तिसरी भाषा, शुध्द, अशुध्द, ग्राम्य वगैरे!

महाराष्ट्रात पहिलीपासून दोन भाषांच्या जोडीला आता तिसरी भाषा..तीही हिंदी लादायचे घाटत असल्याचे दिसून येत आहे. आपली मातृभाषाही नीट समजून घ्यायला पुरेसा काळ जाऊ द्यावा लागत असतो. विविध भाषक वर्तमानपत्रांतून प्रसिध्द होणाऱ्या काही छापील चुकांकडे मुद्राराक्षसाचा विनोद, उपसंपादकाच्या डुलक्या या नावाखाली पाहिले जात असते. अर्थात या साऱ्या चूका अनवधानाने झालेल्या असतात. आपली चूक कुणा इतराने ध्यानात आणून द्यावी असे कुणाला वाटेल बरे?

   ३१ मे हा ‘तंबाखू विरोधी दिन' (नो टोबॅको डे) होता. त्यानिमित्त मी माझ्या फेसबुक वॉलवर तंबाखू व तत्सम पदार्थ मानवी जीवाला किती धोकादायक आहेत यावर लक्ष वेधणारी एक पोस्ट टाकली होती. तंबाखूचे दुष्परिणाम जाणून असणाऱ्या व तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा तिरस्कार करणाऱ्या अनेकांनी त्यावर अभिप्राय नोंदवले होते. त्यातला एक अभिप्राय म्हणत होता...‘जय हिंद...अगदी बरोबर धूम्रपान आरोगॅस घातकच आहे. सर्वांची या गोष्टीपासून त्याग करावा. बाकी ज्याची त्याची मर्जी!'

     दारु, तंबाखू, गुटखा, मावा, खैनी, पानमसाला, विडी, सिगारेट व अन्य अंमली-नशिले पदार्थ यांच्याविरोधात मी गेली पस्तीस चाळीस वर्षे सातत्याने लेखन करीत आहे. त्या बद्दल आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांची पारितोषिकेही मिळवीत आहे. हे सगळे माहित असलेल्या एका वाचकाचा ‘तो' अभिप्राय होता.

   त्या अभिप्रायात आरोग्यास या शब्दाऐवजी ‘आरोगॅस' हा शब्द त्याने उपयोगात आणल्याबद्दल मला क्षणभर हसु आले. आम्हा पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या माध्यमकर्मी मंडळींना अशा विविध शब्दांची सवय झालेली असते. दैनिकासाठी तर दिवसाला शेकडो प्रकारचा लिखित मजकूर ईमेलवर वाचावा लागतो. माईक-कॅमेरा घेऊन थेट मैदानावरच्या अनेक घटना प्रसंगांचे चित्रीकरण करताना, लोकांना बोलते करताना वेगवेगळ्या प्रकारचे शब्दप्रयोग कानावर पडत असतात. स्टुडिओमध्ये विविध व्यवतीमत्वांच्या मुलाखती घेताना आपल्याही शब्दसंग्रहात भर पडत जात असते. त्यावेळी भाषाशुध्दी, व्याकरण, प्रमाण भाषा वगैरे पाहण्याऐवजी बोलणाऱ्याची भावना, त्यांच्या सांगण्यामागचा सच्चेपणा पाहावा लागत असतो. या भाषेबाबत पु.ल.देशपांडे यांच्या ‘ती फुलराणी' नाटकात व्हतं, नव्हतं, हाय, नाय अशा शब्दांबद्दल मार्मिक विवेचन त्यांच्या पात्रांच्या तोंडी असलेल्या संवांदांतून ऐकायला मिळतं. पुलंच्याच एका पुस्तकात (बहुधा व्यक्ती आणि वल्ली) एका चाळकरी पात्राच्या तोंडी टॅक्सी ऐवजी ‘ट्याकशी' असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. असा एक साधा शब्दही विनोदनिर्मीती करण्यास पुरेसा ठरतो तो असा.  वर्तमानपत्रात प्रसिध्द होणाऱ्या काही छापील चुकांकडे मुद्राराक्षसाचा विनोद, उपसंपादकाच्या डुलक्या नावाखाली पाहिले जात असते. अर्थात या साऱ्या चूका अनवधानाने झालेल्या असतात. आपली चूक कुणा इतराने ध्यानात आणून द्यावी असे कुणाला वाटेल बरे?  एका कवीच्या रचनेखाली त्याचे नाव टाकताना कवी ऐवजी ‘कवा' अशी चूक आमच्या अक्षररचनाकाराने केली. माझ्याही नजरेतून ते सुटले. त्या कवीने मला लगेच संदेश पाठवून तसे कळवले. मीही गंमतीत त्याला संदेश पाठवत लिहीले.....‘होते असेही कवा कवा. एवढे मनावर नका घेऊ तवा.'

   एके काळी सर्वांचीच भाषा ही मोठ्या प्रमाणावर बोली स्वरुपाची, केवळ मौखिक,  ग्रामीण, ग्राम्य, नैसर्गिक, स्वाभाविक अशीच होती. भाषेला ग्रांथिक रुप देताना ती प्रमाण भाषा बनत गेली. म्हणूनच विशिष्ट वर्गाचीच भाषा श्रेष्ठ आणि बाकीच्यांची भाषा दुुय्यम असे होत नाही.  साहित्य रचना करताना अनेकदा नाटक, कादंबरी, कविता, कथा अशा प्रकारांसाठी ग्रामीण भाषाही उपयोगात आणली जात असल्याचे तुम्हाला सहज पाहता येईल. मराठीच्या अनेक बोलीभाषेतील गाणी, नाटके, कादंबऱ्यांनी दिगंत प्रसिध्दी, लोकमान्यता मिळवली आहे. जसेकी विख्यात नाटककार गंगाराम गवाणकर लिखित ‘वस्त्रहरण' या मच्छिंद्र कांबळी अभिनित नाटकाने परदेशस्थ मराठी माणसांच्याही पसंतीची पावती मिळवली आहे. स्वतः पु.ल.देशपांडे यांनी ‘वस्त्रहरण'चे जाहिर कौतुक केले आहे. मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिलेले व मच्छिंद्र कांबळी यांनीच रंगमंचावर आणलेले ‘केला तुका नि झाला माका' हे मालवणी बोलीभाषेतील नाटकसुध्दा तुफान गाजले. पांडगो इलो रे बा इलो,  घास रे रामा, येवा कोकण आपलाच आसा, चाकरमानी, चालगती या मच्छिंद्र कांबळी यांनी अभिनय केलेल्या मालवणी बोलीतील नाटकांना रसिकांनी डोवयावर घेतले होते आणि यात केवळ मालवणी बोलणारेच नव्हते तर  पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा तसेच खान्देशातील विविध बोली बोलणारेही या नाटकांतील भाषेवर लट्टू झाले होते. पंचवीस वर्षांपूर्वी ‘मांडवाचे मघारी चाललेय काय?' हे आगरी-कोळी बोलीतील नाटक घणसोलीच्या नंदकुमार म्हात्रे यांनी रंगमंचावर आणले होते. त्याचेही शेकडो प्रयोग झाले. एकदा तर ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात एका संस्थेने ठेवलेल्या या नाटकाच्या प्रयोगाला एवढे प्रेक्षक जमले की आसने कमी पडली तर लोक पायऱ्यांवर बसले. तिथेही जागा पुरेना; तर नाट्यगृहाचे दरवाजे उघडे ठेवून तेथे उभे राहात लोकांनी या आगरी-कोळी बोलीभाषेची रंगत घेतली होती. प्रा. लक्ष्मण देशपांडेलिखित व अभिनित ‘वऱ्हाड निघालंय लंडनला' या वऱ्हाडी बोलीतील  प्रयोगानेही अशीच प्रचंड स्वरुपाची रसिकमान्यता मिळवली होती.

   कोळीगीते व त्यांना मिळणारी प्रसिध्दी हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. भारताचा प्रख्यात शोमन स्व. राज कपूर यानेही त्याच्या विविध  चित्रपटात कोळी समाजावरील चित्रीकरणाला स्थान दिले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री स्व. सीमा (रमेश देव) यांनीही ‘कशी झोकात चालते कोल्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर' हे गाणे टेचात रंगवले होते. विख्यात कवयित्री,  गीतकार स्व. शांता शेळके यांनी लिहीलेली मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा, माज्या सारंगा राजा सारंगा, वादलवारं सुटलं गो अशी कोळीगीते मराठीच्या सर्वच बोली बोलणाऱ्यांनाही प्रचंड आवडली, त्यांच्या ध्वनिमुद्रीका खूप गाजल्या. जगात सर्वशक्तिमान समजल्या जाणाऱ्या अमेरिकेचा तत्कालिन प्रेसिडेण्ट बराक ओबामा व त्याची बायको कोळी भाषा सोडाच..मराठी व हिंदीही समजू न शकणारी असताना बांद्रा येथील ‘होली नेम हायस्कूल' या शाळेच्या कार्यक्रमात नोव्हेंबर २०१० मध्ये आले असता ‘मी हाय कोली सोरील्या डोली मुंबयच्या किनारी' या श्रीकांत नारायण याने गायिलेल्या गाण्यावर भान हरपून त्या शाळकरी मुलांसोबत थिरकले होते. ही सारी हाय, नाय, व्हतं, कोली, सगली, मंडली, हालद, पिवली, काली अशी व्याकरणदृष्ट्या अशुध्द समजली जाणारी बोलीभाषा आहे, पण तिने भल्याभल्यांवर मोहिनी टाकली आहे ती अशी.

   अनेक हिंदीभाषक तथाकथित उच्चशिक्षितांच्या बोलण्यातून मी ‘रेशन' या इंग्रजी शब्दाचा उच्चार ‘राशन' असा ऐकला आहे. अनेकजण ‘एक्सरे' ला ‘एक्सरा' कसे बोलत असतात तेही मी ऐकून आहे.  शब्दांच्या उच्चारणात, जोर देण्यात, जोडाक्षरांत भले भलेही गंमती करीत असतात. शेतात काम करणाऱ्या महिलेने मुंबई-पुणे धावणाऱ्या डेवकन ववीन या गाडीकडे बघत म्हटलेले ‘ती बग डंकीण कशी डौलात चालली हाये' असे ऐकण्यात एक वेगळीच मजा असते. ‘माजा नवरा टरकवर शिलींडर हाये' असं मी एका कामवाल्या महिलेला बोलताना ऐकले आणि थोडा वेळ विचार करत बसलो होतो. मग लक्षात आले की त्या बाईचा नवरा हा ड्रायव्हरसोबत ‘क्लिनर' म्हणून नोकरी करतो, त्यालाच ती ‘शिलींडर' म्हणत होती. माझ्या भाचवंडापैकी एकाला ‘ऍक्सिडेण्ट' ऐवजी ‘ॲस्कीडेण्ट' बोलताना मी नेहमी ऐकून त्याचा आनंद घेत असतो. तीच गोष्ट ‘बारदाण' या शब्दाची. त्याला ‘बादराण' म्हणणारेही खूपजण माझ्या पाहण्यात आहेत. आमच्या लहानपणी मुंबईत राहात असताना माझी मोठी बहीण आमच्या शेजारच्या एका आजोबांशी बोलताना बोबडे बोलत असल्याचे त्यांना खूप आवडे. त्या काळी ‘बीस साल बाद' नावाचा रहस्यमय चित्रपट आला होता. तो तिने माझ्या आईच्या मांडीवर बसून बघितला होता. मग त्या आजोबांनी तिला विचारले की ‘काय गं छमे...कोणता पिक्चर बघून आलीस?' ती म्हणाली ‘नुसता भात!' त्यावर ते विचारीत ‘अरे वा, नुसता भात? डाळ, वरण, भाजी नाही का सोबतीला?'

   वर्तमानपत्र सृष्टीत काम करताना मानवी चूका होऊ शकतात, हे आता साऱ्यांना ठाऊक झाले आहे. वर्तमानपत्रातच का? कुठेही या प्रकारच्या चूका होऊ शकतात. पण छापील माध्यमातील चूका या अधिक गांभीर्याने पाहिल्या जात असतात; कारण त्यांचा वाचकवर्ग मोठ्या प्रमाणावर असतो. अनेकांच्या नजरेखालून ते वृत्तपत्र जात असते. अर्थात यामुळे काही जिवित हानी किंवा कुणाला काही दुखापती वगैरे होत नसतात. कुणाचा हेतूपुरस्सर केलेला तो अपमानही नसतो, पण  तरीही ते वाचून शोकसभेला गेल्यासारखे तोंड करणारेही अनेकजण असतातच. या वर्तमानपत्री चूकांतून अनेकदा गंमतही घडत असते हे वास्तव आहे.  एका प्रसिध्द पत्रकाराचे एक नियमित सदर नामांकित वर्तमानपत्रातून प्रकाशित केले जात असे. त्या सदराचे नाव होते ‘सहज सुचलं म्हणून!' एकदा काहीतरी कुठेतरी गफलत झाली.  शुध्दलेखन नीट पाहिले गेले नाही आणि ते सदर प्रसिध्द झाले. त्या सदराच्या नावात छापले गेले होते...‘सहज सुजलं म्हणून!'

 राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आत्मशुध्दीसाठी विवेकपूर्ण ध्यान (जागतिक योग दिन)