नरकातला स्वर्ग : सर्व थरातील वाचकांनी वाचावे असे पुस्तक

रोज मर्मभेदी मुलाखती, पोलखोल कार्यक्रम, झंझावाती सभा, सच्चाईचे प्रखर लेख, सडेतोड संपादकीय यामुळे राऊत यांना जेलमधे जावे लागले हे या पुस्तकातून आपणास कळते. या आताच्या लोकशाहीत हे पुस्तक मी मागवून वाचतोय हे सांगताच अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. हे पुस्तक माझ्याकडे चक्क सरकारी धाड पडणार की काय, अशी गंमतीशीर कल्पना माझ्या मनात चमकून गेली. हे पुस्तक वाचनीय आहे. कारण ते अस्सल अनुभवांवर आधारित आहे. सर्व थरातील लोकांनी ते वाचले पाहिजे.

 पत्रकार तथा दै.सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे बिनधास्त वक्तव्यासाठी देशभर प्रसिद्ध आहेत. ते संसद सदस्यदेखील आहेत. बेधडक बोलणा-या माणसावर सव्रााधिक संकटे येतात हे आपण ऐतिहासिक काळापासून पहात, वाचत आलो आहोत. संजय राऊत या पुस्तकातील मनोगतात लिहितात की ‘मी कधी डायरी लिहिली नाही. त्यामुळेच हे पुस्तक म्हणजे माझी जेल डायरी नाही. ८ ऑगस्ट रोजी मी ऑर्थर जेलमधे आलो. तेव्हा कोणत्या गुन्ह्यासाठी मी जेलमधे आलोय हे मला माहिती नव्हते. पॅडवर कागद ठेऊन मी लिखाण केले. जेलमधे लिखाणास वेग होता. माझ्या जेलच्या अनुभवांवरून माझे एक पुस्तक येत आहे. हे मी न्युज चॅनेलच्या बाईटमधून सांगत होतो. पण हे पुस्तक लिहून झाल्यावर ते छापण्यासाठी ओळखीचे प्रकाशक तयार झाले नाहीत. कारण त्यांना वाटत होते, हे पुस्तक छापल्यास आपणावर सरकारी धाड पडेल. न्यू एरा पब्लिशिंग हाऊसचे शरद तांदळे यांनी ते धाडस दाखविले. तुरुंगाच्या लोखंडी गजांनी, रंग उडालेल्या भयाण उंच भिंतीनी मला लिहिण्याची प्रेरणा दिली.'

 प्रसिद्ध पत्रकार राजू परुळेकर यांनी या पुस्तकास  मर्मभेदी प्रस्तावना लिहिली आहे. ते लिहितात.. ‘काळोखास आव्हान देऊन त्यात उडी मारणारी माणसं फार कमी असतात. मुळात ती माणसं जन्मतः तशीच असतात.  संजय राऊत हा एक असाच माणूस. शेकडो निरपराध मानवतावादी पत्रकार, राजकीय नेते , उद्योजक तुरुंगात डांबले जात आहेत. त्यातला सर्वात ङोळस पत्रकार आणि खासदार म्हणजे संजय राऊत. अनेक आमिषं, अनेक धमक्या आणि गद्दारीचे अनेक मोह टाळून त्याने ईडीच्या तुरुंगात त्याने उडी घेतली. आपण निरपराध असताना त्याने तुरूंगाचा काळोख स्विकारला. त्या तुरूंगातला देश दिसू लागला. त्याचेच हे मर्मभेदक लिखाण, नरकातला स्वर्ग.'

 फार वर्षापूर्वी मगध राजधानीत एक चणक' नावाचा विचारवंत शिक्षक होता. तो सैनिकातले गुंड, छळवादी जमीनदार, भ्रष्टाचारी मंत्री आणि त्यांचे नातेवाईक यांच्याबाबत जनजागृतीपर भाषणे देत असे. बाजारात, मंदिरात, चौकात त्याची भाषणे अत्यंत लोकप्रिय होत होती. याची भिती सत्तेतील चांडाळ चौकडीस लागताच त्यांनी खुनी लोकांना सुपारी देऊन त्या चणकास एकांत ठिकाणी गाठून निर्दयपणे फाशी दिली. त्याच्या मयतावर आलेल्या लोकांनी सांगीतले की यामागे सत्तेतील धटिंगण आहेत. तेव्हा मरणाच्या भितीने चणकाची बायको आपल्या लहान मुलास घेऊन रातोरात भूमिगत झाली होती. तो लहान मुलगा विख्यात विचारवंत चाणक्य होता. चणकचा सुपुत्र चाणक्य.

जगभरात विचार सांगणा-या लोकांना सत्तांध शक्तींचा सामना करावा लागतो हे आपण वाचलेच आहे. युरोपातील शास्त्रज्ञ  ‘गॅलिलिओ' याने विज्ञानाच्या आधारे सांगीतले की पृथ्वी गोल असून ती सूर्याभोवती फिरत आहे. पण त्याकाळी त्यांच्या धर्मग्रंथात लिहिले होते की पृथ्वी चपटी आहे. धर्मग्रंथाचा अपमान केला हा ठपका ठेवून, शास्त्रज्ञाचा छळ करण्यात आला. तो आपल्या मतावर ठाम राहिल्याने त्यास विष घेण्याची घोर शिक्षा देण्यात आली. आपल्या महाराष्ट्रात संत श्री ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधील गीता ग्रंथ मराठीत आणला. ‘भावार्थ दीपिका ' ग्रंथ असून त्याकाळी तो जनसामान्यांपर्यंत पोहचू शकला नाही. २१ व्या वर्षी समाधी घेताना ज्ञानेश्वरांनी तो ग्रंथ आपल्या मांडीवर घेतला होता. म्हणून तो ग्रंथ वाचला नाहीतर तत्कालीन धर्ममार्तंडांनी तो जाळला असता; पाण्यात बुडवून किंवा जमिनीत गाडून नष्ट केला असता. कोणत्याच धमक्यांना, कोणत्याच अमिषांना पत्रकार/संसदपटू संजय राऊत बाधत नाही हे पाहून पत्राचाळ प्रकरण, थोडीशी जमीन खरेदी प्रकरण ताणून तो तपास ईडीकडे देऊन, न्यायालयात केस उभी करून त्यांना ‘ऑर्थर रोड जेल' मधे डांबले असे राऊत यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षातील अनेकांना खोट्या प्रकरणात गोवून त्याच जेलमधे टाकले होते. त्यांच्या सुरस कथाही या पुस्तकात वाचावयास मिळतील. राऊत १०१ दिवस जेलमधे खितपत पडले. त्या अनुभवातून हे महत्वपूर्ण पुस्तक साकारले आहे.


 या लक्षवेधी पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय तुरूंग व्यवस्थापनाची भयानक बाजू उजेडात आली आहे. तुरुंगात कैदी गंभीर आजारी पडला तर त्यास अनेक अवघड प्रक्रियेतून जावे लागते. तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी कोंबून ठेवतात. कारण कैदी वाढतात; पण तुरूंग जुनेच आहेत. कुणाला बिछाना असतो, ब-याच लोकांना तो नसतो. इतर साधन सामुग्रीवरून कैंद्यात मारामारी होते. सुट्टीच्या दिवशी दोन वेळचे जेवण दुपारीच दिले जाते. त्यामुळे ते संध्याकाळपर्यंत थंडगार होते. रात्रभर प्रखर लाईट जेलमधे चालूच असते. झोप येणे कठीण होऊन जाते. अचानक पहाटे तुरुंगाच्या लोखंडी गजांवर हातोडा जोरात मारून ते तपासले जातात. त्यामुळे झोपमोड होते. महत्वाच्या कैद्यांवर धटिंगण हल्ला करतात. काही सुविधा हव्या असल्यास पैसे मोजावे लागतात. ज्याच्यावर खुप पैसा आहे ते लोक जेलमधे चांगले राहू शकतात. पण मध्यमवर्गीय लोकांचे हाल कुत्रा खात नाही. तुरुंगातून लिहिलेली पत्रे सेन्सॉर होतात. कित्येकांची पत्रे कधीच घरी पोहचत नाहीत. बाहेरच्या लोकांना मुंबईत राहणे परवडत नाही म्हणून ते कैदी माणसास भेटण्यास येतच नाहीत. तुरुंगातील भ्रष्टाचार हा आपल्या कल्पनेपलिकडचा आहे. या पुस्तकातून तो उजेडात आला आहे.

तुरुंगात जाण्यापूर्वी आणि गेल्या नंतर राऊतांनी काय लढा दिला त्याची बरीचशी माहिती या पुस्तकात आहे. त्यांनी नरेंद्र मोदी यांना लिहलेले पत्र अत्यंत बोलके आहे. मोदी साहेब गुजरातचे मुख्यमंत्री आणि अमित शहा गृहमंत्री असताना घडलेल्या घटना, त्याचे परिणाम, त्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेले निर्णय सांगितले आहेत. स्वतःच्या आईस लिहलेले पत्र भावनाप्रधान आहे. तसेच उद्योजक गरवारे, अविनाश भोसले, उके बंधू, सुरश्रींचा पणतू पीटर हे ऑर्थर जेलमधे कसे आले त्याचे विवेचन वाचनीय आहे. पश्चिम बंगालच्या खासदार ममता बॅनर्जी यांची केलेली छळवणूक यात शब्दांकित आहे. तसेच या पुस्तकात काही शैलीदार वाक्येही आली आहेत. १- सध्या आपली न्यायव्यवस्था, संसद, प्रशासन आणि पत्रकारिता या चार स्तंभाचे दशावतार चालू आहेत. २- सामर्थ्याचा उगम बंदुकीच्या गोळीतून होतो. ३ या जेलमध्येे जणू मी विपश्यनेस' आलोय. ४- एक ग्रंथालय आहे ते गुरूजींच्या मर्जीवर उघडते. त्यामुळे पुस्तकेही बंदी होऊन जातात. ५- ईडीच्या ९९ टक्के प्रकरणात कुणाला शिक्षा झाली नाही. ६- पास आना मना, दुर जाना मना, जिंदगी सफर, कैदखाना बना. ७- तुरुंगाच्या बाबतीत आपण केनियाच्या मागे आहोत. ८- जेलमधील जीवन आयुष्यातील नवी पोतडी आहे. ९- आमच्यासारखे लोक सरकारला भूते वाटत असावीत म्हणून त्यांनी आम्हास कसाबच्या कोठडीत ठेवले. १०- तुरुंगातील चांगल्या सोयीसाठी अतिरेकी कैदी असणे गरजेचे आहे. ११- माझ्या कोठडीत सुर्याकिरणांचा काही संबंध नव्हता, असे धक्कादायक पुस्तक कधी वाचून पूर्ण होते कळतच नाही.

जेलमधे जाण्याच्या भितीने माणसांची झुरळे होतात तर वाघांच्या मांजरी होतात. पण मी जेलला घाबरलो नाही असे राऊतांनी म्हटले आहे. १०१ दिवसांच्या नाहक जेलमधून सुटल्यावर थेट शिवतीर्थावर जाऊन ते बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गेले आणि नतमस्तक झाले. संघर्ष करण्याचे आणि लढा देण्याचे धडे बाळासाहेबांनीच दिले होते, असे ते म्हणतात. तुमची सत्याची बाजू असेल तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभे रहा असे सांगणा-या लोकमान्य टिळकांची त्यांनी याद केली आहे. प्रत्येकास आपले युध्द लढावे लागते असा मतितार्थ राऊतांनी या पुस्तकात सांगितला आहे. ऑर्थर जेलच्या बराक नं. २ मधील पुसट..पण अर्थपूर्ण काव्य ओळींनी या पुस्तकाची सांगता झाली आहे. त्या काव्यपंक्ती - ‘अपना अपना युध्द सभिको, हर युगमें लढना पडता है और समयके शिलालेखपर, खुद को खुद गढना पडता है !'

आजचे राजकारण हे शब्दांच्या पलिकडचे आहे. ते सोडून एका पत्रकाराची, एका दैनिकाच्या संपादकाची कथा आणि व्यथा समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे. पुस्तकाचे शीर्षक  जरी ‘नरकातला स्वर्ग' असले तरी हे पुस्तक साहित्यिक दृष्टिकोनातून दर्जेदार आहे.

नरकातला स्वर्ग
लेखक - संजय राऊत, प्रकाशक - न्यु एरा प्रकाशन, पुणे.
प्रथम आवृत्ती 2025

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर