महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
मला पडलेले स्वप्न
आई म्हणाली...खंडोबाची वाडी लांब नाही; जवळच आहे आणि तुला एखाद्या दिवशी शाळा सुटायला उशीर झाल्यास तुझी आत्ये तिथेच राहते, तुझ्या जेवणाची सोय होईल; पण तू रोज खंडोबाच्या वाडीला शाळेला जा. नोकरी मागून मिळत नाही. तू जीव लावून अभ्यास केलास आणि मास्तर झाल्याचा आनंद मला फार झाला आहे. स्वप्नात मी पूर्णपणे रंगून गेलो होतो आणि माझे मन म्हणत होते एक महिना पूर्ण झाला, पाहता पाहता दोन महिने पूर्ण झाले. तीन महिन्याचा पगार आता एकदम मिळणार. सकाळ झाली होती दादांच्या पिंपळाच्या झाडावर कावळ्याचा आवाज व पंखांचे फडफडणे ऐकू येत होते. पगार पगार म्हणत मी जागा झालो.
... त्यावेळी मी लहान होतो रोज रानातून शाळेला जात असे आमच्या रानापासून काही अंतरावर आमची शाळा होती. बुरुंगवाडी व जुळेवाडी ही दोन ग्रामीण खेडी फक्त या दोन वाड्याच्या मधून रेल्वे गाडी जाते इतकाच फरक आहे. नाहीतर ही दोन गावे एकच आहेत. पूर्वी पाच गावांमध्ये एक ग्रामपंचायत होते. त्यापैकी बुरुंगवाडी व आजूबाजूची चारखेडी यांची ग्रामपंचायत भिलवडी रेल्वे स्टेशन होती. तर जुळेवाडीची ग्रामपंचायत येळावी होती. पाच गावांमध्ये सरकारी दवाखाना येळावीला होता; तर दुसरा दवाखाना भिलवडी गावात होता. काळ स्वस्त होता त्यावेळी पाऊस पाणी भरपूर होता. प्रत्येकाच्या शेतामध्ये खंडीने ज्वारी पिकत होती. वर्षाकाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये ज्वारी कडधान्य भरपूर असल्यामुळे कामापुरती ज्वारी व कडधान्य ठेवून बाकी ज्वारी व कडधान्य शेतकरी विकत असे. त्यावेळी मापटे चिपटे व कळकापासून तयार केलेले एक माप असायचे ज्वारी मापण्यासाठी. माल भरपूर पिकत असल्यामुळे मालाला दर कमी होता त्यावेळी पैशाला फार किंमत होती काळ सस्ताईचा होता. माणसांमध्ये भरपूर प्रेम होते. आपले तूपले लोक म्हणत होते. एक प्रेमाचा जिव्हाळा असायचा. अशी त्यावेळी माणसे होती. लबाडी कमी होती. लोक काम जास्त करत होती. कमी प्रमाणात बोलत होती. फक्त कामापुरतं बोलायचं; कोणाची उणीदुुणी काढायची नाहीत; काम एके काम..आपला संसार आपली मुले यामध्ये त्यांना दिवस व रात्री कधी गेली हे समजत सुद्धा नव्हते.....
.... प्रत्येक आई-वडिलांची फार मोठी इच्छा असते. माझ्या मुलीने डॉक्टर व्हावे मुलाने शाळा मास्तर व्हावे. पण काही आई-वडिलांची इच्छा अपूर्ण राहते तर काही आई-वडिलांची इच्छा पूर्ण होते. हा ज्याच्या त्याच्या कर्माचा हिशोब आहे असे मला वाटते गरीबीची जाण लक्षात घेऊन ग्रामीण भागामध्ये अनेक भरपूर माणसे मराठी शाळेत शिकून चांगली नोकरी करतात. अशी कितीतरी उदाहरणे माझ्याच काय, सर्वांच्या पुढे होती. हाताची बोटे सारखी नाहीत. कोण जास्त हुशार, कुणाला जास्त बुद्धी तर कुणी एकदम ढ. असे विद्यार्थीसुद्धा माझ्याबरोबर मराठी शाळेत शिकत होते. शाळेतील गुरुजी जीव तोडून शिकवतात; पण त्या शिकवण्याकडे माझे तरी दुर्लक्ष सारखे बाहेर असायचे. कारण शाळेत शिकवलेले माझ्या लक्षात राहत नव्हते; हा माझ्या डोक्याच्या बाबतीत एक वीक पॉईंट होता. दिवसांमागून दिवस जात होते. मी नेहमीप्रमाणे रानातून गावाकडे शाळेत जात असे. कधी उन्हाळा, कधी पाऊस, तर कधी हिवाळा ह्या तीन ऋतूची सवय रानात राहणाऱ्या मुला-मुलींना अंगी लागली होती. अतिशय कठीण समस्येतून रानातून मार्ग आक्रमण करताना आठ महिने बरे वाटायचे. एकदा पाऊस चालू झाला म्हणजे एकदम शाळेला जायचे नको वाटायचे दिवसभर शाळा शिकून राहणार घरी आले म्हणजे. शाळा सुटताना सांगितलेला उतारा वहीमध्ये काढण्यासाठी मी जेवण करून अभ्यासाला बसायचो कंदीलाच्या प्रकाशामध्ये उतारा कसातरी लिहून काढायचा आणि झोपी जाण्याच्या तयारीत मी असायचो. रात्री साडेनऊ वाजता आजी छपराचे दार बंद करायची. रात्र असल्यामुळे रात्रीच्या वेळी छपराभोवती अंधाराचे साम्राज्य असायचे. अंधार पडल्यामुळे झाडावर बसलेल्या पक्षांचे आवाज वेगवेगळे यायचे त्यांच्या पंखाची धडपड पूर्णपणे जाणवायची. रात्रीच्या वेळी दादांच्या कवटीच्या झाडावरून घु घु असा आवाज यायचा हा आवाज ऐकून मी मनात भित असे. शाळेचे दप्तर खुंटीला अडकवून अंगावर गरम वाकळ घेऊन झोपी जात होतो झोप सुंदर लागायची एकदा का झोप लागली की मग झाडावर बसलेली पक्षी कितीबी ओरडू देत हे कळत नव्हते....
.... गावात सुद्धा त्यावेळी लाईट नव्हती रानात लाईट नव्हती. दिवसा सूर्याच्या प्रकाशामध्ये गाव व रान एकदम उजळून दिसायचे. काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या विहिरीवर किर्लोस्कर पाच हाऊस पॉवरचे इंजिन बसवले होते, ते इंजिन डिझेलवर चालत असे. त्या इंजिनला हँडलच्या साह्याने चालू केले जात होते. एकदा का इंडियन चालू झाली म्हणजे त्याचा आवाज आजूबाजूच्या परिसरामध्ये घुमून जात होता. शेतात लोकांना वाटायचे किर्लोस्कर इंजिन चालू झाले आहे. या इंजिनच्या साह्याने विहिरीतील पाणी पंपाच्या साह्याने पाण्याच्या पाटात पडत होते व ते पाणी पाटातून पिकाला जात होते. हे सारे चित्र मी पाहत होतो. घरातील लोकांचे एकच मत होते मी मराठी शाळेवर मास्तर व्हावे मला शाळेसाठी काही कमी पडू देत नव्हते. तीन हाफ पांढरे शर्ट, खाकी रंगाच्या हाप तीन प्यांटा, डोकीला टोपी, शाळेसाठी सुंदर दप्तर. ऐन पावसाळ्याच्या वेळी काही दिवस मी पोत्याची खोळ डोकी वर ठेवून व दप्तर भिजू नये म्हणून पिशवीचे बंद काखेत ठेवून शाळेला जात असे. त्यावेळी पाऊस भरपूर पडायचा नदी नाले ओढे भरून व्हायचे. इतका निसर्ग सुंदर दिसायचा. ओढ्याच्या काठाला मोर लांडोरी आवाज करून नाचायच्या त्यांचा तो फुललेला पिसारा जणू डोळ्यांची पारणे फेडायचा असा हा देखावा कायमस्वरूपी माझ्या डोळ्यांमध्ये बसलेला असायचा....
.... दिवस पुढे पुढे पळत होते; पण घरातील इतरांपेक्षा माझ्या आईला नेहमी वाटायचे माझा मुलगा मराठी शाळेवर मास्तर व्हावा हे सारे मी ऐकत होतो आणि अभ्यासही तसा करत होतो पण शाळेत शिकवलेले माझ्या लक्षात राहत नाही हा माझा गुणदोष आहे हे मला माहित आहे. पण हे घरातील लोकांना मी सांगू शकत नव्हतो. असेच काल रात्री मला स्वप्न पडले घरातील सर्वजण झोपी गेले आहेत. अंधाऱ्या रात्री झाडावर पक्षांचा किलबिला चालू आहे व रातकिड्यांनी झकास सूर धरला आहे. अंधार एकसारखा माजला आहे घरातील मिणमिणता दिवा व मिणमिणता कंदील यांचा अंधुक प्रकाश घरामध्ये पसरला आहे. आईच्या जवळ मी झोपलो आहे. बाजूला धाकटा भाऊ झोपला आहे व त्याला लागून आजी झोपली आहे. स्वप्नात मी शाळा मास्तर झालो आहे. शाळा भरली आहे. मी कसं मुलांना शिकवतो हे पाहण्यासाठी शाळेचे हेडमास्टर उभे राहिले आहेत. वर्गातील सर्व मुलं व मुली मी काय शिकवत आहे हे शांतपणे ऐकत आहेत. मी मास्तर झाल्यामुळे घरातील सर्व लोकांना आनंद झाला आहे. आईची आई म्हणजे नानू आई माझ्या आईला म्हणाली, सुसे... तुझं स्वप्न पूर्ण झालं तुझं गारानं नरसोबांना ऐकलं. तुझ्या तोंडाला यश आलं. तुला आता तुझ्या संसारामध्ये काही कमी पडणार नाही. तुझा पोरगा भरपूर शाळा शिकला. मामाचं व तुझं स्वप्न पूर्ण केलं. तुला आता काही कमी पडणार नाही. हे सारं पाहायला तुझा बाप जिवंत असायला हवा होता. तुझा मुलगा मराठी शाळेमध्ये मास्तर झालेलं ऐकलं असतं तर त्याला फार आनंद झाला असता. मी मास्तर झाल्यामुळे गावात व आमच्या भावकी मध्ये फार आनंद झाला आहे. माझे मन मला म्हणत होते तू शाळा शिकत असताना शाळेत गुरुजींनी शिकवलेले तुझ्या लक्षात राहत नव्हते. तू मास्तर झालास, कसा कोठून वशिला लावला तुझ्या पांडू मामाने कळत नाही. तुझा बाप रेल्वेत काम करतो तो शिकला नाही मग वशीला कुठून लावला? अशी सुद्धा गावात काही माणसे बोलत होती. मी रोज मराठी शाळेत मुले शिकवण्यासाठी जात होतो. असे बरेच दिवस चालले होते मी मास्तर म्हणून रुजू झालेल्या तारखेपासून पाच महिने गावातील मराठी शाळेत शिकवत होतो. पण अचानक माझी गावातून बदली करण्यात आली. मला आमच्या गावापासून काही अंतरावर खंडोबाची वाडी हे गाव आहे त्या गावी बदली झाली. तिथे एक जागा खाली होती मी आईला म्हणालो माझी बदली खंडोबाच्या वाडीला झाली आहे. आता मला रोज सायकलवरून नोकरीसाठी जावे लागणार. आई म्हणाली...खंडोबाची वाडी लांब नाही; अगदी जवळ आहे आणि तुला एखाद्या दिवशी शाळा सुटायला उशीर झाला तर. तुझी आत्ये तिथेच राहते तुझ्या जेवणाची सोय होईल; पण तू रोज खंडोबाच्या वाडीला शाळेला जा. नोकरी मागून मिळत नाही. तू जीव लावून अभ्यास केलास आणि मास्तर झालास, हा आनंद मला फार झाला आहे. स्वप्नात मी पूर्णपणे रंगून गेलो होतो आणि माझे मन म्हणत होते एक महिना पूर्ण झाला पाहता पाहता दोन महिने पूर्ण झाले. तीन महिन्याचा पगार आता एकदम मिळणार असा माझ्या मनाला आनंद झाला. सकाळ झाली होती दादांच्या पिंपळाच्या झाडावर कावळ्याचा आवाज व पंखांचे फडफडणे ऐकू येत होते. पगार पगार म्हणत मी जागा झालो. माझा आवाज ऐकून आई जागी झाली; आई म्हणाली, तुला स्वप्न पडले की काय? होय स्वप्नच पडले. अगं मी स्वप्नात शाळा मास्तर झालो आहे हे ऐकून आईला फार हसू आले... आणि हे स्वप्न मी शाळेत जाताना पुन्हा पुन्हा आठवू लागलो आणि दुसरे मन म्हणू लागले खरंच स्वप्नातील गोष्टी खऱ्या होतात का. असे जर झाली तर मी शाळा मस्तर नक्की होईन; तर काही वेळा आजी म्हणते दिवसभर घोकलेली गोष्ट रात्री स्वप्नात येते मला वाटते तसेच झाले असावे हेच स्वप्न मी पुन्हा पुन्हा आठवत होतो.... - दत्तात्रय पांडुरंग मानुगडे