ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
पनवेल महापालिका तर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ट्युलिप इंटर्नशिप पत्राचे वाटप
पनवेल : आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महापालिकेच्या घनकचरा- स्वच्छता विभागामध्ये ट्युलिप अर्थात द अर्बन लर्निंग इंटर्नाशिप प्रोग्रॅम राबविला जात आहे. ट्युलिप केंद्र शासनाचा उपक्रम असून विद्यार्थ्याना शहरी प्रश्नांची जाणीव व्हावी आणि महापालिका करत असलेल्या कामाचे स्वरूप समजवून घेऊन आपल्या नवनवीन संकल्पना राबविण्याविषयी प्रोत्साहन देण्यात येत असते.
सदर ट्युलिप कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या वतीने ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये पिल्लई इंजिनिअरींग कॉलेजचे ७ आणि सरस्वती इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्यांची निवड महापालिकेने केली आहे. उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या हस्ते सदर विद्यार्थ्यांना इंटर्नशिप पत्राचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी घनकचरा-आरोग्य विभागाचे विभागप्रमुख अनिल कोकरे, पर्यावरण विभागाचे विभाग प्रमुख मनोज चव्हाण तसेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यामध्ये कार्यात्मक कौशल्ये वाढविणे आणि त्यांच्या ऊर्जा आणि कल्पनांचा उपयोग करुन शहरांच्या भविष्यासाठी उपाय तयार करण्यासाठी सहनिर्मिती करणे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रम, आव्हाने यामध्ये विद्यार्थी पर्यायाने तरुणवर्गाचा सहभाग वाढविण्यासाठी ट्युलिप कार्यक्रमाची संकल्पना सुरु करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत पिल्लई इंजिनिअरींग कॉलेज आणि सरस्वती इंजिनिअरींग महाविद्यालयाचे विद्यार्थी एक महिना महापालिकेच्या ‘स्वच्छ भारत अभियान'चे काम पाहणार आहेत.
या एक महिन्यामध्ये विविध सोसायट्यांमध्ये जाऊन कचरा वर्गीकरण आणि घरातील कचऱ्यापासून खत निमिर्ती करण्याविषयी सदर विद्यार्थी जनजागृती करणार आहेत. तसेच शाळा सुरु झाल्यानंतर विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये कचरा वर्गीकरण,त्यांचा पुर्नवापर, खत निर्मिती या विषयांवर माहिती देणार आहेत.
इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर सेदर विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राचा उपयोग विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सक्रिय सहभाग नोंदवावा. - डॉ. वैभव विधाते, उपायुक्त-पनवेल महापालिका.