स्त्रीने नोकरी करावी का?

नोकरी म्हणजे नेमकं काय? उदरनिर्वाहाचं साधन. मग ती नोकरी एखादा पुरुष करतो की स्त्री, याचा थेट संबंध त्या कामाच्या मूल्याशी नाही. पुरुष नोकरी करतो ते आपल्या कुटुंबाचं पालन-पोषण करण्यासाठी. तसंच आजकाल अनेक स्त्रियाही नोकरी करतात  केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी, गरजा पूर्ण करण्यासाठी.
मग प्रश्न असा निर्माण होतो..स्त्रीने नोकरी करावी का? माझं मत आहे, हो, नक्कीच करावी. परंतु नोकरी करताना एका स्त्रीला किती आघाड्यांवर लढावं लागतं, हे आपण विसरतो. घर, ऑफिस, मुलं, जबाबदाऱ्या  या सगळ्याचा ताळमेळ साधत ती एक प्रकारे तारेवरची कसरतच करत असते. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं, थकवा येतो, तरी ती काहीच न दाखवता सगळं हसत हसत करत राहते.
नोकरी करत असताना ती स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. कामातून मिळणारं समाधान, आत्मविश्वास आणि आर्थिक स्वावलंबन  हे तिला जगण्याची नवी ऊर्जा देतं. मात्र याच नोकरीमुळे कधी कधी कुटुंबाकडे थोडंसं दुर्लक्षही होतं. तेव्हा मनात प्रश्न उभा राहतो  स्त्रीने खरंच नोकरी करावी का?
कधी वाटतं, नोकरी सोडून मुलांकडे लक्ष द्यावं, संसार सांभाळावा आणि आनंदात जीवन जगावं. पण दुसऱ्याच क्षणी जाणवतं, स्त्रीसाठी नोकरी म्हणजे केवळ पैसे कमवण्याचं साधन नसून तिचं अस्तित्व, आत्मसन्मान, आणि स्वाभिमान जपण्याचं माध्यम आहे.
"पैसा है तो सब बोलते है  कैसा है?
या वाक्याची आठवण होते. नोकरीमुळे स्त्रीला घरात, समाजात एक ओळख मिळते. विशेषतः त्या स्त्रियांना  ज्या विधवा आहेत, ज्यांना आधार नाही, नातेवाईक नाहीत  त्यांच्यासाठी नोकरी हे केवळ एक काम नसून जीवनदान आहे. समाजात त्यांचं स्थान टिकवून ठेवण्यासाठी नोकरी ही एक ‘संजीवनी ठरते.
नोकरी हे एक असं स्थान आहे जिथे ती काही काळ स्वतःच्या चिंता, त्रास विसरून कामात रमते  कधी पैसे मिळवण्यासाठी, तर कधी फक्त आत्मिक समाधानासाठी.
म्हणूनच स्त्रीने नोकरी करणं हे केवळ आवश्यक नाही, तर अत्यंत गरजेचं आहे.
-सौ. नेहा विलास मनुचारी 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पालखी : संत नामाचा गजर..विठ्ठल