महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
फुटपाथ फ्रेंडली बाईक
ट्रॅफिक जॅममधून बाहेर काढणाऱ्या पळवाटांमुळे माझा थोडा वेळ वाचतही असेल, पण अपघात वाढतात हे नक्की. या अपघातात, आज कदाचित मी नसेन, पण उद्याच्या अपघाताचे काय? परवाचे काय ? तेव्हाच्या अपघातात आपण असू शकतो, आपली बायको/मुले/आईवडील/जिवलग असू शकतात, हा विचार जर मनात रुजला, तर सगळेच चित्र बदलू शकते. जर प्रत्येकानेच ठरवले, की, मी वाहतुकीचे सर्व नियम पाळणार, तर बदल्यात मिळणार काय आहे ? मिळणार आहे, अपघातशून्य वाहतूक.
सध्या ट्रॅफिक जॅम चा प्रॉब्लेम सगळ्यांनाच भेडसावत असतो. टू व्हीलरवाले /फोर व्हीलरवाले जॅममधून सुटका करून घेण्याकरता नवनवीन पर्याय शोधत असतात आणि बरोबरच आहे - म्हणतातच ना की गरज ही शोधाची जननी आहे. सिग्नल तोडणे, उलटीकडून जाणे, स्पीड लिमिट न पाळणे, लेन तोडणे, या पर्यायांची संध्या चांगलीच चलती आहे. सगळ्यांच्या समोर एकच ध्येय असतं - मी कसा पुढे जाईन ? इतरांशी या मी ला काहीही देणे घेणे नसते.
मध्यंतरी एक पर्याय पुढे आला आणि तो म्हणजे फुटपाथवरून टू व्हीलर नेणे. थोडासा जरी ट्रॅफिक अडला की लगेच बाईकवाले भराभर बाजूच्या फुटपाथवर गाड्या चढवतात आणि वाटेल तेव्हा पुन्हा रोडवर येतात. फुटपाथवर ‘Keep left' किंवा 'speed limit' ही बंधने नसतात, त्यामुळे सगळेच आबादी - आबाद असते.
शहरांमध्ये आता बहुतेक रस्त्यांवर छान फुटपाथ केलेले आहेत. पण त्यावर चालणाऱ्यांपेक्षा, इतर लोकांचेच राज्य असते. त्यामुळे चालणारे फुटपाथवरून मार्ग शोधत शोधत पुढे जात असतात. चालणाऱ्यांना रस्ता क्रॉस करणे अशक्य झाले आहे, रस्त्यावर चालणे अशक्य आहेच, आणि फुटपाथवर पण चालायला जागा नाही, म्हणून म्हणतात, रस्त्यावरचा सगळ्यात बिचारा प्राणी म्हणजे चालणारी मंडळी.
...आणि आता बाईकवाले फुटपाथवर आल्यामुळे, पायी चालणाऱ्यांची बिचारेपणाची लेव्हल अजूनच खालावली आहे. बिचारी मंडळी नेहेमीच वर बघतात आणि देवाकडे मदतीची अपेक्षा करतात. आणि झालं असेच चालणाऱ्यांची याचना वर पोहोचली - देख तेरे संतान की हालत क्या हो गयी भगवान, अब फुटपाथ पर चलना भी नसीब नही ! देवाला अडचण समजली आणि सगळ्या फुटपाथवर दोन्ही बाजूला, अधे - मधे, स्टीलचे चकचकीत खांब बसले. चालणारे खुश झाले. खांबामधून गाडी घालता येत नाही, म्हणून टू व्हीलर वाले नाराज झाले आणि पुन्हा रस्त्यावर आले.
कॉम्प्युटर वर व्हायरस - अँटी व्हायरस जसे सुरूच असते, तसेच देवाकडे ऋषी- मुनीपण साकडे घालत असतात आणि दानवपण. आता टू व्हीलर वाल्यांनी वर बघून याचना केली - ‘देख तेरे संतान की हालत क्या हो गयी भगवान, अब फुटपाथपर बाईक चलाना भी नसीब नही. वरच्याला सगळ्यांचीच काळजी असते, कारण सगळी त्याचीच लेकरे. देवांनी तथास्तु म्हटले आणि टू व्हीलर करता पर्याय पुढे आला.
आम्ही मेन रोडने मार्केटकडे चालत निघालो होतो. फुटपाथवर खांबांमुळे टू व्हीलरची वर्दळ नव्हती, त्यामुळे बिन्धास चालत होतो. पुढच्या चौकात, डावीकडच्या रस्त्यावर बरीच गर्दी दिसली. काय आहे ? हे बघायला म्हणून आम्ही डावीकडे वळलो. थोडं पुढे छोटं ग्राउंड आहे. तिथे एका परदेशी कंपनीने तयार केलेल्या फूटपाथ-फ्रेंडली बाईक चा डेमो दाखवणार होते. नावावरून काहीच अर्थबोध होत नव्हता. बघितल्याशिवाय उत्सुकता संपणार नव्हती. मी आणि काही पर्याय नसल्यामुळे बायको, गर्दीतून वाट काढत पुढे गेलो. कुणीही प्रेमात पडेल, अशी एक नवी कोरी दणकट बाईक समोरच दिमाखात उभी होती.
तिथले मार्केटिंग मॅनेजर (महेश) जाहिरातपर भाषण करत होते. टू व्हीलर वाल्यांकरता खुशखबर - खुशखबर. फुटपाथवर बाईक चालवा. एका भाग्यवान व्यक्तीला पहिली फ्री ट्रायल मिळणार ! नंतर काही जणांना मिळणार, पेड ट्रायल. कोण आहे तो भाग्यवान ? हीच वाक्ये पुन्हा पुन्हा ऐकवणे सुरु होते. प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर, ‘मीच तो भाग्यवान असे भाव दिसत होते. बायको म्हणाली, तुम्ही या भानगडीत पडू नका, तुम्हाला ती गाडी पेलवणार नाही. ‘कौन है वो भाग्यशाली', ‘कौन है वो भाग्यशाली', अशा गर्जना सुरु होत्या. मी गाडीकडे बघितलं आणि माझ्याकडे बघितलं. गाडीचे वजन माझ्या वजनाच्या तिप्पट तरी नक्कीच असणार. नेहेमी म्हणजे इतर वेळेला, मी कितीही भाग्यशाली असलो, तरी, आज, ‘तो मी नव्हेच' हे पक्के होते.
"वो कौन है”,...... "वो कौन है”......, "किसको ट्रायल दी जाय”, असं म्हणत म्हणत, महेश चौफेर नजर टाकत होते. माझ्यावर त्याची नजर स्थिर झाली, आणि, "यही तो है वो” अशी जाणीव महेशला आतून झाली असावी. लगेचच त्यांनी हात माझ्याकडे करून, "सर, आप आगे आईये” अशी घोषणा केली. महेश नक्की कुणाला सर म्हणतोय हे समजण्याकरता मी आजूबाजूला बघायला लागलो. बाजूचा मुलगा म्हणाला, "काका यु आर लकी”, तुम्हालाच बोलावलं आहे. हे काम आपलं नव्हे, हे मला चांगलं समजतं होतं, पण आलेली संधी वाया का घालवायची! हा पण विचार मनात आला. द्विधा मनस्थिती असली, की, मी नेहेमी अंतर्मनाचा सल्ला घेतो.
मी (मनात डोकावून) : काय करू ?
आतून : जा बिन्धास, मी आहे.
मी : ती बाईक पेलणं मुश्किल आहे.
आतून : भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आजतर तुझ्यामागे बसणार आहे. माझं आतल्या मनाशी बोलणं बायकोच्या लक्षात आलं असावं. तिने मला बेस्ट लक दिलं आणि मी लगीच पुढे गेलो. महेशनी टाळ्या वाजवून माझं स्वागत केलं. सगळ्यांनीच जोरदार टाळ्या वाजवल्या.
ग्राउंडमध्ये फुटपाथ सारखा लांब पर्यंत भाग आखून तयार केला होता. त्यावर, फुटपाथवर लावले आहेत, तसे स्टीलचे खांब लावलेले होते. महेशनी त्या फुटपाथवर बाईक आणली. मला डेमो समजावून सांगितला आणि बाईकवर बसायला सांगितले. गाडी स्टॅन्ड वरुन काढून, पलीकडे पाय टाकतांना, माझा थोडा तोल गेल्यासारखे जाणवले, पण तेवढ्यापुरतेच, कारण लगेच जाणवलं, की, मागे कुणीतरी बसले आहे. मागे आहे, याची खात्री करायला, मी दोन्ही पाय थोडे वर उचलले, पण गाडी स्थिर होती. मी बिन्धास झालो.
मी बाईक सुरु केली आणि २०-२५ फुटावर असलेल्या स्टीलच्या खांबांपर्यंत नेली आणि थांबवली. तिथे महेशचा सहकारी उभा होता. सीटच्या खाली असलेलं एक बटन त्यांनी दाबलं. बटन दाबताच हँडलचे दोन्ही भाग आतल्या बाजूला फोल्ड झाले. मी हळूहळू बाईक खांबातून थोडी पुढे नेली आणि सीट खालचे बटन दाबले. हॅण्डल पुन्हा अनफोल्ड झाले. गाडी सुरु करून मी पुढे निघालो. एन्ड पॉइंटला पोहोचलो आणि गाडी मागे वळवली. खांबांपर्यंत आलो, गाडी थांबवली, बटन दाबून हॅण्डल फोल्ड केले, गाडी पुढे घेऊन हॅन्डल अनफोल्ड करून गाडी पुढे सुरु केली आणि महेशपर्यंत पोहोचलो. सगळ्यांनीच जोरदार टाळ्या वाजवून गाडीचं आणि माझं कौतुक केलं. मी खाली वाकून टाळ्या आणि कौतुक माझ्यामागे बसलेल्या मनातल्या व्यक्तीकडे पास केल्या.
महेशच्या टीममधल्या एका सुंदरीनी मला मोठा बुके दिला आणि बाईकवर माझ्या मागे बसून सेल्फी काढला. महेशनी मला एक गिपट बॉक्स दिला. मी सगळ्या टीमचे आभार मानले.
महेश : सर, ही गाडी लवकरच मार्केटला येईल. तुमचा मोबाईल नंबर आणि इमेल या फॉर्ममध्ये भरून द्या. तुम्हाला स्पेशल डिस्काउंट दिल्या जाईल. तुम्ही स्वतः गाडी घ्या किंवा ऑफर कुणाला पास करा.
मी फॉर्म भरून दिला, मला बुके देणाऱ्या मॅडमला थँक्स म्हणालो. आणि महेशला आणि सगळ्या उपस्थितांना हात घालून बाय-बाय केले आणि आम्ही निघालो.
परत जात असताना डोक्यामध्ये सहज विचार आला - अशा सुधारणांमुळे टू व्हीलर वाल्यांची जरी सोय होणार असेल, तरी अशा पळवाटा कुणाच्याही अंतर्मनाला नक्कीच पटणार नाहीत. स्वतःच्या सोयीकरता नियमातून पळवाट कशी काढता येईल, हीच आपण काळाची गरज तयार केली आहे आणि आम जनतेच्या काय गरजा आहेत, हे लक्षात घेऊनच शोध लावणारे त्यावर काम करत असतात. आणि म्हणूनच फुटपाथ फ्रेंडली बाईक तयार होतात. पळवाटांमुळे माझा थोडा वेळ वाचतही असेल, पण अपघात वाढतात हे नक्की. या अपघातात, आज कदाचित मी नसेन, पण उद्याच्या अपघाताचे काय? परवाचे काय ? तेव्हाच्या अपघातात आपण असू शकतो, आपली बायको/मुले/आईवडील/जिवलग असू शकतात, हा विचार जर मनात रुजला, तर सगळेच चित्र बदलू शकते. जर प्रत्येकानेच ठरवले, की, मी वाहतुकीचे सर्व नियम पाळणार, तर बदल्यात मिळणार काय आहे ? मिळणार आहे, अपघात शून्य वाहतूक.
आणि त्याकरता आपण प्रत्येकानी म्हणजे प्र - त्ये - का - ने काय करायचे आहे, तर अगदी सोपे सोपे नियम आपल्याला पाळायचे आहेत. काय आहेत ते नियम ? तर, सिग्नल पाळणे/नो एंट्रीत न जाणे/स्पीड लिमिट पाळणे / आणि अर्थात फुटपाथवर गाडी न घालणे.
या सगळ्यामुळे आपला जाण्याचा वेळ थोडा वाढेल, थोडे लवकर निघावे लागेल. हा बदल स्वीकारून जर आपण वर बघून जर प्रार्थना केली : देख तेरे संतान की हालत क्या हो गयी भगवान - ट्रॅफिकके सभी नियम फॉलो तो कर रहे है, लेकिन ट्रॅव्हल का टाईम बहुत बढ गया है.
आपली प्रार्थना ऐकून देव नक्कीच तथास्तु म्हणेल आणि योग्य असा छान पर्याय बाहेर येईल.या आपल्या सगळ्यांच्या अशा मानसिक बदलाकरता सगळ्यांना शुभेच्छा आणि फुटपाथ फ्रेंडली बाईकला बाय बाय. - सुधीर करंदीकर