बाई कधी येणार?

माझी चाहूल लागताच दोन छोट्या मुली धावत बाहेर आल्या. त्यांना वाटलं होतं की त्यांच्या बाई आल्या असतील. बाईंना भेटायला त्या मुली धावत बाहेर आल्या होत्या. पण समोर अनोळखी मी दिसताच त्यांचा उत्साह मावळला. तरी त्यांनी धीराने मला विचारले, "आमच्या बाई नाही आल्या?” आपल्या बाईंची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुलींचा आपल्या येण्यामुळे हिरमोड झाला याचे मलाही वाईट वाटले.आणि बाईंचा हेवाही वाटला.

शाळा सुरू होऊन नुकताच आठवडा झाला होता.वेगवेगळ्या शाळांमधील पहिलीतील नवीन मुलांच्या चेहऱ्यावरील उत्साह, गोड आवाज आणि त्यांच्या कृतींमधील निरागसता मुलांच्या अनोख्या आणि सुंदर विश्वाची जाणीव करून देत होती. मुलांचे जग पाहण्याची, अनुभवण्याची संधी शाळेमध्ये मिळत होती. प्रत्येक दिवशी वेगळा अनुभव येत होता. अनुभवाचे वैविध्य प्रत्येक दिवशी माझ्याही मनाची उत्सुकता वाढवत होते. आज आपल्या अनुभवाच्या गाठोड्यात नवीन कशाची भर पडणार आहे, याचा विचार मनामध्ये वेगळाच उत्साह निर्माण करायचा. उत्साहाने तुडूंब भरलेल्या मनाला सोबत घेऊन, आनंदाचा झरा असलेल्या मुलांच्या भेटीला जाऊ लागलो.

त्या दिवशीची ती भेट, ‘मुलं शिकतात कशी' ही शिकवणारी ठरली. सकाळी साडेआठ वाजता घर सोडलं. नऊची बस होती. पाऊस असूनसुद्धा बस वेळेवर आली. माझं लक्ष हातातल्या घड्याळाकडे सतत जात होते. माझ्या बालपणीच्या आठवणी मला पुन्हा शाळेत भेटणार होत्या. त्या भेटींमधील काही मिनिटांचे अंतरसुद्धा युगासारखे वाटत होते. मनात विचार यायचा, एसटीच्या पुढे धावता आलं तर किती बरं होईल. मला सोडून माझं मन कधीच शाळेत पोहोचले होते. शहरातल्या गर्दीतून बस आता बाहेर पडली होती. रिमझिम पावसाचे तुषार एका लयीत खिडकीतून नाचत आत येत होते. मध्येच जोराचा वाऱ्याचा झोत यायचा आणि तुषारांच्या नृत्याचा ताल बिघडवून जायचा.तेव्हा मात्र बसच्या खिडक्या एका लयीत बंद व्हायच्या. पावसाचे गाणे चांगलेच रंगात यायचे आणि मग रस्त्याच्या कडेला उभी असलेली झाडे गाण्याच्या तालावर डोलायची. मेघांनी भरलेले आकाश, हिरवाईने नटलेली जमीन आणि काचेच्या फटीतून येणारे पावसाचे थेंब, ‘निसर्ग म्हणजे स्वर्ग' याची अनुभूती देत होते.  मनात शाळा आणि सोबतीला स्वर्ग या अवस्थेत माझा शाळेचा स्टॉप आला आहे हे मी विसरलोच. बसची बेल आणि कंडक्टरचा आवाज ऐकताच, चांगल्या गोष्टीत वेळ कसा जातो ते कळतच नाही हे पटलं आणि काही वेळापूर्वी घड्याळाकडे एकटक पाहणारा मी निसर्गाच्या स्वाधीन कधी झाले आणि शाळेपर्यंत कधी आलो हे समजलंच नाही.

अजून पाऊस येत जात होता. म्हणून हातातल्या छत्रीची उघडझाप सुरू होती. दोनशे मीटर अंतरावर शाळा दिसत होती. शाळेच्या बाजूला असलेल्या शेतात भात लावणी सुरू होती. आजूबाजूला भाताची शेती, शेताच्या कडेला झाडे आणि झाडांच्या शेजारी शाळा. जणू एखाद्या चित्रकाराच्या स्वप्नातील अविष्कार. शाळेच्या दिशेने जाणारे माझे प्रत्येक पाऊल मला वेगळी ऊर्जा देत होते. जागेपणी मला स्वप्नाचा अनुभव येत होता. मला कळलेच नाही की मी कधी शाळेच्या गेटपर्यंत पोहोचलो ते! एवढा सुखाचा प्रवास होता तो. पहिल्यांदा माझं स्वागत केलं ते कुंड्यांमध्ये लावलेल्या छोट्या छोट्या रोपांनी. माझी चाहूल लागताच दोन छोट्या मुली धावत बाहेर आल्या. त्यांना वाटलं होतं की त्यांच्या बाई आल्या असतील. बाईंना भेटायला त्या मुली धावत बाहेर आल्या होत्या. पण समोर अनोळखी मी दिसताच त्यांचा उत्साह मावळला. तरी त्यांनी धीराने मला विचारले, "आमच्या बाई नाही आल्या?” आपल्या बाईंची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुलींचा आपल्या येण्यामुळे हिरमोड झाला याचे मलाही वाईट वाटले.आणि बाईंचा हेवाही वाटला. त्या मुलींचे लक्ष अजूनही बाईंच्या वाटेकडे लागले होते. नजर रस्त्याकडेच होती. तेवढ्यात अजून एक चौथीतली मुलगी बाहेर आली. तिच्या हातात सुंदर गुलाबाचे फुल होते. फुल माझ्या हातात देत ती मला म्हणाली, "गुड मॉर्निंग सर” मला ती ओळखत होती. तिनेही तोच प्रश्न विचारला, "आमच्या बाई नाही आल्या?” निरपेक्ष वृत्तीने, निष्पाप निरागस बालके आपल्या बाईंची वाट एवढ्या आतुरते पाहतात की त्या क्षणी त्यांना सोन्यापेक्षाही जास्त मोल बाईंच्या येण्याचे असते. खरंतर बाई रोज शाळेत येत असतात; पण एखाद्या दिवशी त्या नाही आल्या तर मुलांना तो विरह सहन होत नाही. "बाई येतीलच एवढ्यात” असं मी हसत म्हटलं आणि गुलाबाचे फुल खिशात ठेवलं. पहिलीतल्या नवीन मुलीला तिचं नाव विचारले. गोड आवाजात तिने सांगितले, "कृष्णाई”. नाव सांगतानासुद्धा कृष्णाई, बाईंच्या रस्त्याकडे बघत होती. ‘एक आई' दुसऱ्या ‘आईची' येवढ्या आतुरतेने वाट पाहते हा मंगल प्रसंग मला शाळेत अनुभवता आला. मुलांवर जीवापाड प्रेम करणारे शिक्षक खऱ्या अर्थाने मानवी संस्कृती जपत असतात ते त्या क्षणाला पटलं.

काही क्षणात कृष्णाई वर्गामध्ये गेली. हातात झाडू घेऊन स्वच्छता करू लागली. हळूहळू बाकीची मुलं शाळेत येऊ लागली. पण येणारे प्रत्येक मूल बाईंची वाट पाहत होते हे त्यांच्या डोळ्यात दिसत होते. त्यातल्या काही मुलांनी धाडसाने पुन्हा मला तोच प्रश्न विचारला, "आमच्या बाई कधी येणार?” साफसफाईचे काम करत असताना मुलं मधूनच बाहेर येऊन बाई आल्या आहेत का हे रस्त्याकडे पाहत होती आणि पुन्हा वर्गात जात होती.  आधीच सुंदर असलेली शाळा मुलांच्या चिमुकल्या हातांनी अजून सुंदर केली. निसर्गाचा टवटवीतपणा आणि निरागस मुलांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत होती. थोड्या वेळाने बाई आल्या. बाईंना पाहून मुलांना आनंद झाला. त्यांच्या देहबोलीमध्ये कमालीचा बदल झाला. शाळेचा परिपाठ झाला. प्रार्थनेने वातावरण अजून मंगलमय झाले. आता पाऊस थांबला होता. वर्गात बाईंनी शिकवायला सुरुवात केली.

 चौथीच्या वर्गात संवाद लेखनाचा सराव सुरू होता. सूचनेप्रमाणे मुलं लेखन करत होती. त्यातला काही सराव आदल्या दिवशी झाला होता. मुलांच्या कल्पनाशक्तीचा अंदाज यावा म्हणून मुलांना संवाद लेखनासाठी मी नविन विषय दिला. बाई आणि विद्यार्थी यांच्यामधील संवाद लिहा. मुलांना हा विषय देत असताना मनामध्ये एक विचार होता की मुलं एकतर कल्पना करून आदर्श संवाद लिहितील किंवा शाळेमध्ये ते त्यांच्या बाईंशी नियमितपणे काय बोलतात त्याचे खरे प्रतिबिंब शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करतील. सूचना देताच मुलांनी लेखन करायला सुरुवात केली. अवघ्या पाच मिनिटांत मुलांचा संवाद लिहून पूर्ण झाला. आदिती वही घेऊन माझ्या पुढे आली. तिने लिहिलेल्या संवादातील वाक्य वाचून मला धक्का बसला.

बाईः आता आपण निसर्ग या विषयावर चर्चा करूया.
आदितीः बाई, पण आज अभ्यास तपासला नाही.
बाईः बरं झालं, आठवण केलीस. विसरलेच होते मी. आता पटकन मला केलेला अभ्यास दाखवा.
आदितीः ठीक आहे.
बाईः चला आता चर्चा करायला सुरुवात करूया, आदिती आपल्याला बसायला बैठक घाल.
आदितीः ठीक आहे, लगेच बैठक घालते.
बाईः आता मला सांगा, झाडाला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत?

अमुक एखाद्या विषयावर आपण ‘चर्चा करूया' अशी औपचारिक सुरुवात चौथीतील ग्रामीण भागातील विद्यार्थी करतात हे नक्कीच बाईंचे यश आहे. बाई अभ्यास तपासायला विसरल्या हेही आदितीच्या लक्षात आहे.  पण संवादाला वेगळ्या वाटा फुटण्याआधीच बाई झाडाचे समानार्थी शब्द विचारून आपल्या मूळ ‘निसर्ग', या विषयाकडे चर्चा कशी जाईल याचे योग्य नियोजन करतात. या सर्व बाबी वर्गातील मुलांनी पाहिल्या आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या संवादात दिसले. चर्चा कशी करायची किंवा एखादा विषय कसा शिकायचा हे बाईंनी जाणीवपूर्वक शिकवले नाही. मात्र मुलं बाईंच्या कृतीतून, बाईंना काय शिकवायचे आहे ते शिकली. जर बाईंनी या पद्धतीने वर्गात चर्चाच केली नसती तर मुलांकडून तसे लेखन कधीच झाले नसते. वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांनी काल्पनिक संवाद न लिहिता त्यांच्या वर्गातील नियमित घडणारे संवाद लिहिले होते. प्रत्येकाच्या संवादात वैविध्य होते. कोणी अभ्यासाविषयी, कोणी बाईंच्या ड्रेस विषयी तर कोणी स्वतःविषयी लिहिले होते. यावरून वर्गामधील घडणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादाचा उच्च दर्जा दिसून आला. प्रत्येकाचे संवाद वाचत असताना मला,  "बाई कधी येणार? या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि मुले बाईंची वाट आतुरतेने का पाहत होती तेही समजले.

खऱ्या अर्थाने निसर्गाच्या कुशीत असलेल्या शाळेत बाई निसर्गाविषयी मुलांशी काय चर्चा करत असतील याचे कुतूहल माझ्या मनात निर्माण झाले. अदितीला जर अजून वेळ दिला असता तर बाईंनी निसर्गाची केलेली सर्व चर्चा शब्दरूपाने मला वाचता आली असती. आता पाऊस थांबला होता म्हणून शाळेच्या बाहेर पडलो. दोनशे मीटरवर पुढे बस स्टॉप होता. भात लावणीचे काम सुरू होते. आकाशाचा रंग आता सकाळ पेक्षा  थोडा फिकट झाला होता. वाऱ्याच्या सोबत नाचायला आता पावसाचे तुषार नव्हते. पक्षांचे संगीत मात्र सुरू होते. निसर्ग तोच होता फरक मात्र प्रहराचा होता. थोडं पुढे चालून गेल्यावर मागे वळून पाहिले. सकाळी माझ्या हातात गुलाबाची फुल देऊन गुड मॉर्निंग म्हणणारी मुलगी माझ्या डोळ्यासमोर आली. मला वाटलं मुलं बाहेर आली असतील आणि मला म्हणतील, "परत कधी येणार?” पण तसं काहीच घडलं नाही. मुलं वर्गात त्यांच्या निसर्गात दंग होती. त्यांच्यासोबत त्यांच्या बाई होत्या. "बाई कधी येणार?”  या  शब्दांवर हक्क फक्त बाईंचाच होता. हे शब्द आपल्यासाठी नाहीत ते कळलं. ते शब्द ऐकायचे असतील तर ‘बाई' व्हायला हवे हे निसर्गाने तेव्हा मला शिकवलं. -अमर घाटगे, केंद्रप्रमुख - रत्नागिरी 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

शिक्षणाचा हेतू तरी काय?