असू आम्हीं सुखाने पत्थर पायातील

दरवर्षी शिवराज्याभिषेकाच्या दिवशी आम्ही अनेक विद्यार्थी घेऊन रायगडी जातो अन्‌ गडावरचा प्लॅस्टिकचा कचरा गोळा करुन खाली घेऊन येतो. या उपक्रमाचं हे विसावं वर्ष होतं.. गेली एकोणीस वर्षं हे व्रत आम्ही सगळे नित्यनेमाने करतो आहोत. माझे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यात आनंदानं सहभागी होत असतात. एक दीड महिना आधीपासूनच आमच्या या स्वच्छता अभियानाच्या तयारीची सुरुवात होते. मे महिन्यात आमच्यापैकी काही जण गडावर येऊन नीट पाहणी करून जातात आणि मग अधिक कचरा जिथं जिथं असेल तिथून तो हलवण्याचं नियोजन सुरु होतं.

भरजरी पोशाख करुन, फेटे बांधून, कमरेला तलवारी अन्‌पाठीला ढाली बांधून, जागोजागी फोटो-सेल्फी काढत शिवराज्याभिषेक सोहळ्यात प्रेक्षक म्हणून सहभागी व्हायला कुणाला आवडणार नाही हो? पण राजांची शिकवण आठवते अन्‌ दरवर्षी मन आवरतं घेऊन प्रेक्षक व्हायचं सोडून कार्यकर्ता शिवसेवक म्हणून दुर्गराज रायगड स्वच्छता मोहीम आम्ही काढतो..! कारण, दुर्गराज रायगड हा शिवचरित्रातल्या तलवारीपलीकडच्या देखील अनेक अभूतपूर्व घटनांचा साक्षीदार आहे..!

ज्या मुलांनी आणि त्यांच्या आजच्याच काय, पण आधीच्याही पिढ्यांनी आजतागायत कधीही रायगडावर एक प्लॅस्टिकचा तुकडासुद्धा टाकला नाहीये, अशी १४  मुलंमुली घेऊन ९ जून, २०२५ रोजी पहाटेपासून आम्ही प्रत्येक पायरी प्लॅस्टिकमुक्त करण्याच्या कामी होतो. पावसाचे दिवस आहेत, कोव्हिडच्या केसेस सगळीकडे वाढत आहेत, अशा परिस्थितीत कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं उष्टवलेल्या पाण्याच्या बाटल्या, कागदी कप, प्लास्टिकचे चमचे, रॅपर्स अशा गोष्टी गोळा करायच्या म्हणजे आजच्या परिस्थितीतलं वेडं धाडसच म्हणायला पाहिजे..!  दरवर्षी शिवराज्याभिषेकाच्या दिवशी आम्ही अनेक विद्यार्थी घेऊन रायगडी जातो अन्‌ गडावरचा प्लॅस्टिकचा कचरा गोळा करुन खाली घेऊन येतो. या उपक्रमाचं हे विसावं वर्ष होतं.. गेली एकोणीस वर्षं हे व्रत आम्ही सगळे नित्यनेमाने करतो आहोत. माझे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यात आनंदानं सहभागी होत असतात. एक दीड महिना आधीपासूनच आमच्या या स्वच्छता अभियानाच्या तयारीची सुरुवात होते. मे महिन्यात आमच्यापैकी काही जण गडावर येऊन नीट पाहणी करून जातात आणि मग अधिक कचरा जिथं जिथं असेल तिथून तो हलवण्याचं नियोजन सुरु होतं. सगळ्या नोंदी विद्यार्थ्यांचा गट करत असतो. मी फक्त निमित्तमात्र असतो. स्वच्छता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संस्कार याच वयात मुलांच्या व्यक्तिमत्वावर कोरला गेला तर त्याचे उत्तम परिणाम समाजात दिसून येतात.

कोण आहेत ही मुलंमुली? ज्यांच्या पायाशी सगळी सुखं लोळण घेत आहेत, अशा कुटुंबातली ही मुलं. पण पुण्याहून निघून पायथ्यापासून ते वरच्या बालेकिल्ल्यापर्यंत प्लॅस्टिकच्या बाटल्या, त्यांची टोपणे, पिशव्या, फाटकी तुटकी पादत्राणे, प्लॅस्टिकचे चमचे, ग्लास, चहाचे कप, कागदी प्लेट्‌स, द्रोण, पत्रावळी अशा कितीतरी प्रकारचा कचरा गोळा करायचा, तो व्यवस्थित पॅक करून त्याची नोंद करायची आणि तो गडाखाली पाठवायचा हे काम तसं पहायला गेलं तर मुळीच सोपं नाही. "हे असलं काम मी का करु?" आणि "बाकी लोकं वाट्टेल तसे वागतात त्याचा कचरा मीच का उचलायचा?" असे प्रश्न मनात येऊ न देता काम करत रहायचं, हे किशोरवयीन गटासाठी कठीण असतं. दोन दिवस सफाई कामगाराच्या भूमिकेत राहण्यापेक्षा ॲडलॅब्स इमॅजिकाला गेली असती तर कुणाला त्यात काहीही गैर वाटलं नसतं, अशा वयातली ही मुलं..! पण त्यांनी प्रेरित होऊन हे काम करावं, यातच खऱ्या महाराष्ट्र धर्माचं दर्शन घडतं..! आपल्या देशात शककर्ते राज्याभिषेकच मुळात झालेत एकूण चार..! केवळ चारच..! पहिला राज्याभिषेक चक्रवर्ती सम्राट युधिष्ठिर यांचा..! दुसरा सम्राट विक्रमादित्य यांचा..! पुढचे दोन्ही राज्याभिषेक आपल्या महाराष्ट्रातले आहेत. सम्राट शालिवाहन याचा राज्याभिषेक आणि आजपासून ३५१ वर्षांपूर्वी चौथा राज्याभिषेक झाला तो रायगडावर छत्रपती श्री शिवाजीराजे यांचा..! महाराष्ट्र परमभाग्यवान आणि आपण सारे महाराष्ट्रात जन्म घेतलेले थोर पूर्वपुण्याईचे.. म्हणून आपल्याला हा एक नव्हे तर दोन शककर्त्या सिंहासनाधीश्वरांची परंपरा लाभलेली आहे..

ऐन शिवराज्याभिषेकाच्या दिवशीच ही रायगड स्वच्छता मोहीम का करायची? याचं उत्तरच इथं आहे. संपूर्ण देशभरात हिजरी कालगणना सुरु होती, तेव्हां शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक प्रारंभ करुन कालगणनेला लागलेलं परकीय ग्रहणच संपवून टाकलं. महाराष्ट्राची किंबहुना संपूर्ण हिंदुस्थानची नव्या सार्वभौमत्वाची कालगणना सुरु झाली ती इथं रायगडावरच..! राजांची वार्षिक कालगणनासुद्धा भारतीय संस्कृत महिन्यांनुसार होती. राज्याभिषेक शक शुद्ध पक्ष - वद्य पक्ष, प्रतिपदा ते पौर्णिमा, प्रतिपदा ते अमावास्या, संवत्सर या नुसारच चालत होता. रायगडावरच्या शिलालेखात सुद्धा हिंदू तिथीचाच उल्लेख आहे, हे आपण ध्यानी घेणार की नाही? मराठी साम्राज्याचं स्वतःचं असं वेगळं चलन सुरु झालं. सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई ही ती दोन चलनं. परकीयांच्या चलनी वर्चस्वाचा पायाच शिवरायांनी उखडून काढला, तोही इथंच रायगडावर..!

कुमारवयातच स्वतःची राज्यकारभाराची मुद्रा अस्खलित संस्कृत भाषेत करणारे शिवाजीराजे आजही अनन्यसाधारण महत्त्वाचे का ठरतात ? संपूर्ण राज्यकारभार, पत्रव्यवहार,खतावण्या,दस्त, खुर्दखतं असा लेखन व्यवहार जेव्हा उर्दू आणि फारसी भाषेतून चालत होता, तेव्हां तीच भाषा सामान्य जनतेच्या ओठी रुळली होती. राजांनी यात परिवर्तन घडवून आणलं. ही केवढी मोठी उपलब्धी..! पत्रव्यवहारापासून ते लेखी सनदांपर्यंत सगळा व्यवहार स्वभाषेत सुरु झाला, मराठी साम्राज्याचा राज्यव्यवहारकोश महाराजांनी करवून घेतला, तोही या रायगडावरच..! राजांच्या ३२ मण सुवर्ण सिंहासनाचा वारंवार उल्लेख होत असतो. पण त्या सिंहासनाच्या स्थापनेसाठी केवळ लाखो वीरांचं रक्त सांडलेलं नाही तर, अनेकांच्या बुद्धिमत्तेचा, मुत्सद्दीपणाचा, विद्वत्तेचा, लेखणीतील कौशल्याचा देखील सहभाग आहेच. ते सिंहासन रणातल्या पराक्रमापासून ते दौलतीच्या ताळेबंदापर्यंत आणि महसुलापासून ते दंडनीतीपर्यंत विविध पराक्रम-व्यवहार-व्यवस्थापन यांच्या अभ्यासू चिंतनाच्या भक्कम पायावर उभं आहे.याची जाणीव नंदादीपासारखी अखंड तेवणारी मनं वाढली पाहिजेत. तेच तर शिवचरित्राचं तात्पर्य आहे.

एप्रिल महिन्याच्या १३-१४ तारखेला आमच्यातले काही जण रायगडावर जाऊन आले आणि कुठं, किती प्लॅस्टिकचा कचरा आहे,याचा आढावा घेतला. प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि त्यांची टोपणं हा कचरा सगळ्यात जास्त आहे, असं त्यांचं निरिक्षण होतं. त्यांनी नाणे दरवाजा ते महादरवाजा आणि चित दरवाजा ते महादरवाजा अशा दोन्ही पायरी मार्गांवरच्या १६ जागा शोधून काढल्या, जिथं सगळ्यात जास्त कचरा होता. त्या टीमचं कौतुकच करायला पाहिजे.कारण त्यांनी गडावर पसरलेल्या कचऱ्याची सविस्तर यादी केली.त्यात तीस प्रकारचा कचरा आहे, असं लक्षात आलं. चॉकलेट, गोळ्या, च्युइंगगम्स, वेफर्स, कोल्डड्रिंक्स, पाण्याच्या बाटल्या यांची कंपन्यांसहित यादीच केली. हे बहाद्दर एवढ्यावरच थांबले नाहीत तर, गड उतरल्यानंतर त्यांनी पायथ्याच्या प्रत्येक दुकान, हॉटेल, टपरीपाशी जाऊन तिथंही तेच पदार्थ विकले जातात का, याचीही पडताळणी केली. एकूण कचऱ्याचं प्रमाण आणि पायथ्याशी होणारी विक्री यांचं प्रमाण जुळतंय का, ते पाहण्यासाठी आणखी एक दिवस मुक्काम ठोकून निरिक्षण करत राहिले आणि नोंदी केल्या. उदाहरणार्थ, एखाद्या मावशीबाईंनी टोपलीभर करवंदं विकायला गडावर नेली तर दिवसभरात त्यातली निम्मीसुद्धा संपत नाहीत, पण एखाद्यानं "स्टिंग"च्या बाटल्या विकायला ठेवल्या तर त्याला एकाच दिवसात तीन चार वेळा खालून वर माल आणावा लागतो, इतकी भरपूर विक्री होते. अशी निरीक्षणं त्यांनी नोंदवली. तीच गोष्ट शेव, मसाला शेंगदाणे आणि वेफर्सच्या पाकिटांची होती.

पूर्वी गडावर येणारी माणसं त्यांच्यासोबत डबा आणायची. सोबतीला गडावरच्या आया बहिणींकडून दही किंवा ताक घ्यायची. त्यामुळं प्लॅस्टिकच्या कचऱ्याच्या भस्मासुराची चिंता कुठल्याच गडाला नव्हती. पूर्वी डबा घेऊन येणारी माणसं आता खिशात पैसे घेऊन येतात आणि तहानलाडू भूकलाडू जंकफूडच्या रुपात विकत घेऊन खातात. वाटाणे, फुटाणे, खारे शेंगदाणे खिशात घेऊन ते खात खात गड चढणं आता दुर्मिळ झालं आहे. गडाच्या वाटेवर चार जण एखाद्या झाडाखाली बसून भुईमुगाच्या शेंगा फोडून खात बसलेत, हे तर आता पाहायलाही मिळत नाही. शंभर रुपयांच्या शेंगा घेऊन ती पिशवी खालून वर आणत बसण्यापेक्षा दहा रुपयात वेफर्सचं पाकीट कुठल्याही स्टॉलवर मिळतंय, या तथाकथित' सोयीमुळे सगळा सत्यानाश होतोय. वीस रुपये देऊन मूठभर करवंदं किंवा जांभळं घेण्यापेक्षा वीस रुपयांत वेफर्स घेणं चवीला आवडतंय आणि खिशाला परवडतंय, असा विचार  गडावर येणारी माणसं करायला लागली. साहजिकच, चिंचा, बोरं, आवळे खाणारी मंडळीच उरली नाहीत तर विकणार कुणाला? या समस्येपोटीच गडावर पाकिटबंद पदार्थांचा सुळसुळाट झाला आहे.

रायगड विकास प्राधिकरणानं पायरी मार्गावर किमान दहा ठिकाणी तरी नळाद्वारे पाणी उपलब्ध करुन दिलं तर चहा सरबतांसाठीचे कागदी कप आणि ग्लास बंद करता येतील. काचेचे कप, ग्लास धुवायला पाणी असेल तर कागदी कप लोक कशासाठी विकतील? यावर्षी आम्ही पायरी मार्गावर साधारण दोन हजार चहाचे कागदी कप गोळा केले. एका नळ योजनेमुळे गडाच्या पर्यावरणात आणि स्वच्छतेत किती मोठा फरक पडेल पहा..यावर्षी पायरी मार्गावर जागोजागी आरोग्य विभागाच्या वतीने मोफत ध्Rए ची पाकिटं वाटली जात होती. लोक घेत होते आणि पुढे जाऊन वाटेत ती पाकिटं तशीच टाकून देत होते. माझ्यापुढं एक दहा पंधरा तरुणांचा गट चालत होता. त्यांनीही ती पाकिटं "फुकट ते पौष्टिक” या न्यायानं घेतली. पण पुढं जाऊन त्यांनी ती कचऱ्यात टाकून दिली..संपूर्ण पायरी मार्गावर आम्हाला अशीच न वापरलेली शेकडो पाकीटं कचऱ्यात टाकून दिलेली मिळाली..!

"ह्यातनं कसली एनर्जी मिळतीय, ह्याच्या जागी एक एक विमलची पुडी द्यायला पाहिजे होती” असा डायलॉग मारणाऱ्या एकाला मी पाठमोरा ऐकला. आजन्म स्वतः निर्व्यसनी असणाऱ्या आणि व्यसन करणाऱ्याला जबर शिक्षा ठोठावणाऱ्या राजाच्या राजधानीच्या ठिकाणी असं बोलणारा हा गडी जर तानाजीरावांच्या किंवा हंबीररावांच्या हाती लागला असता तर त्यांनी त्याचं काय केलं असतं, याचा विचारच केलेला बरा. तानाजीरावांनी त्याच्या श्रीमुखात अशी काही लगावली असती की, गड्याची जीभ पुन्हा आयुष्यभर विमल म्हणायच्या अवस्थेत राहिली नसती. पण एक विलक्षण तरुण मला दिसला. पहाटे पावणेसहा वाजता वाघबिळाच्या रस्त्यावर जे शिरकाई देवीचं मंदिर आहे, तिथं देवीपुढं बसून तो त्याच्या हातातल्या स्मार्टफोन मधून ”मराठा म्हणावे अशा वाघराला” चे श्लोक डोळे मिटून ऐकत होता. मला फार आश्चर्य वाटलं. माझ्यासोबतचे सगळे पुढं निघून गेले होते, मी एकटाच होतो. पाच मिनिटं थांबलो. त्याचं ऐकून संपलं. तो उठला आणि मागे वळला, तसं मी त्याला या श्लोकांबद्दल विचारलं. तेव्हां तो म्हणाला, "हे भिडे गुरुजी कोण आहेत"  हे मला माहिती नव्हतं. मिडियावरच्या उलट सुलट बातम्यांमधून मी त्यांच्याविषयी ऐकत होतो. पण असे कुणी इतके वृद्ध आजोबा खरोखरच जर अशा विचारांचे असतील तर हजारो तरुण त्यांना फॉलो का करत असतील, असं मला वाटायचं. नंतर मला युट्यूबवर हे श्लोक मिळाले. शिवाजी महाराजांना "पुण्यश्लोक म्हणणारे मी पाहिले ते केवळ हेच.."  मी ते श्लोक ऐकले आणि विचार केला. तेव्हापासून मी रोज सकाळी देवापुढं बसून हे श्लोक ऐकतो. शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याचा प्रयत्न करतो.”

असा एकलव्य मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. आमच्या थोड्या जुजबी गप्पा झाल्या. कानात इयरफोन्स लावून ते श्लोक ऐकत ऐकत तो नाणे दरवाज्याच्या दिशेनं झपाझप पावलं टाकत निघूनही गेला. आपापल्या आयुष्यात, आपापल्या निवडलेल्या क्षेत्रात वज्रासारखी तत्त्वनिष्ठा आणि राष्ट्रीय चारित्र्य जगणारे कोट्यवधी तरुण उभे राहिले तर ह्या दुर्गराज रायगडावरच्या मराठी तख्ताला याहून आणखी काय हवंय? आज रायगडाचे तट अन्‌ खालचे कडे प्लॅस्टिकनं भरून गेले आहेत. प्रचंड कचरा पडला आहे. तो भारतीय नागरिकांनीच केला आहे, यात शंका नाही. मराठी साम्राज्याची राजधानी प्लॅस्टिकच्या विळख्यात अडकत चालली आहे. रायगडाचं पक्षीजीवन, वन्य प्राणीजीवन दिवसेंदिवस खराब होत चाललं आहे. कुणाचंच तिकडं लक्ष नाही. येणाऱ्या कुणालाही त्याविषयी आस्था नाही. माणसांना ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी वावरण्याचं भान नसतं, हेच सत्य आहे. हा केवळ कपड्यांच्या बाबतीतल्या आचारसंहितेचा मुद्दा नाही. आपली वाणीसुध्दा नियंत्रित असणं आवश्यक आहे. कोणत्याही ऐतिहासिक सांस्कृतिक ठिकाणी कसं वागावं हे आजही लोकांना कळत नसेल तर, आजवरचं सगळं औपचारिक शिक्षण निरुपयोगीच  आहे, असं मान्य करावं लागेल. नियमांच्या पाट्या लावून उपयोग होत नाही, किंवा दंड करुन उपयोग होत नाही. "स्वयंशिस्त” आणि "तारतम्य” हे दोन गुण अविरतपणे शिकवत राहण्याची गरज आहे. महाराजांच्या गडकोटांची आजची परिस्थिती चिंताजनक असली तरीही, स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीचं समग्र दर्शन घडवणारं आज्ञापत्र मात्र आजही उपलब्ध आहे.

शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र हा केवळ ऐतिहासिक दस्तऐवज नाही. तो प्रत्यक्ष आचरण करण्याचा विषय आहे. आज्ञापत्र शाळांमधून मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. त्याचा अभ्यास मुलांनी केला पाहिजे. आज्ञापत्राचे प्रशिक्षण वर्ग, अभ्यास वर्ग झाले पाहिजेत. मुलांसाठी शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रावर आधारित ज्ञान परिक्षा महाराष्ट्रात सुरु व्हायला हवी. कारण, त्यातून शिकावं असं प्रचंड आहे. लिहिण्यासारखं खूप काही आहे. व्यक्त करण्यासारखे अनुभव खूप आहेत. पण व्यक्त होण्यालाही शेवटी चौकट असतेच. ज्याला बदल घडवून आणण्याची इच्छा आहे, त्यानं अखंड कृतिशील राहिलंच पाहिजे. "आचारशीळ विचारशीळ | दानशीळ धर्मशीळ सर्वज्ञपणें सुशीळ |सकळां ठायीं” असं शिवाजी महाराजांचं वर्णन आहे. त्याचंच आचरण करण्याची गरज आहे.   |अधिक काय लिहावें, सर्व सूज्ञ आहेत. मर्यादेयं विराजते.
- मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मधुबाला