पुस्तक परिक्षण

कवी राष्ट्रपाल सावंत यांनी लिहिलेले गतस्मृतींची गजबज हे पुस्तक...अलिकडेच मला कुरियरने प्राप्त झाले. लगेचच वाचन सुरु केले आणि जे शब्दांत मला व्यक्त होता आले..ते वाचकांनी पूर्ण वाचून झाल्यावर हे पुस्तक आवर्जून वाचावे.

राष्ट्रपाल सावंत हे पेशाने शिक्षक. जिल्हा परिषद शासकीय शाळेत मुलांना शैक्षणिक मार्गाने घडवण्याचे कठीण काम त्यांनी स्वखुशीने स्वीकारले असावे. कारण त्यांच्या पालकांनीच त्यांना "शिक्षक हो"  असे सांगितले, ज्याची पूर्तता त्यांनी स्वखुशीने केली. राष्ट्रपाल या नावांतच दमदारपणा आहे, एक विशेष वजन आहे. धर्मगुरु भदन्त यांनी सुचविलेले नाव त्यांच्या पालकांनी ओळख म्हणून दिले... पुढे राष्ट्रपाल गुरुजींनी त्यांस सिद्ध केले. ते आपल्या नावाला जागले. गुरुजींनी आपला पेशा प्रामाणिकपणे पार पाडला. माय मराठीत ते व्यक्त होऊ लागले. रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचे नाव आहे.

हे असे लिहिण्याचा उद्देश एवढाच आहे की कवी राष्ट्रपाल हे तसे मराठी साहित्यांत बऱ्या पैकीं रूळलेले एक उमदे गायकही आहेत. स्वतःची अशी त्यांनी आपली ओळख करुन दिली आहे. स्वतःच्या रचना त्यांस चाल लावून प्रत्यक्ष रेकॉर्ड करुन त्याची म्युझिकल आलबम तयार करून ती इव्हेंंटमधून रिलीज केली आहे. घड्याळी मास्तरकी न करता गुरुजींनी विद्यार्थी प्रत्यक्ष घडवलेत! हे वाचतांना मला स्वतःचे बालपण आठवले. झेडपीच्या शाळेत आमची पिढी घडली. गावात उर्दू माध्यमाची शाळा असूनही मराठी माध्यमातून शिक्षण घेतले. श्रीकृष्ण मामा महाजन यांच्या आग्रहास्तव पीएस्सीचे आमचे गुरुवर्य शि. बा. दांडेकर यांचा रात्री ९ ते १० शिकवणीचा तास असायचा. अगदी न चुकता रोज असायचा हा शिकवणीचा तास. शनिवारी अर्धा दिवस तर रविवारी पूर्ण दिवस शाळेला सुट्टी असली तरीही आमचे दांडेकर गुरुजी शिकवणी त्यांच्या घरी व्हरांड्यात रोज घ्यायचे. सातवीचा रिझल्ट शंभर टक्के लागला. आमच्यापेक्षा गुरुजींना आनंद ज्यास्त झाला. आम्हां विद्यार्थ्यांना त्यानी केलेले मार्गदर्शन योग्य ठरले. यांत विशेष सांगण्यासरखे काय? तर गुरुजी शिकवणी विनामूल्य देत असत! पैसा हे माध्यम शिक्षण क्षेत्रात तेव्हां नसायचे! त्यागमूर्ती शिबा गुरुजींनी अशी घडवली आमची पिढी!

तसेच गुण राष्ट्रपाल सावंत यांच्या अंगी आलेले आहेत. ते एक भावनिक व्यक्तिमत्त्व आहे. नाना जोशी आणि दैनिक सागर यांनी त्यांचे लिखाण कायम वाचकांना उपलब्ध करुन दिले आहे. शिवाय त्यांच्या विश्वात मैत्रीवर जास्त विश्वास होता व तो आजही आहे, त्यांच्या लिखाणातुन ते स्पष्ट जाणवते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातील अनेक विषयांचे वाचन केल्यावर कळते व्यक्ती किती निस्सीम आणि निगर्वी आहे, ते!

मी त्यांना साहित्य क्षेत्रात वावरताना पाहिले आहे. धर्म, जात, पंथ, रंग या पायवाटानां छेद देऊन ते पार पुढे एक सशक्त असा भारत समाज घडवत आहेत. भारत हाच खरा धर्म होय. पावसाची सर जशी बरसून जाते त्यांत चिंब भिजणारे कुणीही असोत, सारे समान! असे जगतांना माणूस धर्म विशेष सजग होतो. राष्ट्रपाल एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. सदर पुस्तकातील विविध सदरे त्यातील मनस्वी गर्भितार्थ सांगतात. सुख दुःख, जय पराज्य जीवन जगतांना येणारे अनुभव त्यांनी लीलया पेलले आहेत. त्यांचे हे पुस्तक वाचतांना अशा विविध छटा वाचकांस अनुभवायला मिळतील. गजबज विषयी' या त्यांच्या मनोगतातले एक वाक्य थेट काळजाला जावून भिडले..."तुम्हीं यशस्वी झालात तरी आपल्याला सहकार्य करणाऱ्यांना विसरायचे नाही, आपल्या परिस्थितीचं भान ठेऊन जगा, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यावरुन लेखक, कवी मनाचा किती मोठा आहे, त्यापेक्षा माणूस किती मोठा आहे, हे सिद्ध होते.

हे पुस्तक म्हणजे त्यांचे आत्मकथन होय. मी एकाच वेळी दोन पुस्तके वाचत असतो, एक फिक्शन आणि दुसरे नॉनफिक्शन. मराठी, हिंदी, उर्दू तसेंच इंग्लिश अशा चार भाषामधले माझे आवडते लेखक त्यांची प्रकाशित पुस्तकें तर वाचतोच; शिवाय या क्षेत्रात तरुण पिढी काय लिहिते तेही जाणून घेण्यासाठी म्हणून त्यांची पुस्तकें विकत घेऊन वाचतो. आजच्या पीढीकडे साधने बरीच आहेत. सोशल मिडिया, AI अशा अकल्पित सुविधा उपलब्ध आहेत. आमच्या वेळी ललित, कथा किंवा कविता लिहायची तर लिहितांनाच त्या खाली कार्बन पेपर टाकून एक प्रत आपल्या फायलीत असावी म्हणून जपून ठेवायचो.  आज ‘फाईल'  या शब्दाचा अर्थच बदलून गेला आहे.

राष्ट्रपाल यांनी तसे दोन्ही काळ अनुभवलेत. पुस्तकास लिहिलेली प्रस्तावना अतिशय बोलकी आहे. पुस्तक वाचण्यासाठी म्हणून जो गर्भित संदेश अपेक्षित असतो तो यांतून स्पष्ट होतो. शिकलास की कळेल, येडा गोविंद, गायक आनंद शिंदे यांची भेट अशी एकाहून एक सरस सदरे त्यांनी आत्मियतेने लिहिली आहेत. संगीत या विषयाची ओढ राष्ट्रपाल यांना नकळतपणे म्युझिक आलबमकडे घेऊन जाते. ते एक शिक्षक, विद्यार्थी घडविताना स्वतः कायम विद्यार्थी राहणे तसे कठीण असते, मात्र ते त्यांना जमले आहे, हे विशेष!

यानंतर राष्ट्रपाल कथा, कादंबरी किंवा नाटक असे विविध प्रकारचे साहित्यिक लिखाण करतील अशी अपेक्षा करूया. पुस्तक जास्तीत जास्त वाचकांनी वाचावे, म्हणूनच माझ्या लिखाणात सांकेतिक शब्दांत जसे जमले तसे आणि तेव्हढेच लिहिले आहे. पुस्तक अमेझॉन, बुक गंगा.com या वेबसाईटवर उपलब्ध होतील तर वाचक घर बसल्या ऑर्डर करुन मिळवू शकतील. सोशल मीडियाचा आधुनिक विचार लेखकांनी करावा, ही अपेक्षा. - इकबाल शर्फ मुकादम 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मला पडलेले स्वप्न