या अश्रूंचा सांगावा!

अश्रू शब्दाची उपपत्ती खूप प्राचीन असली तरी माणसाचा आणि अश्रूंचा परिचय त्याच्या जन्मापासूनचा आहे! अर्थात जितका माणूस प्राचीन तितकेच अश्रूही! डोळ्यांचे संरक्षण करणारा हा प्रवाही पदार्थ भावनांनाही प्रवाहित करतो! ओठांवरचे गाणे पुसणारी ही आसवे दुःखासवे जितके नाते राखते तितके सुखासावेही सख्य राखून असतात! पाणी जसं त्याच्यात जो रंग मिसळला जाईल त्या रंगाचे होऊन जाते, तसे आसवांचेही असते! आसवे बोलतातही..फक्त त्यांची भाषा समजू शकणारे काळीज मात्र हवे देहात.

प्रसंग होता वाढदिवसाचा. त्या आहेतच इतक्या उच्च पदावर विराजमान की त्यांना शुभेच्छा देणा-यांची कमतरता नाही. पण आज मात्र त्यांना शुभेच्छा देणारे स्वर अगदी गाणा-यांच्या हृदयतलापासून येत होते! ते स्वर जणू त्यांना पहात होते...मनाच्या डोळ्यांनी. गाणा-या कंठांनी दृष्टी हा शब्द उच्चारला असेल कित्येकदा...पण दृष्टीला दिसणारे पाहण्यासाठी त्यांच्याकडे डोळे नव्हते! देवाने निर्माण केलेले हे रंग त्यांच्यावर रुसले होते...आणि डोळे मिटून बसले होते! डोळे नसलेल्या चेह-यांवर कायम एक हास्य असते...कित्येकवेळा केविलवाणे भासणारे! पण यावेळी त्यांच्या सबंध चेह-यावर जणू डोळे उगवले होते!

देशाच्या प्रथम नागरिक असलेल्या परम आदरणीय महामहीम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांचा आज ६७ वा वाढदिवस. त्या आज प्रत्यक्ष उपस्थित आहेत...त्यांच्यासाठी स्वरांतून शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत...शब्द आहेत...बार बार दिन ये आये...बार बार मेरा दिल गाये...तू जिये हजारो साल! हॅप्पी बर्थडे टू यु...
त्या लहानग्या जीवांनी गाणे आरंभ केले...आणि इकडे त्या स्वरांच्या एक पाऊल पुढे चालत होती...आसवे! राष्ट्रपती महोदयांच्या नेत्रांतून आसवे कधी पाझरू लागली...ते कदाचित त्यांच्या स्वतःच्याही ध्यानी आले नसावे आरंभी!

नियतीच्या क्रूर निर्णयाचा जोरदार प्रहार झेलून जन्माला आलेली ती बालके...मनापासून गात होती...दिवसा स्वरांचे चांदणे बहरू लागले होते!

अश्रू ओघळून गालांवर येऊ लागताच राष्ट्रपती महोदयांनी आपल्या दोन्ही तळहातांनी ते अलगद पुसून घेतले...मात्र आसवांचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला नाही...मोठ्या लोकांना चारचौघांत रडता येत नाही! पण जी माणसे आसवांना मान देतात, त्यांचे मन मोठे असते आणि ती धैर्यवान असतात!

हृदयात कणव असणा-या अशा राष्ट्रप्रमुख आपल्या देशाला लाभल्या आहेत..हे आपले भाग्यच! माननीय राष्ट्रपती महोदयांनी त्यांच्या हृदयातील मातृत्व, प्रीती कित्येकवेळा प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली आहे. त्यांच्या सेवेत असणा-या एका महिला सुरक्षा अधिकारी कन्येच्या विवाहासाठी त्यांनी राष्ट्रपती भवनात खास कार्यस्थळ उपलब्ध करून जणू वरमाईची भूमिकाच बजावली होती.

दिनांक २० जून रोजी महामहीम राष्ट्रपती महोदया देहरादूनच्या भेटीवर होत्या. तो त्यांचा जन्मदिन. त्यांच्या वाढदिवसानिमित्त  नॅशनल इन्स्टीट्युट फॉर एम्पॉवरमेण्ट ऑफ पर्सन्स विथ व्हिज्युअल डिसेबिलिटीज या संस्थेतील दिव्यदृष्टी असलेल्या लहानग्यांनी बार बार दिन ये आये..हे हिंदी शुभेच्छागीत सादर करण्यास सुरुवात करताच राष्ट्रपती महोदया भावूक झाल्या..त्यांच्या डोळ्यांतून आसवांची धार स्त्रवू लागली. काही क्षणांतच त्यांच्या सुरक्षा रक्षक अधिकारी महिलेने सोबतच्या सुरक्षा अधिका-याला सूचना केली..आणि त्या अधिका-यांनी राष्ट्रपती महोदयांच्या हाती एक रुमाल दिला...त्या रुमालाने आसवे पुसत पुसत त्यांनी ते सर्व गाणे ऐकले...डोळे मिटून! सर्व उपस्थित या प्रसंगी स्तब्ध झाले! देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीच्या मनात इतकी मृदू भावना असणे आणि त्यांनी ती सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करणे, ही खूप मोठी बाब आहे!

महामहीम राष्ट्रपती महोदया...आपणांस दीर्घायू लाभो...आपणांस आपल्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा! आपल्या आसवांनी आणलेला सांगावा आमच्यापर्यंत पोहोचला आहे! जय हिंद! जय भारत. - संभाजी बबन गायके 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 कर्करोग संशोधक डॉ. सुलोचना गवांदे