श्वासांचे सोनं केलेला सैनिक!

१९ जून, २०२५ नुकताच येऊन गेला आणि तो दिवस होता १९ जून, २०००! अर्थात आता पंचवीस वर्षे झालीत त्याला जाऊन. तो म्हणायचा...मरणाच्या दारात जाऊन न आलेला माणूस कधी जगलाच नव्हता, असं समजावं! जो लढणं स्वीकारतो..त्याच्या जीवनाची लज्जतच काही न्यारी असते...सुरक्षित कोषात राहणा-यांना ही खुमारी समजायची नाही!

 ज्याने देशसेवेचे, लष्करी गणवेशाचे स्वप्न पाहिले..ही मुले स्वप्न जगतात आणि स्वप्नासाठी मृत्यूच्या कुशीत शांतपणे निद्रिस्त होतात...त्यामुळेच हा देश शांत झोपू शकतो आणिउठून सुख भोगू शकतो! कॅप्टन ‘सुब्बु' साहेब म्हणायचे...शौर्यासाठी जीवन माणसाला विशेष पुरस्कार देत असते...समाधानाचा, कर्तव्यपूर्तीचा सन्मान. जगलो तर पृथ्वी भोगावी आणि मृत्यू आला तर थेट स्वर्गसुख भोगायला निघून जावे...मातृभूमीचे ऋण फेडून! देहावर राष्ट्रध्वज पांघरलेला असावा...ज्वालांनी अलगद हातांनी देह पोहोचवावा...पल्याड!  

१९४७, १९६५, १९७१ अशी पराभवांची हॅट ट्रीक झालेली असूनही (ना) पाकिस्तानने १९९९ मध्ये चौथं दुःसाहस केलेच...आणि अर्थातच पुन्हा पराभवाचे तोंड पाहिले! परंतु त्यांची ‘जित्याची खोड...त्यांना मारल्याशिवाय जाणार नाही हेच ते वारंवार सिद्ध करतात!

एकतर कारगिल संघर्ष संपल्यावरही त्यांच्या काही तुकड्यांनी युद्ध सुरूच ठेवले होते...एवढा तर त्यांच्या सेनेत समन्वय आहे! त्यांचीही नांगी ठेचून काढल्यावर ते काही दिवसच शांत राहिले आणि मग पुन्हा छुप्या मार्गाने भारतात घुसखोरी करून अतिरेकी तुकड्या पाठवायला सुरुवात केली गेली. कारगिल युद्धाला एक वर्ष पूर्ण झालेले होते. वर्ष होते २०००..काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमधील हाफुरडा पर्वतराजीमधून पाकिस्तान खूप मोठ्या संख्येने प्रशिक्षित अतिरेकी भारतीय सीमेत पाठवणार असल्याची खबर भारतीय गुप्तचरांना लागली..हरकत-उल-मुजाहिद्दीन या नावाच्या अतिरेकी संघटनेची ही योजना होती...आणि अर्थातच पाकिस्तानी सैन्याचा यांना पूर्ण सक्रीय पाठिंबा होता!

भारत-पाकिस्तान सीमा म्हणजे काही सलग बांधलेली भिंत किंवा तार-कंपाउंड नव्हे. अतिरेकी आत घुसलेच कसे? हा प्रश्न इथे केवळ मूर्ख माणसेच विचारू शकतात...नुकत्याच झालेल्या पहलगाम प्रकरणी आपलेच काही बिनडोक नागरिक नेमका हाच प्रश्न विचारताना आपण पाहिले असतीलच. असो. प्रचंड घनदाट जंगल,उंच पहाडी, द-यांनी वेढलेला परिसर आहे हा. बर्फ असते..धुके असते बरेचदा. पावसात दोन फुटांवरचे दिसत नाही. त्याचा फायदा घेत अतिरेकी घुसतात! त्यांच्या घुसण्याच्या मार्गावर छुपे मोर्चे लावून त्यांना रोखणे हाच एक मोठा उपाय असतो. कारण एकदा का ते आत खोलवर घुसले की त्यांना टिपणे जिकीरीचे होऊन जाते!

या अतिरेक्यांचा माग काढत काढत त्यांना नष्ट करण्यासाठी एक मोठे सैन्य अभियान त्वरीत हाती घेण्यात आले.  सीक ॲण्ड डिस्ट्रॉय... अर्थात शोध आणि विनाश!  
स्पेशल फोर्सेसच्या पॅरा वाल्यांना याच कामासाठी तर प्रशिक्षित केले जाते..त्यातील चार्ली टीम या कामासाठी नेमली गेली. १८ जून...मोहीम सुरु झाली. भारतीय सेनेच्या या मोहिमेचे नेतृत्व करत होता १२ ऑगस्ट, १९७२ रोजी मुंबईच्या गोरेगावात जन्मलेला एक तरुण,तडफदार,दिलदार आणि दिलेर अधिकारी! अहमदाबाद येथे माध्यमिक-पूर्व शिक्षण,पुढे मुंबईतून दहावी-बारावीपर्यंतचे उत्कृष्ठ गुण मिळवत पूर्ण केलेले शिक्षण, १९९३ मध्ये एन.डी.ए.खडकवासला,१९९७ मध्ये इंडियन मिलिटरी अकादमी,देहरादून, ७ जून १९९७ रोजी १ पॅरा सेकंड लेपटनंट, प्रचंड आव्हानात्मक पॅराट्रूपर ट्रेनिंग, महू येथे लष्कर मुख्यालयात आणि पुढे बेळगाव येथे आर्टीलरी ट्रेनिंग असे टप्पे पार करत करत १९९९ मध्ये कारगिल परिसरात नेमणूक होण्यापर्यंत या विविध खेळांमध्ये निष्णात असलेल्या मुलाची मजल गेली होती....यासाठी कठोर परिश्रम हा तर परवलीचा शब्द! किंबहुना पॅरा एस एफ  म्हणजे एव्हरेस्ट सर करण्याच्या तोडीचे!

२००० मध्ये साहेब कॅप्टनपदी पदोन्नती प्राप्त करते झाले! खांद्यावरचे सितारे वाढले होते..आणि जबाबदारीसुद्धा! कॅप्टन आर.सुब्रमनियन साहेब आता नव्या उमेदीने देशसेवा करण्याच्या मार्गावर अग्रेसर झाले. त्याआधी त्यांनी अनेक मोहिमांमध्ये स्वतः पुढे होऊन नेतृत्व स्वीकारले होते.

विशेषतः काश्मीर खो-यातले त्यांचे काम अतिशय यशस्वी होते. कॅप्टन साहेब नुकतेच सुट्टीवरून परतले होते. त्यांचे युनिट एका मोठ्या ऑपरेशनची तयारी करताना त्यांना दिसले. अर्थातच साहेबांनी त्वरीत त्या युनिटचे नेतृत्व हाती घेतले. सुमारे नऊ अतिरेकी भारतीय सीमेत घुसल्याची बातमी होती...आणि या सर्वच्या सर्व नऊही श्वापदांना यमसदनी धाडणे गरजेचे होते. हवामानाचा, रात्रीच्या भयावह अंधाराचा अजिबात बाऊ न करून घेता कॅप्टन साहेब आणि त्यांचे सहकारी सैनिक अतिरेक्यांच्या शोधात निघाले....आज मुकाबला होगा...त्यांना माहीत होतं. आपल्या सैनिकांची चाहूल लागताच पाकिस्तानी अतिरेकी सावध झाले आणि पुढे रात्रभर घमासान लढाई सुरु राहिली...तहान, भूक, मरणाची भीती याचा लवलेशही आपल्या बहादूर सैनिकांच्या मनात नव्हता. पहाटेपर्यंत बहुदा सहा अतिरेक्यांचे मुडदे पडले! विरुद्ध बाजूने येणारा गोळीबार थांबला...एकतर सर्वच खलास झाले असतील किंवा वाचलेले परत मागे पळून गेले असतील, असा अंदाज लावून आपल्या सैनिकांनी काही वेळ विश्रांती घेतली.

१९ जून उजाडला...सकाळचे आठ वाजले. त्या अतिरेक्यांचे मृतदेह आणि त्यांच्या जवळ आलेल्या इतर वस्तू ताब्यात घेण्यासाठी सैनिकांची एक तुकडी नेमण्यात आली. रात्रभर जागलेले कॅप्टन साहेब याही तुकडीसोबत निघाले...! आपल्या दुर्दैवाने तीन जनावरं तोपर्यंत बचावली होती...आणि आपल्या सैनिकांची वाट पहात होती. शत्रू असले म्हणून काय झाले...त्यांनाही आपल्या सैनिकांची कार्यपद्धती साधारण माहिती असते. त्यांनी व्यवस्थित सापळा रचला होता. आपल्या सैनिकांवर अचूक गोळीबार करता यावा, अशा जागा त्यांनी धरून ठेवल्या होत्या...कॅप्टन साहेब आणि इतर सैनिक त्यांच्या टप्प्यात येताच उरलेल्या तीन अतिरेक्यांनी एके ४७ मधून तुफान गोळीबार आरंभला! कॅप्टन साहेब अर्थात सर्वांच्या अग्रभागी होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये गोंधळून न जाता धैर्य धरून शत्रूला शक्य ते तिखट प्रत्युत्तर देण्याचे प्रशिक्षण स्पेशल फोर्सेस आणि इतर सर्वच सैनिकांना दिलेले असतेच. कॅप्टन साहेबांनी ताबडतोड जवाबी फायर सुरु केला...पण त्यांच्या  खांद्यामध्ये  आणि मानेत काही गोळ्या शिरल्या...रक्ताची धार, वेदना यांचा प्रवाह सुरु झाला! साहेबांनी जमिनीवर लोळण घेतली...आणि पुढच्याच क्षणी ते उभे राहिले...कारण ते जर उभे राहिले नसते तर इतर सैनिक अतिरेक्यांच्या गोळीबाराच्या मा-यात अलगद सापडले असते...साहेब पुढे धावत गेले...तीन एके ४७ एकाच वेळी एकाच दिशेला फायर करीत होत्या...शेकडो गोळ्या असतात या...अर्स्ट म्हणतात याला...म्हणजे नेम धरण्याची गरज नाही...केवळ फवारा मारल्यासारखा गोळीबार...समोरचा या मरणाच्या पावसात चिंब भिजला नाही तरच नवल! कॅप्टन साहेब फायर करीत पुढे निघाले...वायुवेगाने. दोघांना अचूक टिपले...तिसरा अगदी हाताच्या अंतरावर होता...त्यालाही ठोकले..पण..त्याच्या हातातल्या एके ४७ ने तिचे काम चोख बजावले...साहेबांच्या चेह-यावर, डोक्यात कित्येक गोळ्या शिरल्या...प्रचंड आग, प्रचंड वेदना...आणि रक्तस्त्राव! रात्री सहा आणि सकाळी तीन..असा हिशेब पूर्ण झाला होता! साहेबांना आणि इतर जखमी सैनिकांना रुग्णालयात नेण्यात आले...!

दुपारी चार वाजून तीस मिनिटे...काश्मीरमधल्या पोस्टात एक तार बुक झाली...पत्ता होता..श्रीमती सुब्बा लक्ष्मी, बी ११, गोपुरम सोसायटी, राम मंदिर रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई. चार वाजून एकेचाळीस मिनिटांनी ही एक्सप्रेस तार या पत्त्यावर पोहोचवली गेली...थरथरत्या हातांनी सुब्रमनियन यांनी ती तार स्वीकारली...न वाचताच मजकूर समजू लागला...कळवताना अत्यंत दुःख होत आहे...आय.सी.५६९६३ कॅप्टन आर. सुब्रमनियन यांनी ऑपरेशन रक्षक मध्ये परदेशी अतिरेक्यांशी लढताना आपले सर्वोच्च बलिदान दिले! ही कधीही भरून न येऊ शकणारी हानी सहन करण्याची शक्ती परमेश्वर तुम्हांस आणि तुमच्या आप्त मंडळीस देवो, ...आपला...कमांडिंग ऑफिसर, १, पॅरा एस एफ
जीवनाच्या हिरवळीवर कातळ कडा कोसळून पडावा...तशी अवस्था ही...तरुण, देखणा, बहादूर मुलगा, कुलदीपक असा अवेळी विझून गेला! पण त्याला तेच तर करायचे होते लहानपणापासून. दहावीत ९४, बारावीत ९६ टक्के मिळवणारा पोरगा खरे तर डॉक्टर, इंजिनियर होऊन परदेशी जावा, त्याने पैसे कमवावेत आणि स्वतः आणि कुटुंबाला सुखी करावे की नाही? पण ज्याने देशसेवेचे, लष्करी गणवेशाचे स्वप्न पाहिले..त्याच्या मनात या स्वप्नाशिवाय काहीही नसते..ही मुले स्वप्न जगतात आणि स्वप्नासाठी मृत्यूच्या कुशीत  शांतपणे निद्रिस्त होतात...त्यामुळेच हा देश शांत झोपू शकतो आणि उठून सुख भोगू शकतो! कॅप्टन ‘सुब्बु' साहेब म्हणायचे...शौर्यासाठी जीवन माणसाला विशेष पुरस्कार देत असते...समाधानाचा, कर्तव्यपूर्तीचा सन्मान. जगलो तर पृथ्वी भोगावी आणि मृत्यू आला तर थेट स्वर्गसुख भोगायला निघून जावे...मातृभूमीचे ऋण फेडून! देहावर राष्ट्रध्वज पांघरलेला असावा..आसमंतात जयजयकार निनादात राहावा...ज्वालांनी अलगद हातांनी देह पोहोचवावा...पल्याड!

मरणाच्या गोळीबाराने चेहरा उरलाच नव्हता...पाहण्यासाठी. त्या चेह-यावर चंदनाचा लेप होता...मरणाच्या दारात सुगंधाची पखरण! जीवनाचं सोनं करून गेला हा देह. १९ जून, २०२५..रोजी बरोबर पंचवीस वर्षे झाली! त्यानिमित्त त्या मरणाचे हे स्मरण! जय हिंद!

-संभाजी बबन गायके 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

या अश्रूंचा सांगावा!