महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
‘जिल्हा परिषद'च्या ८ शाळा नादुरुस्त; ९ शाळांमधील १८ वर्गखोल्या धोकादायक
नवीन पनवेल : पनवेल मधील ‘जिल्हा परिषद'च्या ८ शाळा नादुरुस्त आहेत. अडीवली, रोहिंजण, वडघर, वडघर आदिवासी वाडी, दिघाटी, बौदधवाडी, पापडीचा पाडा, केळवणे येथील शाळा नादुरुस्त आहेत. या शाळांच्या दुरुस्तीसाठी ५२.६५ लाख रुपयांचा प्रस्ताव ‘रायगड जिल्हा परिषद'कडून राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. तर धोकादायक ९ शाळा असून वर्ग खोल्यांची संख्या १८ आहे.
धोकादायक शाळांमध्ये कामोठे, कन्या शाळा गव्हाण, चिखले, कोळखेपेठ, लोणीवली, दुंदरे, वाकडी, तळोदा पाचनंद उर्दू, सवणे या ९ शाळांमधील १८ वर्ग खोल्या धोकादायक आहेत. यापैकी कामोठे येथील वर्ग खोल्या वापरात नाहीत. कन्या शाळा गव्हाण येथील वर्गखोली पाडण्यात आलेली आहे. चिखले येथील एक खोली वापरात नाही. कोळखेपेठ येथील खोलीचा जागेचा वाद सुरु आहे.
लोणीवली येथील दोन खोल्या वापरत नाहीत. दुंदरे येथे या खोल्यांमध्ये अंगणवाडी बांधण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. वाकडी येथील खोली वापरात नाही. तळोजा पाचनंद उर्दू येथील ३ खोल्या वापरात नाहीत. तर सवणे येथील एक खोली वापरात नाही. यातील धोकादायक आणि नादुरुस्त असलेल्या काही शाळा महापालिका हद्दीतील आहेत. धोकादायक वर्ग खोल्या पाडण्यासाठीचा प्रस्ताव ‘रायगड जिल्हा परिषद'कडे येथे पाठवण्यात आल्याची माहिती शिक्षण विभाग, पनवेल पंचायत समितीकडून देण्यात आली.
आता शाळा सुरु झालेल्या आहेत. पनवेल तालुक्यातील ‘जिल्हा परिषद'च्या शाळेमध्ये हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. काही ठिकाणी शाळा सुस्थितीत आहेत, तर काही ठिकाणी गळक्या शाळा आहेत. काही शाळांवर छप्पर टाकण्यात आले आहे. त्यामुळे नादुरुस्त झालेल्या शाळांसाठीचा निधी लवकरात लवकर मंजूर होणे गरजेचे आहे. निधी मंजूर झाल्यास शाळा दुरुस्ती करणे सोपे होईल.
नादुरुस्त शाळांसाठी ‘जिल्हा नियोजन समिती'मधून मंजुरी प्राप्त आहे. तसेच युडायस प्रणाली मार्फत शासनाकडे तरतुदीची मागणी केलेली आहे. धोकादायक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसवत नाहीत. त्यांची इतरत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच धोकादायक शाळा पाडण्याची प्रक्रिया सुरु आहे. -अभिजीत मटकर, कनिष्ठ अभियंता, जिल्हा परिषद.