थोरांच्या विचारांना समृद्ध करणारा काव्यसंग्रह - तयांस वंदितो मी


‘तयांस वंदितो मी' या काव्यसंग्रहात महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवराय आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत भगवान बुद्ध, संत बसवेश्वर, संत रोहीदास, संत गाडगेबाबा, साने गुरुजी, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी यांच्याबरोबर माँसाहेब जिजाऊ, पुण्यश्वोक महाराणी अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई, कर्मवीर भाऊराव पाटील, कविवर्य वामनदादा कर्डक यांचेही गुणगाण गाणारी कवने लिहून गंगाधर साळवी यांनी वाचकाला उत्तम कवितांची मेजवानी दिली आहे.

नुकताच आमचे कविमित्र गंगाधर साळवी यांनी मला सस्नेह भेट दिलेला तयांस वंदितो मी  हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह माझ्या वाचनात आला.

 दोनच राजे इथे गाजले कोकण स्वप्नभूमीवर,
एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर'

  शाहीर प्रताप बोधडे यांच्या गीताप्रमाणे थोरांच्या जीवनचरित्रास कविने आपल्या प्रतिभावंत कवनांनी समृद्ध केले आहे. कवी गंगाधर साळवी हे एक उत्तम कवी, शाहीर व उत्तम गायक आहेत. आपली शिक्षकी पेशाची नोकरी सांभाळत ते हा कविता लेखनाचा छंद जोपासत आहेत हे खरच वाखाणण्यासारखं आहे. माणसानं जीवनात एकतरी कला जोपासावी या विषयी महाराष्ट्राचे लाडके पु. ल.देशपांडे सर एकदा म्हणाले होते की. माणसाने जीवन जगण्यासाठी आवश्यक ते शिक्षण जरुर घ्यावे. पोटापाण्यासाठी नोकरीधंदा जरुर करावा. नोकरी-धंदा तुम्हाला जगवेल. परंतु जीवनात एकतरी कला जोपासावी. कला तुम्हाला आपण का जगत आहोत हे शिकवील. याच उक्तीला धरुन कवी गंगाधर साळवी सर आपले जीवन व्यथीत करत आहेत असे मला वाटते. ‘तयांस वंदितो मी' या आपल्या काव्यसंग्रहात त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवराय आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत भगवान बुद्ध, संत बसवेश्वर, संत रोहीदास, संत गाडगेबाबा, साने गुरुजी, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी यांच्याबरोबर माँसाहेब जिजाऊ, पुण्यश्वोक महाराणी अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई, कर्मवीर भाऊराव पाटील, कविवर्य वामनदादा कर्डक यांचेही गुणगाण गाणारी कवने लिहून वाचकाला उत्तम कवितांची मेजवानी दिली आहे. या कवितासंग्रहातील थोरामोठ्यांविषयी कवितेने कलेली कवने वाचुन वाचकाला थोरामोठ्यांविषयी आदर, आत्मियता व त्यांचे कर्तुत्व यांची जाणीव होऊन थोरांच्या विचारांच्या पावलावर पाऊल ठेवून आपला जीवनक्रम मार्गस्थ  करण्याची मोठी शिकवण मिळते. कवी गंगाधर साळवी यांनी आपल्या या कवितासंग्रहाची सुरुवात ‘बुद्ध' या कवितेने केली असून त्यात ते म्हणतात .......

        सत्य अहिंसा करुणेची
        शिकवण दिली शुद्ध
        ध्यानी मनी चित्ती सदा
        वसतो माझ्या बुद्ध ...!
        वाद नाही संवाद दिला
        संयमाचा मंत्र
        सूखे दुजाच्या सुख माना
        नको षडयंत्र .....!!

 दयेचा करुण महासागर असलेल्या भगवान गौतम बुद्धांनी जगाला सुख शांती, सदाचार याची शिकवण दिली. या संदेशावरच आज जग चालत आहे. माणसानं जीवनात मोहमाया, इतराविषयी असलेली द्वेषाची भावना दुर केली तर सर्वाचेच जगणे सुखकर होते हा विचार भवगान बुद्धांनी जगाला दिला आहे, याची आठवण कवी वरील कवितेत आपणास करुन देत आहे. अतिशय उद्‌बोधक अशी ही रचना आहे. यात भगवान बुद्धांनी जगाला मानवतेची शिकवण दिली आहे त्या तत्वावर चालले तर सर्वाचेच भले होते याची शिकवण या कवितेत आपणास होते. तसेच  ‘तत्त्वज्ञानी महाराणी' या आपल्या कवितेत ते म्हणतात ......

          तत्त्वज्ञानी महाराणी
          होळकर घराण्याची
          शूर धाडसी अहिल्या
         सून मल्हारराव होळकरांची
         जामखेड तालुक्यात
         जन्म चौंडी या गावात
         माणकोजी शिंदे यांची
         कन्या गाजते जगात
        खंडेरावांच्या पश्चात
        हाती आली तलवार
        केले नेतृत्व सैन्याचे
        चोख केला कारभार

वरील काव्यपंक्तीत कवी गंगाधर साळवी यांनी पुण्यश्वोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जाज्वल्य इतिहास, त्यांचे शौर्य, जनतेशी असलेली राज्यकारभाराची बांधिलकी व सासरे व आपल्या पतीच्या पश्चात तब्बल २९ वर्ष केलेले रयतेचे राज्य यांचा महिमा सांगीतला आहे. वेळप्रसंगी राजमातेने हाती तलवार घेऊन रणांगणही गाजवलं. आपली गंगाजळी लोकांसाठी खुली करुन असंख्य लोकोपयोगी कामे केली. त्यांनी बांधलेले नदीवरचे घाट, विहिरी, बारवा, अनेक शिवमंदीरे, जेजुरी गडाची तटबंदी, अनेक तलाव आजही त्यांच्या कामाची साक्ष देत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या ‘पूज्य साने गुरुजी' या कवितेत ते म्हणतात ......

       जळगाव जिल्हा अमळनेर
       अद्यापनाचे कार्य पाहिले
       विद्यार्थी सारे धन्य जाहले
       साने गुरुजी गुरु लाभले
       तत्वाशी होते ठाम गुरुजी
       तत्त्वाज्ञानाचे अभ्यासक
       विद्याप्रेमी अन्‌ संवेदनशील
       विद्देचे थोर उपासक ....!

 या कवितेत कवीने परमपुज्य साने गुरुजी यांचे जीवनकार्याचा उलगडा केला आहे. विद्यार्थीप्रेमी असलेल्या साने गुरुजींची कर्मभूमी ही जळगाव जिल्ह्यातील अमळनेर ही राहीली आहे. साने गुरुजींचे राष्ट्रसेवादलातील काम  त्यांची ‘बलसागर भारत' भारतीय स्वातंत्र्याची रम्य सकाळ आहे; तसेच साने गुरुजींची ‘श्यामची आई' हे जगप्रसिद्ध पुस्तक मराठी वाचकांच्या कायम स्मरणात राहणारे आहे. यासारख्या या कविता संग्रहात एकुण ५० कविता असून सर्वच अप्रतीम आहेत. त्यात महाराष्ट्रातील अनेक थोर पुरुषांचा जाज्वल्य इतिहास वाचकासमोर मांडण्याचा कवीचा प्रयत्न अतिशय स्तुत्य असल्याचे कवितासंग्रह वाचल्यावर वाचकाच्या लक्षात येते. त्यातील धन्य माता जिजा माऊली, बाळ शिवबा जन्मले, कुणी पायलट झाल्या, भीमाचं गाणं हे चवदार तळे, मोठ्या दिलाचा राजा, क्रांतिस्तंभ - महाड, कवितेत पांडुरंग, संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील ही साधी मराठी, मैत्री माझ्या बाबांची या काही विशेष भावलेल्या कविता. या प्रकारे हा संपुर्ण काव्यसंग्रहच वाचनीय असून मनाला सुखावणारा आहे. या काव्यसंग्रहाला आदरणीय ज्येष्ठ कवी व गीतकार अरुण म्हात्रे सरांची अतिशय बोलकी अशी प्रस्तावना लाभली आहे. तसेच मुखपृष्ठ समृद्धी क्रिएशन यांनी अगदी हुबेहुब रेखाटले आहे. कवी गंगाधर साळवी यांच्या तयांस वंदितो मी या काव्यसंग्रहास माझ्या अनेक शुभेच्छा तसेच त्यांच्या पुढील लेखनकार्यास आभाळभर खुप खुप शुभेच्छा ....!!!
काव्यसंग्रह ः तयांस वंदितो मीकवी : गंगाधर साळवी
प्रकाशनः महाजन पब्लिशिंग हाऊस पुणे  प्रथम आवृती : मे २०२५
पृष्ठे : १०४ मूल्य : २१०
- तानाजी धरणे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

तिसरी भाषा, शुध्द, अशुध्द, ग्राम्य वगैरे!