महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
नवी मुंबईच्या प्राचीन ग्रामदेवता : नव्या पिढीसाठी मौलिक माहितीचा खजिना
नवी मुंबईतील साहित्यिक गज आनन म्हात्रे यांचे नवी मुंबईच्या प्राचीन ग्रामदेवता हे दहावे पुस्तक नुकताच प्रकाशित झाले. या संशोधनपर पुस्तकास प्रसिद्ध इतिहास तज्ञ श्री सदाशिव टेटवीलकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. टेटवीलकर लिहितात.. प्राचीन आणि अर्वाचीन संदर्भ जुळवत, स्थानिक इतिहासाचा धांडोळा घेत लेखक म्हात्रे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. नव्या पिढीस ग्रामदेवतांची माहिती मिळावी म्हणून या पुस्तकाचे प्रमुख प्रयोजन आहे. या उद्देशात म्हात्रे सफल झाले आहेत.
लेखकाच्या मनोगतात म्हात्रे म्हणतात त्याप्रमाणे कुठल्याही प्रांतातील ग्रामदेवता म्हणजे तत्कालीन लोकसंस्कृतीचा वारसा असतो. गावाच्या देवता म्हणजे ग्रामदेवता असा साधा सरळ अर्थ ते सांगतात. ग्रामदेवता ह्या लोकपरंपरेचा अविभाज्य घटक असतात. पूर्वीच्या कृषी संस्कृतीत या ग्रामदेवतांचे मनोभावे पूजन होत असे. या गावदेवता आपले पालन, पोषण, संरक्षण करतात अशी गावक-यांची अढळ श्रध्दा होती. प्रत्येक गावाची आणि त्या त्या भागातील देवता वैशिष्टय़पूर्ण असते. त्यांची नावेही लक्षणीय असतात. या पुस्तकात देवतांबद्दलची लेखनशैली लक्षवेधक आहे. त्या अनुषंगाने मजेदार प्रसंग, पुरातन लोककथा, इतिहासाचे दाखले, अद्भूत दंतकथा वाचक मनास आकर्षित करतात. कथानकात आलेले पारंपरिक शब्द आणि त्यांचे विश्लेषण प्रत्येक प्रकरणाखाली दिले आहेत. त्यामुळेच प्राचीन रितीरिवाज, पूजन पध्दती, भक्ती प्रकार वाचकास आकलन होतात.
या पुस्तकातील काही देवतांची माहिती वानगीदाखल पाहू या. पावणेश्वर शिवमंदिर- हे नवी मुंबईतील सर्वात प्राचीन मंदिर म्हणून गणले जाते. कारण या मंदिराच्या आवारात पिंपळाच्या झाडाखाली तेराव्या शतकातील शिलाहार कालीन गद्देगाळ शिलालेख आहे. हा परिसर पूर्वी गावाबाहेर शेती भागात होता. प्राचीन काळात कोपरखैरणे गावबंदर, पावणेश्वर शिवमंदिर, बावखळेश्वर, बोरिवली गाव, डोंगर ओलांडून पलिकडे दहिसर गाव, कल्याण/ पनवेल असा पाऊल वाटेचा मार्ग होता. आता हे मंदिर पावणे औद्योगिक पट्ट्यात आले आहे. वेशीवरची देवी - जंगल आणि गावशेती यांच्या सीमेवर जशी वाघजाई देवी असते. तशी नवी मुंबईत करावे, सारसोळे गावात वेशीवरची देवी आहे. पूर्वी बाहेरून आलेला माणूस इथे थांबून, परवानगी घेऊन गावात येत असे. सीमेवरची ही प्राचीन देवी आता गाव विस्ताराने आत आली आहे. रांजणदेवी : रांजणदेवीचं स्थान कोपरखैरणे गावात आहे. ही शेतावरची प्राचीन देवी असून पूर्वीपासून तिथे रांजणीची झाडे होती. ही झाडे दीर्घायुषी असतात. देवाच्या भक्तांना तसे दीर्घायुष्य लाभावे असा संकेत त्यामागे आहे. शेतीची कामे सुरू करताना ह्या देवीची सामुहिक पूजा शेतकरी करीत असत. या पुस्तकात शेतावरच्या देवांमधे म्हसोबा, भूरकसदेव, बामणदेव, काकादेव, नागदेवी, पोशीरदेव, मांगीरदेव, गणोबादेव, दिघाबाबा, गावसोटेश्वर, काळभैरव, सारमायमाता यांची सविस्तर माहिती आली आहे. ती आवर्जून वाचावी अशी आहे.
आजच्या आधुनिक जगात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचे द्वंद्व चालू असताना जे श्रध्दाळू लोक नित्यनियमाने आपल्या ग्रामदेवतांचे मनोभावे पूजन करतात त्यांना हे पुस्तक लेखकाने अर्पण केले आहे. तसेच हे पुस्तक मी अंधश्रद्धेने नव्हे, तर श्रध्देने लिहिले आहे असे लेखकाने पहिल्याच पानावर सांगीतले आहे. इतका ठाम आत्मविश्वास म्हात्रे यांना अभ्यासातून आलेला स्पष्ट दिसत आहे. एकूण पन्नास पेक्षा जास्त ग्रामदेवतांचे अभ्यासपूर्ण संकलन या पुस्तकात आलेले आहे. त्यामुळेच हे पुस्तक म्हणजे माहितीचा, इतिहासाचा, भूगोलाचा, लोकसंस्कृतीचा, लोककथांचा खजिनाच आहे. स्थानिकांच्या नवीन पिढ्यांना, तसेच नवी मुंबई शहरात बाहेरून आलेल्या लोकांसाठी हे पुस्तक म्हणजे ऐतिहासिक दस्तावेज आहे. या पुस्तकात देवतांचे रंगीत फोटो दिले असून, पुस्तकात स्थानाची माहिती देण्यात आली आहे.
या पुस्तकात गावातले देव, वेशीवरचे देव, शेतावरचे देव, मिठागरातले देव, खाडीकिनारीचे देव, रानातले देव, डोंगरावरचे देव, तेकडीवरचे देव यांचा समावेश आहे. शेतक-यांचा, मिठागर कामगारांचा, मच्छिमार लोकांचा जिथे जिथे सबंध आला. तिथे तिथे ग्रामदेवता असल्याचे लक्षात येते. काही देव हे दोन गावांच्या मधल्या भागात पाऊलवाटेवर आहेत. गायमुख नावाचा देव गायरान माळरानावर होता. खांडबाई देवी डोंगर वाटेवर होती. खांबल्यादेव खाडीकिनारी तर तलनाचा देव मिठागरात होता. बालकूबाय, चैतूबाय ह्या गावच्या वेशीवर तर भैरी देव वर्षभर समुद्रात आहे. पूर्वी उघड्यावर असलेले देव आता मंदिरात दिसतात. तर काही देव औद्योगिक भागात राहिले आहेत. डोंगरावचे वाघोबा, सुलाईदेवी, गवळीदेव आता गावक-यांच्या पासून दुर गेलेले दिसतात. असे असले तरी गावाचे गावपण जपण्यासाठी ग्रामदेवतांची यथायोग्य पूजा अर्चा होणे गरजेचे आहे असे लेखकास वाटते. नवी पिढी जुनी संस्कृती विसरत चालली आहे. त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक होईल अशी आशा वाटते. सुंदर फोटो, सुंंदर छपाई, वाचनीय मजकूर यामुळेच हे पुस्तक प्रत्येकाने घ्यावे असेच आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून पूर्वीची कृषी संस्कृती, लोकजीवन, लोककथा, रितीरिवाज, लोक परंपरा ,धार्मिक भावना अधोरेखित झाल्या आहेत. शेती, मीठ उत्पादन, मासेमारी, लग्नविधी, गावजत्रा, लोकव्यवहार, प्रवास हा या ग्रामदेवतांशी जोडलेला होता. आता या भूभागावर ‘नवी मुंबई शहर' वसले असल्याने पूर्वी इथे काय होते याची इत्थंभूत माहिती हे पुस्तक आपणास देते. तेव्हा सुंंदर अंतरंग आणि बहिरंग असलेले हे पुस्तक नवी मुंबईतील प्रत्येक मराठी माणसाच्या संग्रही असावे असे मला मनोमन वाटते.
नवी मुंबईच्या प्राचीन ग्रामदेवता
लेखक - गज आनन म्हात्रे
प्रकाशक - रंगधनु प्रकाशन
प्रथम आवृत्ती - ८ जून २०२५
पाने - १२०, किंमत -१५०/
- सौ. दुर्गा देशमुख