दिवा कोळीवाडा येथील संजना नाईक हिचा रशियामधून एमबीबीएस झाल्याबद्दल सत्कार
नवी मुंबई : ऐरोली-दिवा परिसरातील पहिली एमबीबीएस डॉक्टर म्हणून डॉ. संजना नाईक हिने परदेशात रशिया येथे शिक्षण घेऊन आपल्या जन्मभूमीचे नाव उंचावले आहे. २४ जुलै रोजी दिवा कोळीवाड्यातील ग्रामस्थांकडून तिचा जाहीर सत्कार करण्यात आला.
संजना हिचे १० वी पर्यंतचे शिक्षण ऐरोली सेक्टर ३ येथील श्रीराम विद्यालयात झाले, तर बारावीचे शिक्षण ऐरोलीच्या मेहता महाविद्यालयात झाले. १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर डॉक्टर होण्याची मनाची तयारी असलेल्या संजनाने वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी थेट सातासमुद्रापार कझान शहरात रशिया गाठले. तिथे तिने सहा वर्षापूर्वी रशियातील मारी युनिव्हर्सिटी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. अभ्यासात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये यासाठी तिच्या कुटुंबियांमधील नाईक परिवाराने पुरेपूर काळजी घेतली. वैद्यकीय शिक्षणासाठी आणि करियर घडवण्यासाठी प्रेरक व्यक्ती या यशामागे आई-वडिल असल्याचे ती सांगते. गेल्या वर्षी अल्पशः आजाराने तिच्या वडिलांना देवाज्ञा झाली. आता लवकरच दवाखाना उघडणार असून गोरगरिबांची वैद्यकीय सेवा सुश्रुषा करण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितले. डॉ.संजना नाईक हिचा दिवा कोळीवाड्यातील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणात ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार होत असताना माजी नगरसेवक चेतन नाईक, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश नाना नाईक, बंडू केणी, राजेश मढवी, प्रल्हाद नाईक, सदानंद नाईक, दीपक पाटील यांच्यासह डॉ. संजना नाईक हिचे भाऊ सागर नाईक आणि कुणाल नाईक उपस्थित होते.