दीप आणि प्रज्वलन

जाहीर कार्यक्रमांतून दीप प्रज्वलन करुन काय संदेश द्यायचा असतो? तर समाजातील वाईट चालीरीती, अंधपणाने पाळल्या जाणाऱ्या परंपरा, कालबाह्य रुढी नष्ट होवोत आणि साऱ्यांच्या जीवनात ज्ञानाचा, विज्ञानाचा प्रकाश पडो व त्यांचे जीवन सुकर, सुगम होवो हाच ना! हाच संदेश प्रत्यक्ष वर्तनातून, आचरणातून, कृतीतून दिला गेला  तर?

   नवी मुंबईत कोपरखैरणे येथे एका कार्यक्रमात उद्‌घाटक म्हणून मला बोलावण्यात आले होते. मात्र नेहमी करतात तसे समईतील वाती पेटवून  हे उद्‌घाटन करायचे नव्हते. आयोजकांनी एका टेबलवर एक मेणबत्ती ठेवली होती. तिथे आसपास कुठेही काडेपेटी किंवा दुसरी पेटवून ठेवलेली मेणबत्ती दिसत नव्हती की जी घेऊन समोरची मेणबत्ती पेटवावी. कुणाच्याही तस्वीरीसुध्दा नव्हत्या की ज्यांना पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. लांब पार्क करुन ठेवलेली कार अनलॉक करण्यासाठी जसे चावीला जोडलेले एक चपटे ‘डिव्हाईस' असते व ते दाबल्यावर ‘पॉक' असा आवाज येऊन कारचे दरवाजे अनलॉक होतात तसे एक ‘डिव्हाईस' आयोजकांनी माझ्या हातात दिले व ते कुणालाही दिसणार नाही असे (खिशात) ठेवायला सांगितले. मी तसे केले. मग आयोजकांनी ‘आता घरत हे त्यांच्याकडील दिव्यशक्तीने मेणबत्ती तिला हात न लावता किंवा काडेपेटी अथवा दुसऱ्या कसल्याही माध्यमाचा वापर न करता पेटवून दाखवतील' अशी उद्‌घोषणा करुन मला ती मेणबत्ती पेटवायला सांगितले. मी माझ्या सदऱ्याच्या खिशात हात घातला व त्या ‘डिव्हाईस'चे बटण दाबले आणि त्या मेणबत्तीची वात लगेच पेटली व लवथवती ज्वाला तिथे दिसू लागली.

   यात कसलाही ‘चमत्कार' किंवा माझी कसलीच ‘दिव्यशक्ती' नव्हती. हा साधा विज्ञानाचा प्रकार होता. त्या मेणबत्तीच्या वातीला ज्वलनशील द्रव पदार्थ चोळून ठेवलेला होता आणि माझ्याकडील ‘डिव्हाईस'मुळे त्यातून गेलेल्या व नजरेला न दिसणाऱ्या सिग्नलमुळे ती मेणबत्ती पेटली. या व अशा प्रकारच्या  विज्ञानाचा आधार घेऊन केलेल्या चमत्कारांना भोळी जनता फसते व तथाकथित बाबा, बुवा, भोंदू लोक यांच्यावर विश्वास ठेवून ते सांगतील तसे वागत असते. हे दर्शवण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला होता. चमत्कार करुन साधा पापडही मोडता येत नाही, हेच वास्तव आहे. चमत्कारांनी जर हवे ते परिणाम साधता आले असते तर पंतप्रधान श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी भारतीय सैन्य दलांवर एवढा खर्च का बरे केला असता? पहलगाम हल्ल्यातील सीमेपलिकडून आलेेले दहशतवादी आधीच ओळखून त्यांना चमत्कारांनीच खतम केले असते. आपल्याला पाकिस्तानवर सर्जिकल  स्ट्राईक करायची वेळ आली नसती. भारताने १९६२, १९६५, १९७१ तसेच त्यानंतरचे कारगिल युध्द व आता मे ७ रोजी केलेल्या साऱ्याच लढाया व चढाया असोत की  संरक्षणार्थ आखलेल्या मोहिमा व त्यात कामी आलेले, जखमी झालेले सैनिक असोत...या साऱ्याची आवश्यकताच नव्हती. केवळ चमत्कारांनीच दिल्लीत बसून भारताच्या साऱ्या दुश्मनांना पाणी पाजले असते व यातले लोटाभर पाणी अमेरिकेच्या ट्रम्प तात्याच्या व चीनच्या ली केकियांगच्याही नरड्यात ओतून त्यांनासुध्दा गपगार करुन टाकले असते. पण तसे नसते. चमत्कारही नसतात. ज्यांना लोक चमत्कार समजतात तो सारा नजरबंदीचा, विज्ञानाचाच आधार घेऊन केलेल्या प्रयोगांचा खेळ असतो. चमत्कार, जादू, हातचलाखी, दृष्टीभ्रम, संमोहन यांच्यासाठी जादूगार लोक विविध सभागृहांतून पैसे घेत तिकीटे आकारुन शो लावतात. त्यांना मग हे सगळे व्याप करण्याऐवजी जादूने थेट पैसेच निर्माण करता आले नसते का, हा साधा प्रश्न आपल्याला पडायला हवा.

   तर ते असो. ‘दीप प्रज्वलन' हा आपल्याकडील अनेक कार्यक्रमांचा प्रारंभ बिंदू असतो. त्यासोबतच देवदेवता, महापुरुष यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करणे हाही एक भाग असतो. हे सगळे आपण इतरांनी केले म्हणून सहजपणे करत असतो. ‘त्या' कार्यक्रमात एका वक्त्याने उल्लेख केलेल्या एका उदाहरणाचा दाखला मला इथे द्यावासा वाटतो. आपल्याकडे सर्वसाधारणपणे हिंदु धर्मात व्यवती मृत्यु पावल्यानंतर तो मृतदेह स्मशानाकडे नेताना त्या व्यवतीच्या पुत्राच्या हातात दोरीला बांधलेले एक मडके दिले जाते. त्या मडवयात विस्तव असतो. त्या विस्तवाने म्हणे मृतदेहाला अग्नि देतात. माचिस, काडेपेटी, लायटर यांचे शोध लागण्यापूर्वी प्रेत स्मशानात नेले जात असताना सोबत अशा स्वरुपात अग्नि नेला जात असे. आता शांतपणे विचार केल्यास मडक्यातून नेल्या जाणाऱ्या अग्नीची उपयुक्तता तशी संपुष्टात आली आहे. कारण ज्वलनासाठी आवश्यक अशी साधने आता खिशात घेऊनही फिरता येणे विज्ञानाने शक्य करुन ठेवले आहे. तरीही आजही या सुपर कॉम्प्युटर युगातही ते विस्तव असलेले मडकेच सोबत नेले जात असते हेही पाहता येईल. तर पुन्हा तेही असो. अनेक कार्यक्रमांची सुरुवात दीप प्रज्वलनाविनाच केल्याचेही मी स्वतः पाहिले आहे.  लखलखत्या ट्युबलाईट्‌स, हॅलोजन लॅम्प्स, प्रखर झोताचे इतर दिवे यांच्या साक्षीने सादर होत असलेले अनेक कार्यक्रमही अनेकदा दीप प्रज्वलनाने सुरु होत असतात असेही आपण पाहात असालच. दक्षिण भारतीय मंडळींच्या कार्यक्रमांतील समया ह्या पाहण्यासारख्या असतात. मी काही समया जवळपास चार फूट इंचीच्या असल्याचेही पाहिले आहे. केरळमधील एका हॉटेलात अशा समईशेजारी उभे राहुन ती उंच की मी उंच असे म्हणत एक फोटोही काढला आहे. या मंडळींच्या समया उंच, लखलखीत, स्वच्छ तर असतात; पण अनेकदा त्यांना अतिशय सुंदर फुलमाळांनी सजवल्याचेही मी अनुभवले आहे. दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक राज्यांतील मंडळी हॉटेल व्यवसायांतही अन्य राज्यांमधून घट्टपणे पाय रोवून आहेत. त्यांच्या हॉटेलांच्या दर्शनी भागात कॅशियर बसतो त्याच्या डोवयावर अतिशय सुंदर, स्वच्छ धातूंच्या मूर्ती असलेेले देव्हारे व तेथे लावलेल्या समया, निरांजन वातावरण कसे प्रफुल्लित करुन टाकत असतात याचा मी अनेकदा अनुभव घेत असतो.

   दीप प्रज्वलनावरुन आठवले...विविध साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडाविषयक कार्यक्रमांच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले जाते. पाच ते सहा वाती असलेली समई तेल घालून तेथे ठेवलेली असते व मग आयोजक एक पेटलेली मेणबत्ती देऊन ‘प्रमुख पाहुण्यांनी आता दीप प्रज्वलन करावे' असे विनवतात. बऱ्याचदा पाहुणे दोन व वाती सहा असा प्रकार असतो. तर वाती सहा आणि मान्यवर दहा असेही पाहायला मिळते. आपल्याकडील काही जाचक रुढी परंपरा, प्रथा, चालीरीतींमुळे पती गमावलेल्या महिलांना सांस्कृतिक, सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांपासून दूर ठेवले जात असल्याचा अनुभव आहे. पतीच्या निधनात त्या महिलेचा कोणताही दोष नसताना तिला जणू ही शिक्षाच दिली जात असते. तिच्या हस्ते दीपज्वलन ? म्हणजे अब्रह्मण्यम! तौबा तौबा. जणू धर्मच आता बुडणार. सगळेच अशुभ होणार असा फालतू समज धर्माच्या काही एजंटांनी करुन ठेवला आहे. काही वर्षांपूर्वी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सावित्री मंच, नवी मुंबई यांच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाहुणा म्हणून मलाही विचारमंचावर निमंत्रण होते आणि सोबत मान्यवर पाहुणे, ववते होते त्यावेळी दै. महाराष्ट्र टाईम्सचे संपादक असलेले श्री. भारतकुमार राऊत, दै. नवाकाळच्या संपादक सौ. रोहिणी खाडिलकर-पांडे. त्या कार्यक्रमात दीप प्रज्वलनाचा बहुमान पती गमावलेल्या एका कोपरखैरणे येथील महिलेला देण्यात आल्याचे मी पाहिले. अतिशय देखणेपणाने तो कार्यक्रम सुविहितपणे पार पडला होता. यापासून प्रेरणा घेऊन मग मी वाशीमधील गुरव समाज सभागृहात आयोजित केलेल्या त्यावेळी मी संपादित करीत असलेल्या ‘वार्तादीप' साप्ताहिकाच्या वर्धापन दिन, पारितोषिक वितरण व स्पर्धकांना पुरस्कार वितरण समारंभाच्या ‘दीप प्रज्वलना'चा मान पति गमावलेल्या चार महिलांना तर दिलाच; पण त्यांना साडीचोळी देऊन त्यांच्याच अभिजनांच्या हस्ते सन्मानितही केले. याची दखल विविध वर्तमानपत्रांतून सातत्याने लिखाण करीत असलेल्या विविध पत्रलेखकांनी घेऊन अनेक वर्तमानपत्रांतून तशी पत्रं प्रसिध्दीस दिल्याचे मला ठळकपणे स्मरते.

   पूर्वी माणसाला शेपूट होते म्हणे. माकड हे मानवाचे पूर्वज असल्याचेही सांगितले जाते उत्क्रांतीच्या टप्प्यात मानवप्राण्याने अनेक शोध लावले. प्रगती साधली. त्यात शेपूट हा अवयव मानवासाठी निरुपयोगी ठरल्याने हळूहळू ते पारच गळून गेले. भारताबाबत बोलायचे झाल्यास तत्कालिन मानवसमुहांनी ‘त्या' काळच्या गरजांना अनुसरुन किंवा (वैज्ञानिक साधनांच्या अभावापोटी) अंधपणाने काही प्रथा, रुढी, परंपरा प्रचलित करुन ठेवल्या होत्या. बालविवाह, अनेक मुले जन्माला घालणे,  पति गमावल्यानंतर त्याच्या पत्नीचे केशवपन, सतीची प्रथा वगैरे वगैरे या त्यातल्याच प्रमुख होत. इंग्रज आले आणि त्यांनी  भारतीयांना शिक्षणाची गोडी लावली व त्यामुळे केवळ विशिष्ट अभिजन समाजच नव्हे, तर बहुजन समाजही शिकू लागला. या काही परंपरा किती टाकाऊ, घातक, भेदभाव निर्माण करणाऱ्या आहेत हे  शिकलेल्या समाजाच्या लक्षात येऊ लागले. मग जीवनाकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टीकोनच बदलून गेला. त्यावेळच्या भारतातील सतीची प्रथा नष्ट करण्यासाठी परवया इंग्रजांना कायदा करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराज तर भारतातले इंग्रजपूर्व काळातील राजे होते. त्यांनी आपल्या वडीलांच्या निधनानंतर आपल्या मातोश्री जिजाऊंना सती जाऊ दिले नाही. काय ही दूरदृष्टी आणि महिलांप्रतिची कळकळीची भावना! आज संपूर्ण देशातून सतीप्रथेचे जवळपास समूळ उच्चाटन झाले आहे. बाल विवाह बंदी करण्यात आली आहे, तर विधवा महिलांचे पुनर्विवाहही होऊ लागले आहेत. जाहीर कार्यक्रमांतून दीप प्रज्वलन करुन काय संदेश द्यायचा असतो? तर समाजातील वाईट चालीरीती, अंधपणाने पाळल्या जाणाऱ्या परंपरा, कालबाह्य रुढी नष्ट होवोत आणि साऱ्यांच्या जीवनात ज्ञानाचा, विज्ञानाचा प्रकाश पडो व त्यांचे जीवन सुकर, सुगम होवो हाच ना! हाच संदेश प्रत्यक्ष वर्तनातून, आचरणातून, कृतीतून दिला गेला तर तो त्या केवळ कार्यक्रमांच्या सभागृृहापुरता सांकेतिक स्वरुपात मर्यादित न राहता जनमानसात सर्वदूर झिरपायला मदतच होईल. महाराष्ट्र राज्याचे संस्थापक, मराठी मनाचे मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ६ जून रोजी असणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

सरकार तोऱ्यात, जनता स्वप्नाच्या घेऱ्यात!