महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
योग आहे आरोग्यासाठी क्रांती
आज जगभरात विविध प्रकारांमध्ये योगाचा सराव केला जातो आणि लोकप्रियता वाढत आहे. तसेच सार्वजनिक आवाहन ओळखून ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने ठराव ६१/१३१ द्वारे २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला.
योग आहे आरोग्यासाठी क्रांती
तुमच्या आयुष्यात आणेल
सुख आणि शांती
वृद्धिंगत होईल मती
मिळेल जीवनाला गती
योग म्हणजे जोडणे किंवा एकत्र येणे. योग ही एक प्राचीन भारतीय शिस्त आहे. जे शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्र आणण्यावर लक्ष केंद्रित करते. योग हा शब्द युज या संस्कृत शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ जोडणे असा होतो. योगामध्ये शारीरिक मुद्रा, श्वासोच्छ्वास, व्यायाम, ध्यान आणि नैतिक तत्वे यांचा समावेश होतो. योगामुळे शरीराची लवचिकता, ताकद आणि मानसिक शांती वाढण्यास मदत होते.
योगाचे विविध प्रकार आहेत. हठयोग या प्रकारात शारीरिक मुद्रा (आसने) आणि श्वासोच्छ्वास प्राणायामचा समावेश असतो. राजयोगात हे मन आणि इंद्रिय नियंत्रण ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. कर्मयोगात निष्काम कर्म करणे आणि इतरांना मदत करणे यांचा समावेश असतो. भक्तीयोगात भक्ती आणि श्रद्धा यांचा समावेश असतो. ज्ञानयोगात आत्मज्ञानाचा शोध घेणे आणि त्याचा अनुभव घेणे याचा समावेश केला गेला आहे.
योग हे भारताला मिळालेले वरदान ठरले आहे. योग केवळ शारीरिक व्यायाम नाही तर ती एक जीवनशैली बनली आहे. योगामुळे शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्तरावर सुधारणा होते. त्यामुळे व्यक्तीला निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यास मदत होते. योग ही एक आध्यात्मिक शिस्त असून ती अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित आहे, जी मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रित करते. हे एक शास्त्र आहे आणि निरोगी जगण्याची कला आहे.
२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मान्यता मिळाल्यामुळे संपूर्ण जगभरात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. योग केल्याने आरोग्याच्या बऱ्याच समस्या दूर होतात. मुळात म्हणजे योग हा कोणत्याही एका दिवसासाठी नव्हे तर दररोज करणे महत्त्वाचे आहे. या दिवसाचा उद्देश शारीरिक साधनेच्या होणाऱ्या फायद्याबद्दल व अध्यात्मिक जागृतता निर्माण करणे हा आहे. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून निवडण्याचे कारण ही अत्यंत मोठे आहे. २१ जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो ज्याला उन्हाळी संक्रांती म्हटले जाते. म्हणून या दिवसाची निवड केली.
ताणतणावामुळे जगभरातील लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सव्रााधिक परिणाम होत आहे. तणाव हा माणसाचा मोठा शत्रू आहे. तणावामुळे इतर अनेक आजारांचा धोका वाढत जातो. त्यामुळे तणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते. प्रकाशित झालेल्या आणि डॉक्टरांनी आयोजित केलेल्या अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की, सुदर्शन क्रिया योगाने इतर तणाव, नैराश्य आणि चिंता लक्षणीयरित्या कमी होण्यास मदत होते.
सुदर्शन क्रिया योग हा एक प्रकारचा श्वासोच्छवासाचा व्यायाम आहे ज्यामध्ये लोक वेगाने श्वास घेतात आणि सोडतात. हा योग हृदय गती, रक्तवाहिन्या, हृदयांच्या ग्रंथीची क्रिया, फुपफुसे आणि पचनसंस्था, यकृत आणि रोगप्रतिकारक प्रणालीचे नियम याची काळजी घेतो. तसेच जळजळ नियंत्रित ठेवतो. हे आसन पचन आणि रक्ताभिसरणासाठी उत्तम ठरले आहे. प्राणायाम आणि ध्यान सरावामुळे मानसिक त्रास कमी होतो. सुदर्शन क्रियेमध्ये श्वासोच्छ्वासाचा वेग वारंवार बदलला जातो. सातत्याने केल्यास मानसिक आरोग्यावर जलद परिणाम दिसून येतो. तसेच आत्मविश्वास वाढतो. तणाव कमी झाला की झोप सुधारते. तसेच शरीरातील ऊर्जा पातळी वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
या वर्षाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ‘स्व आणि समाजाच्या कल्याणासाठी योग'. याचा अर्थ स्व म्हणजे स्वतःच्या शरीराची, मनाची आणि आत्म्याची काळजी घेणे. समाजाशी अर्थ इतरांशी आणि पर्यावरणाशी सुसंवाद साधणे. योगामुळे एकाग्रता वाढते. योग आपल्याला निसर्गाशी व स्वतःशी एकरूप करतो.
यावर्षी २१ जून हा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाईल. व्यक्ती आणि समाजाच्या कल्याणासाठी योगाचा उपयोग करणे हे या दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-लीना बल्लाळ