महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
अहमदाबाद विमान अपघातामधील विज्ञान आणि अज्ञानी अंधश्रद्धा
अपघात घडल्यानंतर तुमच्या श्रध्दा, भक्ती वैयक्तिक मनातून व्यक्त करायला, देवाचे आभार मानायला कोणाची काही हरकत नाही. पण जर श्रध्दा, भक्ती सार्वजनिक व्यक्त करायच्याच असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करा. पण अशा दुःखद प्रसंगी तुमच्या अज्ञानी अंधभक्तीच्या मुर्खतेचा बाजार मांडून, मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या आप्तजनांच्या दुखी मनावर मिठ चोळू नका. अहमदाबाद लंडन विमान क्रॅशमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या हॉस्टेलच्या डॉक्टर प्रशिक्षण घेणाऱ्या तरुण मुलांचा काय दोष होता?
शिक्षण हे विज्ञानवादी असते आणि संस्कार हे अज्ञानवादी अंधश्रद्धा, रीतिरिवाज, परंपरा मानणाऱ्या असतात. रेल्वे, विमान, टू व्हीलर फोर व्हीलर, कॉम्प्युटर, मोबाईल, नेटवर्क, वायफाय हे सर्व मानवनिर्मित आधुनिक तंत्रज्ञान वापरुन त्याचा परिपूर्ण उपभोग घेतात. पण नियमाचे पालन केले नाही तर यम उभा राहतो. त्यालाच लोक अपघात म्हणतात. मानवाने हे कायमचे लक्षात ठेवले पाहिजे की अज्ञानावर विज्ञानाने मात केली आहे. तरी आम्ही हे समजून घेत नाही.
लिंबू-मिरची खायची असतात, टू व्हीलर,फोर व्हीलरला किंवा घरच्या दरवाजाला बांधण्यासाठी नसतात. घरात मांजर पाळायची असते, मांजर आडवी गेली कि काही वाईट होत नाही. उलट उंदरांपासून नुकसान होण्याचे टळते. मानवाला शिंक येणे हा नैसर्गिक प्रकार आहे. शिंकल्याने काही अघटीत होत नाही किंवा काही अडचणीही येत नाहीत. भूत झाडावर राहत नाही, झाडावर पक्षी राहतात. चमत्कार असा काही नसतो. प्रत्येक गोष्टी मागे विज्ञान असते आणि आहे प्रत्येकाला कारण आहे. ज्या लोकांना अंग मेहनत करायची सवय नसते तेच हे लोक बुवा, बाबा,महाराज मानवाला खोटे बोलून देवाची, स्वर्ग नरकाची पाप, पुण्याची भीती घालत असतात आणि आहेत. करणी, जादूृटोणा काही नसते; हे भ्याड लोकांच्या मनाचे खेळ आहेत. जादू-टोणा करून ग्रहाची दिशा बदलणारे हे ढोंगी बाबा; वारा, ढगांची दिशा बदलून पाऊस का पाडत नाहीत? खरे तर पृथ्वी ही स्वतः क्षणाक्षणाला दिशा बदलत असते. नवसाने, व्रताने, पुजेने, नैवैद्याने, बळीने, देणगीने, प्रसन्न होऊन फळ देतो देव; म्हणजे देव लाच घेऊन प्रसन्न होईल का ? म्हणूनच विज्ञान वाचा आणि अज्ञान दूर करा.
कुणाला राग आला तर येऊ दे, कुणाच्या भावना दुखावल्या तर दुखू दे. पण तुमच्या श्रध्दा भक्तीचा अशा दुःखद प्रसंगी बाजार मांडू नका. कारण तुम्ही ज्या अपघातातून वाचला आहात त्याच अपघातात शेकडो लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत. हे मान्य करा. तुमची श्रध्दा भक्ती आहे; पण अशा वेळी ती वैयक्तिक मनातून व्यक्त केली तर काही वावगे नाही. अहमदाबाद लंडन विमान क्रॅश मध्ये २४० वर जे प्रवासी मृत्यूमुखी पडले त्यांची देवावर श्रध्दा भक्ती नव्हती का? ते देवाला मानत नव्हते का? मग देवाने त्यांना का नाही वाचविले? तुला एकटीलाच कसे वाचविले? की देव ही भेदभाव करतो? तो देव एवढा निष्ठूर कसा असू शकतो, की त्या विमानातील लहान मुलांचीही त्याला दया येऊ नये? लहान मुलं तर पापीही नसतात मग तो देव लहान मुलांसहित २४० च्या वर प्रवासी बाबतीत एवढा निष्ठूर व तुझ्या एकटीच्याच बाबतीतच एवढा दयाळू कसा झाला?
तुमच्या श्रध्दा भक्ती कुठे व्यक्त कराव्यात किमान याचे तरी भान ठेवा. वैयक्तिक मनातून व्यक्त केल्या तर काही हरकत नाही,परंतु अशा दुःखद प्रसंगी सार्वजनिक तुमच्या श्रध्दा भक्ती व्यक्त करीत असाल तर ते पुरावा देऊन सिद्ध करा. कारण तुम्ही ज्या अपघातातून वाचलेले असता त्याच अपघातात शेकडो प्रवासी लहान मुलांसहित मृत्यूमुखी पडलेले असतात. त्यांच्या मृत्यूची अशी चेष्टा विटंबना किंवा देवाने केलेला भेदभाव कोणताही सुज्ञ व्यक्ती कधीही मान्य करणार नाही. जसे मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या बाबतीत सर्व हळहळ व्यक्त करतात, संवेदना व्यक्त करतात. तसेच तुझ्यासारखे अपघातातून वाचलेल्या प्रवासी बाबतीतही सर्व आनंद व्यक्त करतात. अपघातात मृत्यूमुखी पडणे व वाचणे एक क्रिया आहे. त्याला श्रध्दा, भक्ती, नशीब, त्यांचा काळ आला होता, देव तारी त्यांला कोण मारी, चांगले वाईट कर्म अशा संज्ञा किंवा जोड देऊ नका.
ही एक बाई देवाला मानणारी म्हणून तिला देवाने वाचले, मग ती लहान लहान मुले त्यांच्या आई वडिलांचे देवाला काहीच देणेघेणे नव्हते काय? हॉस्टेलमध्ये जेवत असलेल्या शिकाऊ डॉक्टर मुलांचा काय दोष होतो. ही बाई ती मानवनिर्मित चारचाकी गाडीच्या वाहतूक कोंडीमुळे उशीरा पोचली हे खोटे आहे काय? मी वाहतूक कोंडीमुळे दहा मिनिटे उशीरा पोचले, मी अनेक वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांना विनंती केली. त्यांनी मला प्रवेश दिला नाही. त्यामुळेच मी वाचले हे जगाला ओरडून सांगितले पाहिजे होते. हे सत्य न सांगता मी गणपतीमुळे वाचले हे सांगणे म्हणजेच जगाची फसवणूक करते.
अपघात घडल्यानंतर तुमच्या श्रध्दा, भक्ती वैयक्तिक मनातून व्यक्त करायला, देवाचे आभार मानायला कोणाची काही हरकत नाही. पण जर श्रध्दा, भक्ती सार्वजनिक व्यक्त करायच्याच असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करा. पण अशा दुःखद प्रसंगी तुमच्या अज्ञानी अंधभक्तीच्या मुर्खतेचा बाजार मांडून, मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या आप्तजनांच्या दुखी मनावर मिठ चोळू नका. अहमदाबाद लंडन विमान क्रॅशमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या हॉस्टेलच्या डॉक्टर प्रशिक्षण घेणाऱ्या तरुण मुलांचा काय दोष होता? देवाला त्यांची दया का आली नाही? अहमदाबाद लंडन विमान क्रॅशमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या कोणत्याही मानवाचा कोणताही दोष नव्हता. दोष हा मानव निर्मित आधुनिक तंत्रज्ञानाच्या यंत्रणेतील दोषाकडे दुर्लक्ष करण्याचा आहे. त्याची योग्यवेळी दखल घेतली असती तर अपघात टळला असता. त्याची निपक्ष चौकशी झाली पाहिजे. ती होईल ही अपेक्षा करणे हे आपल्या हाती नाही. सत्ताधारी जे ठरवतील तेच होईल. पण भविष्यात असे अपघात होऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे हीच यातील सर्व मानवांना नम्र विनंती. अहमदाबाद लंडन विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व मानवांना, प्रवासी, पायलट, क्रू मेंबर, प्रशिक्षण घेणारे डॉक्टर, इतर रहिवाशी यांना भावपूर्ण श्रध्दांजली. - सागर रामभाऊ तायडे