पनवेलमधील २७० शाळांमध्ये ‘शिक्षण सप्ताह'चे आयोजन

पनवेल : ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०'च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त २२ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील २७० शाळांमध्ये ‘शिक्षण सप्ताह'चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये आयुक्त मंगेश चितळे यांच्या सुचनेनुसार शिक्षण सप्ताह अंतर्गत आठवड्याच्या प्रत्येक दिवशी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

या ‘शिक्षण सप्ताह'मध्ये शिक्षण आणि विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते आणि विद्यार्थी यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिवांनी याबाबत  व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे ‘शिक्षण सप्ताह'मध्ये  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात सांगितले आहे. त्यानुसार  शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली २२ ते २८ जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

२२ जुलै रोजी ‘अध्यापन साहित्य दिवस' या अंतर्गत वर्धित शिक्षण, पर्यावरणीय शाश्वतता, कौशल्य विकास यावर आधारित कार्यक्रम घ्ोण्यात आले. २३ जुलै रोजी मूलभूत संख्याज्ञान-साक्षरता दिवस साजरा करण्यात आला. या अंतर्गत पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये वाचनात प्राविण्य मिळवण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम महापालिकेच्या १० शाळांमध्ये राबविण्यात आले.

२४ जुलै रोजी क्रीडा दिवस अंतर्गत क्रीडा आणि स्वास्थ्याच्या दृष्टीने खिलाडूवृत्ती आणि नैतिक वर्तणूक यातील सकारात्मक वृत्ती विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहे. तर आज २५ जुलै रोजी सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमाचे, २६ जुलै रोजी कौशल्य-डिजीटल उपक्रमामध्ये शैक्षणिक यशोगाथा, डिजिटल शिक्षणाचे फायदे अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

तसेच २७ जुलै रोजी ‘मिशन लाईफ'च्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम आणि शालेय पोषण दिवस साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये पर्यावरणातील गंभीर समस्या, हवामान बदल, मतदान आणि संसाधनांची कमतरता याबद्दल जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. २८ जुलै रोजी समुदाय सहभाग दिवस साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये शिक्षण मंत्रालय अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे ‘विद्यांजली' या शालेय स्वयंसेवक व्यवस्थापन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

दरम्यान, ‘शिक्षण सप्ताह' अंतर्गत महापालिकेच्या १० शाळांमध्ये रोज नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी महापालिकेचे सर्व शिक्षकवृंद कार्यरत आहेत. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 रा. फ. नाईक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालयात टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मानवंदना