महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
एक सुंदर अनुभवयात्रा
या क्षेत्रावरून वर्तमानकालीन २० तीर्थंकर आणि अनंतानंत मुनिराज मोक्षास गेले आहेत, त्यामुळे या पर्वतावरील भूमीचा कण आणि कण अत्यंत पवित्र आहे. भारतभरातील भाविक श्रावक सतत या शाश्वत भूमीचे दर्शन करण्यासाठी येत असतात. या पहाडाचं वैशिष्ट्य म्हणजे ९ किमी चढायचं, नंतर ९ किमी असं चोवीस टोकं खालीवर करत दर्शन घ्यायचं व ९ किमी खाली उतरायचं, असा २७ किमी प्रवास-पहाड परिक्रमा, अनवाणी करायची.
जगाचा अनुभव घेण्यासाठी प्रवास करणे हा उत्तम मार्ग आहे, यावर माझ्या वडिलांचा ठाम विश्वास होता आणि त्यासाठी त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं. तर ही गोष्ट आहे १९८४च्या सप्टेंबर महिन्यातली. मी जेमतेम तेवीस वर्षाचा होतो. मला उत्तरप्रदेश व बिहार यातील काही भागात जायचं होतं. त्यावेळी तिकडे महापूर आलेला व गाड्याही अनिश्चित वेळेत. माझ्या घरातून कडाडून विरोध, पण मी मात्र जाण्यासाठी ठाम मी आदल्या दिवशी आरक्षण करून काशी एक्सप्रेसने निघालो. ट्रेनमध्ये बॅग जागेवर ठेवून बसलो, इतक्यात, माझ्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या, सहप्रवाशानं विचारलं, कहाँ जावत हो ?' मी सांगितलं, पहले बनारस, बादमे सम्मेद शिखरजी.' अरे बढिया, हम भी तो बनारस रहावत' त्याने म्हटलं आणि गप्पा सुरु झाल्या.
पुढे दोन मोठ्या स्टेशनांवर, आणखी एक एक कुटुंबं आली. पंजाबी, युपी अन मी पक्का महाराष्ट्रीयन. वयाने लहान व एकटाच असल्यामुळे, मी सर्वांचा लाडका झालो की! अरे भाई, ये खाओ, वो खाओ, बहोत अच्छा है', असं करत, माझी चंगळच झाली. गाडीमध्ये दिवसभर करायचं तरी काय? म्हणून मी सर्वांना सांगितलं, चलो, सब लोग अपने-अपने जीवनकी, अच्छी-सी कहानी सुनाओ.' मग काय डब्बाभर नुसती दे धम्माल ना ! ये कुडी इक दिन मुझे मेरे बसस्टॅन्ड के सामने दिखाई दी जी, और सात दिनोमें, इलू इलू होके, हमने शादी भी करली हाँ, बल्ले बल्ले!' इति सरदारजी.
दुसरा भोजपुरी होता, त्याला जोर आला. म्हणाला शादीसे पहले हमका देखे का मौका तो मिलल, पर ई मोहतरमा घुंगट में! शादी के बाद पता चलल की कितनी सुंदर हाई और देखके हमका बहुत आनंद आईल.' अशी सर्वांसोबत मजा करत, गाणी म्हणत, तीन रात्र व दोन दिवस ट्रेनमध्ये, कसे गेले, ते कळलंच नाही. मध्यरात्री २.३० ला एकदाची काशी आली अन् हुश्श म्हणत, बॅग घेऊन दरवाजात आलो. पण बाहेर बघताच धाबं दणाणलं ना ! सगळीकडे पूर आल्याने, गरीब लोकं स्टेशनवर येऊन झोपले होते. माझी बॅग म्हणजे दगड हो..व्हीआयपीची टिपिकल लाल बॅग! ती हातात घेऊन, एकेकाला ओलांडत कोणाला आपला धक्का लागू नये म्हणून हळूहळू करत, सुमारे अडीच तासानं मी स्टेशनच्या बाहेर आलो. मला प्रचंड दम लागलेला, मी बॅगेवरच धपकन बसलो.
मला ट्रेन मध्ये भेटलेला पहिला सहप्रवासी म्हणाला, का हुई ? अभि साईकील रिक्षासे बिठवा धरमशाला छोडी हूं! अरे काहे, के ये लोग घुमाफिरा के पैसा निकालें!' खरंच मला कोणतीही माहिती नव्हती, पण या मित्रामुळे, मी एकदाचा काशीच्या दिगंबर जैन धर्मशाळेत दाखल झालो. मला तेथील गृहस्थाने १० X १० ची खोली दिली. थोडावेळ झोपून सकाळी बाहेर आलो व चहासाठी विचारलं. यहाँ चाय का टायम नौ बजेतक, दोपहर का खाना बारा बजे और चाय तीन बजे, शाम का खाना छ बजे.' हे सर्व ऐकून मी गार पडलो. ही सवय नाही हो मुंबईकराला.
इकडे मी उतरलेल्या धर्मशाळेत एक आजी-आजोबा होते, त्यांच्याशी ओळख करुन गप्पा मारता मारता कळलं की त्यांनाही शिखरजीला जायचंय. ते तर पंधरा दिवस तिथेच अडकून पडले होते. नंतर विचारपूस केली, तेव्हा कळलं की सध्या इथून कोणत्याही गाड्या बाहेर जाऊ शकत नाहीत. मग काय, कधी पायी तर कधी सायकल रिक्षाने बनारस बघत बसलो. धर्मशाळेसमोर माझ्यासारखा गप्पिष्ट, पानवाला होता, लगेच मैत्री जुळली.
सहाव्या दिवशी, दुपारी जेवण करून पानवाल्याशी गप्पा मारताना, एक तरुण आला व पानवाल्याला म्हणाला, मुझे जल्दी दस पान बांधके दो!'
मी आश्चर्याने बघत त्याला विचारलं, इतनी क्या जल्दी है भाई ?'
तो म्हणाला, मैं शिखरजी जा रहा हूं।'
मी ओरडलोच, कैसे?'
मेरी मेटॅडोर है नौ सिटकी, और खाली है!'
मग काय बुआ, मी पण पानवाल्याला बारा पानं ऑर्डर केली व त्या तरूणाला घेऊन धर्मशाळेत आजोबांसमोर उभं केलं. आजोबांनी त्याला, हम तीन सवारी है, सो रूपे दूंगा' म्हटलं आणि तोही तयार झाला. माझं धर्मशाळेचं रहाण्याचं सहा दिवसांचं भाडं, नाश्ता, चहा व जेवण सगळे मिळून ४५ रू. दिले व अकरा रुपये धर्मशाळेला देणगी दिली. मग आम्ही तिघेही सामान उचलून सरळ नव्याकोऱ्या मेटॅडोरमध्ये बसलो. अर्थातच मी व ड्रायव्हर, पानं घेऊन त्याचे पैसे देऊन, दुपारी एक वाजता भुर्रर्रर्रर्र की! आणि आमचा श्रीसम्मेद शिखरजीला जाण्यासाठीचा प्रवास सुरु झाला. रात्रीचे आठ वाजले होते. किर्रर काळोखात, रस्त्यावर आमची एकच गाडी! आणि एका पोलिसांच्या गाडीने आम्हाला थांबवलं. घामच फुटला की राव! त्यांनी आमची विचारपूस केली व म्हणाले, थांबा, पुढे डाकूंच्या टोळीचा धोका आहे, अजून एक पोलिसांची गाडी बोलवतो.' पोलिसांची गाडी आल्यावर आमच्या गाडी पुढं एक व मागं एक गाडी, असा राजेशाही थाटात, पुन्हा आमचा प्रवास सुरु झाला. मध्यरात्री एक वाजता आम्ही शिखरजीला पोचलो. बनारस ते शिखरजी असा सुमारे ४०० किमी. प्रवास, एकूण बारा तास! पोलिसांकडेच विचारपूस करून, आम्ही दिगंबर धर्मशाळेचा दरवाजा ठोठावला. त्यांनी आम्ही जैन असल्याची खात्री करून, म्हणजे आमचे नमोकार मंत्र म्हणून घेऊन, आम्हाला दोन खोल्या दिल्या. झिरोचा दिवा लावून खोलीत प्रवेश केला व आवरून लगेच झोपी गेलो.
अचानक आवाज आल्याने खडबडून जागा झालो. दरवाजा उघडून पाहिलं तर, कानावर पारसनाथ भगवान की जय चा जयघोष ऐकू आला. मी विचारलं तर अब हम पहाड पे जा रहें है', असं एकानी म्हणताच, मी लगोलग थंडगार पाण्याने आंघोळ केली व आवरून पळत-पळत, त्यांच्या समूहात सामीलपण झालो. शाश्वत तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी पहाडावर जाण्यासाठी निघालो. पहाटेचे तीन वाजले होते. काळाकुट्ट अंधार, कोणाकडे बॅटरी तर बऱ्याच जणांकडे काठ्या पण होत्या. पारसनाथ भगवान की जय' च्या जयघोषात सारे हळूहळू चढत होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने तशीही गर्दी कमी होती.
या क्षेत्रावरून वर्तमानकालीन २० तीर्थंकर आणि अनंतानंत मुनिराज मोक्षास गेले आहेत, त्यामुळे या पर्वतावरील भूमीचा कण आणि कण अत्यंत पवित्र आहे. भारतभरातील भाविक श्रावक सतत या शाश्वत भूमीचे दर्शन करण्यासाठी येत असतात. या पहाडाचं वैशिष्ट्य म्हणजे ९ किमी चढायचं, नंतर ९ किमी असं चोवीस टोकं खालीवर करत दर्शन घ्यायचं व ९ किमी खाली उतरायचं, असा २७ किमी प्रवास-पहाड परिक्रमा, अनवाणी करायची.
सकाळचं झुंजूमुंज होताच पहिले तीर्थँकर वृषभनाथ जेथून मोक्षास गेले, त्या पहिल्या टोकावर पोहोचलो व दर्शन घेऊन पुढे मार्गक्रमण करत भगवान पुष्पदंत ज्या नवव्या टोकावरून मोक्षास गेले, तिथे पोचलो. या टोकावरून संपूर्ण शिखरजी पर्वताचे अप्रतिम दर्शन घडते. हे एकच स्थान असे आहे की तिथून सर्व चोवीस निर्वाण स्थळे दिसतात. परंतु या टोकावर सरळ चढण असल्यामुळे वरती जाण्यासाठी प्रचंड त्रास होतो. जास्त पाणीही पिता येत नाही. नेमकी पावसानेही आमच्याबरोबर हजेरी लावली ! एकमेकांचा हात धरून, तो ही खूप सांभाळून हं, खालच्या व्यक्तीला वरती खेचणं, म्हणजे दोघांचाही कपाळामोक्षच हो! थरथर कापणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ नेमका तिथं गेल्यावरच कळतो. इथं पोचल्यावर दर्शन घेऊन चारी बाजूनं पहाण्याचा प्रयत्न केला, पण ढगांमुळं निराश झालो.
पुढं तेरावे तिर्थंकर भगवान चंद्रप्रभूंचे ललित टोक दर्शन, साप - शिडी सारखे चढ-उतार केल्याशिवाय दर्शनच होत नाही. चालत असताना चक्कर येते अन् कळतही नाही कशामुळे? डोंगराच्या खालच्या भागात उतरून आल्यामुळे थंडी वाढली होती.चंद्रप्रभू स्वामींची मूर्ति पाहताच थंडी पळूनच गेली की! पहाड परिक्रमा करणे हा सुद्धा आनंदाचा भाग आहे. मी सोडून बाकीची मंडळी धार्मिक श्लोक /गाणी म्हणत मार्गस्थ होत होती, मी आपला पार्श्वनाथ भगवान की जय' चा नारा देत सर्वांना प्रोत्साहित करायचो.
या सगळ्या टोकांमध्ये देखणं मंदिर म्हणजे मधुवनमंदिर व त्याचा परिसर! तिथं गेल्यावर मला आलेला थकवा गायब! मला तेथून जाऊच नये असं वाटलं. स्वर्ग हो स्वर्गच! ताजेतवाने होऊन पुढे आम्ही खूपच अवघड अशा, २३ वे तिर्थंकर श्री पार्श्वनाथांच्या टोकावर जायला सुरवात केली. अनवाणी असल्यामुळे पायाला दगड टोचू लागले. आत्तापर्यंत बरा वाटणारा प्रवास आता बोलू लागला होता. थकवा जास्तच जाणवू लागला. पावसाळी हवा व थंडगार वाऱ्याने कुडकुडलो हो मी! सुमारे एक तासानी आम्ही सुवर्णभद्र कुट येथे पोहोचलो अन् माझ्या श्वासाचं जोरदार संगीत सुरु झालं ना ! बसल्याजागी आडवं होऊन विश्रांती घेतली, मगच पार्श्वनाथ स्वामींचं दर्शन घेतलं. असं करत करत आम्ही चौघांनी संपूर्ण चोवीस टोकांची परिक्रमा करत, दुपारी एक वाजता खाली उतरण्यास सुरवात केली. अखेर चार वाजता धर्मशाळेत पोहोचलो. दोन्ही पायात गोळे आले होते. नंतर मी जो झोपलो, तो सरळ दुसऱ्या दिवशी पहाटेच उठलो.
मी रहात असलेल्या धर्मशाळेचं आवार प्रचंड मोठं, एकमजली, जुनं दगडी बांधकाम! ‘सी' आकाराच्या इमारतीत पन्नास खोल्या आहेत. संपूर्ण भारतातून समस्त दिगंबर जैन लोकं इथं आठवडाभर रहाण्यासाठी येतात व स्वयंपाकही इथेच करून जेवतात.
मी गप्पीष्ठ असल्यामुळे प्रसिद्ध ! मी एकटा असल्याचं कळल्यावर ते मला खास ‘बंबैय्या या नावाने हाक मारायचे, प्रेमाने नाश्त्याला, जेवायला बोलवायचे. त्यांच्या बोलण्यात एक हटके असा विलक्षण गोडवा व ठसका होता. म्हणजे ऐ बंबैय्या तू कंटे रो रे ?' शेवटच्या रे ला ताणून धरायचे. म्हणजे तू कुठं राहतोस रे ? बायकांचं बोलणं तर मला कळतंच नव्हतं, आणि मला कळलं नाही हे समजल्यावर त्या आपला पदर तोंडाला लावून जोरात हसायच्या. पुढं यातील काही लोकांनी चार दिवस जवळची चार खास धार्मिक स्थळं पाहण्यासाठी बस केली व मलाही त्यात विनामूल्य सामील करून घेतलं.
पहिलं राजगृही इथं छोट्या पांच टेकड्यांवर तीर्थंकरांची सुंदर मंदिरं आहेत. दुसरं आहे ते चंपापुरी, बारावे तीर्थंकर वासुपूज्य महाराजांचं जन्मस्थान व मोक्षाला गेले ते रमणीय ठिकाण. कुंडलपूर इथे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचं जन्मस्थान. पावापुरीला देखणी कमळं असलेलं सुंदर जलमंदिर - महावीरस्वामी मोक्षाला गेले ते स्थान. ही महत्वाची प्रार्थना स्थळं पाहून पुन्हा शिखरजी धर्मशाळेत आलो. दुसऱ्या दिवशी जेवताना एकाने सांगितलं की मुंबईसाठी गाडी उद्यापासून सुरू होणार आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाश्ता करून, सर्वांचा आशीर्वाद घेत, डोळ्यातील अश्रू पुसत - पुसत, बसने, १६ किमी वर असलेल्या इसरी गावाच्या दिशेने मार्गस्थ झालो. तेथील धर्मशाळा अत्यंत सुंदर!
संध्याकाळी पारसनाथ स्टेशनवर जाऊन चौकशीअंती समजलं की दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता, मुंबईला जाणारी ट्रेन येणार आहे. मी दुपारी ३ वाजता स्टेशनवर हजर ! स्टेशन मास्तरांनी सांगितलं की ट्रेन ६ तास उशिरा येणार. आजूबाजूला व स्टेशनवर काही मिळत नसल्याने त्या स्टेशन मास्तरांनीच मला जेवण दिलं. थोडावेळ झोपायलाही दिलं. रात्री ११ ला ट्रेन आली अन् मी दोन दिवसांनी, २१ दिवसांच्या प्रवासानंतर डोंबिवलीला पोचलो. माझ्या व घरच्यांच्याही जीवात जीव आला.
सम्मेदशिखरजी येथे जाण्यासाठीचा मौसम म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत. ही अनुभवयात्रा मला नवी दिशा देऊन गेली. कितीही अडचणी आल्या तरी आयुष्यात खंबीरपणानं त्यांचा सामना करून पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास या यात्रेने मला दिला. आपण एकट्याने जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपण आपल्या मनाचे, आनंदाचे राजे असतो. मला भेटलेल्या या सर्व माणसांमुळे, माणुसकी आणि जगाच्या चांगुलपणावरचा माझा विश्वास दृढ झाला. - मनोज मेहता