सरकार तोऱ्यात, जनता स्वप्नाच्या घेऱ्यात!

आपल्या देशाचे नीती आयोगाचे ‘सीईओ' यांनी जाहीर केले आहे की, भारत जपानला मागे टाकून चार ट्रिलियन डॉलरची अर्थ व्यवस्था झाली आहे. म्हणजे आता आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. जपान तर मागे पडला, पण आता जर्मनीसुद्धा आपल्यापेक्षा फार पुढे नाही. असे असले तरी आपण व आपल्यातील सामान्य माणसाचे खिसे रिकामे आहेत. आपल्या देशातील गरीब माणसाकडे काम नाहीये. त्यांचे पोट भरत नाही. म्हणून ते ५ किलो रेशनच्या आधारावर जगत आहे. आपले कल्याणकारी भारत सरकार सांगते तशी स्थिती खरोखरच आहे का?

 नुकताच संपलेल्या मे महिन्यात भारत सरकारने २ लाख कोटीपेक्षा जास्त रवकम ‘जी एस टी' तून कमावली असल्याची फुशारकी सरकारने मारली, लोकांना हातोहात फसवले. कारण अशी आकड्यांची चमक प्रत्यक्षातील विकासाची नसते हेच खरे, सरकारचे म्हणणे खरे असते तर भारतातील लाखो लोक भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी का जात आहेत? ते भारताचे नागरिकत्व का सोडत आहेत. नोकरीसाठी सगळीकडे का भटकत आहेत? भारतात ते बेरोजगार आहेत. म्हणून युध्दग्रस्त इस्त्राईलला, युक्रेनला का जात आहेत आणि आता तर अफगाणिस्थानलाही जात आहेत. कारण त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. फुगवलेल्या किंमतीच्या आधारे सरकारला जी एस टी तून पैसा मिळत आहे, त्यानुसार सरकारचा अंदाज आहे की २०२६ मध्ये जीडीपीत ४ हजार अब्ज डॉलरने वाढ होईल, तशी सरकारची अपेक्षा आहे.

भारत सरकार जपानशी तुलना करत आहे, पण जपान आणि भारत यांच्यात लोकसंख्येच्या बाबतीत जमीन-अस्मानचा फरक आहे. सध्याची भारताची लोकसंख्या १४२ कोटीच्यावर आहे, तर जपानची लोकसंख्या मात्र १२ कोटी आहे. भारताचे क्षेत्रफळ ३३ लाख चौरस किलोमीटर आहे; तर जपानचे क्षेत्रफळ पावणेचार लाख चौरस किलोमीटर आहे. भारताचे प्रतिव्यवती उत्पन्न २४८ यु एस डॉलर आहे. तर जपानचे प्रतिव्यक्ती  उत्पन्न अंदाजे ३४००० युएस डॉलर आहे. ज्या देशात ८२ कोटी लोक ५ किलो मोफत धान्यावर जगत आहेत त्या देशात आपण चौथ्या क्रमांकावर असू किंवा पहिल्या क्रमांकावर असू त्याला काही अर्थ नाही.

२०१४ पूर्वी देशावर ५७ लाख कोटीचे कर्ज होते तर २०१४ नंतर देशावर २५२ लाख कोटीचे कर्ज आहे. तरीही आम्ही म्हणतो देशाची अर्थव्यवस्था संपन्न आहे. खरंतर सध्या तरी देशाची अर्थव्यवस्था वाढलेली नसून फक्त मोजवयाच लोकांच्या संपत्तीत ५३६% वाढ झाली आहे. खरं तर ती त्यांची खाजगी संपत्ती आहे, त्यात देशाचा फायदा काय? देशात गरीबांच्या संपत्तीत नव्हे, तर गरीबीत सतत वाढ सुरूच आहे.

देशात विविध सरकारांनी निरनिराळ्या योजना आणल्या. त्यात देशहिताचाच भाग असायचा; पण सध्याच्या सरकारने योजना आणताना देशाच्या योजना न संबोधता, त्यांना मोदीच्या योजना म्हणूनच घोषित होतात व त्यांचाच उदो उदो करण्यात येतो. सरकारमधील जवळपास सर्वच मंडळी फक्त  मोदीच्या नामाचाच गजर करीत आहेत आणि त्यांचे चेले-चपाटे व अंधभक्त मंडळी त्यास दुजोरा देतात. याचाच फायदा घेत मोदी लोकांना नवनवीन घोषणात फसवून जनतेला मुख्य विषयापासून दूर ठेवतात. पण अशी फसवेगिरी सतत चालत नाही, फसवणारा कधी ना कधी फार मोठ्या अडचणीत सापडतो तो सापडतोच. या बाबतीत जातक कथेत एक गोष्ट आहे ती तंतोतंत सध्याच्या स्थितीला उजाळा देणारी आहे.   

एक होते गाढव. त्याला भेटला एक कोल्हा. कोल्हा त्याला म्हणाला, ‘आपण दोघे मैत्री करूया' गाढव म्हणाले, ‘अरे मी शहरात राहणारा तर तू जंगलात राहणारा. आपली मैत्री कशी होऊ शकेल?' कोल्हा म्हणाला, ‘त्यात काय हरकत आहे. तू मला शहरातल्या काेंबड्या, बकऱ्या कोठे आहेत ते दाखव. मी तुला जंगलातल्या गवताळ जागा दाखवीन.' गाढव तयार झाले.

गाढव आणि कोल्ह्याची मैत्री झाली आणि ती काही दिवस चांगली राहिली. एक दिवस कोल्हा गाढवाला म्हणाला, ‘चल, मी तुला जंगलातले उत्तम गवताचे ठिकाण दाखवतो' गाढव तयार झाले. कोल्हा गाढवाला घेऊन जंगलातील गवताळ रानात गेला. गाढव आरामात गवत खात राहिले. कोल्हा एका बाजूला उभा होता. तोच त्याला समोरच्या झाडीत एक सिंह दिसला. सिंहाला पाहून कोल्ह्याला वाटले आता आपली धडगत नाही. हा सिंह मला मारल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याला एक युक्ती सुचली. तो सिंहाजवळ गेला व म्हणाला, ‘हे जंगलाच्या राजा, मी तुमच्यासाठी समोर चरत असलेले गाढव आणून देऊ शकतो. तुम्ही त्याला मारा. आपण दोघे त्याच्यावर ताव मारू.' सिंह तयार झाला.

कोल्हा गाढवाजवळ गेला व म्हणाला, ‘चल मित्रा, तुला यापेक्षा ही छान गवत असलेली जागा दाखवतो.' गाढवाने होकार दिला ते चालू लागले. वाटेत एका ठिकाणी मोठा खड्डा होता. कोल्ह्याने गाढवाला खड्यात ढकलून दिले. गाढवाला खड्याबाहेर येता येईना, कोल्ह्याने सिंहाला बोलावले आणि मोठ्या दिमाखात गाढव दाखवले व सांगितले, ‘महाराज आता करा गाढवाची शिकार' असे बोलून कोल्हा गाढवाकडे छद्‌मीपणाने पाहत हसत राहिला.

सिंहाने गाढव पाहिले, त्याने उडी घेतली पण ती सरळ कोल्ह्याच्या अंगावर. आधी त्याने कोल्ह्याचा फडशा पाडला आणि नंतर गाढवाचाही. सारांश काय? तर फसवणारा स्वतःसाठी संकट ओढवून घेतो. असाच काहीसा प्रकार देशात सुरूआहे. मोदी साहेबांनी विविध पक्षातील कलंकितांना, भ्रष्टाचाऱ्यांना, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांचाच फडशा पाडण्याची चाल खेळत आहेत. हे काम फक्त राजकारण्यापर्यंतच मर्यादित राहिले नाही. तर दलित, पिडीत लोकांसह बेरोजगार, असंघटीत कामगार शेतकरी, छोटे-मोठे कारखानदार, लहानसहान दुकानदार यांना टार्गेट करून विविध प्रकारची प्रलोभने दाखवून जंगलातील हिरवळीप्रमाणे दिसणारी स्वप्ने दाखवली व वेळ येताच त्यांना खड्यात ढकलून दिले आहे व शिकारीसाठी आर एस एसच्या दावणीला बांधले आहे.

भारतीय जनतेची सध्या ससेहोलपट सुरू केली आहे. नेते मंडळी आपला हेतू साध्य करण्यासाठी जनतेचा बळी देण्याचे कपट कारस्थान करीत आहेत. लोकांची स्थिती खड्यात पडलेल्या गाढवासारखी झाली आहे. ते आंकाताने ओरडत आहेत, त्यांना मदत करणाऱ्यांची गरज भासत आहे.

आताचे केंद्रातील सरकार व त्यांचे इतर राज्यातील डबल इंजिनवाले सरकार मतदारांना मते मागतांना विविध भुलावणी देणारी व आशादायी स्वप्ने दाखवतात आणि निवडून आल्यावर काही काळ ती पूर्ण करण्यासाठीचे सरकारची उचललेली पावले दाखवतात, मात्र काही दिवसांतच त्यातील अडचणीचा पाढा वाचत लोकांची दिशाभूल करून लोकांना फसवतात. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘लाडकी बहीण योजना' या अंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा १५०० रूपये देण्याची योजना मतदानावेळी दाखवली या अंतर्गत फवत महाराष्ट्रात दोन कोटीच्यावर महिलांनी या योजनेच्या लाभसाठी अर्ज केले त्यापैकी बहुतांश अर्ज मंजूर करून त्यांना लाभही देण्यात आला. आता त्यात विविध प्रकारच्या अटी आणि शर्ती घुसडण्यात आल्या त्या अटींचा लाभ घेत अनेक महिलांच्या अर्जातील तुटीची छाननी करून अनेकीची नावे योजनेतून वगळण्यात आली व त्यांचा लाभ बंद करण्यात आला. काहीजणींच्या लाभाची परत वसूली करण्याचे संकेतही देण्यात आले.

मोदींनी बेकार तरूणांना दरसाल दोन कोटी रोजगार देण्याचे अभिवचन दिले, मात्र दोन कोटी रोजगार देणे दूरच; पण असलेले रोजगारही धोक्यात आणले, नोटबंदीच्या नावाखाली राबवलेल्या योजनेने लाखो लहान-सहान कारखाने बंद पडले व काही कोटीच्या घरात रोजगार गेले.

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याचे वचनही फोल ठरले, उलट पूर्वीच्या मिळणाऱ्या दरातही घट करण्यात आली, त्यामुळे लाखो शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येच्या थराला गेले. अनेकांनी आत्महत्याही केल्या व करत आहेत. महिलांच्या सबलीकरणाच्या गोष्टी केल्या, प्रत्यक्षात त्यांना अबला बनवण्यात सरकारला यश आले आहे. महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. रक्षकच भक्षकाची भूमिका निभावत आहेत. एवढी सगळी ‘उलटी गंगा' वहात असतांना सरकार मात्र आपलीच पाठ थोपटून घेत आहे.

काही अंधभवत मंडळी अशा स्थितीतही भानावर येत नाही, सरकारच्या नाकर्तेपणालाच प्रगतीचे पर्व मानू लागले आहेत. म्हणूनच एका शायराने म्हटले आहे.

‘रात बीती, पर सुबह टलने लगी
एक नकली रोशनी छलने लगी
जो मशाले उजाले का पर्याय थी
वो जलाने का काम करने लगली!'
-भिमराव गांधले 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

त्यापेक्षा कोरडी भाकरी जास्त चांगली