ये दिल संभल जा जरा

दिल म्हणजे हृदय. दिल म्हणजे मन, भावना, प्रेम, करुणा, आकर्षण किंवा कोणावर असलेली आपुलकी. आपण सहज मदत मिळाल्यावर म्हणतो ना, त्याचं दिल खूप मोठं आहे, तो खूप दयाळू आहे. ह्या दिलाला जपणं फार आवश्यक आहे. ह्याला बऱ्याचदा ठेचसुद्धा लागत असते. तेंव्हा ते जख्मी होतं, तुटतं; पण दिसत नाही; मात्र घायाळ झालेलं असतं. हे असं का होतं? तर आपण दुसऱ्यावर विश्वास ठेवतो म्हणून.

एक डाकू होता. तो खूपच क्रूर होता. त्याची खूपच दहशत होती. त्याचा खूपच दरारा होता. त्याला लोक खूपच घाबरायचे. त्या डाकूकडे खूप मोठी संपत्ती होती. तो खूपच श्रीमंत होता. त्याच्याकडे गडगंज संपत्ती होती. जिकडे-तिकडे त्याच्या नावाची चर्चा होती. एवढ्या सर्व त्याच्याकडे सुखसोयी असूनसुद्धा तो नाखूश होता, नाराज होता. तरी त्याच्याकडे सुख, चैन, शांती नव्हती. तो खूपच बेचैन होता.

तो एक दिवस फिरता-फिरता एका चित्र प्रदर्शनामध्ये गेला.. त्याला लहानपणापासूनच फारच चित्रकलेची आवड होती. चित्र प्रदर्शनामध्ये खूपचं चांगले चित्र होते. त्या चित्राकडे बघून तो डाकू खूपच प्रभावित झाला होता. त्याला चित्रकाराला भेटण्याची खूपचं इच्छा झाली. तो चित्रकाराला भेटला. त्याने सर्वप्रथम चित्रकाराचे चांगले चित्र काढल्यामुळे खूपच कौतुक केले, अभिनंदन केले व त्याने आपल्या मनातील खंत व्यक्त केली, दुःख व्यक्त केले. त्याने चित्रकाराला असे सांगितले की, "मला असे चित्र काढून दे की त्याला बघितल्यानंतर आनंद होईल. मन प्रसन्न होईल. मनाचा भार हलका होईल. त्या चित्राकडे बघितल्यावर देवाचे दर्शन झाल्याचा आनंद मिळाला पाहिजे.” तो डाकू एका  महिन्यानंतर परत भेट देईन असे सांगून तो गेला.

आता चित्रकार मोठ्या चिंतेत पडला असे कोणते चित्र काढावे म्हणजे ही व्यक्ती खुश होईल. बरं ही व्यक्ती डाकू असल्यामुळे त्याची दहशत होतीच; त्यामुळे त्या चित्रकारावर एका वेगळ्या प्रकारचा ताण आला होता तोसुद्धा एका तणावातून जात होता. हा तणाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. काय, कोणते आणि कसे चित्र काढावे ?

खूप विचार केल्यानंतर चित्रकाराच्या डोक्यात कल्पना सुचली आणि ती त्याने चित्ररूपाने उतरवली. खूप सुंदर असे चित्र त्या चित्रकाराने काढले. सगळा जीव, जिव्हाळा, प्रेम, आत्मीयता त्याने चित्रात ओतली होती. चित्र चांगले निघाल्यामुळे चित्रकार खूपचं समाधानी होता. ते चित्र त्याने त्याच्या दालनात प्रदर्शनासाठी ठेवले होते.

एक महिना संपला आणि तो डाकू ठरल्याप्रमाणे आला आणि त्याने चित्रकाराची भेट घेतली आणि चित्राबद्दल विचारले. चित्रकाराने चित्र तयार असल्याचे सांगितले आणि त्या झाकलेल्या चित्राचे कापड काढून चित्र बघण्यास सांगितले. तो गुंड त्या चित्राकडे गेला आणि त्याने त्या चित्रावरचा कापड बाजूला केला आणि तो एकटक त्या चित्राकडे बघत राहिला. चित्रकाराने सांगितले महाराज हेच ते चित्र आहे ज्यामध्ये तुम्हाला सुख शांती, आनंद, प्रेम आणि परमेश्वर नक्कीच मिळेल. काही वेळ त्या गुंडाने एकटक चित्राकडे बघितल्यावर तो रडायला लागला. चित्रकार एकदम तणावात आला. चित्रकाराने एका निरागस मुलाचे सुंदर चित्र काढले होते. चित्रकाराने म्हटलं, ”महाराज काय झाले आवडले नाही का चित्र?” गुंड काही वेळ स्तब्ध झाला आणि परत एकदा ढसाढसा रडायला लागला आणि म्हणाला.. "अरे हे तर माझेच लहानपणीचे चित्र आहे, माझाच फोटो आहे. मला हे चित्र खूपच आवडले.” छान चित्र काढल्याबद्दल त्याने चित्रकाराचे खूप खूप आभार मानले. तो गुंड चित्रकाराला म्हटला, "बघ चित्रकार, मी किती चांगला होतो. निरागस, गोंडस आणि प्रेमळ सुद्धा आणि बघ आता कसा झालो. मी बालक होतो तेव्हा माझ्यात परमेश्वर, दया, करुणा, शांती आणि प्रेम वास करीत होते आणि बघ आता मी कसा झालो.  माझ्याकडेच प्रेम, करुणा, शांती होती आणि आता तेच मी इतरत्र शोधत आहे. हे असं का झालं तर माझ्यावर झालेल्या सहवासामुळे, संस्कारामुळे मी जन्माला आलो तेव्हा मी कसा होतो. मला भेदभाव  जात-पात, धर्म काहीही माहित नव्हतं. माझं हृदय अगदी स्वच्छ होतं. माझं दिल एकदम चांगलं होतं. मी कोणावरही सहजपणे विश्वास ठेवत होतो. मला चांगले वाईट काहीच कळत नव्हते. मला सगळे चांगलेच वाटायचे. मी सगळ्यांवर विश्वास ठेवला जे काही इतर करत होते ते मी करत होतो. ते मला वाटले इतर सर्व करतात ते सर्व चांगलेच आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवत गेलो आणि एक कुख्यात गुंड कधी झालो कळले सुद्धा नाही. मी तर एक निरागस, गोंडस बालक परमेश्वरच रूप होतं. मी माझ्या मित्रांवर विश्वास ठेवला चोऱ्या करू लागलो, मारामारी करू लागलो, लूटमार करू लागलो, कारण की, माझ्या दिलाने ह्या मित्रांवर, समाजावर विश्वास ठेवला.”

बस, असंच काहीस  मित्रहो आपल्यासोबत असतं. आपण कधी नकळत ह्या जाळ्यात अडकतो आपल्याला कळतसुद्धा नाही. आपण विश्वास ठेवतो आपले दिल त्याच्यावर बिनधास्त भरवसा ठेवते. आपण लहान असतो आपल्याला सर्व चांगलेच वाटतात. आपले बालपण बघा कसे निरागस असते. आपल्याला कोणावरही संशय येत नाही. आपले शालेय जीवनसुद्धा फार चांगले असते. जसजसे आपण मोठे होतो तस तसा अनुभव आपल्याला वेगवेगळा येत असतो व ज्या-ज्या वातावरणात, सहवासात आपण वावरतो. आपल्यावर तसे परिणाम होतात व आपण त्याप्रमाणे होतो.

आपल्या जीवनात आपल्याला असे बरेच अनुभव येतात की आपण त्याच्यावर सहज विश्वास ठेवतो आणि आपला विश्वासघात होतो. बऱ्याचदा आपल्याला व्यावहारिकदृष्ट्यासुद्धा चाट बसलेली असते. बरेचदा आपल्या जवळचे मित्रसुद्धा पलटी मारतांना आपल्याला अनुभव येतात. तरुणाईमध्ये सहज प्रेम होतं आणि नंतर ब्रेकअपसुद्धा. हेसुद्धा प्रथम विश्वास ठेऊन प्रेम केले जाते आणि नंतर प्रेमाची ताटातूट होते असं बऱ्याचदा वाचण्यात येतं. राजकारणी मंडळी पलटी मारण्यासाठी फारच एक्स्पर्ट असतात. सकाळी ह्या पक्षात तर संध्याकाळी दुसऱ्या. युटर्न मारण्यात ते फारच वस्ताद असतात. काडीचाही भरवसा यांच्यावर ठेवला जात नाही. मुळात, जन्मतः माणूस हा खूपचं चांगला आहे. तो पटकन विश्वास ठेवतो. तो भोळाभाबडा असतो. बाबा, महाराज, भोंदू महाराज यांच्या भुलथापांवर सुद्धा ते  विश्वास ठेवतात पण नंतर मात्र फसले जातात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बघाना अगदी सहज विश्वास ठेऊन ओ.टी.पी. देतात, लिंंक शेयर करतात. काही रक्कम पाठवा म्हटलं की लगेच पाठवतात आणि हा विश्वास ठेवल्यामुळे बऱ्याच जणांना आर्थिक भुर्दंड बसलेला आहे हे आपल्या निदर्शनात आले आहे.

दिल म्हणजे हृदय. दिल म्हणजे मन, भावना, प्रेम, करुणा, आकर्षण किंवा कोणावर असलेली आपुलकी. आपण सहज मदत मिळाल्यावर म्हणतो ना, त्याचं दिल खूप मोठं आहे, तो खूप दयाळू आहे. ह्या दिलाला जपणं फार आवश्यक आहे. ह्याला बऱ्याचदा ठेचसुद्धा लागत असते. ते दिल बरेचदा जख्मी होतं, तुटतं पण दिसत नाही; पण बऱ्याचदा घायाळ झालेलं असतं.

हे असं का होतं ? तर आपण दुसऱ्यावर विश्वास ठेवतो म्हणून. पण आता वेळ आली आहे ती ही की, "ये दिल संभल जा जरा, क्यों मोहब्बत करने चला है तू” म्हणण्याची.
नाही तर मग आपल्यावर वेळ येईल, "दिल लेना खेल है दिलदार का, हो भुले से नाम लो प्यारका, प्यारभी झूठा, यारभी झूठा, देखो मुझको दिलवालो हा खाया है मैने धोखा प्यारका” म्हणून म्हणावेसे वाटते ”ये दिल संभल जा जरा..........”.
-अरविंद सं. मोरे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

कीर्तिवान! पुण्यवान