद्यात केल्याने तीच समाजात रूढ झाली. मनु हा बौद्ध धर्माचा कट्टर विरोधक म्हणून वागत होता. असं सारं असले तरी बुद्धाने स्त्रियांना समाजात आदरणीय स्थान देऊन त्यांना पुरुषांच्या बरोबरीने बसविले.
बालविवाहाच्या विषयात मुस्लिम कायद्यात विवाहाच्या बाबतीत वयाचे बंधन नाही. मुलींनी कोणत्याही वयात विवाह केल्यास त्याला अधिकृत मान्यता मिळते. मुस्लिम समाजात विवाह हा एकप्रकारे करार (ठेका) आहे . असं असले तरी मुस्लिम पतीला आपली पत्नी केव्हाही सोडून देण्याचा अधिकार आहे.शिवाय कायद्याने पतीला अनेक स्वसंरक्षणाचे अधिकार प्राप्त केलेले आहेत. पत्नीला मात्र स्वतःच्या संदर्भात काही धन, संपत्ती, स्त्री धन ( मेहर ) रूपात आपल्या पतीकडून प्राप्त करण्याचा दावा करू शकते. तसे पहाता मुस्लिम स्त्रियांची स्थिती जगातील सर्व स्त्रियांपेक्षा अधिक निराशाजनक आहे. मुस्लिम कायद्यानुसार एक मुसलमान एकाचवेळी चार स्त्रियांशी विवाह करण्याची मुभा दिलेली आहे. असं असले तरीही ते इतर मुस्लिम दासीशी भोग विलास करू शकतो. हा त्यांना कायद्याने अधिकार दिलेला आहे.यामुळे मुस्लिम स्त्रियांना फार हालअपेष्टाना सामोरे जावे लागते. मुस्लिम स्त्रियांना चेहऱ्यावर पडदा ठेवूनच सर्वत्र वावरावे लागते. स्त्रियांना मशिदीत इबादत (पूजा प्रार्थनेला) जाता येत नाही .या जीवन कार्यपद्धतीमुळे त्यांना मानसिक आणि नैतिक न्यूनता प्राप्त होते. डॉ. आंबेडकरांनी सर्वच धर्माचा अत्यंत चिकित्सक पद्धतीने अभ्यास करून त्याचे योग्य पद्धतीने लेखक महेंद्र गायकवाड यांनी माहिती उपलब्ध करुन दिली आहे. या पुस्तकातील मांडलेले विचार ही भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळातील स्त्रियांचे केलेले विवेचन अत्यंत मार्मिक, भेदक आहे.सखोल चिंतनातून मांडलेला विचार तळागाळातील दुर्बल स्त्रीला सक्षम स्त्री करण्याचा हेतू आहे. तिची दशा आणि दिशा बदलेल तेव्हा चळवळीतील लढणाऱ्या आंदोलनात स्त्रियांचा पुढाकार वाढलेला दिसेल! हा म्हटला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय आहे.
पुस्तकाचे नाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री विषयक लेखन लेखक : महेंद्र गायकवाड
प्रकाशक : संघर्ष प्रकाशन मूल्यः२००/ रु. पृष्ठे : १५२
- मनोहर साळवी