महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
महापालिका आयुक्तांचा शाळा दौरा
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी १३ फेब्रुवारी रोजी महापालिका शाळांचा पाहणी दौरा केला. तत्कालीन आयुक्त विकास ढाकणे यांनी सुरु केलेल्या ‘आदर्श शाळा' उपक्रमाला पुढे चालना देण्यासाठी त्यांनी निवडलेल्या शाळांना भेट देऊन वस्तुस्थितीची माहिती घेतली. या दौऱ्यात शाळेच्या बांधकामातील विविध त्रुटींवर लक्ष केंद्रित करुन आयुवत आव्हाळे यांनी बांधकाम आणि विद्युत अभियंत्यांना सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी शाळा क्र.८, २९ आणि २३ यांची सखोल पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी केली. वाचन कौशल्य चाचणीत काही त्रुटी निदर्शनास आल्यामुळे शाळा क्रमांक-८ मधील शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस जारी करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास संबंधित शिक्षकांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
याशिवाय शाळा क्र.८ च्या परिसरात अनेक दिवसांपासून नियमबाह्य असलेली टपरी तत्काळ हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने संध्याकाळपर्यंत महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागामार्फत सदर टपरी हटविण्यात आली.
शाळेच्या अभ्यासिकेचे आणि इमारतीच्या सुरु असलेल्या बांधकामाचेही आयुक्त आव्हाळे यांनी निरीक्षण केले. आवश्यक सुधारणा सुचवत, सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या पाहणीदरम्यान महापालिकेच्या सहायक आयुक्त मयुरी कदम, प्रशासन अधिकारी कुंदा पंडित, बांधकाम अभियंता दीपक ढोले, विद्युत अभियंता हनुमंत खरात आणि इतर अधिकारी उपस्थित होते.