‘सीकेटी हायस्कुल'मध्ये व्याख्यान, निबंध स्पर्धा संपन्न

पनवेल : माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन-संरक्षण याचे महत्व शालेय स्तरावर बाल वयात विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी शासन निर्देशानुसार पनवेल महापालिकेच्या वतीने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सीकेटी हायस्कुल'मध्ये ‘पाणी' या विषयावर व्याख्यान आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरणाचे महत्व शालेय विद्यार्थ्यांना समजावे यासाठी पर्यावरण सेवा योजना पनवेल महापालिकेच्या वतीने महापालिका कार्यक्षेत्रातील २५ माध्यमिक विद्यालयांमध्ये राबविण्यात येत आहे. सदर ‘योजना'ची माहिती देण्यासाठी २५ माध्यमिक शाळांच्या प्रतिनिधींची बैठक उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात घेण्यात आली होती. या पर्यावरण सेवा योजनांतर्गत आकाश, जल, वायू, भूमी, अग्नि या ‘माझी वसुंधरा अभियान'मधील महत्वाच्या घटकांनुसार कृती कार्यक्रम, शिबिरे, व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वृक्षारोपण, प्रश्नमंजुषा, आदि उपक्रमांचे आयोजन विविध विद्यालयांमध्ये करण्यात येत आहेत.
त्यानुसार २८ फेब्रुवारी रोजी ‘सीकेटी हायस्कुल'मध्ये ‘पर्यावरण सेवा योजना'ची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. माझी वसुंधरा अंतर्गत ‘पाणी' या विषयांतर्गत पाण्याचे संवर्धन यावर व्याख्यान देण्यात आले. तसेच ‘पृथ्वीवरील माती' या विषयावर निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी झाडे दत्तक घेऊन त्यांना वाढविण्याविषयी सांगण्यात आले. याचबरोबरच ‘पर्यावरण संवर्धन'वर आधारित व्हिडीओ विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. तसेच पर्यावरण वाचविण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.

याप्रसंगी इंग्रजी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, उच्च माध्यमिक विभाग प्राचार्य प्रशांत मोरे, माध्यमिक विभाग मुख्याध्यापक कैलास सत्रे, मराठी प्राथमिक विभाग मुख्याध्यापक सुभाष मानकर, उच्च माध्यमिक विभाग पर्यवेक्षक अजित सोनवणे, माध्यमिक विभाग पर्यवेक्षक कैलास म्हात्रे, पर्यावरण सेवा योजना समन्वयक हरिश्चंद्र ठाकूर तसेच इयत्ता ६ वी ते ८ वीचे  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, अशा पध्दतीने महापालिकेच्या वतीने विविध शाळांमध्ये कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

निबंध स्पर्धेतील विजेतेः इयत्ता सहावी गट- अनन्या अजय पयेर (प्रथम). गार्गी महेश म्हात्रे (द्वितीय), दिव्या देविदास मुळीक (तृतीय).
इयत्ता सातवी गट- वेदांत नितीन शिंदे (प्रथम), नंदिनी उमेश साळुंखे (द्वित्तीय), वरद नवनाथ गावडे (तृतीय).
इयत्ता आठवी गट- भक्ती संतोष पाटील (प्रथम), माधवी दगडू काबुगडे (द्वितीय), अर्पिता प्रदीप टेमघिरे (तृतीय). 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

गोठीवलीच्या नमुंमपा शाळेला विज्ञान एकांकिका स्पर्धेत पारितोषिक