महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
नभः स्पृशम दीप्तम : पराक्रमाने लावले आभाळाला हात!
शनिवार, २५ नोव्हेंबर, १९७२...सकाळचे आठ वाजून तेहतीस मिनिटे झालेली आहेत. पुणे-नगर महामार्गावर असलेल्या वाघोली गावात कै.विष्णुजी शेकोजी सातव शाळेतील शेकडो विद्यार्थी वर्गात अभ्यासात दंग आहेत...बहुदा दुसरी तासिका संपत आलेली आहे.
शाळेपासून जवळच असलेल्या लोहगाव येथील भारतीय हवाई दलाच्या अर्थात एअर फोर्स बेस वरून प्रचंड आवाज करीत आणि वायूवेगाने उड्डाणे भरणा-या विमानांची लगतच्या गावांना आणि या शाळेतील विद्यार्थ्यांनाही एव्हाना जणू सवयच झाली होती...१९३९ पासून. ब्रिटीशांनी त्यांच्या रॉयल इंडियन एअर फोर्स बेससाठी हा विस्तीर्ण, उंच टेकड्या नसलेला परिसर निवडला होता.
दुसरी तासिका संपण्याची घंटा घुमली. वर्गावरील शिक्षक दुस-या वर्गांत जाण्यासाठी वर्गांबाहेर पडले. शाळेच्या व्हरांड्यातून बाहेर पडणा-या एका शिक्षकांचे लक्ष सहज आभाळाकडे वेधले गेले....एक विमान शाळेच्याच रोखाने येते आहे...पण या विमानाचा आवाज मात्र ऐकू येत नाहीये...असं होत नाही कधी...म्हणजे आजवर कधीही असं झालं नव्हतं कधी...विमान दूरवरून येत असताना त्याचा आवाज कानी येत नाही लगेच...पण जवळ आलं तर आवाज यायलाच पाहिजे! पण तसं काहीही घडत नव्हतं....काही क्षणांतच ते विमान शाळेच्या अगदी जवळ आलं...काळजीची बाब म्हणजे हे विमान अतिशय कमी उंचीवरच उडत येत होतं...
शाळेची इमारत काही फार उंची असलेली नव्हती त्यावेळी...पण तरीही त्या विमानाची उडण्याची पातळी पाहता...ते विमान शाळेवर कोसळणार अशी खात्रीच होती...त्या विमानाकडे पाहत असणा-या शिक्षकांना काही प्रतिक्रिया देण्याची संधी बहुदा मिळाली नाही...शाळेच्या अगदी वरून विमान क्षणार्धात पलीकडे निघून गेले होते!
पण...काहीच सेकंदांत तेथून काहीच अंतरावर असणा-या विमानाच्या धावपट्टीजवळच्या शेतातून आगीचा, धुराचा भला मोठा लोळ उठलेला दिसला....स्फोटासारखा आवाजही आला पाठोपाठ! भारतीय लष्करी हवाई दलाचं मिग-२१ हे लढाऊ विमान कोसळले होते...त्यातील शेकडो लिटर्स अतिज्वलनशील इंधनाने पेट घेतला होता....सर्वांगाला ज्वालांनी वेढलेल्या अवस्थेत वैमानिक विमानाबाहेर पडले आणि कोसळले...पुन्हा कधीही न उठण्यासाठी! अवघ्या ३९ वर्षांचे आयुष्य क्षणार्धात कर्तव्याच्या चितेवर राख होण्यासाठी निजले होते...भारताने एक महावीर वैमानिक गमावला होता!
विंग कमांडर साहेब त्यादिवशी मिग-२१ मधून त्यांचे आठवे प्रशिक्षण उड्डाण करणार होते. या आधी साहेबांनी कॅनबेरा, स्पीटफायर आणि तत्सम लढाऊ विमाने मोठ्या कौशल्याने हाताळली होती. जोधपूर येथे हार्वर्ड विमानाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी संभाळली होती. पुढे १९५८ मध्ये ते आग्रा येथील जेट बॉम्बर कन्वर्जन युनिट (कॅनबेरा विमाने) मध्ये गेले. १९३३ मध्ये केरळात एका उच्चशिक्षित प्राध्यापक-प्राचार्य-शिक्षिका दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या आणि इंदोर येथे बालपण व्यतीत केलेल्या या साहेबांनी त्यांच्या वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी भारतीय वायुसेनेत अधिकारी म्हणून पाऊल ठेवले होते. १९६१ मध्ये आफ्रिकेतील कांगो मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतीय मिशन मध्ये साहेब फ़्लाईट लेपटनंट म्हणून साहेबांनी जबरदस्त उड्डाणे करून वायू सेना मेडल पटकावले होते. १९६० च्या आसपास साहेबांनी इराक देशातील वैमानिकांना इराक येथे जाऊन मिग-१५,मिग-१७ विमाने उडवण्यात प्रशिक्षित केले होते....हवेत असताना आगीने वेढल्या गेलेल्या एका विमानाचे त्यांनी सुरक्षित landing करून त्यांनी दोन प्रशिक्षणार्थी वैमानिक आणि ते विमानही वाचवण्यात यश मिळवले होते!
स्क्वाड्रन लीडर या जबाबदारीच्या पदावर असताना ६ ते २१ सप्टेंबर,१९६५ या दिवसांत साहेबांनी तब्बल सहा वेळा पाकिस्तानात खोलवर चढाई करून बिनचूक बॉम्बफेक करून पाकचे कंबरडे मोडले होते....पाकिस्तानी सेबरजेट विमाने आणि विमानविरोधी गोळीबाराला त्यांनी प्रत्येक वेळी चकवा दिला.....हे जीवघेणे धाडस होते! या धाडसाचे कौतुक करताना भारताने या शूर, धाडसी, कौशल्यवान वैमानिकाला भारताचे द्वितीय क्रमांकाचे वीरता पारितोषिक ‘महावीर चक्र' प्रदान करून गौरवले. साहेबांनी याच पराक्रमाची पुनरावृत्ती १९७१च्या भारत-पाक युद्धातही करून दाखवली...बॉम्बर स्क्वाड्रनचे कमांडर असताना उत्कृष्ट नेतृत्व करीत साहेबांनी ५ आणि ७ डिसेंबर, १९७१ अशा दोन्ही दिवशी पाकड्यांच्या मियांवाली विमानतळावर बिनचूक हल्ला चढवून शत्रूला पळता भुई थोडी केली होती. याच युद्धात साहेबांनी शत्रूच्या रेल्वे स्टेशन्सवर आणि अन्य महत्त्वपूर्ण ठिकाणांवर यशस्वी रॉकेट आणि इतर शस्त्रांनी हवाई हल्ले चढवून त्यांना नेस्तनाबूत केले..यासाठी अत्यंत उच्च दर्जाचे उड्डाण कौशल्य,नेतृत्वगुण आणि हिंमत असावी लागते....देशाने साहेबांना या कामगिरीसाठी पुन्हा एकदा ‘महावीर चक्र' दिले! याला लष्करी भाषेत Mahavir Chakra & Bar असे संबोधले जाते. दोनदा महावीर चक्र प्राप्त करणा-या मोजक्या व्यक्तींच्या पंक्तीत साहेब मोठ्या सन्मानाने बसले! असा पराक्रम करणारे हे वैमानिक भारतीय वायुदलातील विंग कमांडर जग मोहन नाथ यांच्या नंतरचे केवळ दुसरेच अधिकारी आहेत.
१९७२ च्या आरंभी साहेबांना पुण्याच्या लष्करी हवाई तळावर ऑफिसर इन्चार्ज पलाइंग या महत्त्वाच्या पदावर ग्रुप कॅप्टन पदोन्नतीवर नेमण्यात आले..त्यांच्या अनुभवाचा फायदा येथे असणा-या अनेक युवा वैमानिकांना होऊ लागला होता. अत्यंत मितभाषी असणारे साहेब एकदा का विमानाच्या कॉकपिटमध्ये बसले की संपूर्णपणे बदलून जात! लढाऊ विमाने उडवण्यावर त्यांचे प्रभुत्व होते. विविध प्रकारची लढाऊ विमाने उडवण्याची एकही संधी ते दवडत नसत. मार्च १९७१ म्हणजे प्रत्यक्ष युद्ध सुरु होण्यापूर्वी साहेबांनी पायलट-नेवीगेटर यांच्या जोड्या तयार करून घेतल्या होत्या...सराव व्हावा म्हणून. सराव करण्यासाठी त्यांनी बिहार, उत्तरप्रदेश, बंगाल येथे बंद केल्या गेलेल्या हवाईतळांचा लक्ष्य वेधण्याच्या सरावासाठी उपयोग करून घेऊन आपल्या अनुभवाची, बुद्धिमत्तेची, नेतृत्वगुणांची अनोखी चमक दाखवून दिली होती..त्यामुळे पाकिस्तानवरील प्रत्यक्ष हल्ल्यांत याचा खूप फायदा झाला! मिट्ट काळोखात केवळ ५०० फूट उंचीवर उडत जाऊन लक्ष्य जवळ येताच तब्बल ७ हजार फुटावर पोहोचून बॉम्ब टाकून पुन्हा तीनशे ते पाचशे फुटापर्यंत खाली झेप घेऊन परतीला लागण्याचा सराव उपयोगी न पडता तरच नवल. म्हणून साहेबांना हवाई दलाच्या प्रत्येक मोहिमेच्या तयारीसाठी खास बोलावून घेतले जाई! कित्येक वर्षांची तपश्चर्या होती या मागे.
नम्र... पण नर्मविनोदी स्वभाव, संगीताची आणि मर्सिडीजसारख्या कार्स चालवण्याची आवड जोपासणारे हे वैमानिक सहकारी वैमानिकांना धैर्य, शौर्य आणि भीती याबाबत सातत्याने मार्गदर्शन करीत. सव्रााधिक धोका असलेली उड्डाणे करायची असल्यास या साहेबांचे नाव आघाडीवर असायचेच. साहेबांचे दोन्ही बंधू हवाई दलातच कार्यरत होते. २५ नोव्हेंबर, १९७२...आज साहेबांनी मिग-२१ या विमानाची तपासणी करताना नेहमीपेक्षा जरा जास्तच वेळ घेतला. कारण हे विमान त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत म्हणजे पुणे विमानतळावर नेमणूक होण्यापूर्वी उडवलेले नव्हते. कोणतेही नवे विमान लवकरात लवकर पूर्ण शिकून घेण्याचा, त्याचा अनुभव घेण्याचा साहेबांचा परिपाठ होता....या आधी साहेबांनी या विमानातून सात training sorties (उड्डाणे) यशस्वीरीत्या केली होती...हे त्यांचे आठवे प्रशिक्षण उड्डाण असणार होते.
त्यांनी नेहमीच्या रुबाबदार पद्धतीने मिग-२१च्या कॉकपिटमध्ये प्रवेश केला...सहका-याचा सॅल्यूट स्वीकारत त्यालाही खास हवाई दल पद्धतीत सल्यूट केला...सर्व यंत्रणा काय्रान्वित करीत विमान धावपट्टीवर वेगाने पळवायला आरंभ केला...अत्यंत सफाईदाररीत्या मिग-२१ भला मोठा आवाज करीत हवेत झेपावले! पण हे मिग-२१ अपेक्षित उंची गाठण्याच्या प्रयत्नात असतानाच दुर्दैवाने या विमानाचे एकमेव इंजिन बंद पडले...! विमान वेगाने जमिनीकडे झेपावू लागले...त्यातल्या शेकडो लिटर्स इंधनासह...ज्वालाग्राही इंधन!
त्याचवेळी तिथल्या हवाईपट्टीवरून पुण्यातल्या एका डॉक्टर साहेबांचे खाजगी विमान आकाशात झेपावले होते..त्यांचा आणि एअर ट्राफिक कंट्रोलचा संवाद नेहमीपेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ एक मिनिटभर लांबला...तो संपल्यावर साहेबांनी संदेश उच्चारला..."वन फोर...इंजिन फेल्ड! इंजन बंद पडले आहे!”
एकच इंजिन असते मिग-२१ मध्ये!
Ejecting ? इजेक्ट करताय ना? छत्रीच्या साहाय्याने विमानाबाहेर उडी घेताय ना? विमानतळावरील सहका-यांनी त्यांच्याशी संपर्क स्थापित करून विचारले..."नाही! मी Belly Landing करतो आहे...म्हणजे विमान विमानाच्या पोटावर उतरवणार आहे....धावपट्टीजवळच्या शेतात!” बाप रे! हे तर भलतेच धोक्याचे होते..या आधी मिग २१ असे उतरवलेले उदाहरण कुणाच्या ऐकिवात नव्हते..पण साहेब अनुभवी होते...ते हे करून दाखवतीलच अशी खात्रीच शिवाय मिग २१ मधून उडी घेण्यासाठी पायलटच्या खुर्चीला वर उडवणारी जी यंत्रणा असते ती कार्यान्वीत होण्यासाठी त्या विमानाने किमान तीनशे मीटर्सची उंचीवर असणे आवश्यक होते असे म्हणतात...ते विमान तर खाली कोसळत होते...शिवाय शाळेच्या इमारतीवर विमान कोसळू नये अशीही काळजी वैमानिकाने घेतली होती..त्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा वेळ म्हणजे काही क्षण खर्च झाले होते...धोका वाढला होता!
काहीच क्षणांत साहेब ते विमान घेऊन धावपट्टीच्या दूरवरच्या टोकावर आलेले दिसले...धावपट्टीच्या मागे असलेल्या, हिरवीगार पीक आलेल्या शेतात साहेबांनी विमान उतरवले....विमान वेग कमी कमी होत पुढे जाताना दिसत होते....पण...त्या शेतात असलेल्या एका खडकावर विमान आदळले....विमानातल्या शेकडो लिटर्स अतिज्वालाग्राही इंधनाने पेट घेतला...ते विमान आता जणू एक चिता झाले होते...विमानतळावर आता एक विचित्र शांतता पसरली होती..ग्रुप कॅप्टन श्री.पद्मनाभ गौतम साहेब या चितेवर पहुडले....आणि काहीच क्षणांत त्यांनी भारतमातेच्या सेवेला पूर्णाविराम दिला!
‘महावीर' पद्मनाभ गौतम साहेबांनी त्या दिवशी त्या क्षणी समयसूचकता दाखवली...स्वतःचे प्राण धोक्यात घालून, विमानातून उडी मारण्याचे टाळून शेकडो विद्यार्थ्यांचा,नागरीकांचा जीव वाचवला...आणि प्राणार्पण केले!
दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी सातव हायस्कूलमध्ये हुतात्मा विंग कमांडर पद्मनाभ गौतम साहेब यांना मौन श्रद्धांजली वाहिली जाते. मागील काही वर्षांपूर्वी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी साहेबांच्या कुटुंबीयांची या शाळेस शाळेस भेटही घडवून आणल्याचे समजते. कारकीर्दीत सहका-यांमध्ये गौतम साहेबांची ‘पीट' (अर्थात पीटर) आणि काहीवेळा ‘बॉब' ही टोपणनावे प्रसिद्ध होती. साहेबांच्या पत्नी बंगळूरू येथे राहावयास गेल्या. लग्नाच्या वेळी केवळ १८ वर्षांच्या असलेल्या श्रीमती बाला यांनी साहेबांचे देहावसान झाल्यानंतर जिद्दीने बी.ए. आणि एम.ए. (इंग्लिश. प्रथम क्रमांक) पदव्या मिळवल्या. पुढे त्यांना Hindustan Aeronautics Limited च्या staff college Assistant Personnel Officer म्हणून नेमले गेले. नंतर त्यांना faculty म्हणून जबाबादारी दिली गेली. त्यांच्या दोन्ही कन्या आणि एक मुलगा इतर क्षेत्रात कार्यमग्न असतात. साहेबांच्या दोन्ही बंधूंनी विंग कमांडर पी.अशोका आणि विंग कमांडर अजिथ हे सुद्धा भारतीय वायुदलातील उत्तम Test Pilot म्हणून नावारूपास आले!
(विंग कमांडर कृष्णास्वामी पार्थसारथी साहेब यांनी इंग्रजीत लिहिलेला लेख, honour point fsHespe, bharat rakshak डॉट कॉम, विकीपिडीया, The Tribune, Deccan Herald, Samvadd world इत्यादी तसेच वर्तमानपत्रातील कात्रणे, फोटो (की. एस. नायर यांचे सौजन्य), बातम्या, सातव शाळेचे मुख्याध्यापक श्री.निंबाळकर सर, अजिनाथ ओगले सर इत्यादी माध्यमांतून या लेखासाठी माहिती एकत्रित केली आहे. या सर्वांचा मी आभारी आहे. सर्वसामान्य लोकांसाठी लिहिलेला हा लेख व्यावसायिक दृष्टीने लिहिलेला नाही. कुणीही copy, forward करू शकेल. No Copy Rights. मूळ लेखकांची परवानगी घेता आलेली नाही. दिलगीर आहे. जाणकारांनी चुका, त्रुटी दाखवून द्याव्यात..त्वरित दुरुस्ती करेन. सामान्य वाचकांच्या माहितीसाठी सादर.) - संभाजी बबन गायके