महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
संसार सुखाचा होण्यासाठी
मॉं आखिर मॉं होती हैं। आंखें क्यों लाल हैं? समझ जातीं हैं। रोने से या अधुरी नींद से ?
आज सकाळी सकाळीच ताईच्या लक्षात आलं. काहीतरी दोघांमध्ये बिनसलंय. अजय अनिताला न सांगताच ऑफिसलाला निघून गेला. अनितापण थोडी हिरमुसलेलीच दिसत होती. तिचे लाल डोळे बघून त्याचे कारण समजू शकणारी तिच्यातील आई जागी झाली.
इतक्यातच लग्न झालंय. सुरवातीला एकमेकांना समजेपर्यंत छोटे मोठे खटके उडतात. पण त्यांना वेळेवर थांबवणेही आवश्यक आहे. सध्या तर आजूबाजूचे किस्से ऐकून, मनात नाही म्हंटल तरी कुठेतरी भीती आहेच. दोघांनी आनंदाने एकमेकांना वेळ द्यावा, समजून घ्यावे हीच इच्छा आहे. लग्नानंतरचा सुरवातीचा दोन चार वर्षांचा काळ महत्त्वाचाच असतो. एकदा का घडी नीट बसली की दोन्हीकडच्या आईवडिलांची काळजी कमी होते.
ताई गर्ल्स कॉलेजमध्ये प्रोफेसर होती, एका मुलीची आई आहे. आम्ही तिघी बहिणी आहोत. त्यामुळे मुलींच्या भावना, सुख दुःख ती समजते. मुलीचे मन, तिचा चेहरा ती वाचू शकते. अनिताला ताई सुनेसारखं नाही तर मुलीसारखंच सांभाळते.
अनिता म्हणजे माझी मुलगी अनघाच आहे. असं ताई सतत स्वतःला सांगत असते. माझी अनघा बरोबर जी वागणूक होती, तीच मी अनिताबरोबर ठेवणार हा तिने मनाशी केलेला एक निश्चयच होता. हे ती अजयचे लग्न व्हायच्या आधीपासून म्हणत असे. म्हणजे स्वतःला समजावत असे. तिचे सुनेबददलचे ते स्पष्ट विचार होते.
खरच मला ताईचे कौतुक वाटते, सुनेने कसे वागावे यापेक्षा मी सुनेबरोबर कसे रहावे ? याबद्दल ताईने जास्त विचार केला होता .ताईने नोकरी केल्यामुळे नोकरी करणाऱ्या मुलींचे प्रश्नही ती समजत होती.
ताई अनिताला म्हणाली
अग !! बस. गरम छान करारा तुला आवडणारा पराठा करते. आज तुझ्याच आवडीची पनीर मसाला भाजी केली आहे. मागच्या आठवड्यात तू केली होतीस ना , तशीच करायचा प्रयत्न केलाय मी. जमली का बघ बरं.
ताईने अनिताला वाढलं. बरोबर कैरीचे ताजे लोणचेही वाढले.
अनिताला आपल्या सासूबाईबद्दल खूप आदर आहे. त्या तिच्याशी प्रेमाने वागतात. आमच्या दोघांचे खटके उडाले की ते त्यांच्या अनुभवी नजरेत लक्षात आलेलं आहे. हे कळतं तिला. पण त्या कधी विचारत नाहीत. अजयला पाठीशी घालत नाहीत. सुनेचे कर्तव्य आणि जबाबदारी यावर भाषण देत नाहीत. त्याउलट त्या नेहमी अनिताकडे लक्ष देतात.
आज म्हणाल्या, अगं..अनिता लग्नात देशमुख परिवारातील सदस्यांच्या डोक्यावर झाल ठेवून तुझ्या आई-बाबांनी आमच्या कडून वचन घेतलंय की आम्ही तुझा सांभाळ छान करू. तुला घरच्या सुनेचा मान मिळेलच. अगं ! जसा अजय आमचा, तशीच तू पण आमचीच गं .घरची मुलगी नोकरीला जाताना प्रसन्न मनाने निघावी. असं मला वाटतं. ताई पराठे करता करता बोलत होती.
तेवढ्यात हुंदक्याचा आवाज ऐकून ताईने मागे बघितले तर अनिता रडत होती. ताईने तिच्या पाठीवर हात ठेवला. काय झालं ? विचारलं. तिला पाणी दिलं, शांत केलं.
एकूलती एक अनिता आपल्या आईवडिलांची परी. अनिताला घरी कोणी तिला रागवतंय. असा प्रसंग तिने कधी अनुभवला नाही. तिचे आईवडील दोघेही मृदू भाषी, हळू आवाजात बोलणारे. त्यामुळे अजयचे जोरात बोलणे म्हणजे तिला तो रागवतोय, असंच वाटतं. तसा अजयपण थोडा चिडकाच आहे. त्यात आवाज मोठा, आवाजाची पट्टी सारखी वाढलेलीच असते.
आम्हाला सवय आहे, पण अनिताला हे सर्व नवीनच.
अनिता म्हणाली, आई !! अजय सारखा रागवतो. ओरडतो. त्याचं मला वाईट वाटतं. त्यापेक्षा मला नीट सांगितलं तर मी अगदी मनापासून त्याचं काम करेन. पण त्याआधीच आमचा वाद होतो.
ताईने अनिताचे बोलणं शांतपणे ऐकून घेतलं.
ताई म्हणाली..खरं आहे तुझं म्हणणं. देशमुखांकडे सर्वांनाच मोठ्या आवाजात बोलायची सवय आहे. बाबा काय? अजय काय ? सर्वच जोरात बोलणार. कोणालाही वाटेल भांडण चालू आहे की काय? हे बरोबर नक्कीच नाही. काय करणार? सवयी एकेकाच्या.
बरं ! आता. छान तयार हो आणि ऑफिसला जायची तयारी कर. चल आज मी सोडते तुला कारने. माझीपण ड्रायव्हिंग प्रॅक्टिस सुटायला नको.
घरी आल्यावर ताईने अजयला फोन केला. त्याची चांगली क्लास घेतली. आज घडलेली घटना सांगितली.
अरे !! अनिता तुझ्यावर विश्वास ठेवून या घरात आली आहे. तू जोरातच बोलतो, हे आम्हाला माहीत आहे; पण तिला त्याची सवय नाही. हे कारण खूप मोठं नाही रडायला, हे मला मान्य आहे. पण तूही थोडा स्वतःमध्ये बदल कर ना. मी असाच आहे, असं म्हणून चालणार नाही. कमीत कमी तिला सांग माझ्या या अशा प्रकारे बोलण्याचा तू त्रास करून घेऊ नको.
अरे, लग्न म्हणजे तडजोड म्हणतात ना, ते हेच आहे. लहान सहान गोष्टींमध्ये जेवढ्या लवकर तुम्ही तडजोड कराल तेवढंच चांगलं. फ्लॅट कुठे घ्यायचा? किंवा कार कोणती घ्यायची? या अशा मोठ्या गोष्टींवर सहसा वादावादी होत नाही रे. लहान सहान गोष्टींमध्येच तडजोड करायची असते. आज तिला न सांगता तू निघून गेलास, असे वागणे म्हणजे थोड्या प्रमाणात झालेल्या वादावादीला वाढविणे झाले. लग्नाआधी सर्व गोष्टींचा काटेकोर पणे विचार करणारा, विचारपूस करणारा तूच ना. अनेक मुली बघितल्यानंतर अनिताला पसंत केले. प्रि वेडींग काळात विचारपूर्वक काम करणारा तू लग्नानंतरची जबाबदारी विसरलास का? लग्नाआधी भेटायला जाताना उत्सुक असलेला तू दहा मिनिटे आधीच तेथे पोहचायचास आणि आज तिला न सांगता निघून गेलास. हे बरोबर नाही. या लहान लहान गोष्टी महत्वाच्या आहेत. याकडे वेळेवर लक्ष देणे गरजेचे आहे. लग्न म्हणजे कमीत कमी ४०/५० वर्षाचा एकत्र सहजीवनाचा कॉन्ट्रॅक्ट. कसा सवसेसफुली पूर्ण करणार? अरे, वादविवादानंतर बोलणं बंद झालं की आनंद कमी होतो आणि नातं नाजूक होतं, कमजोर होतंं हे लक्षात ठेव. हे असं काही करू नका. सुरवातीला दोघांनी एकमेकांना समजेपर्यंत सांभाळून राहणे गरजेचे आहे. मी असाच आहे. म्हणून चालणार नाही. असा हट्ट ठेवू नको. नाहीतर तुझा हट्ट जिंकेल आणि नातं हारेल. या अशा गोष्टी मला चालणार नाहीत. आजकाल लग्न होणे, ते टिकविणे दोन्ही कठीण. देवाच्या दयेने अनिता चांगली संस्कारी मुलगी आहे. आज अनिता ऑफिस मधून निघायच्या वेळेस तेथे जा. तिला घेऊन बाहेर कॉफी पिऊन या. संध्याकाळी मला तुम्ही दोघे आनंदाने घरी आलेले दिसायला हवे आहेत.
ताईने अजयला चक्क बजावलेच. ताईला हा नियम माहीत आहे की संसार सुखाचा होण्यासाठी घरात किती सुखसोयी उपलब्ध आहेत यापेक्षा तो आणि ती एकमेकांना किती समजून घेतात हे महत्वाचे आहे. हा नियम ताई समजून होती. ताई म्हणते अगदी दोघांच्या मध्ये लुडबुड करायची नाही, हे जरी खरे असले, तरी अगदीच लक्ष द्यायचं नाही हेपण चूकच.
कधी कधी चिमूटभर बदल गरजेचा असतो आणि तसं समजवून सांगण्यासाठी ताईसारखं व्यक्तिमत्त्वही आजूबाजूला असावं लागतं. - संध्या बेडेकर