महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
राहून गेलेला अंतराळ-स्पर्श!
यशापेक्षा यशासाठी केलेल्या प्रयत्नांना खरे तर जास्त महत्त्व असते. पण दुनिया उगवत्या सूर्याला नमस्कार करीत असते. अगदी मनःपूर्वक प्रचंड मेहनत घेऊन, प्रचंड सराव करून शेवटी नकाराला मोठ्या धैर्याने सामोरे जाण्या-या श्री.रविश मल्होत्रा यांना सलाम! त्यांची शेवटच्या क्षणी निवड झाली नाही, म्हणून तमाम भारतीय हळहळले होतेच. १९८४ मध्ये पी.टी.उषा सेकंदाचा शंभरावा भाग मागे राहिली लॉस एन्जेलिस ऑलिम्पिक्सच्या ४०० मीटर्स अडथळा शर्यतीतील कांस्य पदकापासून...पण तिची मेहनत सर्वांच्या मनात भरली.
तो अगदी त्याच्यासारखा. दोघांत फरकच करायचा झाल्यास तसा तो करताही आला असता, किंबहुना केलासुद्धा गेला. पण हे दोघेही एकमेकांना पर्याय होते, याचाच अर्थ दोघांत काडीचाही फरक नव्हता. पण लाखांत एक असणे वेगळे आणि लाखांत पहिले असणे वेगळे.
लढाऊ विमाने जमिनीपासून जास्तीत जास्त साठ हजार फुटांपर्यंत वर जाऊ शकतात. SR-७१ BLACK BIRD ने चक्क ऐशी हजार फुटांचा टप्पा गाठल्याचे बोलले जाते. काहीवेळा तर प्रयोग म्हणून नव्वद हजारांपर्यंतही उंची गाठली गेल्याचे समजते. इथून अंतराळ केवळ एक हजार फुटावर म्हणजे जमिनीपासून साधारण शंभर किलोमीटर्स वर सुरु होते.
पण लढाऊ विमानांचे ध्येय इतक्या उंचीवर जाण्याचे नसतेच. त्यामुळे हे दोघेही त्यांना उपलब्ध असलेल्या विमानांच्या क्षमतेच्या अत्युच्च पातळीपर्यंत निश्चित जाऊन यायचे...विमानांच्या चाचण्या घेणे, हे त्यांच्या कामाचा एक भाग होता.
पण एका आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचा भाग म्हणून भारतीय वैमानिकांना अंतराळात जाण्याची संधी समोर येऊन उभी ठाकली. हजारो वैमानिकांमधून या दोघांची निवड झाली...आणि आधी भारतात आणि पुढे परदेशात या दोघांचे अतिशय आव्हानात्मक प्रशिक्षण सुरु झाले! दोघांपैकी कुणा एकालाच भारताचा पहिला अंतराळवीर होण्याचा बहुमान प्राप्त होऊ घातला होता. दोघांनाही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सज्ज राहणे अपरिहार्य होते....अगदी अंतराळात प्रत्यक्ष झेप घेण्याच्या काही तास आधीपर्यंत! अर्थात दोघांत स्पर्धा होतीच. पण स्पर्धा या शब्दाचा खरा अर्थ एकत्रित प्रयत्न करीत पुढे जाणे, असा आहे. दुस-याला मागे ढकलून स्वतः पुढे जाणे नव्हे.
दुस-यालाही पुढे घेऊन जात जात ध्येयाच्या दिशेने प्रामणिक प्रयत्न करीत राहणारा एक माणूस चाळीस वर्षांपूर्वी भारताने अनुभवला....रविश मल्होत्रा! स्पर्धा या शब्दाचा आताचा अर्थ दुस-याच्या पुढे जाणे, असा आहे. पण खरे तर एकत्रित प्रयत्न करणे याला स्पर्धा म्हणतात. असो.
दुस-यालाही पुढे घेऊन जात जात ध्येयाच्या दिशेने प्रामणिक प्रयत्न करीत राहणारा एक माणूस चाळीस वर्षांपूर्वी भारताने अनुभवला....रविश मल्होत्रा! ३ एप्रिल,१९८४ रोजी राकेश शर्मा साहेब रशियाच्या Soyuz T 11 बैकानूर येथून बहुदा भल्या सकाळी अंतराळात झेपावले.
आणि ‘मल्लू' अर्थात रविश मल्होत्रा साहेब मागे राहिले! स्पर्धेत दुस-या क्रमांकावर राहणे विजेत्यांच्या मनातही नसते. परंतु भारतीय अंतराळ कार्यक्रम ही काही धावण्याची स्पर्धा नव्हती आणि हाच विचार राकेश शर्मा साहेब आणि रविश मल्होत्रा साहेबांच्या मनात पक्का रुजलेला होता....कुणीतरी एकच अंतराळात जाऊ शकला नसता...पण जर एकच अंतराळवीर निवडला गेला असता आणि त्यालाच ऐनवेळी काही झाले असते तर? सर्व योजना कोसळून पडली असती...आणि भारताची संधी गमावली गेली असती! रविश मल्होत्रा साहेबांचे हृदय पहिल्या क्षणाला गांगरून गेले असेलच, निराश झाले असेलच. पण सैनिकाचे हृदय त्यांचे. दुस-याच क्षणी त्यांनी नैराश्य झटकले...आणि केवळ राकेश शर्मा यांच्या सकुशल प्रवासासाठी ते प्रार्थना करू लागले...! पुढे घडला तो इतिहास. पण रविश मल्होत्रा साहेबांसारख्या मोठ्या मनाच्या माणसामुळे हा देश सारे जहां से अच्छा आहे...हेही तेव्हढेच खरे.
आज पंचाहत्तर-शहात्तर वर्षांचे असलेले रविशजी अगदी फीट आहेत. रोज तासभर नियमित आणि माजी सैनिकाला साजेसा व्यायाम करतात...आठवड्यात पस्तीस किलोमीटर्स चालतात..रशियात लागलेली सवय आजही कायम आहे!
रशियाची राजधानी असलेल्या मॉस्को शहराच्या जरा बाहेर वसवल्या गेलेल्या star city मध्ये शर्मा आणि मल्होत्रा या आडनावांच्या, केवळ नशिबाने एकत्र आलेल्या दोन पंजाबी तरुणांचे प्रशिक्षण सुरु होते...हा तळ त्यावेळच्या रशिया-अमेरिका शीतयुद्धाच्या काळात अतिगुप्त ठेवण्यात आला होता...अर्थात रशिया याबाबतीत तेथील हवामानासारखाच अतिशीत होता.
२ एप्रिल, १९८४. तिकडे दुपारचा एक वाजून आठ मिनिटे झालीत...यान काहीच क्षणांत झेप घेणार आहे! आणि तसेच झाले!
२५ डिसेंबर, १९४३ रोजी जन्मलेले रविशजी यांचे पालक मूळचे लाहोरचे रहिवासी. पण रविशजी यांच्या जन्मानंतर केवळ चारच वर्षांत त्यांना भारतात यावे लागले. भावाच्या आधारावर राहावे लागले. पुढे ते व्यवसायानिमित्त कोलकात्यामध्ये स्थिरावले. रविशजी राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात एन.डी.ए.पुणे येथे निवडले गेले. त्यांना त्यांच्या इतर भावांप्रमाणे नौसेनेमध्ये जायचे होते..पण नशिबाने धाडले वायुसेनेत. १९६३ मध्ये ते vampiere Squadron मध्ये commisioned झाले. विविध लढाऊ विमाने उडवनायाचा अनुभव गाठीशी असलेल्या रविशजी यांनी १९७१च्या भारत-पाक युद्धात दिमाखदार कामगिरी बजावली. त्यांनी सुखोई सारखी अत्याधुनिक विमाने उडवली...एकूण १७ यशस्वी उड्डाणे घेऊन शत्रूवर हल्ले चढवले...कित्येक वेळा त्यांचे विमान शत्रूच्या हल्ल्यात सापडले सुद्धा...पण ते परतले. विंग कमांडर दिलीपजी परुळकर यांच्यासोबत यांनी काम केले. परुळकर साहेब पाकिस्तानच्या कैदेत वर्षभर होते...पुढे ते निसटलेसुद्धा होते..आणि पुन्हा पकडलेसुद्धा गेले होते!
रविशजी पुढे रशिया भारत संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी निवडले गेले...शंभर कोटी भारतीयांमधल्या निवडक लोकांमधील एक असणे म्हणजे काय, हे त्यांनी अनुभवले. अंतराळ शिक्षणाचे भाषा माध्यम अर्थातच रशियन होते...ही भाषा त्यांनी आणि राकेश शर्मा यांनी आत्मसात करून घेतली. सबकुछ रशियन...कुणीही इंग्रजीचा एक शब्द जाणत नव्हते..किंवा उच्चारत नव्हते. सिम्युलेटर अर्थात छद्म वातावरणात,परिस्थितीमध्ये प्रशिक्षण सुरु होते. अंतराळात असते तसे वातावरण इथे तयार केले गेले, अनेक सराव केले गेले...त्यामुळे प्रत्यक्षात अंतराळ स्थानकात काहीही समस्या आली नाही.
राकेशजी आणि रविशजी बंगळूर मध्ये एकमेकांचे सहकारी होते काही दिवस, पण रशियात ते आणखी जवळ आले...राकेश रिकी बनले तर मल्होत्रा मल्लू. पुढे रविशजी भारतीय हवाई दलात त्यांच्या आधीच्या लढाऊ वैमानिक कामगिरीवर रुजू झाले. पण त्यांची अंतराळात जाण्याची इच्छा अजूनही आहे. रशियाने त्यांना १९८४ मध्ये Order fo Freindship बहाल केली. तर भारताने त्यांना १९८५ मध्ये कीर्ती चक्र प्रदान केले!
यशापेक्षा यशासाठी केलेल्या प्रयत्नांना खरे तर जास्त महत्त्व असते. पण दुनिया उगवत्या सूर्याला नमस्कार करीत असते. अगदी मनःपूर्वक प्रचंड मेहनत घेऊन, प्रचंड सराव करून शेवटी नकाराला मोठ्या धैर्याने सामोरे जाण्या-या श्री. रविश मल्होत्रा यांना सलाम! त्यांची शेवटच्या क्षणी निवड झाली नाही, म्हणून तमाम भारतीय हळहळले होतेच. १९८४ मध्ये पी.टी.उषा सेकंदाचा शंभरावा भाग मागे राहिली लॉस एन्जेलिस ऑलिम्पिक्सच्या ४०० मीटर्स अडथळा शर्यतीतील कांस्य पदकापासून...पण तिची मेहनत सर्वांच्या मनात भरली. रविश मल्होत्रा साहेब आणि उषा यांची तुलना नाही...पण दोघांनीही अपयश स्वीकारले..आणि पुढे वाट चालत राहिले! अंतराळापर्यंत हात पोहोचवण्याची हिंमत तर दाखवलीच...स्पर्श होणे न होणे...हा नशिबाचा भाग.
आपले अंतराळ वीर शुभांशु शुक्ल येत्या काही दिवसांत अंतराळात भरारी घेतील..त्यांच्यापुढे रविशजीेसारख्या मोठ्या दिलाच्या माणसांचा आदर्श असेलच....खूप खूप शुभेच्छा...जय हिंद.! - संभाजी बबन गायके