ठाण्यातील आकर्षक तुळजाभवानीचे मंदिर

ठाण्याच्या गणेशवाडी-पांचपाखाडी येथे काळ्या पाषाणातून म्हणजेच कृष्णशिळेतून आई भवानीचे मंदिर अप्रतिमरित्या साकारले आहे; सुमारे १ हजार ३५० टन काळ्या पाषाणाचा वापर करुन ३३ फुटांचा कलश आणि त्यासमोर नवग्रह, प्रवेश कळश, २६ कोरीव दगडी स्तंभ, २० गजमुखांची आरास तसेच मंदिरासमोर हवनकुंड, १०८ दिव्यांची दीपमाळ आदींनी सजविलेले असे हे मंदिर आता तयार झाले आहे.

हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्य देवता आणि महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती म्हणजे आदिशक्ती आई तुळजाभवानी होय! देशातील ५१ शक्तिपीठांपैकी आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी  तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. याच शक्तीपीठाचे एक प्रतिरूप आता ठाण्यात साकारले आहे.

आई भवानीचे ठाण्याच्या गणेशवाडी-पांचपाखाडी येथे असलेले मंदिर आपणा सर्वांना माहित आहे. शारदीय नवरात्रोत्सवात या मंदिरात मुंबई-ठाण्यातील अनेक भाविक येथे येत असतात. हे मंदिर येथील नागरिकांनी उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कालांतराने या मंदिराचे काम रखडले. त्यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी साधारणपणे २५ ते ३० वर्षांपूर्वी या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. तुळजापूर येथे आई तुळजाभवानीच्या मूर्तीची गळाभेट घडवून आणलेल्या मूर्तीची २ व ३ मार्च २००४ रोजी येथे  विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.

मात्र, या देवीचे विद्यमान स्थितीमधील हे मंदिर जीर्ण होत चालले होते. शिवाय, भविष्यातील वाढणारी वाहतूक पाहून डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या मंदिराचा नव्याने  जीर्णोध्दार करण्याचा निर्णय घेतला. आता हे मंदिर थेट तुळजापूरची अनुभूती देणारी  प्रशस्त आणि आकर्षक वास्तू तयार झाली आहे . तुळजाभवानीच्या या नवीन मंदिरासाठी शेजारील उद्यानातील जागा ठाणे महानगरपालिकेकडून मिळविण्यात आली असल्याने आता मंदिराला भव्य परिसर लाभला आहे. त्याचेही नूतनीकरण करण्याचे काम चालू आहे.

 काळ्या पाषाणातून म्हणजेच कृष्णशिळेतून हे मंदिर अप्रतिमरित्या साकारले आहे; सुमारे १ हजार ३५० टन काळ्या पाषाणाचा वापर करुन ३३ फुटांचा कलश आणि त्यासमोर नवग्रह, प्रवेश कळश, २६ कोरीव दगडी स्तंभ, २० गजमुखांची आरास तसेच मंदिरासमोर हवनकुंड, १०८ दिव्यांची दीपमाळ आदींनी सजविलेले असे हे मंदिर आता तयार झाले आहे. लोप पावत असलेल्या हेमाडपंथी शैलीला पुनःर्जिवित करीत हे मंदिर साकारले आहे. पाषाणाव्यतिरिक्त अन्य साधनांचा वापर न करता, हे मंदिर उभे केले आहे.

या मंदिरात आल्यानंतर तुळजापूरच्या मंदिराचा अलवार स्पर्श जाणवावा, अशी मनस्वी इच्छा डॉ.जितेंद्र आव्हाड यांची होती. या इच्छेतून थेट तमीळनाडूचे सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखाणीतून कृष्णशिळा, शिव शंकराचे स्थान असलेल्या कर्नाटकातील मुरुडेश्वर येथून आणण्यात आल्या. असेंड क्रियेटीव्हचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली.शिखर कळस, नवग्रह, दगडी स्तंभ, आकर्षक कलाकुसर, दोन्ही बाजूंना प्रशस्त हत्तींची शिल्पे या कृष्णशिळेतून साकारली आहेत. शिल्पकलेचा हा एक उत्कृष्ट आविष्कार असल्याने ते पाहण्यासाठी भाविकांची रीघ लागलेली असते.

सर्वसामान्यांसाठी खुले असलेले हे मंदिर ५०० वर्ष साक्ष देईल, असे बांधण्यात आल्याचे वास्तुविशारकांचे म्हणणे आहे. तुळजाभवानी मातेचे ठाण्यातील हे मंदिर आता भक्तांचे तीर्थस्थान तर प्रेक्षकांचे नयनरम्य पर्यटनस्थळ झाल्याचे दिसून येते. - शिवाजी गावडे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

थोरांच्या विचारांना समृद्ध करणारा काव्यसंग्रह - तयांस वंदितो मी