महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
आपुलकीचं रिडेव्हलपमेण्ट कधी ?
पैसे, प्रगती, विकास, रॅटरेस, तथाकथित उच्चभ्रू राहणीमान, महागड्या वस्तू-उपकरणं, दिखाऊपणा या साऱ्याच्या धबडग्यात निष्पाप, निरागस प्रेम, माया, ममता, आपुलकी, वात्सल्य, शेजारधर्म, आस्था, जवळीक हे सगळंच जुन्या चाळी, जुन्या वाड्यांप्रमाणेच अडगळीत चाललं आहे की काय? त्याची रिडेव्हलपमेण्ट कधी होणार? हल्ली सगळंच म्हणे मॉलमध्ये मिळतं. त्या मॉलमध्ये केवळ बाजारी वस्तू नव्हे... जिव्हाळा, स्नेह, निरपेक्ष लोभ, अनुराग देणारे एखादे काऊंटर तुमच्या पाहण्यात असेल तर मला जरुर सांगा.
मी त्या पिढीचा प्रतिनिधी आहे, जी पिढी एकेकाळी पायात चपला नसताना शाळेत गेली. ज्या पिढीच्या मातांनी घरापासून दूर असलेल्या विहीरीवरुन पाणी भरले आहे व सोबतीला आपल्या या मुलाच्या हातातही पाण्याने भरलेले एखादे छोटे भांडे दिले आहे. या पिढीने मोठ्या भावंडांचे कपडे वापरण्यात कसलाच कमीपणा मानला नाही. पुढच्या वर्गात गेलेल्या नात्यातल्या अन्य ज्येष्ठ विद्यार्थ्यांची वह्या, पुस्तके, गणवेश, दप्तरे वापरताना त्यांच्या मनात कोणताच किंतु, परंतु आला नाही. शेजारच्या घरातून भाजी, कालवण, फळे आणि तत्सम खाद्य स्वीकारताना व त्यांचा आस्वाद घेताना त्यांची जात, धर्म, पंथ, भाषा कधी आडवी आली नाही. या पिढीतील अनेक महिलांनी शेजारणीने जर आपले दागिने तिच्या नात्यातील एखाद्या मंगलकार्यासाठी मागितले तरी बिनदिक्कतपणे काढून दिले आहेत. माझ्या काळच्या त्या पिढीच्या आधीच्या पिढीतील असेही काही लोक माझ्या पाहण्यात आहेत.. ज्यांनी गरजू मित्राने ‘पैशाची तंगी आहे' म्हणून मागणी केली असता स्वतःचे अन्य कोणत्याही वाढीव, अतिरिक्त उत्पन्न नसतानाही आपला आख्खा पगार त्या मित्राच्या शब्दाखातर त्याला देऊन टाकला आहे व स्वतः जेवढ्यास तेवढ्यावर भागवून पूर्ण महिना काढला आहे.
माझा जन्म जरी मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमधला असला तरी माझ्या बालपणीचा व तरुणपणीचा मोठा काळ मात्र कल्याणमधील ‘त्या काळी' दुर्गम भाग मानला जाणाऱ्या खेड्यात गेला आहे. माझ्याप्रमाणेच अनेकांनी मी वर दिलेल्या काही घटना, प्रसंगांची अनूभुती घेतली असेल. कल्याणच का? मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, सातारा, सांगली, नागपूर या अथवा महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या कोणत्याही महानगरातील, शहरातील, खेड्यातील भागात या प्रकारचेच वातावरण होते. काही ठिकाणी यालाच ‘चाळ संस्कृती' असेही म्हटले जाते. आजही अद्याप टॉवरमध्ये रुपांतरीत न झालेल्या मुंबईतील अनेक जुन्या चाळींमध्ये याचे प्रत्यंतर घे mता येत असेल का? मला कल्पना नाही. आमची स्व-मालकीची चाळ कल्याण पूर्वेस होती आणि तेथे भाडेकरुही होते. आमच्या घरातील विविध सुखाची, दुःखाची कार्ये त्या सर्वांच्या साथीने, धीराने, मदतीनेच पार पडली याची आजही मला कृतज्ञ जाणीव आहे. संपूर्ण चाळीला रंगरंगोटी करणे असो, दारापुढचे अंगण नव्याने बनवणे असो, आवारात वाढलेले गवत काढणे असो, आणखी एखादी खोली बांधताना लांब उभ्या असलेल्या ट्रकमधून रेती, माती, दगड, विटा वाहुन आणणे असो, वेडेवाकडे वाढलेले झाड कापणे असो, कौलांची पावसाळापूर्व झाडलोट असो..या व अशा साऱ्या कामांसाठी आम्हाला कधीही बाहेरुन मजूर आणावे लागले नाहीत. आम्ही स्वतः आमच्या त्या साऱ्या सोबत्यांसह कष्टाच्या कामांत कधीही कमीपणा न मानता ही कामे हातावेगळी केली आहेत.
मला आठवते..आमच्या एका भाडेकरु कुटुंबाच्या घरी दीड दिवसाचा गणपती बसवला जात असे. त्याची सजावट करण्यासाठी आम्ही त्यावेळची सारीच बाळगोपाळ मंडळी उत्साहाने सामील होत असू. गावात वीजपुरवठ्याला सुरुवातच झालेली नसल्याच्या काळात त्या गणपतीच्या मागील चक्र पणतीच्या वाफेवर फिरवण्याचा देखावाही आम्ही केला होता. एकदा तर ग्लुको बिस्किटांचे खांब असलेली सजावट केली होती. त्या परिवाराकडे मोठे टेबल नव्हते. दरवर्षी मग आमच्या घरातले मोठे टेबल त्यांच्याकडे नेले जाई व त्यावरील मखरात गणेश मूर्ती विराजमान होत असे. दीड दिवसांचे गणपती गेले की मग गौरी आवाहनाला तीच सजावट आणखी काही जुजबी बदल करुन आमच्या घरी त्याच टेबलावर केली जात असे व ‘यांच्याकडे नेहमी काहीतरी वेगळे बनवले जाते' म्हणत गावकरी आमच्या घराला भेट देऊन देवीदर्शनाचा लाभ घेत असत. पापड-लोणची, शेवया- कुरडया करणे असो, वाळवणे असो, गोधड्या शिवणे असो.. हे सारे सामुहिकरित्या सहकारी तत्वावर कसे केले जाई याचा मी साक्षीदार आहे. समोरच राहणाऱ्या ग्रामस्थांच्या सोबतीने आम्ही सारे चाळकरी दिवाळीला सहा ते सात फुटांचा मोठा आकाशकंदील बनवीत असू व तो समोरच्या मुख्य रस्त्यावर मध्यभागी टांगत असू. अर्थात त्याही काही चांगले होत असेल तर न पाहवणारे काही गावकरीही असतच म्हणा! असे नमुने सर्वत्रच असतात. ते लोक त्या कागदी कंदीलावर दगड मारुन तो फाडत असत. मग शेजारचे ग्रामस्थ त्या अज्ञात टारगटांना उद्देशून टोपलीभर शिव्या देत असत, हे मला आजही लख्खपणे आठवते. माझ्या परिवारात काही दुःखद घटना घडली की हे सारे शेजारी, भाडेकरु जणू त्यांच्याच घरात दुःख झाले आहे असे समजून वागत. आम्हाला धीर देत. आमच्या घरात येऊन स्वतः आमच्यासाठी जेवण बनवीत असत. १९६६ ते १९८८ अशी सुमारे बावीस वर्षे आम्ही त्या गावात राहिलो. त्या गावात आमचे कुणीच थेट नातेवाईक नव्हते. तरीही आम्ही शेजारपाजारच्यांशी चांगले त्रणानुबंध जपले...आजही जपून आहोत.
१९८८ पर्यंत वाट पाहुनही त्या गावात काही फारशा नागरी सुधारणा होईनात म्हणून शेवटी कंटाळून मी वडीलांना ती सारी चाळ, जागा विकायला लावली आणि कल्याण पश्चिमेला एक ‘फ्लॅट' घ्यायला लावला. त्याला ‘ब्लॉक' असेही म्हणतात. तिथे मात्र गुजराती, व्यापारी मंडळींचे प्राबल्य होते. कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम यांच्यात तेव्हाही उगवते आणि मावळते इतके महदंतर होते. आजही ते तसेच कायम आहे. बऱ्याच सुधारणा कल्याण पश्चिमेच्याच वाट्याला आल्या आहेत. कल्याण पश्चिमेच्याही अनेक चाळी, अनेक जुने वाडे, जुन्या इमारती, कृष्णा-न्यु प्रकाश-ऑल्विन-पौर्णिमा यांसारखी जुनी थिएटरे बंद पडून तेथे टॉवरबाजी सुरु झाली आणि माणूसकी, शेजारधर्म, चांगुलपणा, मोकळेढाकळेपणा पारच ‘फ्लॅट' झाला आणि आपुलकी ‘ब्लॉक' केली गेली. आता शेजारी तिथे भेटतो तो जिन्यात किंवा लिफ्टमध्ये.. ‘हाय, हाऊ आर यु, युवर टमी इज कमिंग आऊट किंवा युवर हेअर आर टर्निंग ग्रे रॅपिडली' असे काहीतरी खवचटपणे ऐकवण्यासाठीच की काय, असे वाटण्याचा जमाना अवतरला आहे. अशाच एका टॉवरमध्ये राहणाऱ्या एका गृहीणीचा दुसऱ्या एका गृहीणीशी झालेला संवाद माझ्या कानावर पडला. त्या दोघीही एकमेकींच्या नातेवाईक असल्याचे त्यांच्या बोलण्यावरुन जाणवत होते. दुसरी पहिलीला सांगत होती...‘अगं आमच्याकडे एक शेजारीण जुन्या साड्या, जुन्या चादरी, ईतर कपडे घेऊन मस्तपैकी गोधड्या शिवून द्यायची. खात्रीच्याही असतात आणि आपल्या डोळ्यांसमोर बनवलेल्या व मेहनत म्हणून खूपच कमी मोबदल घेत असल्याने मला आवडतात. माझ्या भाचीला, भाच्याला मुलं झाली तेंव्हा त्यांच्यासाठी त्याच शेजारणीकडून मी गोधड्या, मुलांच्या अंगाखाली अंथरायची छोटी दुपटी बनवून घेतली व त्यांना दिली. हल्ली असे फार कमी लोक करतात म्हणून त्यांनाही त्या गोधड्या, दुपटी खूप आवडली. जणू माझ्याच मायेचा स्पर्श त्या साऱ्यांना झाला होता असे समजून त्यांनी ती प्रेमाने स्वीकारली व मुलांसाठी वापरली सुध्दा! तुला नात झाली तेंव्हाही मी त्याच शेजारणीकडून हे सगळे बनवून आणणार होते...पण करोनाचे निमित्त झाले आणि ती शेजारीण त्यातच गेली बघ!'
हे सगळं ऐकून पहिली उत्तरली...‘हरकत नाही गं! आमच्या घरी तर सगळ्याच फोमच्या गाद्या आहेत. हल्ली असल्या गोधड्या, दुपटी कोण वापरतं? हे सगळंच डी मार्ट मध्ये किंवा वेगवेगळ्या मॉल्समध्ये रेडिमेड आणि सहज मिळतं, शिवाय पाहिजे ती व्हरायटी, पाहिजे ते कलर्स. कसल्यामसल्या बायकांनी बनवलेल्या गोधड्या नि दुपटी अनहायजिनिक असू शकतात.'
यावर मग दुसरीने कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं.
पैसे, प्रगती, विकास, रॅटरेस, तथाकथित उच्चभ्रू राहणीमान, लठ्ठ पगारांमुळे आलेली मस्ती, महागड्या वस्तू-उपकरणं, दिखाऊपणा या साऱ्याच्या धबडग्यात निष्पाप, निरागस प्रेम, माया, ममता, आपुलकी, वात्सल्य, शेजारधर्म, आस्था, जवळीक हे सगळंच जुन्या चाळी, जुन्या वाड्यांप्रमाणेच अडगळीत चाललं आहे की काय? त्याची रिडेव्हलपमेण्ट कधी होणार? हल्ली सगळंच म्हणे मॉलमध्ये मिळतं. त्या मॉलमध्ये जिव्हाळा, स्नेह, निरपेक्ष लोभ, अनुराग देणारे एखादे काऊंटर तुमच्या पाहण्यात असेल तर मला जरुर सांगा.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धासुमनांजली. ओम शांती...
-राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई