माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो!

महाराष्ट्रातील एका खेडेगावातील एक मुलगा लहानपणीच आईवडिलांपासून दूर जातो, घरातील सर्व कामें करीत, काही वर्षे, काही मैल पायी शाळेत जात राहतो, कृषी विषयातील उच्च शिक्षण घेतो, ४५ वर्षांपूर्वी अमेरिकेत जातो आणि स्वतःला घडवत असताना आपली मूळं न विसरता उलट ती तिथे रुजविण्यासाठी जिवापाड प्रयत्न करीत राहतो, ही खरोखरच आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. ही असंभव वाटणारी सत्यकथा आहे, अमेरिकेतील शिकागो येथील माधवराव गोगावले यांची.

माधवराव यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर (तेव्हाचे खेड) तालुक्यातील कोरेगाव बुद्रुक हे होय. त्यांचे आजोबा शंकरराव गणपतराव गोगावले हे शेतीला जोडधंदा म्हणून दुकान चालवित असत. वडील नामदेवराव यांनी तीच परंपरा पुढे चालवली. एकदा शाळेची वार्षिक तपासणी करण्यासाठी आलेल्या शिक्षण निरीक्षकांकडून माधवरावांच्या आजोबांना ते अतिशय हुशार विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले. गावात चौथीपर्यंतच शाळा होती म्हणून माधवरावांच्या आजोबांनी धोरणी निर्णय घेऊन त्यांना तालुक्याच्या ठिकाणी राजगुरूनगरच्या शाळेत दुसरी इयत्तेत असतानाच घातले. हाच जणू माधवरावांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरला. त्यांचे आजोबा रामभाऊ कोंडाजी टाकळकर आणि आजी सीताबाई यांच्या घरीच त्यांच्या राहण्या-जेवण्याची, त्यांच्याकडे लक्ष देण्याची प्रेमळ सोय होती.

राजगुरूनगर येथे माधवरावांचे सहावीपर्यंत शिक्षण छान झाले. पण आजी-आजोबांनी वय झाल्यामुळे त्यांच्या मूळ टाकळकर वाडीत रहायला जायचे ठरवले. साहजिकच माधवरावांनीही त्यांच्याबरोबर टाकळकर वाडीत रहायला जावे लागले. पण त्यामुळे त्यांना  टाकळकर वाडी ते राजगुरूनगर हे तीन मैलांचे अंतर पुढे अकरावी होईपर्यंत रोज पायी तुडवावे लागले. सोबतच वृद्ध आजी आजोबांची काळजी घेणे, दूधदुभत्या जनावरांच्या आणि घरात पडेल त्या कामात मदत करणे अशी सर्व कामेही ते करीत राहिले. कारण  शिकण्याची दुर्दम्य इच्छा. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत तर आठवी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण तेथीलच महात्मा गांधी विद्यालयात झाले. तेही सर्व मराठी माध्यमातून. घरची कामे, शाळा, अभ्यास याशिवाय माधवराव इतर उपक्रमात सातत्याने सहभागी होत राहिले. तेव्हापासूनच वर्तमानपत्रात व नियतकालिकांत त्यांचे लेख, कविता प्रकाशित होऊ लागल्या. खेळांची आवड असल्याने त्यांच्या शाळेच्या कबड्डी आणि खो-खो खेळांचे ते संघनायक होते. महाराष्ट्र शासनाच्या ”दिवसा पिकवा मळा, रात्रीची शिका शाळा” या साक्षरता उपक्रमात त्यांच्या गुरुजींबरोबर ते ६ व्या वर्गात असल्यापासून पुढे ३ वर्षे प्रौढांना साक्षर करण्याचं काम आनंदाने करीत राहिले.
माधवरावांनी तत्कालिन अकरावी मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर  पुढील शिक्षणासाठी पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेत उच्च श्रेणीत पदवी मिळवली. इथे शिकत असतानाही ते अभ्यासाबरोबरच विविध खेळात भाग घेत राहिले. तसेच एनसीसीत होते. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून दरवर्षी एक महिना परराज्यात प्रशिक्षण घेण्याच्या उपक्रमामुळे भारतातील त्याकाळच्या बहुतेक राज्यांत त्यांचा प्रवास आणि त्या त्या राज्यांचा अभ्यास झाला. कृषी पदवीच्या शेवटच्या वर्षात असतानाच भारत सरकारच्या भारतीय कृषी अनुसंधान केंद्रातर्फे घेण्यात येणाऱ्या अत्यंत कठीण प्रवेश परीक्षेत पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये माधवराव आल्यामुळे त्यांना आयसीएआर फेलोशिप मिळाल्यानेे त्यांना नैनिताल येथील प्रसिद्ध गोविंद वल्लभ पंत राष्ट्रीय कृषी आणि तांत्रिक विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेता आले व गावातील पहिला मॅट्रिक पास, पहिला पदवीधर व पहिला पदव्युत्तर पदवीधर असे बहुमान त्यांना मिळाले.

 एमएससी झाल्यानंतर माधवरावांनी काही काळ कृषी क्षेत्रात काम केले. या कामानिमित्त त्यांना महाराष्ट्रभर फिरावे लागले. त्यातून त्यांना महाराष्ट्र समजत गेला. सर्व काही व्यवस्थित चालू असताना माधवरावांनी भारत सोडून थेट अमेरिकेची वाट धरुन तिथे सुरुवातीला कृषी क्षेत्रात एका हायब्रीड सीड कंपनीत चार वर्षे नोकरी केली. पण तेथे फार वाव दिसत नसल्याने त्यांनी नोकरी करीत संगणक शास्त्रातील पदवी मिळविली. त्यामुळे त्यांना आरोग्य क्षेत्रात प्रोग्रामर, सिस्टिम ॲनालिस्ट, ॲप्लिकेशन ॲनालिस्ट, नेटवर्क ॲडमिन, सुरक्षा अनुपालन अधिकारी अशा चढत्या श्रेणीने काम करण्याची संधी मिळत गेली. अमेरिकेत अनेक क्षेत्रातील तज्ञ व प्रसिद्ध व्यक्तींशी मैत्री केली. भारतीय परंपरा, संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी असे काही उपक्रम असतील त्यात ते स्वखुशीने भाग घेऊ लागले. शिकागो येथील चिन्मय मिशनमध्ये मुलांना माधवरावांनी सपत्नीक २५ वर्षे रामायण, महाभारत, संत चरित्रे, गीता, वेद, उपनिषदे आणि भारतीय परंपरा यावर स्वामी चिन्मयानंद यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित अभ्यासक्रम शिकविला. या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी दरवर्षी भारतीय सणांच्या वेळी होणाऱ्या कार्यक्रमात सादर करण्यासाठी भारतीय संत, रामायण, महाभारतातील प्रसंग, परंपरा, सणांची माहिती यावर वेगवेगळ्या १५ ते ४५ मिनिटांच्या नाटिका लिहुन त्यांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले. शिकागोतील वार्षिक शिबिरात ऐनवेळी दिलेल्या विषयांवर बोलण्याच्या स्पर्धांचे त्यांनी २५ वर्षे आयोजन केले आहे. काही वर्षे निबंध स्पर्धांचे आयोजक व शिबिराचे मार्गदर्शक म्हणूनही काम केले. शिकागो महाराष्ट्र मंडळाच्या मराठी शाळेत मुलांना स्वयंसेवक म्हणून तीन वर्षे शिकविले आहे. लिंकन व्हिलेजच्या कार्यकारणीचे सदस्य म्हणून त्यांनी मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगणे बांधण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. संगम-इंडो अमेरिकन कल्चरल संस्थेचे अध्यक्ष आणि संगम फाउंडेशन ट्रस्टी म्हणून काही वर्षे काम केले.

संगम संस्थेचे ते अध्यक्ष असताना भारतातून फोर्ट वेन या शहरात येणाऱ्या दोन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्कॉलरशिप सुरू केल्या. १९९१ साली फोर्ट वेन या शहरात माधवरावांनी दिवाळी अधिवेशनाचे सूत्रसंचालन केले. त्या कार्यक्रमावर आधारित सुमारे दोन तासांची डॉक्युमेंटरी त्यांनी निर्माण केली. यासाठी अनेक तास सौ ज्योती वहिनी व त्यांनी संकलनामध्ये घालवले. फोर्ट वेन शहरातील टी व्ही चॅनलवर अनेकवेळा ती दाखविली गेली. त्याचबरोबर अमेरिकेतील अनेक शहरातील पब्लिक टी व्ही वाहिन्यांवर ती डॉक्युमेंटरी प्रदर्शित केली गेली. महाराष्ट्रातील किल्लारी भागात ३० सप्टेंबर १९९३ या दिवशी झालेल्या भूकंपातील आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी आणि त्यांच्या परिवाराने एकहाती फोर्ट वेन, इंडियाना राज्यात मदत गोळा करण्यासाठी प्रयत्न करून त्यावेळच्या सुमारे एक लाख डॉलर्सची औषधे, कपडे, आणि इतर काही वस्तू आणि पैसे पाठविले. कोविड काळामध्ये ”महाराष्ट्र मंडळ, शिकागो”च्या अध्यक्षा उल्का नगरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणीने अनेक उपक्रम सुरू केले. भारतीय संस्कृतीची व मराठी धर्माची जोपासना करण्यासाठी सुरू केलेले ते उपक्रम आजही जोमाने चालू आहेत. महाराष्ट्र मंडळाच्या अध्यात्मपीठ, साहित्यकट्टा, इतिहास मंच, ज्येष्ठ नागरिक यांसारख्या वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन व अनेक कार्यक्रमांचे सुत्र संचालन माधवरावांनी केले आहे. अमेरिकेत मराठी भाषेची जोपासना करून वाचन-लेखनाद्वारे ती वृद्धिंंगत करणे, सभासदांच्या मनात मराठी साहित्याविषयी गोडी निर्माण करणे, नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या साहित्याच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ देणे, उत्तम कार्यक्रम आयोजित करून श्रोत्यांचे मनोरंजन करण्यासाठी हातभार लावत आहेत. भारतातील अनेक साहित्यिक व कलाकारांना आमंत्रित करून झूम सत्रातील त्यांच्या कार्यक्रमांचा अनेक सभासद लाभ घेत आहेत. सात वर्षे त्यांनी ISACA शिकागो चॅप्टरचे बोर्ड ऑफ डिरेक्टर म्हणून सेवा कार्य केले आहे. महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या कार्यकारणीवर आधी सदस्य व आता विश्वस्त म्हणून ते कार्यरत आहेत. माधवराव यांच्या आईची इच्छा होती की त्यांनी शिक्षक किंवा प्राध्यापक व्हावे. ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी अतिरिक्त प्राध्यापक म्हणून शिकागो शहरातील एका विद्यापीठात अनेक वर्षे तांत्रिक विषय शिकविले.

आतापर्यंत माधवरावांनी आमंत्रित कवी म्हणून ४ कवी संमेलनात कविता सादर केल्या आहेत. तर २ विश्व मराठी संमेलनात तसेच २०२३ साली वाराणसी येथे झालेल्या विश्व सनातन धर्म संमेलनात निमंत्रित वक्ता म्हणून विचार मांडले आहेत. दोन वर्षांपूर्वी भारतातील एका कार्यक्रमात त्यांनी इंग्रजीतील एकही शब्द न वापरता एक मिनिट शुद्ध मराठीत बोलण्याचे आव्हान एकही इंग्रजी शब्द न वापरता पेलून दाखविले. माधवराव काही वर्तमानपत्रे, नियतकालिके यामधून सातत्याने वृत्तांत, लेख, कविता लिहीत असतात. पुण्यातील एका मासिकात त्यांनी पशुसंवर्धन या विषयावर  लेखमाला लिहिली आहे. त्यांचे काही शोधनिबंध व संशोधनपर लेखही प्रकाशित झाले आहेत. "इलिनॉयः भारतीयांसाठी सोनियाचा दिन” या इलिनॉय राज्यात दिवाळीची सार्वत्रिक सुट्टी देण्याबाबतच्या तेथील सरकारने घेतलेल्या निर्णयावर माधवरावांनी लिहिलेला सविस्तर वृत्तांत न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवर प्रसिद्ध झाला आहे. या वृत्तांताचे  हिंदी, इंग्रजी, गुजराती, कानडी, तामिळ, तेलगू, आणि मल्याळम भाषेतही अनुवाद प्रसिद्ध झाले. आपण मूळचे शेतकरी आहोत हे माधवराव इतवया वर्षांनंतर कधीही विसरले नसल्याने त्यांच्या घरच्या बागेमध्ये सेंद्रिय पद्धतीने वेगवेगळ्या पालेभाज्या व भाजीपाला लावत, निसर्गाशी नाते टिकवत त्यातून मिळणारा आनंद ते घेत असतात. आपल्या बागेत स्वतः वाढविलेल्या आणि सौ.ज्योती वहिनींनी बनविलेल्या खमंग चवदार ताज्या भाज्यांचा आस्वाद ते घेत असतातच; पण बागेतील बराचसा भाजीपाला मित्रमंडळी व कार्यालयातील सहकाऱ्यांनाही ते अगत्याने देतात. माधवरावांचे हौशी खेळांमध्ये भाग घेणे चालू असून गेली दोन वर्षे त्यांनी ५ किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत पन्नास वर्षावरील गटात सुवर्णपदके मिळविली आहेत. शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी ते नियमित व्यायाम करीत असतात. पूर्वाश्रमीच्या पुणे येथील ज्योती सीताराम खरबस यांच्यासोबत माधवरावांचा १९८० साली विवाह झाला. त्यांनी प्रतिष्ठित अशा परड्यू विद्यापीठातून बी एस सी ही पदवी मिळविली. माधवरावांच्या प्रत्येक उपक्रमात सौ ज्योती वहिनी केवळ त्यांच्या पाठीशीच नव्हे, तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असतात. माधवरावांची मुलगी शालिनी ही प्रोग्राम डायरेक्टर म्हणून तर मुलगा अजित व्यवसाय क्षेत्रात व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. व्यावसायिक, कौटुंबिक, सामाजिक, साहित्यिक जबाबदाऱ्या पार पाडीत असतानाच माधवरावांनी एक गोष्ट कटाक्षाने जपली आहे आणि ती म्हणजे त्यांची पर्यटनाची आवड ! अनेक देशात जाऊन त्यांनी त्या त्या देशाची संस्कृती, राहणीमान, चालीरीती, पुरातन वास्तू, उद्योगधंदे, कृषी उद्योग आणि तिथे पिकणारी पिके आणि फळझाडे, प्रसिद्ध शहरे, प्रेक्षणीय आणि निसर्गरम्य स्थळे पाहण्याबरोबर तेथील जीवनाचा अभ्यास केला आहे. आजपर्यंत त्यांनी सपत्नीक नेपाळ, श्रीलंका, भूतान, थायलंड, जपान, चीन, मलेशियासह  सेंट्रल अमेरिकेतील पनामा, कॅरिबियन भागातील बहामाज, काझूमेल बेटे, इजिप्त, मोरॉक्को, दक्षिण आफ्रिका, दुबई, अबुधाबी, शारजाह, क्वातार, कुवेत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी, पॉलीनेशिया बेटांतील ताहिती, बोरा बोरा, मोरया, आणि हवाई बेटे पाहिली आहेत. युरोप खंडातील आइसलँड, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, इटली, ग्रीस, पोलंड, डेन्मार्क, हंगरी, नेदरलँड, स्वीडन, स्विझर्लंड, ऑस्ट्रिया, फिनलँड, नॉर्वे इत्यादी देशांचा प्रवास केला आहे. माधवराव सहपरिवार उर्वारित आयुष्य आनंदात जगण्याबरोबर अनेक ज्येष्ठ साहित्यकांनी सुचवल्याप्रमाणे आता नियमित साहित्य लिहून कविता संग्रह आणि ललित कथा पुस्तक प्रकाशित करण्याच्या प्रयत्नात आहेत.

आज अमेरिकेत जाण्याची मुलामुलींमध्ये, त्यांच्या पालकांमध्ये प्रचंड ओढ निर्माण झाली आहे. या मुलामुलींना आपण काय सांगू इच्छिता? असे विचारल्यावर माधवराव म्हणाले, "आपण सामान्य कुटुंबात जन्मलो, वाढलो त्यामुळे आपली स्वप्नपूर्ती होईल की नाही असा विचार कधीच मनात आणू नका. मराठी माध्यमातून शिकलेले असला तरी त्याबद्दल मुळीच खंत मानू नका. जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असेल व मिळेल त्या क्षेत्राशी जुळवून घेऊन आपल्या स्वप्नपूर्तीसाठी सतत झटत राहिलात तर यश तुमच्या हातात पडल्याशिवाय राहणार नाही. साध्यासाध्या गोष्टीने हिरमोड होऊन न थांबता पुढे पुढे जातच राहिलो तर जीवन निश्चितच एक ना एक दिवस यशस्वी होतेच. आई-वडिलांचे आशीर्वाद, त्यांची सेवा, समाजसेवा करत करत आपल्या परिवारालाही चांगलं शिक्षण व संस्कार देऊन आपल्या जीवनात समाधानी नक्कीच होता येते. केवळ पैशाच्या मागे लागून जीवनात समाधान मिळत नाही. आपल्या जीवनाचे सूत्रधार आपणच असतो; त्यामध्ये परमेश्वर व आपल्या जवळच्या माणसांचा विशेषतः विवाहानंतर तुमच्या जोडीदाराचा खूप मोठा वाटा असतो. योग्य संगतीत आपण राहिलो, आपली मुळे आपण विसरलो नाहीत तर नक्कीच उच्च प्रतीचे जीवन जगत आपल्याला पाहिजे तितकी उंच भरारी घेता येते.

खरोखरच माधवरावांनी दिलेला हा अमूल्य सल्ला केवळ अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या मुलामुलीनीच नाही, तर जगात इतरत्र कुठेही जाऊ इच्छिणाऱ्या किंवा आपल्या देशातच राहून करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मुलामुलीने लक्षात घेऊन तो अंमलात आणणे, हीच या पिढीच्या सुखी जीवनाची खरी गुरुकिल्ली असेल. - देवेंद्र भुजबळ 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

देव कुठे असतो?