महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
शिक्षणाचा हेतू तरी काय?
मुळात शिक्षणाचा हेतू हा स्पर्धा नसावा. माणसाच्या विचारांची उंची वाढावी. माणूस म्हणून यशस्वीपणे जगता यावे. समाजात वावरताना स्वभान असावे. एकमेकांप्रती आदरभाव बाळगावा. या झाल्या माफक गोष्टी. त्या हसत खेळत शिक्षणातून मिळतात. शाळा ही केवळ शिकवण्याची जागा नाही शाळा ही प्रयोगशाळा आहे. जिथे स्वातंत्र्य, विचार, सहभाग आणि आनंद असायला हवा. मानवी मूल्यांची जपणूक करत माणूस म्हणून जगता याव. मुलांना स्वतःचं व्यक्तिमत्व बिनधास्तपणे विकसित करू द्यावे. यासाठी पालक म्हणून मार्गदर्शक राहावे.
चाचणी परीक्षेत कमी गुण पडल्याने मुख्याध्यापक पित्याची मुलीला बेदम मारहाण, लेकीने जीव सोडला! नेलकरंजी, आटपाडी सांगली जिल्हा येथील घटना. बातमी वाचली मन सुन्न झाले. वडील शिक्षक मुख्याध्यापक धोंडीराम भोसले. मुलगी साधना दहावी ९५ टक्के गुणाने उत्तीर्ण झालेली. बारावीत नीटच्या परीक्षेत कमी गुण पडले बस! एवढेच कारण. शिक्षक म्हणून समंजस आणि संयमाने घेतले असते तर टोकाची परिस्थिती निर्माण झाली नसती. तिने पुन्हा गुण मिळवले असते किंवा नसतेच मिळवता आले तरी पर्यायी स्वतःला सिद्ध केले असते. पण तिला एवढी मारहाण केली की तिचा जीवच गेला. तिला किती यातना झाल्या असतील. रात्रभर ती तळमळत होती. पण तिला दवापाणी विचारले नाही. सकाळी जागतिक योगदिन म्हणून कर्तव्यासाठी शाळेत हजर राहायला गेले. आपण रात्री काय आणि कसे वागलो याची जराही खंत वाटली नाही. वडील म्हणून, शिक्षक म्हणून, माणूस म्हणून जनावरांसारखे वागत असतील तर त्यांच्या शिक्षणाचा काय उपयोग? त्यांच्याकडे यावर काय उत्तर आहे?
शिक्षक असून तुमच्यांकडे मानवी मूल्य नसतील पाल्यांबरोबर अमानवी वागत असाल तर तुम्हीं कसले शिक्षक? कशी घडवणार भावी पिढी? निरागस वय पायाखाली चुरडून टाकत असाल तर स्वतःला शिक्षक म्हणून घेऊ नये. शिक्षणाने माणसाला चेहरा मिळतो हे खरं असले तरी ही पद्धत योग्य आहे का? स्पर्धा नेमकी कोणाबरोबर आणि कशासाठी? नेमकं पोहोचायचे कुठे?
मुळात शिक्षणाचा हेतू हा स्पर्धा नसावा. माणसाच्या विचारांची उंची वाढावी. माणूस म्हणून यशस्वीपणे जगता यावे. समाजात वावरताना स्वभान असावे. एकमेकांप्रती आदरभाव बाळगावा. या झाल्या माफक गोष्टी. त्या हसत खेळत शिक्षणातून मिळतात. शाळा ही केवळ शिकवण्याची जागा नाही शाळा ही प्रयोगशाळा आहे. जिथे स्वातंत्र्य, विचार, सहभाग आणि आनंद असायला हवा. मानवी मूल्यांची जपणूक करत माणूस म्हणून जगता याव. मुलांना स्वतःचं व्यक्तिमत्व बिनधास्तपणे विकसित करू द्यावे. यासाठी पालक म्हणून मार्गदर्शक राहावे.
मग ही ओढाताण का? मुल तीन वर्षाचं होतं नाही तोपर्यंत त्याच्यावर ओझं लादलं जातं. अगदी अवास्तव.भाषेची व गणिती आकड्यांची ओळख या प्राथमिक इयत्तेपर्यंतच्या गोष्टी पण त्यासाठी वर्षाला लाखभर रुपये मोजले जातात. त्याची खरच गरज असते काय? यावर फार विचारही केला जात नाही. पूर्वी कुठे इंग्रजी माध्यमातल्या शाळा होत्या तरी तज्ञ डॉक्टर, इंजिनिअर निर्माण झाले नव्हे. मुलांना त्या-त्या विषयांची आतून ओढ असेल तर त्या-त्या विषयात नक्की पारंगत होतील. अगदी आनंदाने. त्याला जे आवडतं ते करु द्यावे. अपेक्षांच ओझं नको.
पालक म्हणून मुलांना योग्य मार्गदर्शन करणे बरोबर; पण जोर जबरदस्ती करणे कितपत योग्य? अशाने मुलं नकारात्मकतेकडे झुकतात. आत्मविश्वास हरवतात. मुल महत्वाचे, त्याच हसु महत्वाचे वाटत नाही का? त्याला त्याच्या बुद्धयांकानुसार वाढु द्यावे. वेगवेगळे अनुभव त्याला त्याच्या पद्धतीनं घेऊ द्यावेत. पालक म्हणून सगळ्याच गोष्टी त्याच्यावर लादल्या गेल्या तर मनाचे खच्चीकरण होईल आणि याचा परिणाम त्याच्या शारीरिक वाढीवर होईल याची जाणीव असावी.
प्रगतीच्या नावाखाली शिक्षणाची इंग्रजी माध्यमे आली आणि शिक्षणाची चौकट विस्तारली. मातृभाषिक शिक्षणाला धक्का देऊन इंग्रजी माध्यमाने हातपाय पसरले. पण मातृभाषेतील शिक्षणाने मुलांची जशी प्रगती होते तशी इंग्रजी भाषेतील शिक्षणाने प्रगती होत नाही.असे अनेक तज्ञांनी हे मत मांडले आहे. - सौ रुपाली लटके