जीवनसे भरी तेरी आँखे

डोळे जेंव्हा ‘कायमचे मिटायची' वेळ येते तेव्हा वास्तवाचे भान राखून डॉक्टर त्या व्यक्तीच्या वारसाला सांगतात...‘जवळच्या सर्व नातेवाईकांना बोलावून घ्या.' जेंव्हा प्रत्यक्षात ती व्यक्ती डोळे मिटते तेव्हा सोबत असलेल्या साऱ्यांचे डोळे अश्रूंनी डबडबतात. त्याच्या अंत्यदर्शनासाठी, शेवटचे डोळे भरुन पाहण्यासाठी मग लोक गर्दी करतात.  म्हणूनच म्हणतो आपण सारे हाती पायी, नजरेने, कानाने, डोळ्यांनी धड असू तोवर जवळच्या, लांबच्या, आपले जीवन समृध्द करणाऱ्या साऱ्यांना भेटत राहा. सारे काही मोबाईलवर-सोशल मिडियावर सोपवू नका.

   प्रसंग २० जूनचा आहे. भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचा जन्मदिवस  साधेपणाने साजरा होत होता. त्यांचे शुभचिंतन करायला डेहराडूनच्या ‘नॅशनल इन्स्टीट्युट फॉर एम्पॉवरमेन्ट ऑफ पर्सन्स विथ व्हिज्युअल डिसेबिलिटीज' या अंधशाळेतील मुले-मुली आल्या होत्या. त्यांनी ‘बार बार दिन ये आए..हॅप्पी बर्थडे टू यु' हे गाणे गात राष्ट्रपतींना शुभेच्छा दिल्या. जीवनात दुःख, उपेक्षा, परवड, विरह या व अशा अनेक नकारात्मक गोष्टी सोसलेल्या द्रौपदीजींना हे गाणं ऐकून रडूच कोसळले. दृष्टी, नजर नसलेली तशी बालके देशातल्या घटनात्मकदृष्ट्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीला ‘हा दिवस बार बार येऊ दे.. बार बार दिन ये आए' असं म्हणत अभिष्टचिंतन करीत होती...आणि दोन्ही डोळे व्यवस्थित असताना ओघळणारे अश्रु न लपवणाऱ्या महामहिम राष्ट्रपती अवाक झाल्या होत्या. त्यांच्या शेजारी उभ्या असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याने आपला रुमाल देऊ केला असल्याचे छायाचित्र सर्वत्र प्रसिध्द झाले आहे. डोळे असलेल्यांनी ते पाहिले..डोळे नसलेल्यांचे काय?

   ‘बार बार दिन ये आये' हे गाणे १९६७ साली पडद्यावर आलेल्या ‘फर्ज' या रविकांत नगाईच दिग्दर्शित सिनेमातले असून ते जम्पिंग जॅक म्हणवल्या जाणाऱ्या रविंद्र कपूर अर्थात जीतेंद्र व बबिता यांच्यावर चित्रित झाले आहे. हे सुंदर गीत मोहम्मद रफी या सुप्रसिध्द गायकाने आपल्या जादुई आवाजात गायिले व लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडगोळीने ते संगीतबध्द केले होते. आजही या सिनेमाला व प्रख्यात गीतकार आनंद बक्षी यांनी रचलेल्या या गाण्याला तब्बल अठ्ठावन्न वर्षे होत आली तरीही देशभर कुठे ना कुठे तरी कुणाचा ना कुणाचा तरी वाढदिवस साजरा होत असेल तर हे गाणे अवश्य वाजवले जातेच. ज्यांना डोळे आहेत, ते हे गाणे वाजताना इतरांनी त्यावर केलेला धम्माल नाच पाहतात, ज्यांना डोळे नाहीत तेही या श्रवणीय गाण्याचा आनंद घेत असतात. नेत्रहीन लोक यातून काय समजत असतील? त्यांना केक कसा दिसतो, मेणबत्या कशा प्रज्वलित केल्या जातात, विझवल्या जातात, मग केक कसा भरवला जातो हे सारे समजायचे काय माध्यम असेल? असे प्रश्न मला नेहमी हैराण करत असतात. मला वाटते... महामहिम राष्ट्रपती यांच्याही मनात असाच भावभावनांचा कल्लोळ दाटला असेल व त्यामुळेच त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला असावा. तुम्हा आम्हा डोळेधारकांना तोंडाच्या वाणी अर्थात भाषेप्रमाणेच डोळ्यांचीही भाषा असते. पण जन्मापासून केवळ अंधाराचीच सवय झालेल्यांचे काय?

   डोळा हा मराठी शब्द फारच खडबडीत आणि भलताच अनाकर्षक वाटावा असा शब्द असून त्यात ड आणि ळ ही दोन दोन कठीण व्यंजने आली आहेत. हिंदीत डोळ्यासाठी आँख, नैन, नेत्र; तेलुगु-तमिळ-मल्याळम-कन्नड मध्ये कण्णु; पंजाबीमध्ये नैन, संस्कृतमध्ये अक्षि असे प्रतिशब्द आहेत. तुमच्या आमच्या पंचेंद्रियांपैकी तुमचे आमचे जीवन सुकर, सुगम करण्यात सुमारे ६० % हुन अधिक वाटा या डोळ्यांचाच असतो असे म्हटले तर ते वावगे ठरु नये. आता तर डिजिटल मेडिया, गुगल पे, ऑनलाईन पेमेण्ट, होम थिएटरच्या जमान्यात या डोळ्यांना अनन्यसाधारण महत्व आले आहे. एकत्र कुटुंबपध्दतीत एकेकाळी घरात अंध, अपंग, मंदबुध्दी, गतिमंद, रोगीट मुल जन्माला आले तरी त्याचा व्यवस्थित सांभाळ सारे कुटुंबच करीत असे. मग कुटुंबे फुटली, ज्याला त्याला स्वतंत्र, सार्वभौम होण्याचे वेध लागले. मग अशा वेळी जर नियती, दैव, निसर्ग, प्रारब्ध यांची अवकृपा झाली आणि चूकूनमाकून दिव्यांग बालक जन्माला आले तर त्याचा त्या घरात सांभाळ नीट होतोच असे नाही. काही वर्षांपूर्वी रजतपटावर आलेल्या व ऑस्करपर्यंत धडक मारलेल्या ‘श्वास' या मराठी चित्रपटातील परश्या या पात्राची मला यावेळी आठवण येते व त्याच्यासाठी धावपळ करणारा मामा, सामाजिक कार्यकर्ती यांची धडपड स्मरते. मी अंध विद्यालयाशी संबंधित असल्याने हे जाणून आहे की काही निष्ठुर पालकांनी त्यांना झालेले अंध अपत्य कुठेतरी बस स्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर, भर बाजारात एकटे सोडुन ते निघुन गेले आहेत. अशा बालकांना पाहुन मग कुणीतरी संवेदनशील व्यक्ती तसे बालक या अंधशाळेत आणून दाखल करते. तिथे त्यांचा सांभाळ होतो व त्यांना शिक्षणही दिले जाते. अशी ब्रेल लिपीतून शिकून बँकेत वा अन्यत्र चांगल्या पदांवर नोकऱ्या करणारी मुले मला माहित आहेत.

   ज्यांना डोळे आहेत व त्यामुळे चांगले दिसते ते किती भाग्यवान! या डोळ्यांचीही भाषा असते. त्यासाठी शब्दांची गरज पडत नाही. खोटे वाटत असल्यास काही काळापूर्वी  प्रसृती झालेली माता आपल्या नवजात बालकाकडे कशी बघते, ती नजर जरा आठवा. त्या नजरेचे वर्णन करण्यास भल्याभल्यांच्या लेखण्या तोकड्या पडतील. आपल्याला भाऊ मिळाला आहे, त्याच्याकडे कवतिकाने पाहणाऱ्या त्याच्या ताईचे डोळे आठवा. शब्दांची गरजच उरत नाही. केवळ नजर बोलते. देवळाच्या बाहेर बसलेल्या भिक्षेकऱ्याच्या थाळीत टाकलेल्या नाणी, नोटांनंतर त्याच्या नजरेतला भाव आठवा. बाहेर भरपूर पाऊस पडत असताना दारात भिजका अवस्थेत बसलेले कुत्रे पाहुन आपण जणू त्याला हाकलायलाच गेलो आहोत असे त्याला वाटताना आपण त्याच्या अंगावर सुरक्षेसाठी प्लास्टीकचे कापड पांघरल्यावर त्याच्या नजरेतील बदललेल्या भावच्छटा एकदा न्याहाळा. कोणत्याही वाणी, बोली, भाषा, लिपी पेक्षाही ते भाव अधिक सांगून जातील. प्रेमात पडताना वाणीपेक्षा अशी डोळ्यांचीच भाषा म्हणे अधिक बोलकी असते, तिला ‘नेत्रपल्लवी' असेही म्हणतात. मला राजेश खन्ना, शर्मिला टागोर, फिरोझ खान अभिनित ‘सफर' हा चित्रपट व त्यातील ‘जीवनसे भरी तेरी आँखे मजबूर करे जिनेके लिए' हे नितांत सुंदर गीत मला आठवते. त्या गाण्यात शर्मिला टागोरचे पेन्सिलीने रेखाटलेले डोळे, भुवया, कपाळ पाहा. ती चित्रे त्या गाण्याला अधिक उठाव देतात. हे गाणे त्याही काळी व आजही सुपरहिट होते/आहे व राजेश खन्नाच्या गाजलेल्या अनेक गाण्यांपैकी एक म्हणून नावाजले गेले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत या डोळ्यांना केंद्रस्थानी ठेवून खूप चित्रपट निर्मिले गेले. अनेक चित्रपटांची नावेही डोळ्यांशी संबंधित होती. जसे आँखे, ऑंखो आँखो मे, ऑँखमिचौली, दो आँखे बारह हाथ, तिसरी आँख, आँखियोंके झरोकेसे, मनकी आँखे, दो आँखे, दीदार-ए-यार वगैरे वगैरे...

   या डोळ्यांनी सकारात्मक कामे जशी केलीत तसेच हेच डोळे अनेक नकारात्मक कामांतही व्यस्त कसे असतात हे अलिकडे वाढलेल्या सायबर चोरट्यांच्या करामतींनी सर्वांच्या लक्षात आले असेलच. पाकिटमार, चोर, डाकू, उचले, भामटे यांना ‘तेज नजर' ठेवून बेसावध लोकांना हेरुन मग आपले सावज साधायचे असते. पूर्वी हिंदी चित्रपटात खूँखार डाकू म्हटला की त्याच्या एका डोळ्यावर काळी पट्टी व तिची दोरी कानापर्यंत गेल्याचे पाहायला मिळे. ‘स्त्रीलंपट' पुरुषांची नजर महिला बरोबर ओळखून असतात. जरब दाखवणारेही डोळे असतात. मराठी, हिंदी सिनेसृष्टीत विविधांगी भूमिका रंगवलेल्या दिवंगत कलावंत निळू फुले यांनी ती जरब, तो लंपटपणा, प्रसंगी प्रेम, वात्सल्य, जबाबदारी या वेगवेगळ्या भावना आपल्या ‘नजरेतून' अनेकदा साकारल्या आहेत. विख्यात दिवंगत अभिनेत्री ललिता पवार यांनाही डोळ्यांतून खलनायकी छटा पुरेपुर दाखवण्याची किमया करुन दाखवता आली होती. प्रत्यक्ष जीवनात आईची माया व बापाचा धाक याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असतो. अनेक पतसंस्थांच्या वर्धापनदिन सोहळ्यात ‘आईच्या मायेने कर्ज द्या व बापाच्या धाकाने ते वसूल करा' असा संवाद मी बऱ्याच वक्त्यांच्या तोंडून ऐकला आहे. ती आईची माया, बापाचा धाक या दोन्ही गोष्टी प्रामुख्याने डोळ्यांतूनच व्यक्त होत असतात. ‘या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती...' हे पाठलाग या चित्रपटातील ग.दि. माडगुळकर यांनी लिहिलेले, आशा भोसले यांनी गायिलेले व दत्ता डावजेकर यांनी संगीतबध्द केलेले गाणे आपल्यापैकी अनेकांनी ऐेकले असेल. डोळ्यांतून व्यक्त होणाऱ्या कित्येक भावनांना शब्दांत गुंफण्याचा प्रयत्न माडगुळकरांनी या गीतात यशस्वीपणे केला आहे. ‘मधु मागशी माझ्या सख्यापरी मधु घटचि रिकामे पडती घरी'  या कविवर्य भा. रा. तांबे यांच्या गीताच्या शेवटच्या दोन ओळींत ‘आता मधुचे नाव कासया? लागले नेत्र हे पैलतिरी' असे निरोपाचे शब्द वापरले आहेत. जे वाचताना, ऐकताना व्याकुळ करतात.

   हेच डोळे जेंव्हा ‘कायमचे मिटायची' वेळ येते तेव्हा वास्तवाचे भान राखून डॉक्टर त्या व्यक्तीच्या वारसाला सांगतात...‘जवळच्या सर्व नातेवाईकांना बोलावून घ्या.' जेंव्हा प्रत्यक्षात ती व्यक्ती डोळे मिटते तेव्हा सोबत असलेल्या साऱ्यांचे डोळे अश्रूंनी डबडबतात. त्याच्या अंत्यदर्शनासाठी, शेवटचे डोळे भरुन पाहण्यासाठी मग लोक गर्दी करतात. अशी ही सारी डोळ्यांच्या भाषेची कहाणी आहे. म्हणूनच म्हणतो.. आपण सारे हाती-पायी, नजरेने, कानांनी, डोळ्यांनी धड असू तोवर जवळच्या, लांबच्या, आपले जीवन समृध्द करणाऱ्या साऱ्यांना भेटून घ्या. सारे काही मोबाईलवर सोपवू नका. एकदा का कायमचे डोळे मिटले की सारा अंधारच! तुमच्या फोटोला कुणी किती गुलाबाचे, चंदनाचे, सोन्याचांदीचे हार घातले व तुमच्या तेराव्याला, वर्षश्राध्दाला कितीही जेवणावळी उठल्या तरी त्यातले काहीही पाहण्यासाठी तुम्ही नसणार! मग हे डोळे देहाबरोबर जळून जाण्यापेक्षा मरणोत्तर नेत्रदानाची तजवीज केली तर? बघा..पटतंय का!

 राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

बाई कधी येणार?