महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
डी. एड होण्याची संधी हुकते तेंव्हा!
मला पाहताच आमच्या वर्ग शिक्षकांनी मार्कशीट व शाळा सोडल्याचा दाखला माझ्याकडे देत असतांनाच आमचे आवडते शिस्तबद्ध मुख्याध्यापक मोठ्याने व फार खेदाने बोलले की, अरेरे!! तुपारे तुझा डी. एड्चा चान्स गेला. याचा अर्थ मला मिळालेले मार्क डी. एड्ला प्रवेश मिळेल एवढे नव्हते. त्या क्षणाला मला काय बोलावे हे कळले नाही. पण घरी परत जातांना सरांचे ते शब्द कानावर सारखे गुंजत होते. कारण मी सरांच्या दृष्टीने कुठेतरी कमी पडलो होतो. याची मला त्याच दिवसी जाणीव झाली होती. योग्य मार्गदर्शनाचा अभाव हे एक याचे प्रमुख कारण होते.
भर उन्हाळ्यात त्या आठवड्यात सलग दिवसा किंवा रात्री पाऊस पडतो होता. त्यामुळे बाहेर जाणे तसे मुश्कीलच होते. बारावीचा निकाल लागल्यामुळे दररोज प्रवेश देणे, कागदपत्रे तपासणीसाठी म्हणून महाविद्यालयात जाणे हे माझे दररोजचे सुट्टीतील काम चालू होते. आज थोडा-थोडा पाऊस पडत होता. विद्यार्थी फार काही प्रवेशासाठी येत नव्हते. सी. ई. टी.चा निकाल लागला नसल्यामुळे कमी मार्क असलेले विद्यार्थीही बी. एस्सी.ला प्रवेश घेण्यास उत्सुक नसल्याचे प्रथमच जाणवले. पालकांचा आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण देण्याकडे कल वाढला आहे. याचे हे परिणाम दिसायला लागले आहेत. शांत बसून राहाण्यापलीकडे काहीही काम नव्हते. अशा या शांत वातावरणात मला माझा भूतकाळ आठवला. माझे शालेय शिक्षण गावातील जिल्हा परिषद व नंतर निवासी आश्रम शाळा येथे झाले होते. सातवी इयत्तेनंतर गावापासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या तालखेड माध्यमिक विद्यालयात झाले.
हे सर्व आठवले व स्वतःवरच हसायला आले. कारण या पस्तीस वर्षात खूप बदल झाला होता. या शांततेत मला तत्कालीन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक स्वर्गीय व्ही. बी. यादवसरांचे माझ्या मनावर कायम स्वरुपी कोरले गेलेले ते शब्द आठवले. आठवी व नववी पर्यंतअ व ब तुकडीमध्ये शिकलेले आम्ही विद्यार्थी दहावीला मात्र एकत्र एकाच वर्गात शिकलो. अ तुकडीची मुले व मुली हे बहुतेक स्थानिक आणि आम्हाला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांचे ते परिचयांचे. त्यातील फारच थोडे बाहेर गावाहून आलेले होते. पण ब तुकडीतील माझ्यासहीत बहुतेक बाहेरगावचे व जरा अभ्यासात लक्ष नसलेली आजच्या भाषेत त्याला टपोरी मुले म्हणता येईल. तेव्हा तालखेड पंचक्रोशीत हे एकमेव हायस्कूल होते. जवळा, खेर्डा, डुब्बा, इरला, मारफळा, पुंगणी, एकदरा, तेलगाव, राजेगाव, वारोळा, श्रिंगारवाडी, मारफाळा, लोणावळा ई. व सदर गावांच्या हद्दीत असलेले तांडे ई. गावातील विद्यार्थी याच हायस्कूलमध्ये शिकायला असायाचे. छान महाविद्यालयात जसे वातावरण असते, अगदी तसेच येथील वातावरण होते. जून १९८९ ला आमच्या दहावीच्या बँचचा निकाल लागला. तेव्हा संपूर्ण पास असलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल माजलगाव टाईम्स या तत्कालीन दैनिकात छापून आला होता. शाळेत जाऊन हा निकाल पाहण्यापेक्षा मी आणि माझे गावातील वर्ग मित्र मिळून माजलगाव टाईम्स या दैनिकात निकाल पाहिल्याचे आजही आठवते. आपला परिक्षा क्रमांक पास विद्यार्थ्यांच्या यादीत आलेला पाहून तेव्हा मला व माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला होता. आमच्या गावातून तालखेडच्या हायस्कूलला बारा विद्यार्थी होते. त्यातील फक्त आम्ही तीनंच पास झालो होतो. ते मी, महादेव व अनुरथ अगदी जवळचे व नात्यातील. बाकी सर्व एक किंवा दोन विषयात नापास झाले होते. त्यात माझे मार्क एवढेही चांगले नव्हते; पण त्या दोघांपेक्षा थोडेजास्त होते. म्हणून माझ्या घरातील वातावरण फारच आंनददायी होते. कारण मी आमच्या तुपारे परिवारातील पहिल्याच प्रयत्नात दहावी पास झालेला एकमेव होतो.
या आनंदात दोनतीन दिवस निघून गेले. मी दोन तीन दिवसानंतर शाळेत पुढील शिक्षणासाठी शाळा सोडल्याचा दाखला व मार्कशीट घेण्यासाठी शाळेत गेलो. तालखेड आमच्या गावापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. या तीन वर्षात कधी पायी तर कधी सायकलवरून प्रवास केला होता. हे अंतर पायी चालत जायला काहीच वाटायचे नाही. माझ्या मनाला पुढील ११वी प्रवेशाचे वेध लागले होते. पुढे काय करावे, कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा ह्याचा गोंधळडोक्यात चालू होता. डी एड, आय. टी. आय. चे फार्म भरावे हाही विचार डोक्यात होताच. कारण घरच्या गरीब परिस्थितीत मी जास्त स्वप्न पाहू शकत नव्हतो. तरीही गणित चांगले असल्यामुळे आपण वाणिज्य शाखेला प्रवेश घेऊन पुढे बँकेत नोकरी करावी हा विचार मनात येत होता. मी माझ्या मित्रांसोबत चर्चा करतांना कधी कधी बोलायचो की कॉमर्स शाखेत प्रवेश घेवून मी बँकेत कँशिअर होणार आहे. पण तेव्हा त्यासाठी आवश्यक शिक्षण काय असते हेही माहीत नव्हते. हे असे चांगले विचार मनात चालू असतांनाच, दुसऱ्या बाजूला वडिलांनी ऊसतोडीला जाण्यासाठी मुकादमाकडून घेतलेले पैसे डोळ्यासमोर दिसत होते. आपण शिकण्यापेक्षा त्यांचा आधार व्हायला पाहिजे हाही विचार डोक्यात येत होताच. या कारणाने मी पुढे शिकतो की नाही, असेही तेव्हा वाटत होते. पण अण्णा व बाईंनी (आई वडिलांनी) त्याही परिस्थितीत मला शिक्षणाची संधी दिली हे माझ्यासाठी आयुष्यात काहीतरी करण्याची उपलब्धी चालून आली होती. या अशा विचारात कधी तालखेड आले हे मला कळलेच नाही. निकाल लागून दोन-तिन दिवस झाले होते. शाळेत फारच कमी विद्यार्थी दिसत होते. बहुतेक विद्यार्थी शाळेत येऊन आपले कागदपत्रे घेऊन गेली असावी. तेव्हा आत्ताच्या सारखे निकाल जाहिर झाल्यानंतर मार्कशीट उशिराने येत नव्हते, तर निकालाच्या एक दिवस आधी ते शाळेत दाखल होत असत. मी फारच आनंदी असल्यामुळे सर्वात पुढे होतो. तेव्हा शाळेत आँफीस, मुख्याध्यापक आणि स्टाफरूम असे वेगवेगळे काहीच नव्हते त्यामुळे लिपिक, शिक्षक व मुख्याध्यापक सोबतच बसलेले असायचे. मला पाहताच आमच्या वर्ग शिक्षकांनी मार्कशीट व शाळा सोडल्याचा दाखला माझ्याकडे देत असतांनाच आमचे आवडते शिस्तबद्ध मुख्याध्यापक मोठ्याने व फार खेदाने बोलले की, अरेरे!! तुपारे तुझा डी. एड्चा चान्स गेला. याचा अर्थ मला मिळालेले मार्क डी. एड् ला प्रवेश मिळेल एवढे नव्हते. त्या क्षणाला मला काय बोलावे हे कळले नाही. पण घरी परत जातांना सरांचे ते शब्द कानावर सारखे गुंजत होते. कारण मी सरांच्या दृष्टीने कुठेतरी कमी पडलो होतो. याची मला त्याच दिवसी जाणीव झाली होती. योग्य मार्गदर्शनाचा अभाव हे एक याचे प्रमुख कारण होते. आमच्या गावात तसे तेव्हा फार शैक्षणिक वातावरण नव्हते. मात्र मागील वीस-पंचवीस वर्षात सकारात्मक बदल झालेला दिसत आहे. तेव्हा जे दोन-चार शिकले होते ते माझ्या पेक्षा वयाने मोठे होते. श्री. डॉ. रामा पवार, श्री.डॉ. बाजीराव अभियंता श्री. नामदेव पवार व प्रा. श्री. सुखदेव पवार (बी.टेक.) ही आमच्या गावच्या तांड्यातील मंडळी व गावातील मा. श्री. रत्नाकर वाघमारे सर (पहिले डी. एड् शिक्षक), प्रा. श्री.बळीराम तौर सर व मुख्याध्यापक श्री.पद्माकर तौर सर इ. सोडले तर गावातून आणखी कोणी कुठे चमकलेले नव्हते.
या सर्वानंतर बऱ्याच दहावीच्या बँच गेल्यानंतर मी व अन्य दोन पास झालो होतो. आमच्या घरी या अगोदर कोणीही शिकलेले नव्हते. पुढे शिकायचे शिक्षण घेऊन मोठे व्हायचे असा कोणताही हेतू न ठेवता आम्ही दहावी पर्यंत शिकलो होतो, हे मात्र मान्य करावे लागेल. आठवीला असतांना मी ब तुकडीत वर्गातून पहिला आलो होतो. नववीला मात्र कोण पहिले आले होते ते कळले नव्हते. मी बऱ्यापैकी होतो हे निश्चित. श्री किशन पवार, श्री.भारत मुळे, श्री. मते, श्री. मोरे व श्री. भास्कर तुपसमुद्रे असे काही मोजके विद्यार्थी सोडले तर बाकींबद्दल काही न सांगितलेले बरे. दहावीला रॉकेलच्या दिव्यासमोर बसून मी अभ्यास केला, पण तो पुर्णपणे केला नाही. कारण एवढेच किंवा तेवढेच मार्क व टक्केवारी हा प्रकार तेव्हा जास्त प्रमाणात प्रचलित नव्हता. परीक्षेत पास झाले पाहिजे एवढाच उद्देश होता. या मार्कबद्दल कधी कोणी सांगितले नाही किंवा आपण स्वतः कधी तसे ठरवले नव्हते. त्या दिवशी मला फारच उदास वाटले. पण वेळ निघून गेली होती. पण मी काहीतरी करू शकतो हा गुण सरांनी प्रथमदर्शनी माझ्या लक्षात आणून दिला होता. त्या शब्दांनी मला मोठे बळ दिले. माझ्याकडे या तीन वर्षात कोणीतरी लक्ष देत होते हेही माझ्या लक्षात आले. धन्यवाद सर. आज मला तुमच्यामुळे आयुष्यात काहीतरी करता आले. पुढे शिक्षणासाठी बीडला गेलो. बारावी विज्ञान शाखेतून पास झालो व पुढे बी. एस्सी., एम. एस्सी., बी. एड्, व एम. एड् केले. यामुळे मला नोकरीही लागली.
योगायोगाने मी जेव्हा नागोठाणे येथे नोकरीला लागलो तेव्हा श्री. यादव सरांचा मुलगा अभियंता श्री.विश्वेबंरचे पहिले पोस्टींग नागोठाणे जवळील एम. एस. सी.बी., थर्मल स्टेशन, कानसाई येथिल उपकेंद्रात कनिष्ठ अभियंता म्हणून झाले होते. या निमित्ताने सर नागोठणेला आले तेव्हा माझ्या घरीे आले होते व मी तुमच्या त्या एका शब्दामुळे इथपर्यंत येऊ शकलो हे आनंदाने त्यांना मला सांगता आले. तेव्हा तेही आनंदाने बोलले की, श्रीकृष्णा, तु खुप शिकलास व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नोकरीला लागला ही फार आनंदाची बाब आहे. त्यानंतर सहा सात महिन्यात श्री. विश्वेबंरांची औरंगाबाद जिल्ह्यात बदली झाली. पण भूतकाळात मला मिळालेले मार्गदर्शक गुरू किती महत्वाचे आणि त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान आजही किती भक्कम आहे याची जाणीव मला झाली व ही कायम राहील. आपल्याला कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असे बरेच काही शिकवून जाते हे मी माझ्या आयुष्यात शिकलो व ही जाणिव ठेवून मी पण दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत राहतो. - डॉ. श्रीकृष्ण दि. तुपारे