‘नमो चषक क्रिकेट स्पर्धा'ची सांगता

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात ‘नमो चषक-२०२४'ची सुरुवात झाली आहे. याच अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा-महाराष्ट्र, १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या माध्यमातून आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने नमो चषक-२०२४ आणि भव्य ‘क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव'मधील क्रिकेट स्पर्धेची सांगता करावे येथील कै. गणपतशेठ तांडेल मैदानामध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आली.

बेलापूर विधानसभा क्षेत्रामधील संपूर्ण विभागामध्ये ‘नमो चषक' स्पर्धा पार पडल्या. त्याचप्रमाणे गेला महिनाभर ज्येष्ठांकरिता, महिला आणि तरुण-तरुणींसाठी फुटबॉल, कॅरम, बुध्दीबळ, कबड्डी तसेच १०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, नृत्य, गायन, वेशभूषा, चित्रकला अशा विविध स्पर्धा पार पडल्या. या सर्व स्पर्धांना लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धांदरम्यान हजारो स्पर्धकांनी ‘नमो ॲप्स'वर आपली नाव नोंदणी करुन सहभाग नोंदविला, अशी माहिती आयोजिका आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.

‘नमो चषक-२०२४' अंतर्गत सुरु असलेल्या क्रिकेट स्पर्धेची सांगता करावे येथील कै. गणपतशेठ तांडेल मैदान येथे उत्साहात पार पडली. या क्रिकेट स्पर्धेमध्ये बेलापूर विधानसभा क्षेत्रातील एकूण २८ संघ तसेच ४० प्लस मधील ८ संघांनी सहभाग नोंदविला होता. नवी मुंबईतील तरुणांना एक व्यासपीठ निर्माण व्हावे आणि नवी मुंबईतील खेळाडू राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप निर्माण करतील, या उद्देशाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जय गजानन तुर्भे या संघाने पटकावला. त्यांना रोख १,५०,००० रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. उपविजेत्या आराध्या-शहाबाज संघाला रोख १,००,००० रुपये आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले.  याशिवाय या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज अक्षय कोळी, उत्कृष्ट गोलंदाज अजित चव्हाण, उत्कृष्ट क्षेत्रक्षक राकेश यांना देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच संपूर्ण स्पर्धेमधील उत्कृष्ट मालिकावीर म्हणून रवी म्हात्रे यांना मोटारसाईकल बक्षीस म्हणून देण्यात आली.

स्पर्धेत ४० प्लस संघांचे सामने  खेळविण्यात आले. यामध्ये प्रथम पारितोषिक सारसोळे ४०प्लस संघ तर द्वितीय पारितोषिक दारावे ४० प्लस संघाने पटकावले. उत्कृष्ट फलंदाज जयेश मेहेर, उत्कृष्ट गोलंदाज रवी तांडेल यांना देखील पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमधील उत्कृष्ट मालिकावीर म्हणून राजेश भोईर यांनाही गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या संघातील प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

‘नमो चषक क्रिकेट स्पर्धा'च्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक काशिनाथ पाटील, सुनील पाटील, निलेश म्हात्रे, समाजसेवक दिलीप पाटील, कुंदन म्हात्रे, पुण्यनाथ तांडेल, जयवंत तांडेल, गुरुनाथ तांडेल, संजय ओबेरॉय, विकास सोरटे, प्रताप भोसकर, सचिन नाईक तसेच शेकडो खेळाडू आणि नागरिक उपस्थित होते.

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार

Read Next

‘पनवेल'मध्ये लवकरच क्रिकेट प्रशिक्षण अकादमी -दिलीप वेंगसरकर