पावसाळे

पाऊस बरसू लागला अन्‌ अशावेळी आपण एकटे असलो तर कुठली तरी आठवण मनात येतेच... डोळे भरून येतात. मन कातरं होतं...वेडबागडं होतं.. भूतकाळाचे दरवाजे अलगद उघडतात...आणि अनाकलनीय अशा आठवणीत आपण हरवून जातो जरा वेळाने आपणच आपल्याला सावरतो....म्हणूनच पावसाळ्यात एकदा तरी मनाला असं जरा वेळ भटकू द्यावं..स्वैर सोडावं  आणि त्याचा मनसोक्त आनंद घ्यावा.. काहीही म्हणा.. पण हिवाळे, ऊन्हाळे येतात आणि जातात... पावसाळा मात्र आर्त करून जातो....

भूरभूर ...भूरभूर पाऊस सुरू झाला. मी लगेच गॅलरीत गेले. समोरच्या घरातली छोटी मुलं बाहेर येऊन "येरे येरे पावसा तुला देतो पैसा म्हणत नाचायला लागली. दोघं अगदी गोड आहेत. पाऊस वाढला. मुलं आत गेली.बराच वेळ पाऊस पडला. अंगणात पाणी  साठलं होतं. थोड्या वेळाने पाऊस थांबला. मुलं आता काय करतील? कदाचित पावसाच्या साचलेल्या पाण्यात होड्या सोडतील..

"पाऊस आला धो धो”
 पाणी व्हायलं सो सो सो
 पाण्यात बोट सोडली सोडली
 हातभर जाऊन बुडली बुडली
बोट बुडणार हे माहीत असलं तरी बोट सोडायचा मोह होतोच...

माझं मन माझ्या लहानपणात गेलं. त्या मुलांवरून आठवले शाळेचे दिवस.. नवीन रेनकोट घेतलेला. नेमका शाळेत जायच्या आणि यायच्या वेळी पाऊस पडायचाच नाही. कोरडा रेनकोट दप्तरातून न्यायचा आणि परत आणायचा. कंटाळून एके दिवशी रेनकोट घरीच ठेवला. त्या दिवशी शाळा सुटायच्या वेळी धुवांधार पाऊस सुरू झाला. भिजत घरी यायला आवडायचं; पण त्यापेक्षा आपण आज नेमका रेनकोट घरी ठेवला याचं दुःख वाटत होतं.

तेवढ्यात शाळेच्या गेटपाशी हातात रेनकोट घेतलेली आई दिसली .. रेनकोट घालून मिरवत घरी येता आलं..किती  किती आनंद झाला होता..

शाळेतला मराठीचा तास. त्यादिवशी पाऊस खूप जोरात येत होता. बाई वर्गात आल्या आल्या म्हणाल्या, "आज आपण फक्त कविता म्हणू तासभर कवितांनी वर्ग चिंब भिजला. दिवस सुगीचे सुरू झाले, उघड पावसा ऊन पडू दे, ने मजसीने परत मातृभूमीला, ऐल तटावर पैल तटावर" एका मागोमाग कविता म्हटल्या..

 शेवटी बाईंनी "बाई या पावसानं...”  हे गाणं म्हटलं .बाईंचा आवाज किती गोड आहे हे तेव्हा कळलं. बाईंचं तेव्हा नुकतंच लग्न झालं होतं. त्या गाण्यातील ”जीवलग कोठे बाई पडे अडकून नच पडे चैन..ही ओळ आठवली.. त्यावेळी बाईंनी ते गाणं का म्हटलं.. ते आज  इतक्या वर्षानंतर समजलं.शाळेनंतर कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर वेगळीच दुनियासमोर आली. त्यात पहिल्या ट्रीपचा अनुभव तर  कितीतरी आठवणी देऊन गेला..

 लोणावळा ते खंडाळा पायी जायची ट्रीप. वर्गातल्या तरुण मुलांबरोबर बाहेर पडायची आयुष्यातली पहिली वेळ.. गप्पा, गाणी, खोड्या आणि वरून पाऊस..
हळूच कोणीतरी दोघे मागे रेंगाळायचे. हातात हात घालून झाडाखाली उभे रहायचे.. खुळ्यासारखा कोणाचा तरी कुणावर तरी  जीव जडायचा..

कॉलेजपुरती ती  नाती ..अशा हळव्या पावसात ट्रीपला जी मजा येते ती आयुष्यात परत कधी येत नाही.

हुरहुरती मनं घेऊन ट्रिपहून परत यायचं असतं... खरं म्हणजे तसं फारसं काही घडलेलं नसतं ...पण म्हटलं तर खूप घडलेले  असतं..कॉलेजच्या त्या रमणीय जगातून बाहेर यावं लागतं. कॉलेजातले मित्र कॉलेजपुरतेच असतात. एखाद दुसरा तेवढ्या वेळापुरता जवळचा होतो इतकंच.....नवरा मात्र दुसराच कोणीतरी होतो. तोही खूप आवडतो. लग्नानंतर वेगळे जग सुरू होतं. हातात हिरव्या बांगड्या आणि गळ्यात काळेमणी आले की गृहिणी  दिसायला होतं..अल्लडपणा हरवतो. मंगळवारी मंगळागौरीचा मोठा थाट आईने मांडलेला असतो. सगळी जय्यत तयारी झालेली असते. पूजेला आठ मुली येणार आहेत. असं आई घोकत असते.

त्याच दिवशी धुवांधार पाऊस येतो. मुली येतात की नाही? पूजा होते की नाही? अशी आईला काळजी असते. पण भर पावसात मुली येतात आईचा जीव भांड्यात पडतो.
"जय देवी मंगळागौरा” ही आरती म्हणताना आईचा तो नथ घातलेला सात्विक चेहरा कृतकृत्य झालेला असतो. पाऊस म्हटलं की आईचा तो चेहरा आठवतो...संसारचक्र पुढे जात राहते. बाकी काही असलं तरी नवऱ्याबरोबर पावसाची मजा मात्र  लुटता येत नाही. तो बिचारा कर्तव्य तत्पर जबाबदार माणूस असतो. दोघे बाहेर फिरायला जातात. अचानक आभाळ भरून येते. वारा सुटतो.. पाऊस येणार ..असं वाटतं..मनात येतं आता पावसात दोघांनी हातात हात घेऊन मस्त भिजत  मजेत घरी यावं....वगैरे रोमँटिक कल्पना आपल्याला सुचायला लागतात. आपलं लक्ष जमिनीवर नसतंच ...

तेवढ्यात नवरा चटकन रिक्षा नाहीतर टॅक्सी थांबवतो. आपण काही न बोलता त्यात  चढून बसतो..शहाण्या बाई सारख्या.. बाहेर धो धो पाऊस सुरू असतो. अंग जराही ओलं न होता भर पावसात आपण कोरडे घरी येतो. पण त्यातही आनंद वाटायला लागतो. कारण आता संसारात मनापासून रमायला झालेलं असतं. बाहेर पाऊस कोसळायला लागल्यावर नवरा मुलं घराच्या चार भिंतीत सुरक्षित असले की हायसं वाटतं. त्या क्षणी बाहेर पाऊस बघायला जायला वेळ नसतो. सगळ्यांसाठी खायला काहीतरी  गरम करून देण्यात आनंद असतो. आता आईची जागा आपण घेतलेली असते.

घराच्या गॅलरीत खुर्चीवर अनेक पावसाळे पाहिलेले दोन जीव सासू-सासरे बसलेले असतात. गतजीवनाच्या  कितीतरी आठवणी त्यांच्यासोबत असतात. त्यांचीच त्यांना साथ असते.कधी कधी ते दोघे एकमेकांशी बोलतही नाहीत. नुसते पावसाकडे बघत बसतात... पावसाकडे बघतात का अजून काही बघतात कळत नाही...

एक खुर्ची रिकामी झाल्यावर सासूबाईंचा एकटा जीव निःशब्द होऊन जातो. त्यांच्याकडे बघता बघता आपल्या डोळ्यात पाऊस उतरतो."पुढचा पावसाळा मी पाहिनं असं वाटत नाही” असं म्हणत पावसाकडे बघत बसलेल्या त्या आठवतात.. खरंच पुढच्या पावसाळ्यात दुसरी खुर्चीही रिकामी होते. गॅलरी उदास सुनीसुनी होऊन जाते..

मनात विचार येतो.. आपलेही बरेच पावसाळे पाहून झाले. अजून किती आहेत कोण जाणे? पावसाचे हे असंच आहे. त्याच्याकडे बघताना आठवणींच्या सरी धावून यायला लागतात... भावनांनी भिजवुन टाकतात..डोळे ओलावतात..पावसाळ्यात कधीतरी असा एखादा दिवस येतो.. खिडकीतून, गच्चीतून, गॅलरीतून, दारातून कुठूनही आपण पाऊस बघत असतो. अशावेळी आपण एकटे असलो तर कुठली तरी आठवण मनात येतेच...

 डोळे भरून येतात. मन कातरं होतं...वेडबागडं होतं.. भूतकाळाचे दरवाजे अलगद उघडतात...आणि अनाकलनीय अशा आठवणीत आपण हरवून जातो जरा वेळाने आपणच आपल्याला सावरतो....म्हणूनच पावसाळ्यात एकदा तरी मनाला असं जरा वेळ भटकू द्यावं..स्वैर सोडावं  आणि त्याचा मनसोक्त आनंद घ्यावा.. काहीही म्हणा पण हिवाळे, ऊन्हाळे येतात आणि जातात... पावसाळा मात्र आर्त करून जातो.... - नीता चंद्रकांत कुलकर्णी 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पुस्तक परिक्षण