सानपाडा येथील किरण सिंहा संघ विजेता
नवी मुंबई : रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या औषध विक्रेत्यांना शारीरिक आणि मानसिक तणावातून थोडा विराम मिळावा आणि औषध विक्रेत्यांमध्ये क्रीडा गुणांना वाव मिळावा या उद्देशाने नवी मुंबईतील किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांसाठी पहिल्यांदाच ‘सद्गुरु चषक अंडर आर्म क्रिकेट स्पर्धे'चे आयोजन ९ फेब्रुवारी रोजी घणसोली सेक्टर ९ येथील एएसपी शाळेच्या मैदानावर सानपाडा येथील सद्गुरु एजन्सीचे मालक शामशेठ यांच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेचे विजेतेपद सानपाडा किरण सिंहा संघाने पटकावले. तर तुर्भेच्या रॉयल चॅलेंजर्स संघाने द्वितीय क्रमांक मिळवला.
नवी मुंबईच्या विविध नोड्समधून एकूण १६ संघ व जवळपास २०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. खेळाडूंनी उत्कृष्ट क्रिकेट कौशल्याचे प्रदर्शन करत अतिशय चुरशीचे सामने खेळले. विजेत्यांना नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर शेठ पिंगळे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सद्गुरु एजन्सीच्या सर्व कर्मचारी वर्गासह केमिस्ट विकास ग्रुपचे सदस्य प्रवीण खैरे, सतीश कोल्हे, प्रल्हाद सती, शांताराम पवार, प्रवीण आहेर, धनाजी भोसले, शशिकांत रासकर, सुनील जाधव, रमेश महाजन, हेमंत काटकर, विजय खोपडे, सुरेश धोंडे, नाना पिसाळ यांनी विशेष सहकार्य केले. मुख्य आयोजक शाम शेठ पिंगळे यांनी यावेळी सांगितले की, औषध विक्रेत्यांमधील क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन यापुढेही सातत्याने करण्यात येईल.