राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  

अहिल्याबाई होळकर म्हणजे तुम्हां आम्हां सर्वांच्या मनात असणारी ती प्रतिमा की ज्यात सात्विकता, सुशीलता, शितलता, पवित्रता, पुण्यता, चारित्र्यसंपन्नता, धर्मपरायणता, हातात शंकराची पिंड घेतलेली निस्सिम शिवभक्तीनी, जिच्या डोईवरचा पदर कधी  ढळला नाही आणि काळजातला धीर कधी खचला नाही. अशा या लोकमाता, राजमाता, खऱ्या अर्थाने मानव धर्माच्या उपासक अहिल्यादेवींचे हे चित्र आज तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात कोरलेले आहे.

 अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्ताने त्यांच्या जन्मस्थानी अहिल्यानगर मधील चौंडी या गावी मंत्रिमंडळाची बैठक झाली. सर्व शासकीय कागदपत्रांवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे बोधचिन्ह वापरण्याच्या निर्णयासहित त्यांच्या त्रिशताब्दी वष्राानिमित्त अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. स्त्रीला तिची स्वप्ने, भावभावना, इच्छा, आकांक्षा, विचार असतात. तिचे हे अस्तित्व जाणणारा शिक्षित पुरुष भेटला तर गार्गी, मैत्रेयी, झाशीची राणी, जिजाबाई, इंदिरा गांधी निर्माण होतात.

 १८ व्या शतकात त्यावेळच्या पुरुषी मक्तेदारी व मानसिकतेवर प्रहार करणारे एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाईंचा जन्म ३१ मे १७२५ अहमदनगर जिल्ह्यात चोंडी या गावी झाला. वडील माणकोजी शिंदे आई सुशीलाबाई गावातील एक सुसंस्कृत कुटुंब होते. अहिल्या आठ वर्षाची असताना चोंडी गावाजवळ  मराठी सैन्याचा तळ पडला होता. त्यामध्ये श्रीमंत पेशवे थोरले बाजीराव, सुभेदार मल्हारराव होळकर आणि इतर लहान-थोर मंडळी होतीच. तेथे जवळच असलेल्या शिव मंदिरात संध्याकाळच्या वेळी आठ वर्षाची अहिल्या दिवाबत्ती करत असल्याचे सुभेदार मल्हारराव होळकर व श्रीमंत पेशवे थोरले बाजीराव यांनी बघितलं. त्या मुलीची निडरता, धारिष्ट्य, एकाग्रता, कामाप्रती असलेली निष्ठा बघून श्रीमंत पेशवे थोरले बाजीराव यांनी सुभेदार मल्हारराव होळकर यांना सुचवले की त्यांनी त्यांच्या मुलासाठी म्हणजेच खंडेरावसाठी तिच्या वडिलांकडे मागणी करावी. त्यानुसार श्रीमंत पेशवे थोरल्या बाजीरावांच्या  पुढाकाराने इ. स. १७३३ मध्ये अहिल्या आणि खंडेराव यांचा विवाह थाटामाटात पार पडला. पुढे मल्हाररावांनी अहिल्येची बुध्दिमत्ता, गुणवत्ता पाहून आपल्या मुलाच्या बरोबरीने सुनेलाही राज्य कसे चालवावे, घोडा कसा फेकावा, तलवार कशी चालवावी, धार कशी लावावी, तोफखाना कसा वापरावा, न्यायनिवाडा कसा करावा, लोकांना मदत कशी करावी, माणसे कशी पारखावीत, गनिमी कावा कसा करावा, धनुष्यबाण कसा चालवावा, भात्यामध्ये बाण कसे भरावेत यासारख्या अनेक गोष्टींचे शिक्षण दिले.

  संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर मुघल बादशहा औरंगजेबाने मराठी सरदारांना देऊ केलेल्या वतनाच्या लोभातून मराठी राज्य वाचविण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी पुन्हा वतनदारी, जहागीरी सुरू केली. पुढे छत्रपती शाहूंच्या कालखंडात ती तशीच सुरू राहिली. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथांनंतर पेशवे पदाची वस्त्रे पहिल्या बाजीरावांकडे आली. त्यांच्या चाणाक्ष व रत्नपारखी नजरेने मल्हाररावांमधील वेगळेपण ओळखले आणि माळव्याची मोठी जबाबदारी व सरंजाम मल्हाररावांकडे सुपूर्त केला. मल्हारराव अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेले. लहानपणीच वडील खंडोजी व आई जिवाईचे निधन झाले होते. मामा भोजराज यांच्याकडे लहानाचे मोठे झालेले. भोजराज पेशव्यांचे सरदार कदमबांडेंकडे होते. त्याच कदमबांडेंकडे मल्हारराव यांनीही सैनिक म्हणून सुरुवात केली. मल्हारराव म्हणजे एक ओजस्वी, तेजस्वी, रांगडं पण मायाळू व्यक्तिमत्व. त्यांनी आपली पत्नी म्हणजे मामाची मुलगी गौतमीलाही बरोबरीने शिक्षण दिले व अधिकारही दिले. युद्धकाळातही सैन्य व्यूहरचना करताना आधी गौतमीबाईंचा व नंतर सुनबाई अहिल्यादेवींचाही सहभाग असे. युद्धात राखीव सैन्याचे महत्त्व अहिल्यादेवी जाणत होत्या. इतकेच नाही तर मराठ्यांकडे असलेल्या अनेक  मनसबदारांपैकी केवळ मल्हाररावांची पत्नी गौतमीबाईंच्या नावाने स्वतंत्र खाजगीतील दौलत पेशव्यांकडून देण्यात आली होती. ही खाजगीतली दौलत गौतमीबाईंकडून पुढे तशीच अहिल्यादेवींकडे आली आणि होळकरांना दोन प्रकारच्या खाजगी दौलतीचा हिशेब ठेवावा लागत होता. एक मल्हाररावांच्या पत्नीकडे असलेल्या खाजगीतली दौलतीचा आणि सुभेदार मल्हारराव म्हणून त्यांच्याकडे मराठा साम्राज्याचा प्रतिनिधी म्हणून आपल्या सैन्याच्या दाणापाण्यासाठी मिळालेल्या सरंजामाचा.

 इ. स. १७५४ मध्ये कुंभेरीच्या वेढ्यात खंडेराव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी अहिल्यादेवींना दोन मुलं होती. त्या सती जायला निघाल्या. पण सासऱ्यांच्या आग्रहाने त्या सती गेल्या नाहीत. पुढे काळाच्या ओघात सासुबाई गौतमीबाई, इ. स. १७६६ मध्ये सासरे मल्हारराव, मुलगा भालेराव, व नातू नाथोबा, जावई यशवंतराव फणसे यांचे निधन झाले. मुलगी मुक्ता सती गेली. वैयक्तिक आयुष्य प्रचंड दुःखाचे असले तरी तब्बल २९ वर्ष अहिल्यादेवींनी रयतेचे अश्रू पुसत एकहाती राज्य केले. दुःखाचे डोंगर समोर असतानाही होळकरांचे दिवाण गंगाधर चंद्रचूड यांच्या सल्ल्यानुसार रघुनाथराव पेशवे यांचे आक्रमण अहिल्यादेवींनी मोठ्या चतुराईने परतवून लावले. ते ऐतिहासिक वाक्य तुम्हांआम्हां सर्वांना माहित आहे.. "मी हरले तर  फारसा फरक पडणार नाही, पण आपण मराठी सत्तेचे अटकेपार झेंडे गाडणारे बाईकडून पराभूत झालात तर तुमची सर्वत्र अपकीर्ती, अवहेलना आणि कुचेष्टा होईल.” यातील राजकारण रघुनाथरावांच्या लक्षात येताच त्यांनी सैन्याला माघारी पाठवले व मी युद्धाला नाही तर आपल्यावर आलेल्या दुःखाच्या सांत्वनाला येत आहे. असा निरोप पाठवला. हे सर्व जरी माहित असले तरी आज तुम्हां आम्हां सर्वांना अहिल्याबाई आठवतात, लक्षात राहतात त्या त्यांच्या सामाजिक कार्यामुळे. काठमांडूपासून कन्याकुमारीपर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत अखंड भारतामध्ये अनेक ठिकाणी अहिल्यादेवींनी केलेल्या कार्याचे दाखले मिळतात. ठिकठिकाणी  विहिरी, घाट, मठ, मंदिरे, पाणपोया, अन्नछत्रे, अन्नशाळा, धर्मशाळा, संस्कार वर्ग, आश्रम शाळा, ग्रंथागार, यज्ञशाळा, यज्ञकुंड, तलाव हे सर्व लोकांच्या सोयी सुविधेसाठीच. हे बनविण्यासाठी लागलेला पैसा हा त्यांनी त्यांच्या खाजगीतील संपत्तीमधून केला. याशिवाय अनेक जुन्या मंदिरांचा जिर्णोद्धारही केला. त्यांच्या मते "ईश्वराने मला हे राज्य करण्याची जबाबदारी दिली आहे आणि याचे उत्तर मला ईश्वरालाच द्यायचं आहे” म्हणूनच त्यांना पुण्यश्लोक या उपाधीने जनतेनेच सन्मानित केले. अहिल्यादेवींच्या या धोरणाचा परिणाम म्हणूनच माळवा प्रांतात शांतता, स्थैर्य, व्यापार, उद्योगधंद्यांचा विकास झाला.परकीय आक्रमणे किंवा दुष्काळ या कालखंडात शेतकऱ्यांना शेतसारा माफ असे. महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच अहिल्याबाईंनी शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक ते सर्व बी-बियाणे व साहित्य उपलब्ध करून दिले. धनसंपत्ती दिली नाही. पण कोणी उपाशी राहणार नाही याचीही काळजी घेतली. राज्यातील जमिनीचे पाच भाग केले व एक भाग हा तेथील जनावरांसाठी राखून ठेवला. थोडक्यात अहिल्याबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच प्रजाहितदक्षतेचे राज्य केले.

 देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी चार ज्योतिर्लिंगांची निर्मिती अहिल्याबाईंनी करुन  इतर सर्व ज्योतिर्लिंगांना नवे रूप प्राप्त करून दिले. धर्मशास्त्र, युद्धशास्त्र, कला, नीती, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, भाषा, नवीन कायद्यांची निर्मिती यावर अहिल्याबाईंनी काम केले. सोमनाथांचे मंदिर बांधले. असं म्हणतात की साधारणतः ११००० मंदिरे बांधण्यात किंवा त्यांचा जीर्णोद्धार करण्यात अहिल्यादेवींचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी कुंभमेळ्यास राजाश्रय दिला. वेद पाठशाळाही सुरू केल्या. देशभर रस्ते बांधले. कलकत्ता ते काशी असा हमरस्ता तयार केला. रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावली. यातूनच असंख्य लोकांना रोजगार मिळाला. देशभरातील प्रतिभा संपन्न कारागीरांना माहेश्वरीत आमंत्रित केले. माहेश्वरी साडी उद्योग निर्मितीचे व विविध उद्योगाचे केंद्र बनले. पुढे माहेश्वरी ही व्यापारी पेठ म्हणून नावारूपाला आले. कलाकारांना राजश्रय दिला. अहिल्यादेवींनी ही कामे करताना स्थानिक सत्ता कोणाचीही असली तरी तेथील राजसत्तेशी संवाद साधत मंदिरे बांधण्याची कामे पूर्णत्वास नेली. औरंगजेबाने काशी विश्वेश्वराचे मंदिर तोडून मस्जिद बांधली होती. स्थानिक नवाबाशी चर्चा करून अहिल्यादेवींनी तेथे त्याच्याच बाजूला काशी विश्वेश्वराचे पुन्हा मंदिर बांधले. काशीला विद्यालय बांधले. धर्मशास्त्र, खगोलशास्त्र, व्याकरण, गणित या विषयांचे पंडित त्या ठिकाणी नेमले. त्यांनी भीमाशंकराचे मंदिर बांधले. जेजुरीला खंडेरायाच्या मंदिराचा जिर्णोद्धार केला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजही अहिल्यादेवींनी सुरू केलेल्या सर्व कामांसाठी लागणारा खर्च हा होळकरांच्या ट्रस्ट  मधून केला जातो. ब्रिटिश आमदनीतही तो याच पद्धतीनेच सुरू होता.

याशिवाय राज्यात हुंडाबंदी केली. सती प्रथा कायद्याने बंद केली. शाहिरांना प्रोत्साहन दिले. लावणीतही भक्ती आणली. विविध कलांना उत्तेजन दिले. कवी मोरोपंत अहिल्यादेवींच्या राजदरबारात होते. केदारनाथ, रामेश्वरला अहिल्यादेवींनी धर्मशाळा बांधली.  या देशात पहिला सामूहिक विवाह सोहळा अहिल्यादेवींनी घडवून आणला. आज पाकिस्तानात असलेल्या कराचीजवळ शिवमंदिर बांधले तर काठमांडूमधील पशुपतिनाथाच्या मंदिराचाही जीर्णोद्धार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाप्रमाणेच अहिल्यादेवींच्या कालखंडात शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ नाही आली.  राज्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू होता. अहिल्यादेवींनी घोषणा केली "जो कोणी या दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल त्याला माझी मुलगी पत्नी म्हणून देईन आणि त्यानुसार यशवंतराव फणसे नामक युवकाने दरोडेखोरांचा बंदोबस्त केला आणि अहिल्यादेवींनीही दिलेल्या शब्दाप्रमाणे आपली मुलगी मुक्ता हिचा त्याच्याशी जात, धर्म, पंथ याचा विचारहीन करता विवाह लावून दिला. राज्याच्या सीमेवर असणारे दरोडेखोर रामोशी, गौंड, भिल्ल या आदिवासींना विश्वासात घेऊन त्यांना राज्याच्या सीमावर्ती भागात सीमांचे रक्षणकर्ते बनविले. त्यांच्यासाठी भिलकवडी नामक कर सुरू केला. त्यांना नियमित वेतन सुरू केले. जे नागरिक हे काम करू शकत नव्हते त्यांना तेथील जमिनी कसण्यासाठी आपापसात वाटून दिल्या व उत्पन्नाचा एक भाग सरकारात जमा करण्यास सांगितले. अहिल्यादेवींची राहणी अतिशय साधी होती. सतत सफेद वस्त्र परिधान केले. कधीही अलंकार वापरले नाहीत; पण समस्त भारताला आपल्या कामाने अलंकारिक करून सोडले. माहेश्वरीत एका घोंगडीवर बसून त्या राज्यकारभार करीत. कोणत्याही प्रकारचा ऐशारामी  डामडौल नव्हता. रोज पहाटे पाच वाजेपासून त्यांच्या कामाला सुरुवात होई तर संध्याकाळी उशिरापर्यंत कामे सुरू असत.
-प्रा. प्रशांत पुंडलिक शिरुडे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण संस्थांची गरज!